आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Sarabjeet Singh Death And Pak India Relation

हेरगिरी: एक उघड गुपित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील तुरुंगात डांबून ठेवलेल्या सरबजितसिंगवर क्रूर हल्ला करण्यात आला. उपचार सुरू असतानाच तो मरण पावला. घटना घडलेला देश पाकिस्तान असल्यामुळे भारतात जनक्षोभ उसळून आला. या आकस्मिक घटनेमुळे सरबजितला दहशतवादी ठरवून कायद्याने मृत्युदंड देण्याची पाकिस्तान सरकारकडे असलेली संधी विरोधी गटाकडून हिरावून घेतली गेली आणि भारत सरकारने शहिदाचा दर्जा देऊन सबरजित नेमका कोण असावा, याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

मुळात, सरबजितसिंग कोण होता, मद्याच्या धुंदीत सीमा ओलांडलेला ‘निष्पाप’ नागरिक की भारताने विशेष मोहिमेवर धाडलेला हेर? या अवघड प्रश्नाचे अधिकृत उत्तर कधीही मिळणार नाही, हे उघड असले तरीही या घटनेच्या निमित्ताने जाणकारांमध्ये हेरगिरीचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला. त्या चर्चेच्या अनुषंगाने हेरगिरीमागील उघड गुपिताचा काढलेला हा माग...

भारताचा नागरिक सरबजितसिंग याला लाहोरच्या तुरुंगात जीवघेणी मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू ओढवला. यामुळे खेद वाटणे, राग येणे, क्षोभ प्रकट होणे, यात आश्चर्य नाही. तो दारूच्या नशेत चुकून सीमेपलीकडे गेला, असे कुटुंबीयांचे म्हणणे; तर तो भारताचा हेर होता, दोन ठिकाणी बॉम्ब उडवण्यात त्याचा सहभाग होता, हे मत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले. सरबजितसिंग हा खरेच भारतीय हेर होता का? याचे खरेखुरे उत्तर मिळालेच, तरी त्याला यापुढील कमीत कमी तीस वर्षे वाट पाहायला हवी. या संबंधीची गुप्त कागदपत्रे उघड करण्यासाठी ती कायदेशीर मुदत आहे. अर्थात, तीस वर्षांनी हे रहस्य उलगडेलच असेही नाही. कारण, आपल्या गुप्त फायली ‘राष्ट्रीय सुरक्षे’च्या नावाखाली उघड न करण्याकडेच बहुसंख्य राष्ट्रांचा कल असतो.

मात्र, सरबजितसिंग हेर नव्हता, असे कुटुंबीयांचे म्हणणे ग्राह्य धरले तर ‘हुतात्मा’, ‘राष्ट्राचा शूर सुपुत्र’ असे उद््गार, 1 कोटी 25 लाख अशी आर्थिक मदत, राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार, केंद्रीय मंत्रिपरिषदेचे अंत्यसंस्कारप्रसंगी प्रतिनिधित्व, सत्ताधारी पक्षाच्या क्र. दोनच्या नेत्याची उपस्थिती या सर्वाचा अर्थ काय लागतो? तो आमचा हेर होता, याला आपण अप्रत्यक्षपणे मान्यता देत नाही का? जर सरबजितसिंग खरोखरच हेर असेल, तर प्रश्न आणखी किचकट होतो. कारण, या खटाटोपात सहभागी असल्याने धरला-मारला गेला असेल तर त्याच्या कुटुंबीयांना वार्‍यावर सोडायचे नसतेच; मात्र संकेतानुसार त्यांना जी मदत द्यायची, ती गाजावाजा करत द्यायची नसते. मध्ये काही काळ जाऊ देत प्रकरण थोडे थंड झाले म्हणजे पुढची पावले उचलायची असतात. मधल्या काळात त्या कुटुंबीयांना आर्थिक आधार पुरवणे ही खासगी, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घडवणारी कार्यपद्धत रुजवावी लागते. त्यामुळे सरबजितसिंग हेर असो वा नसो, या प्रकरणी केंद्र शासनाचे वागणे अगम्य ठरते. माणसाच्या पृथ्वीवर वावरण्यात ‘शेती’ हा पहिला व्यवसाय. यावर वाद नाहीत. दुसरा व्यवसाय इतिहासक्रमात कुठला? एक मत हेरव्यवस्था असे, तर दुसरे वेश्या व्यवसाय असे. या चर्चेच्या तपशिलात न पडता, हेरव्यवस्था प्राचीन काळापासून प्रचलित आहे हे मान्य केलेच पाहिजे. तेव्हापासून राष्ट्रे (राष्ट्र-राज्य-नेशन-स्टेट ही संकल्पना अलीकडची) आपापले हेर फक्त शत्रू वा संभाव्य शत्रूच नव्हे, तर मित्र राष्ट्रांतही ‘पेरत’ आली आहेत. यात दोन पदर स्पष्ट आहेत. परक्या राष्ट्रांत आपले राजदूतावास असतात. त्यातले काही अधिकारी हे हेरगिरीसाठीच नेमलेले असतात. जर त्यांना अशा कृत्यासाठी त्या त्या राष्ट्राने ‘पकडले’ तर तुरुंग पाहावा लागत नाही; पण मायदेशी मात्र रवानगी होते. मात्र, दुसरा पदर जास्त धोके असलेला. त्यात सामान्य व्यक्ती हेरगिरीसाठी निवडली जाते.

