आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगाच्या दक्षिणेकडे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण अमेरिकेतील देशांमधून प्रवास करताना स्पष्ट जाणवते, की अमेरिका हा शब्द समान असला तरी उत्तर अमेरिकेपेक्षाही दक्षिण अमेरिका फारच भिन्न आहे. कोलंबिया, इक्वेडोर, ब्राझील, व्हेनिझुएला, अर्जेंटिना, चिली, पेरू, बोलिव्हीया हे विषुववृत्ताच्या दक्षिणेला असलेले देश म्हणजे दक्षिण अमेरिका असे असले तरी विषुववृत्तापासून जवळ पण थोडेसे उत्तरेला असलेले पनामा, कोस्टारीका इत्यादी देशही दक्षिण अमेरिका असेच संबोधले जातात. कारण स्पष्ट आहे ते म्हणजे भाषा. उत्तर अमेरिकेची भाषा इंग्लिश तर दक्षिण अमेरिकेची भाषा मुख्यत: स्पॅनिश, काही अंशी पोर्तुगीज.

उत्तर अमेरिका मुख्यत: धर्माने प्रोटेस्टंट. कारण वस्ती करण्यासाठी आलेले गोरे ब्रिटन, फ्रान्स इत्यादी देशातून आले होते. दक्षिण अमेरिका मुख्यत: कॅथोलिक कारण स्पेन व पोर्तुगालहून वस्तीसाठी आलेले.साहजिकच स्पॅनिश भाषा सर्वत्र रुळल्यामुळे आणि ती लॅटिन भाषेशी जवळची असल्याने दक्षिण अमेरिकेचा ‘लॅटिन अमेरिका’ असाही उल्लेख होतो. उत्तर अमेरिकेत उद्योगधंदे फोफावलेले. दक्षिण अमेरिका मुख्यत: कृषिप्रधान. शेती आणि खनिजे हेच मुख्यत: अर्थकारणाचे आधार. त्यामुळे उत्तर अमेरिकेला कामगारांची गरज होती, तर दक्षिण अमेरिकेला गुलामांची. आफ्रिकेतून निग्रो गुलाम तिथे आणले गेले. तिथल्या मूळ नेटिव्जना ‘इंडियन’ असेच संबोधतात. कोलंबस भारत शोधायला गेला होता. त्याचा हा परिणाम. ‘नेटिव इंडियन’ आता फार थोडे उरलेत. वसाहतवादी युरोपीयन म्हणजे स्पॅनिश आणि पोर्तुगीज. ‘नेटीव इंडियन’ आणि गुलाम निग्रो यांच्या संकरातून गत सहा शतके निर्माण झालेल्या जनरेशन्स आता सर्रास दिसतात. निव्वळ निग्रो किंवा निखळ युरोपीयन्स कमी दिसतात. साहजिकच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचार करता, दक्षिण अमेरिकेत काळा- गोरा हा वंशभेद तिथे फारसा नाही. ब्राझीलमध्ये हे विशेषत्वाने जाणवते. कॅथालिक ख्रिश्चन मुख्य धर्म असल्याने आणि इतर धर्माचे फारसे अस्तित्व नसल्याने धर्मभेद नाही. हे दक्षिण अमेरिकन देशांचे वैशिष्ट मानावे लागेल.

धर्मभेद नाही, त्यामुळे धार्मिक मूलतत्त्ववादसुद्धा नाही. त्यामुळे हे सारे देश दहशतवादापासून सध्या तरी मुक्त आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आहे, पण तिचा अतिरेक नाही. पेरू देशातील कुस्को शहराच्या विमानतळावर बॅगा तपासणारे एक्स रे मशीनच नव्हते. बॅगेत काही नाही ना, असा प्रश्न विचारून पुढे सोडले जात होते.

