आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षरांचं गणराज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू शतकातलं मराठी साहित्य एकसंघ नाही. त्याचा तंबू एकखांबी नाही. त्याचा अंमल एकछत्री नाही. त्याचं विधान एकआवाजी नाही. त्याची व्हिजन एकांगी नाही. मराठी साहित्यात कुठल्याही एकाच संवेदनशीलतेची (sensibility) एकाधिकारशाही नाही. आज मराठी साहित्यात किमान चार भिन्न संवेदनशीलतांचा दबदबा आहे. अनुभवाचं ‘इमोशनल प्रोसेसिंग’ म्हणजे संवेदनशीलता.

सामोर्‍या येणार्‍या अनुभवातलं तरल तत्त्व ओळखून ते कथा, कविता किंवा कादंबरीतून मांडण्याचं काम साहित्य करतं. रोजमर्राचं जगणं स्वयंचलित यंत्रासारखं असतं. या यंत्राची कळ जगणारा क्वचितच फिरवतो. परिस्थिती ही कळ फिरवते. जगणारा त्याबरहुकूम जगतो. असं जगणं पराधीन असतं. यंत्रवत जगताना आयुष्याची लिरिकल व्हेन हरवते. या लिरिकल व्हेनचा शोध म्हणजे साहित्य. हा शोध लेखक ज्या चश्म्यातून करतो, तो चश्मा म्हणजे साहित्यिक संवेदनशीलता.

पन्नास आणि साठच्या दशकात मराठी साहित्यात प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवेच्या चश्म्यांची एकाधिकारशाही होती. पुढे लोकशिक्षणाचा प्रसार झाला. साहित्य-संस्कृतीचं लोकशाहीकरण झालं. त्यामुळे गोठलेलं सांस्कृतिक वास्तव वितळू लागलं. हे वितळणं भारतासारख्या पारंपरिक उतरंडीच्या समाजरचनेला छेद देणारं ठरलं. यातून ‘हॉरिझाँटल सोसायटी’ किंवा आडवी समाजरचना उदयास येऊ लागली. ही प्रक्रिया सुरू झालेली असून तिचं समापन नेमकं कोणत्या बिंदूवर होईल, हे कुठल्याही समाजशास्त्रज्ञाला सांगता येणार नाही.

एक खरं, जागतिकीकरणाने भारतासारख्या पारंपरिक समाजात लिबरल डेमॉक्रसीचे वारे वाहू लागले. मीडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडिटेशनचं प्रस्थ वाढलं. एकूणच संस्कृतीचं लोकशाहीकरण झालं. साहित्यातला ‘कन्झर्व्हेटिव’ कालखंड संपून ‘रिपब्लिकन’ कालखंड सुरू झाला. अक्षरांचं गणराज्य (Republic of Letters) उदयास आलं.

या गणराज्याचा पुरावा मराठी प्रकाशन व्यवसाय देतो. कालच्या तुलनेत आज या व्यवसायातली आर्थिक उलाढाल पाचपट, दहापट की शंभरपट झाली? हा प्रश्न रोचक आहे. अक्षरांचं गणराज्य स्थापन झालं की मूठभर लेखकांची राजेशाही खतम होते. शहरोशहरी आणि खेडोपाडी नवे साहित्यिक शिलेदार निर्माण होतात. या प्रत्येकाचा सवतासुभा असतो, प्रत्येकाचं साहित्यिक सत्य चलनात येतं. या गणराज्यात कुठल्याही एकाच लेखकाला किंवा कवीला महासत्य सांगण्याचा विशेषाधिकार नसतो.

अक्षरांच्या गणराज्याचा एक फायदा म्हणजे, लेखकांना संवेदनशीलतेचा मोठा मेन्यू उपलब्ध होतो. त्यातून ते स्वत:साठी हवी ती संवेदनशीलता निवडू शकतात. संवेदनशीलतेचे जुने चश्मे फेकून नवे नाकावर चढवू शकतात. संवेदनशीलतेचा हा निकष वरवर सांस्कृतिक वाटतो, पण तो मुळात राजकीय हक्कांशी निगडित असतो. एखाद्या लिखाणात लेखक स्वत:चं कुठे पोझिशनिंग करतो, या निर्णयावरून त्या लेखकाची साहित्यिक भूमिका ठरते.
अशी कड घेणारी प्रेरणा विशिष्ट मानवी समूहाबद्दल आग्रही भूमिका घेते, म्हणून दलितांचं किती शोषण कराल? हा प्रश्न नामदेव ढसाळ विचारतात. ब्राह्मणांना किती झोडपाल? हा प्रश्न ह.मो.मराठे विचारतात. स्त्रियांना समानता केव्हा? असे ऊर्मिला पवार विचारतात. शेतकर्‍यांच्या आत्महत्या केव्हा थांबणार? हे सदानंद देशमुख विचारतात. विश्वात माणूस एकाकी का? हा प्रश्न विलास सारंग विचारतात आणि होमोसेक्शुअल माणसांचा मानसिक छळ कधी थांबणार? हा प्रश्न एखादा ‘गे’ लेखक विचारू शकतो. हे सगळे प्रश्न पोटतिडकीने विचारलेले आहेत.