या व्यक्ती आपल्या राष्ट्रातून पाठवल्या गेलेल्या असू शकतात वा त्या परक्या राष्ट्राच्या नागरिकही असू शकतात. जर हे उघड झाले तर पकडले जाणे, शारीरिक-मानसिक छळ, वेदनामय मृत्यू, तुरुंगवास, कुटुंबीयांना त्रास... असा अनेकपदरी छळ असतो. असे हेर परक्या राष्ट्रांत पाठवणे काही वेळा फार अवघड असते. उदा. दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या जपानमध्ये परके राष्ट्र हेर व्यवस्था निर्माण करणार कसे? वंश, भाषा, सवयी, सामाजिक रीतिरिवाज सर्वच परके; परंतु असे हेर पेरण्यासाठी भारत-पाकिस्तान यांना तुलनेने परस्पर भूमी खूप अनुकूल आहे. वंश, भाषा, खाणे-पिणे, पेहराव, अनेक रीतिरिवाज खूपच सारखे आहेत. त्यामुळे इथला नागरिक तिकडे सहज सामावला जाऊ शकतो. दोन्हीकडे परस्पर द्वेष असलेले गट, त्यांच्या कडव्या विचारधारा आहेत. त्यातून हेर पेरण्यास मदत होते. लोभ, वासना, भीती, हाव असे अनेक घटक ‘हेर’ बनवण्यासाठी वापरले जात असले तरी गेल्या शतकापासून
त्यात विशिष्ट ‘विचारधारे’वर श्रद्धा असलेला नवा घटक आला आहे. त्यात कम्युनिझमवर प्रेम वा द्वेष, अतिरेकी इस्लाम, ज्यू, हिंदुत्व या धारेतून आलेले हेर जास्त कडवे असतात. हेच ‘गोर्‍या’ वंशवादी मंडळींसाठी लागू पडते.

‘आयबी’ (इंटेलिजन्स ब्युरो) ही खूप जुनी संस्था. काही इतिहासकारांनी या संस्थेची पाळेमुळे ‘पेंढारी व ठगी’ यांच्या विरुद्धच्या मोहिमेपर्यंत दाखवली आहेत. संस्थेची जवळपास सर्व कागदपत्रे भारत सोडताना ब्रिटिशांनी ‘पळवली’ वा नष्ट केली. जी काय थोडीबहुत वाचली (दुय्यम महत्त्वाची) ती पाकिस्तानात गेली. त्यामुळे भारताला संपूर्णपणे नाही, तरी बर्‍याच अंशी ब्युरोची नव्याने बांधणी करावी लागली. 1968 पर्यंत फक्त ‘आयबी’ ही देशपरदेशात हेरगिरीची जबाबदारी दिलेली संस्था होती. यातून परदेशासाठी ‘रॉ’(रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) ही नवी यंत्रणा निर्माण करण्यात आली. 1993चे मुंबई बॉम्बस्फोट, अक्षरधाम, संसद हल्ला, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, वाराणसी इथले स्फोट, 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला यात स्थानिक माणसांचा सहभाग असल्याखेरीज हे सर्व घडवणे अशक्य आहे. त्याचा शोध, प्रेरणास्थानांचा माग हे शांतपणे, एकएक धागा जुळवत संभाव्य चित्र तयार करण्याचे काम आहे.

