आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञेचा सिंधी आविष्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या अखंड भारतातील आणि 1947 नंतरच्या स्वतंत्र भारतातील प्रमुख भाषांपैकी सिंधी ही एक भाषा आहे. फाळणीनंतर सिंध प्रांत भारतात न राहिल्यामुळे भारतीय घटनेत सिंधी भाषेचा समावेश झाला नाही. ‘सिंधी’ भाषेला स्वतंत्र राज्य नाही. पुढे 1967मध्ये सिंधी भाषेचा अधिकृत भाषा म्हणून घटनेत समावेश झाला. फाळणीनंतर भारतात आलेल्या पिढीने सिंधी भाषेचे अस्तित्व सांभाळले आहे. अनेक नवे साहित्यिक पुढे आले. सिंधी साहित्य इतर भाषांत अनुवादित केले, तर काहींनी इतर भाषांतील साहित्य सिंधी भाषेत अनुवादित केले आहे.
विपुल शब्दभांडार असलेली सिंधी भाषा अर्थातच समृद्ध आहे. संस्कृत कुळातील या भाषेवर द्रविडी बोलींचा प्रभाव आहे. सिंधी या मुख्य भाषेच्या ‘विचोली’, ‘सिराईकी’, ‘लाडी’, ‘थरेली’, ‘लासी’ आणि ‘कच्छी’ अशा सहा उपभाषा आहेत. या उपभाषांपैकी ‘विचोली’ या भाषेला भाषिक महत्त्व अधिक आहे, कारण या भाषेत साहित्य अधिक प्रमाणात तयार झाले आहे. सिंधी भाषेची लिपी देवनागरी आहे. परंतु 1853मध्ये ब्रिटिश सरकारने अरबी-फारसी लिपीला सिंधी भाषेची लिपी म्हणून घोषित केले. त्या भागात राहणार्‍या बहुसंख्य मुसलमानांमुळे हा निर्णय घेतला गेला. या शासकीय निर्णयानंतरही सिंधी समाज देवनागरी लिपीचाच वापर करत राहिला. देवनागरीप्रमाणे ‘गुरुमुखी’ आणि ‘हट वाणिका’ या लिप्यांचाही वापर होत गेला. फाळणीनंतर भारतात आलेल्या बहुसंख्य सिंधींनी देवनागरी लिपीचा अधिकृत लिपी म्हणून स्वीकार केला. ‘पैशाची भाषा’ व महाराष्ट्रीयांची ‘प्राकृत भाषा’ या भाषांशी सिंधी भाषेचे साधर्म्य दिसून येते. मराठी भाषेशी सिंधी भाषेचे असलेले साधर्म्य पाहता, मराठी माणसाला सिंधी भाषा शिकणे सुलभ जाते. सिंधी साहित्यात सतत दोन प्रवाह एकत्र विकसित होत गेले. एक प्रवाह इस्लाम धर्माने प्रभावित आणि दुसरा प्रवाह भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडलेला. सातव्या शतकापासून उत्क्रांत होत आलेल्या सिंधी भाषेचा आधुनिक काळ हा 1843नंतर समजला जातो. इंग्रजांनी सिंधवर ताबा मिळवल्यानंतर हा काळ सुरू झाला. ब्रिटिश राजवटीमुळे पाश्चिमात्य संस्कारांचा प्रभाव सिंधी भाषेवर झाला. या काळात ‘गद्य साहित्य’ अधिक प्रमाणात तयार झाले.

1914-1947 हा स्वातंत्र्ययुद्धाचा काळ. हा दुसरा टप्पा सिंधी भाषेतील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. या काळात इंग्रज सत्तेविरुद्ध काही साहित्य तयार होऊ लागले. मुख्य म्हणजे, ‘माता’ नावाचे वर्तमानपत्र सुरू झाले. त्यातून ब्रिटिशांविरुद्ध सिंधी लोकांच्या मनातील असंतोष प्रकट होऊ लागला. ‘तालीम’, ‘लाडकाना पतिका’, ‘सिंधीवासी दैनिक’, ‘हिंदवासी दैनिक’ अशा अनेक साप्ताहिक, दैनिकांतून ब्रिटिशांविरुद्ध लेखन होत गेले.