दक्षिण अमेरिकन देशांचे आपापसात सीमेवर तंटे नाहीत. बहुतेक देशांनी परस्पर सामंजस्याने आपापले सीमावाद मिटविले. चिली आणि अर्जेंटिनाची सीमा हजारो किलोमीटर आहे. पण त्यांनी वाद मिटवून शांतता प्रस्तापित केली आहे. 30 वर्षांपूर्वी 1982मध्ये अर्जेंटिनाने भौगोलिकदृष्या जवळ असणार्‍या आणि नैसर्गिकरीत्याही अर्जेंटिनाचा भूभाग असावा, असे भासणार्‍या पण इंग्लंडचे राज्य असलेल्या फाकलँड (माल्विना आयलॅँड) बेटांवर आक्रमण केले होते. अर्जेंटिनाच्या तत्कालीन लष्करी सत्ताधार्‍यांनी हे साहस केले खरे, पण हजारो किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या इंग्लंडने हे आक्रमण मोडून काढले. पंतप्रधान मार्गारेट थॅचर बार्इंनी ही कामगिरी केली. हा इतिहास वगळता आपापसात युद्ध नाही. परिणामी सैन्यदले कमी. सरंक्षण या विषयावर होणारा खर्चसुद्धा आपल्या तुलनेत फारच कमी.

ब्राझील आणि पॅराग्वे या देशांच्या सरहद्दीवर ‘इत्यापु बायनॅशनल’ हे जगातील द्वितीय क्रमांकाचे मोठे धरण आहे. त्याचा मुख्य उद्देश वीजनिर्मिती असून ते जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. ब्राझील आणि पॅराग्वे या देशांनी मिळून हे धरण बांधले असून त्यापासून निर्मिलेली वीज हे दोन देश पन्नास पन्नास टक्के विभागून घेतात. ब्राझीलपेक्षाही पॅराग्वे आकाराने बराच लहान असल्याने त्याला इतक्या पन्नास टक्के विजेची आवश्यकता नाही. त्यामुळे पॅराग्वे फक्त दहा टक्के वीज घेते आणि उर्वरित चाळीस टक्के वीज ब्राझीलला विकत देते. धरण बघण्यासाठी पर्यटकांना प्रवेशही मुक्त...

पनामा, ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू या देशांमध्ये आता अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही आहे.एके काळी समाजवादी वा डावी विचारसरणी बाळगणारे हे बहुतेक देश आता अमेरिकेच्या छुप्या साम्राज्यवादाचे अंकित झाले आहेत. अपवाद बोलिव्हियाचा. तिथे आजही डाव्या विचारांचे सरकार असून भांडवलशाहीचे अस्तित्व जाणवत नाही. तीस वर्षांपूर्वीच्या भारत देशात आलो आहोत, असे बोलिव्हियात पाऊल टाकल्यावर जाणवते. भांडवलशाही आणि जगाचे आधुनिक वारे या देशांमध्ये वाहात असून जुना इतिहासही सोयीस्कररीत्या विस्मरणात ढकलण्याचे प्रयत्न होत आहेत. पेरू देशाची राजधानी लिमामध्ये आम्हाला गाईड मिळाला, त्याचे नाव होते फिडेल. त्याचे नाव ऐकून मी त्याला क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोचे स्मरण करून दिले. तेव्हा त्याने उत्तर दिले की होय, माझे नाव फिडेल हे माझ्या वडलांनी कॅस्ट्रोच्या नावावरूनच घेतले. साठ- सत्तरच्या दशकात शीतयुद्धाच्या काळात आमचे हिरो होते फिडेल कॅस्ट्रो. आता ते ओझे वाटते. आम्ही ते विचार झुगारू इच्छितो. चिलीमध्येही असाच अनुभव आला.

बर्नार्डो नावाचा 17 वर्षांचा उत्कृ ष्ट इंग्लिश बोलणारा आणि चौफेर ज्ञान असलेला गाइड उत्तम प्रकारे माहिती देत होता.चिलीचा इतिहास तो सांगत असताना मी त्याला म्हणालो, की अध्यक्ष आयंदेची अमेरिकनांनी गोळ्या घालून हत्या केली. तेव्हा तो उद्गारला, नाही, नाही, त्याने आत्महत्या केली! अगदी हिरिरीने त्याने माझा प्रतिवाद केला. बोलिव्हियामध्ये डावे सरकार आहे. तरीही तिथेसुद्धा असाच सूर कानी आला. एका बोलिव्हीयनशी बोलता बोलता मी विषय काढला, चे गव्हेरा यांचा. जगातल्या सगळ्या डाव्या चळवळींच्या गळ्यातील ताईत असलेल्या चे गव्हेराबद्दल हा माणूस भरभरून बोलेल, असा माझा कयास होता. प्रत्यक्षात तो हा विषय टाळू पाहात होता. मी जास्तच खोदून काढायला लागलो, तेव्हा तो म्हणाला, चे गव्हेरा बोलिव्हियामध्ये क्रांती करण्यासाठी आले, पण फिडेल कॅस्ट्रोपेक्षा त्यांचा हा चेला जास्त प्रभावी आणि लोकप्रिय होऊ लागल्याने फिडेल कॅस्ट्रोनेच त्याची हत्या घडवून आणली. याचाच अर्थ, इतिहासाचे वास्तव पुसून खोटा इतिहास पुढे आणण्याचे उद्योग तिथे सुरू असावेत. अर्थात, सर्वच लोक हा खरा इतिहास विसरलेत किंवा विसरतील असे शक्य नाही!