प्रश्न असा उभा राहतो की, हे सर्व एकतर्फी म्हणजे, भारत फक्त सहनच करत आला असे आहे का? दुसरे म्हणजे, असे कट रचले म्हणून सर्वच्या सर्व 100% यशस्वी होतात, असे असते का? दोन्ही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी आहेत. सत्तरीच्या दशकाशेवटी व ऐंशीच्या दशकात ‘खलिस्तान’ची हिंसक चळवळ फोफावली. भिंद्रानवाले नामक प्रकरण, आॅपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधींचा खून हे सर्व घडले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रिबेरो व गिल यांनी अत्यंत चिवट, कडवी मोहीम चालवून चळवळ थंड पाडण्यात मोलाचे योगदान दिले. या खलिस्तान प्रकरणाला पाकिस्तान पैसा, शस्त्रे, प्रशिक्षण, सुरक्षितता अशा स्रोतातून मुक्तपणे छुपी मदत करत होता. हेच मार्ग सिंध- बलुचिस्तान भागात ‘रॉ’ने राबवताच आता द्यावी लागणारी किंमत परवडणारी नाही, म्हणून पाकिस्तानने मदत थांबवली. बांगलादेश प्रकरणावेळी प्रत्यक्ष युद्ध पेटण्याच्या निदान सहा महिने आधीपासून भारत हेरांच्या मदतीने छुपी मदत देत होता. 3 डिसेंबर 71चा पाकिस्तानचा भारताच्या आघाडीच्या विमानतळांवरील हवाई हल्ला याचा तपशील हेरव्यवस्थेमार्फत जसा आधी कळला होता, तसेच ढाका येथे वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक सुरू असल्याची वार्ता गुप्तता भेदून कळल्याने विमान दलाला तिथे बॉम्बफेक करणे शक्य झाले होते. शेख मुजिबूर रेहमान यांच्या हत्येचा कट शिजल्याची पक्की माहितीही भारताला होती. (15 आॅगस्ट 1975) मुजीबना सावध करण्यासाठी उच्चस्तरीय पावले उचलली गेली. त्यांना भारतात आणण्यासाठी विमान सज्ज ठेवण्यात आले होते; पण असा कट आपल्याविरुद्ध होईल, हे मुजीबना काही केल्या पटेना. शेवटी त्यांची हत्या झालीच. 1965, 1971 प्रसंगी राजस्थानमधून सिंधमध्ये तसेच पंजाबमधून लाहोरपर्यंत भारतीय फौजा गेल्या. त्यांना इच्छित स्थळापर्यंतच्या वाटा भारतीय हेरांनीच दाखवल्या. हे हेर पाकिस्तानमध्ये प्रचंड मागणी असलेली दारू (इस्लाममध्ये नशेला बंदी असल्याने तिथे दारूबंदी) भारतातून नेणारे व परतताना सोने, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरटी वाहतूक करणारे भारतीय ‘देशप्रेमी’ हेर होते. आपण फक्त पाकिस्तान घडवून आणतो, त्या दहशतवादी कृत्यांचे बळी आहोत, या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. युद्ध-मग ते छुपे असो वा उघड- माणूस जातीच्या पाचवीला पुजलेले आहे. हेरव्यवस्था हे त्याचे महत्त्वाचे अंग आहे. यात कुणीही धुतल्या तांदळासारखा नसतो.

अलीकडेच जाहीर झालेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानने भारतात पेरलेली-पोसलेली निदान 30 दहशतवादी केंद्रे नाहीशी करण्यात यश आले. यात जी धरपकड झाली त्यात पाकिस्तानी 10, तर 38 भारतीय आहेत. ज्यात 10 शासकीय कर्मचारी आहेत. दुसर्‍या महायुद्धात तंत्रज्ञान-गणित-भाषाशास्त्र या आधारे ब्रिटनने जर्मनी, जपानची अनेक महत्त्वाची गुपिते सांकेतिक भाषांची फोड करत उलगडली. या यंत्रणेत प्राध्यापक, गणिततज्ज्ञ, टंकलेखक, यंत्रकामगार, खेळाडू, निरोपे, सफाई कर्मचारी, आचारी हे व असे 10 हजारांवर सर्वसामान्य स्त्री-पुरुष सामील होते; जे युद्ध संपल्यावर आपापल्या नागरी जीवनात परतले. हे राष्ट्रीय गुपित 1945मध्ये युद्ध समाप्ती ते 1970चे दशक अशी जवळपास 25 वर्षे सांभाळले गेले. प्रकट झाले ते शासनाने तसा निर्णय घेतल्यावर. हेर व्यवस्थेचे क्षेत्र ‘नाही चिरा- नाही पणती’ या प्रकारात मोडणारे आहे. परदेशी नेमलेल्या हेरांना हे सांगितले जाते की, पकडले जाऊ नका. तसे झालेच तर शासन आमचा संबंध नाही, असेच म्हणणार. इतकेच नाही, तर देशहिताला प्राधान्य देत प्रसंगी आपल्याच हेराला परदेशात ठारही करावे लागते. या क्षेत्रात वर्ज्य-अवर्ज्य असे काही नसते. अशा वेळी आपली वर्तमानपत्रे, माध्यमे, राजकारणी, विद्यापीठे, प्रशासन यांनी सर्वसामान्यांना हेरगिरीशी जोडल्या गेलेल्या वास्तवाची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक ठरते.