हॉरिझाँटल सोसायटीत असे प्रश्न विचारण्यावर पाबंदी नसते. किंबहुना आडव्या, मुक्त समाजाचं वैशिष्ट्य हेच, की त्यात राहणार्‍या प्रत्येक सभासदाला मनात पडलेले चित्रविचित्र, जटिल प्रश्न विचारता येतात. प्रश्न हे चिकित्सेचं पहिलं पाऊल आहेत. ही चिकित्सा सुरू झाली की साहित्यिक संवेदनशीलतेला नवे धुमारे फुटू लागतात. या धुमार्‍यांचं स्वरूप समजून घेतलं तर आपल्याला एकविसाव्या शतकातल्या मराठी साहित्याचा ट्रेंड कळू शकतो.
विसाव्या शतकातल्या मराठी साहित्यात प्रश्नांची रेंज इतकी व्यापक नव्हती. तीस-चाळीस वर्षांपूर्वीची संवेदनशीलता बर्‍यापैकी आखीव-रेखीव होती. ती प्रामुख्याने सौष्ठववादी आणि रूपवादी होती. अनुभवाचं विवेकनिष्ठ, तार्किक आणि सौंदर्यशास्त्रीय निकषांनुसार प्रोसेसिंग करणं, हा त्या काळातला साहित्यिक संवेदनशीलतेचा फंडा होता. हा ‘मौज स्कूल’ने उचलून धरला होता. त्याबरहुकूम साहित्यिक आपल्या लेखनाला सजवत होते. ‘मौजे’च्या टेपने आपापल्या छात्या मोजून बघत होते. फुगवून बघत होते.

मग एक व्यापक राजकीय आणि सामाजिक मन्वंतर आलं. मराठी साहित्यात दलित संवेदनशीलतेने उचल खाल्ली. साहित्यात निखळ रूपवादाऐवजी समतेवर आधारित राजकीय जाणीव मध्यवर्ती झाली. ‘जैसे थे’वादी वर्णाश्रम धर्माला सळसळणार्‍या ह्यूमन राइट्सवादी विचारांनी आव्हान दिलं. सुरक्षित आणि सुरचित साहित्याच्या संवेदनशीलतेत न भूतो न भविष्यति असा पॅराडाइम शिफ्ट झाला. हा बदल एकापेक्षा एक प्रक्षोभक ठरलेल्या दलित आत्मचरित्रांनी घडवून आणला. याच सुमारास मराठी साहित्यात स्त्रीवादी जाणिवेचा शिरकाव झाला. त्यामुळे प्रस्थापित पुरुषप्रधान विचारव्यूहांना आणि सांस्कृतिक हट्टाग्रहांना स्त्रीप्रधान, समताधिष्ठित, जेंडर इक्वलिटीचा पर्याय मिळाला. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात छापल्या गेलेल्या आणि विक्रीचे उच्चांक मोडणार्‍या स्त्रियांच्या आत्मचरित्रांनी मराठी साहित्यात स्त्रीवादी संवेदनशीलता आणि स्त्रीवादी जाणीव कायमस्वरूपी आणून ठेवली.

यानंतर ‘खेड्याकडे चला’ या गांधीवादी घोषणेला उठाव देणारी ग्रामीण किंवा देशीवादी साहित्यिक संवेदनशीलता तरारून वाढली. मातीत कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांनी आपली मुलं शाळा-कॉलेजात पाठवणं सुरू केलं. ग्रामीण आत्मविश्वासाला नवे धुमारे फुटले. ग्रामीण शिक्षितांच्या पहिल्या पिढीने गावोगावच्या सहकारमहर्षींच्या भरवशावर स्वत:चा आर्थिक विकास साधणं सुरू केलं. शेतीत बैलजोडीच्या मदतीला टॅÑक्टर्स आले, मोटेच्या मदतीला किर्लोस्कर पंप आले. खेड्यात नवी चेतना निर्माण झाली.