या देशांमध्ये राजकीय-लष्करी पातळीवर कितीही सांमजस्य असले तरी, फुटबॉलच्या मैदानावर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. अर्जेंटिना आणि ब्राझील फुटबॉल सामना म्हणजे जणू भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना. हा खरा संघर्ष स्पॅनिश विरुद्ध पोर्तुगीज असा आहे. चिली, पेरू, उरूग्वे या देशांचीही फुटबॉलमधली ईर्षा जबरदस्त आहे. रिओ द जानेरो शहरातील एका स्टेडियमध्ये फुटबॉलपटू पेले यांचा पुतळा आहे, तर मॅराडोनाला अर्जेंटिनामध्ये देवाचाच सन्मान आहे.

तांबे आणि इतर धातूंची खनिजे मोठ्या प्रमाणावर असल्याने अर्थकारण मुख्यत: त्यावरच अवलंबून. खनिज तेलही काही देशांमध्ये भरपूर आढळते. बोलिव्हिया देशामध्ये पेट्रोल दोन डॉलर्सला एक गॅलन इतके स्वस्त होते. त्याचे फार आश्चर्य वाटले. बोलिव्हियाची बॉर्डर सोडताना आमची बस थांबवून आतून तपासण्यात आली. पोरसवदा मिलिटरीचे तरुण होते तपासणीस. या देशातून बाहेर पेट्रोलचे स्मगलिंग होते, त्यासाठी ही तपासणी होती. कॉलेजमधून शिक्षण संपताच दीड वर्षाचे मिलीटरी ट्रेनिंग कंपल्सरी असल्याने हे ट्रेनी या तपासण्या करतात.

पण या दक्षिण अमेरिकन देशांना शाप आहे तो ड्रग्जचा. ब्राझील, अर्जेंटिना, पनामा या सर्वच देशांमध्ये कमी- अधिक प्रमाणात ड्रग्ज ट्राफिकिंग आहे. पण त्यातही सर्वात जास्त बदनाम आहे कोलंबिया. त्यामुळे कोलंबियाशी भोवतालच्या देशांचे संबंध तसे फटकूनच आहेत. पनामामधून कोलंबियाच्या बॉर्डरपर्यंत रस्ता आहे, पण तो बॉर्डरवरच पनामाने तो बंद केला आहे. कोलंबियाशी संबंध नकोच. अर्जेटिना, बोलिव्हिया, ब्राझीलमध्ये कोका नामक वनस्पती निपजते. तिच्या पानापासून कोका टी नावाचे चहा सदृश उत्तेजक पेय घराघरातून प्यायले जाते. मात्र याच वनस्पतीच्या पानांपासून कोकेन हे अमली द्रव्यसुद्धा बनते.साहजिकच त्याचा व्यापार जगभर द. अमेरिकेतून होतो.

युरोपीय देशांनी जसा सर्व देशांतून फिरणारा युरोहायवे तयार केला आहे. त्यामुळे एका देशातून दुसर्‍या देशात सहज जाता येते. तसाच दक्षिण अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा असा संपूर्ण अमेरिका खंडाला आरपार छेदणारा पॅन अमेरिकन हायवेसुद्धा अर्जेंटिनाच्या दक्षिण टोकापासूून सुरू होतो. मात्र ब्राझील ओलांडून कोलंबियाच्या बॉर्डरवर हा हायवे थबकतो आणि कोलंबियाला वगळून पुन्हा पनामामध्ये सुरू होतो, तो थेट कॅनडाला छेदतो!