इतिहास हेरगिरीचा
>हेरगिरी हा काही आधुनिक डावपेचांचा प्रकार नाही. प्राचीन काळापासून राजाच्या दरबारी हेर असायचे. या हेरांचे काम म्हणजे, शत्रूपक्षांची खबर काढणे; तसेच राजाच्या विरोधात कोण कट शिजवत आहे, याची माहिती राजापर्यंत पोहोचवणे. ऋग्वेदात हेरगिरीचे अनेक दाखले आहेत.

> भारतात ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत अधिकृतरीत्या गुप्तवार्ता विभाग उघडला. याच आधारे ब्रिटिशांनी 1842मध्ये अफगाणिस्तानावर कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. अफगाण राजा अकबर खान याच्या सैन्याची माहिती काढण्यासाठी, ब्रिटिशांनी त्या वेळी मोहन लाल काश्मिरी नावाच्या भारतीयाकडे हेरगिरीचे काम सोपवले होते; पण काश्मिरी अफगाण सैनिकांच्या तावडीत सापडला. त्यांनी त्याचा शारीरिक छळ केला. काश्मिरीची काही काळानंतर सुटका झाली. पुढे काश्मिरीचा ब्रिटनच्या महाराणीने गौरव केला होता.

> ब्रिटिशांनी साम्राज्य विस्तारासाठी त्या काळात अनेक स्थानिक हेरांची मदत घेतली होती. काश्मीरमधील अब्दुल हमीद हेरगिरी करत यार्कंदपर्यंत गेला होता. सरत दास याने पाटोला येथील दलाई लामांच्या राजवाड्यात धडक मारली होती.

>1965च्या युद्धात कच्छच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात हालचाली होत असल्याची माहिती गुजरातमध्ये राहणार्‍या स्थानिकांकडून भारतीय सैन्याला मिळाली होती. सगाथाजी जागाशी ठाकूर हा व्यापारी त्या वेळी पाकिस्तानातून स्मगलिंगच्या मार्गाने सोने, चांदी व महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भारतात तस्करी करत होता. भारतीय गुप्तचर खात्याने त्याच्या नेटवर्कचा फायदा करून घेण्यासाठी त्याला पाकिस्तानमध्ये हेरगिरी करण्यासाठी पाठवले. सगाथाजीने दिलेल्या माहितीमुळेच भारतीय सैन्याने पाकिस्तानातील नागपारकर हे गाव आपल्या ताब्यात घेतले.

>1971च्या बांगलादेश युद्धात रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेने ब्रिगेडियर सुरजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तान (बांगलादेश)-भारत सीमेवर अनेक हेर पेरून मदारीपूर येथील चहाचे मळे, नदीतील बोटी, रेल्वे मार्ग आपल्या ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्याची कोंडी केली. शिवाय 22 हजार गनिमी सैन्य उभे करून सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानी सैन्यास जेरीस आणले.

> ‘रॉ’ने नेमलेल्या हेरांची मदत घेऊन भारतीय हवाई दलाने ढाक्याच्या हवाई हद्दीत शिरकाव करून प्रमुख सरकारी कार्यालयांवर बॉम्ब टाकले होते. एका सरकारी कार्यालयात त्या वेळी पाकिस्तान सरकारची कॅबिनेट मीटिंग सुरू होती.

>1989मध्ये पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिरातील हरमिंदर साहिब येथे बॉम्ब ठेवले होते. हे बाँब पाकिस्तानचा एक कर्नल येऊन उडवेल, अशी योजना दहशतवाद्यांनी आखली होती; पण जेव्हा हा पाकिस्तानी कर्नल तेथे जाऊन पोहोचला, तेव्हाच भारतीय सैन्याने सुवर्णमंदिराला वेढा घालून कारवाई सुरू केली. पुढे हा बॉम्ब फुटला नाही. त्यामुळे हताश झालेल्या दहशतवाद्यांपुढे शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हा पाकिस्तानी कर्नल दुसरा तिसरा कुणी नसून ‘रॉ’ने पेरलेला अजित दोवल नावाचा हेर होता.

>जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यात लष्कर आणि प्रशासनाला एकेकाळचा काश्मिरी दहशतवादी, परंतु नंतर भारताचा हेर बनलेल्या उस्मान माजिदसारख्या गुप्तहेरांची बरीच मदत झाली.

>2010 ते आजपर्यंतच्या तीन वर्षांत भारतीय सुरक्षा संस्थांनी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने नियोजनबद्ध षडयंत्र रचून आकारास आणलेल्या 30 ठिकाणचे हेरगिरीचे जाळे नष्ट केले. यात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या 38 भारतीय तसेच 10 पाकिस्तानी एजंटांना अटक झाली होती.