आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगल स्क्रीनवरच 'पॉप' शो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेमाच्या लोकप्रियतेचे मोठे रहस्य राज कपूरने सांगून ठेवलेच आहे. तो म्हणाला होता, ‘आम्ही स्वप्न विकतो.’ हा हिंदी सिनेमा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पाहणे हा एक अनुभव असतो. मुंबईतील सीएसटीजवळचे कॅपिटल, काळबादेवीचे एडवर्ड, दादरचे शारदा, कोहिनूर, चित्रा, लालबागचे गणेश, माटुंग्याचे ‘बादल, बिजली, बरखा’, वांद्र्याचे गेइटी गॅलक्सी, चेंबूरचे बसंत (ज्यात आरशाच्या पडद्याचे अभिनव तंत्रज्ञान वापरले होते. खालची माणसे पडद्यावर सिनेमा बघत आणि बाल्कनीतली माणसे आरशात सिनेमा पाहत), ग्रँट रोडचे इम्पीरियल अशी कितीतरी थिएटर्स शोधून शोधून मी सिनेमे पाहिले; विशेषत: मॅटिनी शो. एकदा आमिर खानचा सेक्रेटरी आशिषला मी म्हटले, ‘रंगीला’ मी चित्रा थिएटरमध्ये पाहिला.’ तो म्हणाला, ‘ऐसी फिल्म देखने का सही मजा वहीं आता है।’ खरे तर तेव्हा मल्टिप्लेक्सचा जमाना नव्हता, पण वर उल्लेखलेली थिएटर्स ही बहुजन समाजाची मनोरंजनाची हक्काची थिएटर्स होती. दिवसाला तिथे चार शोज होत आणि सर्वकाळ थिएटर किमान अर्धे तरी भरलेले असायचे. यातल्या अनेक थिएटरबाहेर काचेत सिनेमातल्या दृश्यांचे मस्त फोटो लावले जात. ते बघण्याची मजा काही और होती. या ‘विंडो शॉपिंग’मध्ये सिनेमाचा अंदाजही येई.

आजही यातली अनेक थिएटर्स चालू आहेत. अगदी अलीकडे मी अमिताभचा ‘नसीब’ भायखळ्याच्या एडवर्ड टॉकीजमध्ये पाहिला. तिथे आजही जुने-जुने चित्रपट लागत असतात. आणि बाल्कनीच्यावर असलेला स्वस्तातला बॉक्सही तिथे आहे. तिथून चित्रपट पाहणे शाळा-कॉलेजच्या वयात एक स्वप्न असायचे. कारण प्रामुख्याने तिथे जोडपीच रोमान्ससाठी जात. ग्रँट रोड येथील मिनर्व्हा थिएटरला ‘शोले’ 100 आठवडे चालला, ही आज दंतकथा वाटावी. कारण आज सिनेमा दोन-तीन आठवडेही चालत नाही. मुंबई सेंट्रलच्या ‘मराठा मंदिर’ला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सहा वर्षे चालू होता. कित्येकदा अशा थिएटरमध्ये थंडगार हवा खाण्यासाठी लोक जात. कोहिनूर, अलेक्झांड्रा, इम्पीरियल अशा अनेक थिएटरमध्ये घराला अंगण असावे, तशी भरपूर जागा असे. त्यात बाक टाकलेले असत. कामाठीपुर्‍याजवळील गल्लीत तर एकाजवळ एक सात सिंगल थिएटर आहेत. ती सारी आजही चालत आहेत. सिंगल स्क्रीनची मोठी मजा म्हणजे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग. हे प्रेक्षक गाण्यांना जोरदार शिट्या वाजवतात. फाइट सीन सुरू असेल तर जोशात येऊन ‘मारो साले को’ असे प्रोत्साहन देतात. हेलनच्या व्हॅम्परिंगला शिव्या देतात. शृंगार दृश्याच्या वेळी ‘ए अबे’ असे किंचाळतात. एकूणच सारे थिएटर सिनेमात विरघळून जाते. ‘लगान’ मी पाहिला तो अशाच एका थिएटरमध्ये. सिनेमातल्या शेवटच्या तणावपूर्ण ओव्हरच्या वेळी एकाने उठून जणू दिग्दर्शकाला सूचना दिली की, ‘अभी फ्लॅश बॅक मत दिखा।’ कुर्ल्याला अशा एका थिएटरमध्ये मी सिनेमा पाहायचो. तिथे पडदा कोपर्‍यात शिवलेला होता. या सगळ्यांत स्टर्लिंग, रिगल, लिबर्टी या भिन्न प्रकृतीच्या थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची मजा औरच होती. ‘स्टर्लिंग’ आणि ‘रिगल’ला प्रामुख्याने इंग्रजी चित्रपट लागत. 3-6-9 अशा तेव्हा सिनेमाच्या वेळा नियमित असत. थिएटर आता लोप पावली. काही कशीबशी तग धरून आहेत. ‘कॅपिटल’सारखे थिएटर अलीकडेच बंद पडले. तिथे एकेकाळी लो बजेट अगदी ‘रिक्षावाली’सारखे सिनेमे लागत. तरीही या सार्‍या थिएटर्सना आणि प्रेक्षकांना एक चेहरा होता. दादरच्या ‘शारदा’चा प्रेक्षक ‘मिनर्व्हा’ला दिसायचा नाही आणि मिनर्व्हाचा ‘रिगल’ला दिसायचा नाही. ‘एडवर्ड’सारख्या थिएटरमध्ये हमाल, मजूर अशी मंडळी प्रामुख्याने सिनेमाची मजा लुटताना दिसत.

आज मल्टिप्लेक्सचा जमाना आहे. साहजिकच अनेक सिंगल स्क्रीन थिएटरचे रूपांतर मल्टिप्लेक्समध्ये झाले. आता त्यामधील एक-दोन कोपरेच थिएटर म्हणून उपयोगात येतात. यामध्ये काळा पडदा सरकवून कुठूनही आत-बाहेर जाता येत नाही. तिकीट महाग असतेच, पण साधी पाण्याची बाटली आणि कॉफीसुद्धा 30-40 रुपयांना मिळते आणि कधी-कधी ऑर्डर पुरवणारे वेटर सीटवर येऊन खाणे पुरवतात. सिनेमा जगण्याची ती पूर्वीची मजा आता येत नाही. एक पडदा असलेली थिएटर्स धडाधडा बंद पडताना, विजय तेंडुलकरांनी विचारलेला प्रश्न मला या क्षणी आठवतो : हे प्रेक्षक आता कुठे जात असतील?
(shashibooks@gmail.com)