1947 नंतरचा काळ हा फाळणी, रक्तपात, हाणामारी अशा दु:खद घटनांचा आहे. या काळातही सिंधी साहित्यात विद्र्रोह, संताप अतिशय संयमित स्वरूपात व्यक्त झाला. सिंधी भाषेचे अभ्यासक याचे श्रेय महात्मा गांधींना देतात. सिंधी साहित्यावर गांधीजींचा मोठा प्रभाव आहे. ब्रिटिश काळात सिंधी साहित्यावर फ्रॉइड आणि मार्क्स यांचा तात्पुरता परिणाम झाला. परंतु वेदकाळापासून जी विचारधारा पुढे झिरपत आली, ती विचारधारा पाहता गांधी विचारांचा प्रभाव सिंधी साहित्यिकांवर होणे सहजसुलभ व क्रमप्राप्त होते.

सिंधी साहित्यातील उत्कृष्ट कलाकृतींपैकी नारायण श्याम यांचा कवितासंग्रह ‘माक भिना रावेल’ आणि आनंद खेमाणी यांच्या नव्या कवितांचे संकलन-संपादन असलेल्या ‘बीमार पीढी’ या कलाकृतींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आनंद खेमाणी यांच्या ‘बीमार पीढी’मध्ये आजच्या मानवी जीवनातील निराशा, संकोच आणि मानवी जीवनातील एकारलेपणही स्पष्ट होते. तीर्थ बसंत यांच्या ‘कंवर’ या चरित्रकथेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. लाल पुष्प, मोहन कल्पना आणि गुनो सामताणी या सिंधी भाषेतील कथाकारांच्या कथांनी सिंधी भाषेतील कथावाङ्मय अधिक समृद्ध केले आहे. गुणो सामताणी यांच्या ‘अपराजिता’ या कथासंग्रहाला आणि लाल पुष्प यांच्या ‘हुनजो आत्मा जौ मौत’ या पुस्तकांना 1972 आणि 1973चे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले होते. तारा मिरचंदानी आणि रिटा शहाणी या दोन्ही सिंधी लेखिका पुण्यातच राहतात. तारा मिरचंदानी यांच्या ‘हटयोगी’ या सिंधी पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. पूर्वी डेक्कन कॉलेजला प्राध्यापक असणारे पण निवृत्तीनंतर आता ‘कच्छ’मध्ये स्थायिक झालेले प्रीतम वारियानी यांनी सिंधी लोककथा संकलित केल्या आहेत. सिंधी भाषेत लोकसाहित्याची मौखिक परंपरा आहे. स्वतंत्र भारतातील सिंधी लोकसाहित्य संकलित करणारे नारायण भारती हे एक प्रमुख अभ्यासक आहेत. महाराष्ट्रात आलेल्या सिंधी समाजातील नव्या पिढीत मात्र सिंधी भाषेविषयी चिंताजनक उदासीनता आहे. प्रारंभी उल्हासनगर, मुंबई येथून काही दैनिक, नियतकालिके काढण्याचा क्षीण प्रयत्न झाला. आज तरी सिंधी भाषेचे कोणतेही दैनिक, मासिक, साप्ताहिक नाही. महाराष्ट्रातील 50 लाख सिंधी बांधवांत सिंधी नियतकालिकांना 500 वाचक नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सिंधी भाषेतील साहित्यकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले, परंतु अद्याप एकही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही. भविष्यात मिळणेही कठीण दिसते, असे अनेक सिंधी बांधव सांगतात.

arunjakhade@padmagandha.com
(पुढील आठवड्यापासून शीख समाजाच्या महाराष्ट्रातील योगदानाची दखल.)