आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनिकिन्स हटाव...कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल कपड्यांच्या दुकानांच्या बाहेर वस्त्र-प्रावरणांची जाहिरात करणारे पुतळे उभे करून ठेवले जातात. अगदी मग ते स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचे असोत की पुरुषांच्या शर्ट पॅँट वा टी शर्टचे. मुळात हे पुतळे दुकानांच्या बाहेर उभे करणे हे अत्यंत नियमबाह्य असून त्यावर बंदी आणली पाहिजे. कारण इथे प्रश्न आहे, तो सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचा. अतिक्रमण ही जाहिरातबाजी होऊ शकत नाही! त्यामुळे दुकानाच्या बाहेर कपडे परिधान केलेले पुतळे उभे करण्यास परवानगी द्यायला नको. परंतु दुकानांच्या आत मांडण्यात येणारे कपडे किंवा कपडे परिधान केलेल्या पुतळ्यांवर बंदी घालणे हा तद्दन मूर्खपणा आहे. कारण पुतळ्यांना अंतर्वस्त्र घातल्याशिवाय संबंधित दुकानदारांना अंतर्वस्त्रांची जाहिरात कशी करता येणार? जाहिरात जरूर करावी, फक्त त्यात बीभत्सपणा नसावा. पण मला इथे सांगावेसे वाटते की, अंतर्वस्त्र परिधान करून उभा असलेला स्त्रीचा पुतळा गेली पन्नास वर्षे मी बघत आलोय. मुंबईतील नाना चौकात माझ्या वडलांचे एक दुकान होते. या दुकानात ब्रेसिअर घातलेला एका स्त्रीचा अर्धाकृती पांढरा पुतळा तर मी लहानपणापासून बघत आलोय. पण त्या पुतळ्यामुळे मी काय नि माझे मित्र काय, कोणाच्याही भावना कधीच चाळवल्या गेल्या नाहीत. आजच्या पिढीला मासिके, इंटरनेटसारख्या मिळत असलेल्या सुविधा आमच्या वेळी नव्हत्या. मग असे असताना या अर्धाकृती पुतळ्यामुळे आमच्या भावना चाळवल्या जायला हव्या होत्या. पण तसे काही झाले नाही आणि कोणाच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही!

साधारणपणे अंतर्वस्त्राची जाहिरात करणारे हे पुतळे पांढर्‍या रंगाचे असतात आणि त्याला कोणतीही ‘फीचर्स’ नसतात. फक्त ती एक शरीराकृती असते आणि त्यावर हे कपडे चढवले जातात. पण त्यामुळे भावना चाळवल्या जाऊन बलात्काराची प्रकरणे होऊ शकतात, असा विचार करणे खरोखरच मूर्खपणाचे आहे. आज महाराष्ट्रासमोर अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत, त्याकडे प्राधान्याने लक्ष पुरवले पाहिजे. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींमुळे राजकीय पक्ष आपलेच हसे करून घेत आहेत, असे मला वाटते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येक जाहिरात एजन्सी प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याअगोदर आपला ग्राहक कोण आहे, याचे तारतम्य बाळगूनच उत्पादनांची जाहिरात करत असते. त्यामुळे ब्रेसिअरची जाहिरात लहान मुलांच्या कार्टून वाहिन्यांवर तुम्हाला दिसणार नाही. हल्ली बलात्कार, छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे, हे खरे. त्यासाठी एक वेळ मॅनिकिन्स होर्डिंग्ज, जाहिराती बंद करू; पण आज मुंबईच नाही तर ग्रामीण भागातील तरुण मुलीसुद्धा तंग जीन्स वा टी शर्ट घालताना दिसतात. आपण त्यावरही बंदी घालणार आहोत का? मला वाटते की कोणी कसले कपडे घालून रस्त्यावर फिरावे, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो वैयक्तिकच राहावा. हे सांगण्याचे कारण असे की, पुतळ्यांवर बंदी घालणे हे संस्कृतिरक्षकांचे पहिले पाऊल आहे. त्यात ते यशस्वी ठरले तर ज्या मुली ‘प्रोव्होकेटिव्ह’ प्रकारातले कपडे घालतात, त्यांच्याकडे या मंडळींचा मोर्चा वळू शकतो. मुळात मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे कपडे घालण्याबाबत जर पालकांकडून स्वातंत्र्य देण्यात आले असेल, तर मग त्यांनी कपडे कोणते परिधान करावे, हा निर्णय महापालिका कशी घेऊ शकते?

एकीकडे आपण म्हणतो की, बलात्कारासारख्या घटना कमी करण्यासाठी लैंगिक शिक्षणाबद्दल जागृती केली पाहिजे. पण काही वर्षांपूर्वी मला महिलांनी असे सांगितले की, घरी मुले सारखे अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात, त्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती बंद करा. त्यापेक्षा हे उत्पादन काय आहे, त्याचे हायजेनिक महत्त्व काय, हे सांगणे पालकांचे कर्तव्य नाही का? या काही लपवण्यासारख्या गोष्टी नाहीत. मुलांनी प्रश्न विचारले म्हणून डोळे बंद करून घ्यायचे का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

शेवटी एक सांगावेसे वाटते की, ज्या राजकीय पक्षांनी मॅनिकिन्सला विरोध केला आहे, त्यांनी खरोखरच काही भरीव कार्य करायचे असेल तर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपापल्या प्रभागात अश्लील चाळे, मुलींची छेड काढणे यांसारखे प्रकार शोधून काढून पोलिसांमध्ये त्यांची
तक्रार केल्यास ते खरे सामाजिक कार्य केल्यासारखे होईल.
‘अमुक बंद करा, तमुक बंद करा’ म्हणजे आपला समाज चांगला होईल, हा विघातक विचार आहे.
वस्तुत: ब्रा, पॅँटी न घालणार्‍या चार-पाच वर्षांच्या मुलीवरही बलात्कार होतात. त्यासाठी अगोदर विकृत माणसांना धडा शिकवण्याची गरज आहे. ब्रा आणि पॅँटीजच्या प्रदर्शनामुळे विकृती वाढते, हा हास्यास्पद दावा आहे.

अश्लीलता म्हणजे काय, हे नगरसेवकाने नव्हे न्यायालयाने ठरवावे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने एखादा ठराव करून त्यावर चर्चा करण्यापेक्षा, न्यायालयात माहितीच्या अधिकाराखाली तक्रार दाखल करावी. पुतळ्यांना अंतर्वस्त्र परिधान करणे ही अश्लीलता आहे, असा जर सर्वोच्च न्यायालयाने उद्या निकाल दिला तर कोणाचाच विरोध राहणार नाही. विषय संपला!
(bharatdabholkar@gmail.com)