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मात्र दक्षिण अमेरिकेतील प्रत्येक देश लाजवाब. पृथ्वीवरील अतिशय सुंदर प्रदेशात आपण आलो आहोत, याची जाणीव वारंवार होत राहते. चाळीस चाळीस किलोमीटर रुंदीचे पात्र असलेल्या नद्या पाहताना डोळे विस्फारतात. पन्नास मीटर्सपर्यंत पाण्याची खोली इतके पाणीच पाणी. अख्ख्या युरोप खंडातील सर्व नद्यांना मिळून जितके पाणी असेल, तितके एकट्या ‘तरूमा’नदीला आहे, हे ऐकताना कानांवर विश्वास बसत नाही.

निग्रो नदीचे कोकाकोलासारख्या रंगाचे पाणी हे एक आश्चर्य.अ‍ॅमेझॉनबद्दल किती सांगावे. ब्राझीलमध्ये ती अटलांटिक महासागराला अक्षरश: फाडून आत प्रवेशते, तेव्हा पाण्याचा प्रवाह आणि वेग इतका, की दीडशे किलोमीटरपर्यंत समुद्राचे पाणी गोड लागते; खारे नाही, हा अमेझॉनचा प्रताप. अमेझॉनच्या खोर्‍यातील जंगल हे अविश्वसनीय असे आहे. तीन किलोमीटर रुंदी असलेला ‘इग्वासू’ धबधबा नायगारापेक्षा प्रचंड मोठा. ब्राझील, अर्जेंटिना आणि पॅराग्वे या तीन देशांमधून पाहण्यासाठी या धबधब्यावर तीन दिवस खर्च करावे लागतात!

अर्जेंटिनाच्या दक्षिण टोकाला अल कलाफते या लहानशा गावातील नदीमध्ये असलेले हिमनग हे जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक. ग्लोबल वार्मिंग कितीही होत असले तरी या ग्लेशियसचा आकार कमी- अधिक होत नाही. त्याच्या बर्फाचा रंग निळसर दिसतो, हेही आश्चर्य. इग्बासू धबधबा आणि अल कलाफतेचा हिमनग हे जगातल्या सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी आहेत.

अर्जेटिना, पेरू, चिली, बोलिव्हिया या चारही देशांमध्ये हिमाच्छादित गिरीशिखरांचे दर्शन सतत होत असते. तर ब्राझील आणि पनामामध्ये विषुववृत्ताजवळचा उकाडा जाणवतो. शंभर- दीडशे किलोमीटर रुंदी आणि चार हजार कि. मी. लांबी असलेल्या मिरचीसारख्या चिली देशात दक्षिणेला हिमशिखरे आणि उत्तम शेती आहे, तर उत्तरेला जगातले सर्वात मोठे असे ‘अताकामा’ नामक वाळवंट आहे. गत 200 वर्षे इथे पाऊस पडलेला नाही. या वाळवंटात ‘इकाकू’ नामक विमानतळ आहे. अतिशय आश्चर्यकारक अशा नैसर्गिक दृश्यांची रेलचेल या दक्षिण अमेरिकेत आहे. रिओ द जानेरो चा ‘कोपा कबाना’ बीच हे जगातील पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.

जाता जाता सांगितले पाहिजे, की जगभरातून या सुंदर प्रदेशात हजारो पर्यटक जात असले तरी भारतीय पर्यटक मात्र अभावानेच आढळतात. मात्र या सर्व देशांतील मोठ्या शहरांमध्ये म्हणजे सान्तियागो (चीली), रिओ द जानेरो (ब्राझील), ब्युनोस, आयरेस (अर्जेटिना), लिमा (पेरू) इत्यादी शहरांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आढळतात. रिओमध्ये एक मोठा चौक ‘महात्मा गांधी स्क्वेअर’ या नावाने आहे. तर लिमामध्ये महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि जवाहरलाल नेहरू या तिघांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. या तिघांव्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील सामान्य जनतेला माहीत आहेत फक्त इंदिरा गांधी. इतर सुप्रसिद्ध भारतीय व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्याबद्दल ते अनभिज्ञ आहेत...