आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणारा किशोर कुमार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदूषक. निव्वळ हास्याचा धबधबा. पडद्यावर किशोरकुमार नुसता धुमाकूळ घालायचा. त्याच्या अदाकारीने रसिक सर्व दु:ख विसरायचे. पडद्यामागे मात्र जेव्हा त्याने गाण्यातून दु:ख, विरह सादर केले, तेव्हा सारेच अवाक् झाले. दर्दभर्‍या गाण्यातून किशोरकुमार कानातून थेट काळजात शिरला. त्याच्या त्या खास ठेवणीतल्या पिचलेल्या आवाजाने रसिकांच्या हृदयाला हात घातला. आपल्या रोमँटिक गाण्यातून रसिकांना अवर्णनीय आनंद देणार्‍या किशोरच्या दर्दभर्‍या गाण्यांनी रसिकांच्या भावविश्वातील दु:खाला चंदेरी किनार दिली. किशोरकुमार हा खरे तर अवलिया कलाकार. शतकात एखादाच असा अवलिया अवतरतो. कोणत्याही गाण्याचे सोने करण्याचे कसब हे किशोरचे वैशिष्ट्य. त्याच्या दर्दभर्‍या गाण्यांना तरुणाईच्या भावविश्वात मानाचे स्थान आहे.‘मेरे मेहबूब कयामत होगी’(मि. एक्स इन बॉम्बे)मधून किशोरने याची नांदी दिली. ‘ये जो मोहब्बत है’ (कटी पतंग)मधून प्रेमाच्या गल्लीतील वाटचाल किती अडचणीची आहे, याची जाणीव त्याने करून दिली. ‘तुम बिन जाऊ कहाँ’(प्यार का मौसम)मधील व्याकुळता किशोरच्या पिचलेल्या आवाजाने अधिकच गहिरी केली. ‘हमे तुमसे प्यार कितना’(कुदरत)मधला निर्व्याज भाव तिच्यासह सर्वांच्या मनाला भिडला. ‘ये क्या हुआ, कैसे हुआ’(अमर प्रेम)मधून त्याने विचारलेले प्रश्न आजही बेचैन करतात. ‘जिंदगी का सफर’(सफर)मधल्या आशयाला किशोरच्या आवाजाने आगळी घनता लाभली. ‘जिंदगी के सफर में गुजर जाते’(आपकी कसम)मधून जीवनातील वास्तव उघड करण्यात किशोरने मागेपुढे पाहिले नाही. ‘जिंदगी प्यार का गीत’(सौतन)मधली समजावणी त्याच्या आवाजाने खुलली.‘तिने’ त्याचे प्रेम नाकारल्यानंतर त्याची मनोवस्था व्यक्त करताना किशोरकुमारच्या आवाजाची दर्दभरी धार काळीज पिळवटून टाकणारी आहे. ‘हम बेवफा हरगिज न थे’(शालिमार)मधली निरागस कबुली मनाला जशी भिडते, तशीच ती ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’(अमानुष)मधून काळीज हेलावते. ‘मेरा जीवन कोरा कागज’(कोरा कागज)मधले नैराश्य काही केल्या लपत नाही, उलट ‘तेरी दुनिया से होके मजबूर’(पवित्र पापी)मधून ते नैराश्य अधिक गहिरे होते. ‘इससे पहले के याद तू आए’(नजराना)मध्ये ते ज्या टोकाला जाते, ते ऐकून मन कासावीस होते. ‘कोई हमदम न रहा’(फंटूश)मधली भावना अत्यंत सुन्न करणारी. ‘घुंगरू की तरह’(चोर मचाए शोर)मधला विरक्त भाव अवाक् करणारा. ‘दिल आज शायर’(गॅम्बलर)मध्ये हारल्याची भावना जमिनीवर आणणारी आहे. ‘मंजिलों पे आके लुटते हैं दिलों के काँरवा’(शराबी)मध्ये किशोरने लावलेला सूर अक्षरश: अंगावर काटे आणणारा आहे. सर्वस्व असतानाही सर्व काही गमावल्याची भावना किशोरने ज्या गहिर्‍या स्वरांनी पेश केली आहे, त्याला तोडच नाही! ‘चिंगारी कोई भडके’(अमर प्रेम)मध्ये तर किशोर वॉज अ‍ॅट हिज बेस्ट! या गाण्याने लावलेली सुरेल आग सहा दशकांनंतरही कायम आहे. किशोरने अगदी मनापासून खास ठेवणीतल्या आवाजात पेटवलेली ही ‘चिनगारी’ अनेक पिढ्या धगधगत राहणारी आहे. ‘ओ साथी रे’(मुकद्दर का सिकंदर) गाण्यात पहिल्या आलापपासून किशोर आपल्या मनाचा ताबा घेतो. तिच्याशिवाय जगणे शक्यच नाही, हा गाण्यातला भाव किशोरच्या गहिर्‍या, खर्जातल्या, कंपयुक्त आवाजाने इतका जिवंत केला आहे, की आजही या गाण्याचे गारूड कायम आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीतकार, गायक, गीतकार अशा अनेक भूमिका लीलया वठवणारा किशोर हा खरा अष्टपैलू. यॉडलिंगने मस्ती घालणारा किशोर जेव्हा दर्दभर्‍या गाण्यातून काळजाला हात घालतो, तेव्हा त्याचा आवाज अधिकच गहिरा होतो. हृदयाच्या आतल्या कप्प्यात उतरतो. आपल्याला गुंतवून ठेवतो. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही’(आँधी) हे गाणे ऐका, म्हणजे याचे प्रत्यंतर येईल.

ajay.kulkarni@dainikbhaskargroup.com