या चेतनेचं, या ऊर्जेचं कन्व्हर्शन ग्रामीण साहित्यात झालं. या कन्व्हर्शनची वैचारिक भूमिका देशीवादाने तयार केली. स्थानिक बोलीभाषा व स्थानिकच संस्कृतीत रुजलेला देशीवादी विचारव्यूह भालचंद्र नेमाड्यांनी सजगपणे विकसित केला. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात फक्त घामगाळू कष्टच करायचे असतात, या समजुतीला धक्का बसून खेडेगावातसुद्धा बौद्धिक आयुष्याची (life of mind) रोचक शक्यता निर्माण झाली.

तुकारामांच्या अभंगांचा वारसा सांगणार्‍या ग्रामीण साहित्याने कथा, कादंबरी आणि कवितेच्या फॉर्मला आत्मसात केलं. हे करताना वास्तववादाला जवळ केलं. यातून मराठी साहित्याची संवेदनशीलता खर्‍या अर्थाने सर्वसमावेशक झाली. ग्रामीण शिक्षितांच्या या पहिल्या किंवा दुसर्‍या पिढीने आपल्या व्यक्तिगत आणि सामुदायिक जगण्याचा ताळेबंद मांडणं सुरू केलं. मराठी साहित्यात ग्रामीण संवेदनशीलतेचा उदय झाला.

एकविसाव्या शतकातल्या मराठी साहित्याचा ट्रेंड लक्षात घेताना संवेदनशीलतेचे ‘शहरी’, ‘ग्रामीण’, ‘दलित’, आणि ‘स्त्रीवादी’ हे चार आविष्कार लक्षात घ्यावे लागतात. या चारही संवेदनशीलता मराठी साहित्याला चोहोबाजूने रोचक आणि सर्वसमावेशक करतायत. एरवी ‘कोसला’, ‘ऑक्टोपस’, ‘कोंडुरा’, ‘सत्तांतर’, ‘तणकट’, ‘बारोमास’, ‘चतुरंग’, ‘कळ’, ‘रिबोट’ किंवा ‘हाडकीहाडवळा’, ‘राघववेळ’, आणि ‘नातिचरामी’ या प्रातिनिधिक मराठी कादंबर्‍यांमध्ये व्यक्त होणार्‍या वैविध्यपूर्ण संवेदनशीलतांचा ताळेबंद जुळवणं कठीण आहे. अक्षर गणराज्याचा खरा फायदा नव्याने शिकलेल्या नागरिकांना झाला. त्यांच्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दरवाजा उघडला. अभिजन लिहितील आणि बहुजन ते वाचून मान डोलावतील, हे जुनं समीकरण बाद झालं. पारंपरिक लेखक-वाचक हे एकतर्फी नातं बदलून दुतर्फी झालं. कालचे वाचक आजचे लेखक झाले. उतरंडीतल्या खालच्या गाडग्यांमध्ये आत्मभानाचा प्रादुर्भाव झाला.
ग्लोबलाइज्ड काळात या नव्या भानाचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे साहित्यिक एकाधिकारशाही संपून साहित्यिक लोकशाही प्रस्थापित होतेय. याचे बरेवाईट परिणाम आहेत. साहित्यिक प्रेरणेचं ‘हौशीकरण’ आणि वाङ्मयीन पारितोषिकांचं राजकारण हे साहित्याच्या लोकशाहीकरणाचे दोष आहेत. तर कालपर्यंत मूकाभिनय करणार्‍या समाजाचं सुरू असलेलं सक्षमीकरण हा लोकशाहीकरणाचा फायदा आहे. आज मराठी पुस्तकांचा खप वाढतोय. इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादाची मागणी वाढतेय. योग, अध्यात्म, काळी जादू, पाककला, कराटे, वेटलॉस, अर्थशास्त्र, विज्ञान, मानसिक आरोग्य, टुरिझम, धर्म, आर्ट ऑफ वॉरपासून तर ऑर्ट ऑफ लव्ह इत्यादी शेकडो विषयांवर मराठी पुस्तकं खपतायत. हे विषयवैविध्य अक्षरांच्या गणराज्यातच शक्य आहे. हा ट्रेंड गुणात्मक नाही, संख्यात्मक आहे, असं कोणी म्हणू शकतं. पण पोस्टमॉडर्न टाइममध्ये गुणात्मकतेवर निर्बंध नाहीत. अक्षरांच्या गणराज्यात कुठलेच निर्बंध नाहीत, म्हणून हे गणराज्य चिरायू होवो.

vishram.sharad@gmail.com