आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशामागील अपयश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेमाडेंच्या वयाची 75 वर्षे पूर्ण झाली, हे खरेच वाटत नाही. तसेच ‘कोसला’ला 50 वर्षे झाली, हेही खरे वाटत नाही. ‘कोसला’वर भरपूर लिहिले गेले आहे. पण मला वाटते, त्यातील सर्वात उत्तम लेख नेमाडेंचे वैचारिक शत्रू विलास सारंग यांचा आहे. मध्यंतरी जळगावला परिसंवादानिमित्त भेटले, तेव्हा नेमाडे म्हणाले, ‘पेंग्विन बुक आॅफ इंडियन रायटिंग’मध्ये ‘कोसला’चा जो भाग प्रसिद्ध झाला आहे, तो विलास सारंग यांनी अनुवादित केला होता. ‘कोसला’चे यश कशात आहे, याची पुन्हा चर्चा करण्याचे कारण नाही. तरुणपणातील बंडखोरी, अस्वस्थपण आणि मुर्दाडपणा दाखवणारे, असे दुसरे पुस्तक नाही. कोसला वाचून पांडुरंग सांगवीकर म्हणजे आपण, अशी सगळ्यांची भावना होते. ढोबळमानाने हे कादंबरीच्या यशाचे रहस्य मानता येईल. स्वामी, मृत्युंजय, ययाती अशा भूतकाळावर आधारित कादंबर्‍या मराठी मनाला आवडतात. त्यातली खोटी उदात्तता आणि भरजरी भाषा मराठी समाजाला भावते. त्या तुलनेत पांडुरंग आणि त्याची भाषा थेट कंटेम्पररी बोलीभाषेसारखी. ‘कोसला’चा प्रभाव इतका की, ‘बिढार’ आणि ‘जरीला’ अशा कादंबर्‍यांना त्याच्या यशाने झाकोळून टाकले. खरे तर याही कादंबर्‍यांच्या आठ-दहा आवृत्या निघाल्या. पण चर्चा चालते ती ‘कोसला’बद्दल. हे काही एखाद्या लेखकाला आवडेल असे नाही. 50 वर्षांनंतर ‘कोसला’ ताजी, टवटवीत वाटते, याचा अर्थ आपण 50 वर्षांत बदललो नाही की काय? समाज अनेक बाबतीत आजही बदलला नाही, हेही खरेच आहे. उदाहरणार्थ- जातीयतावाद, परंपरेची ओढ, धार्मिक कर्मकांडांची आवड या परिस्थितीत जो तरुण मोठा होतो, तो वरकरणी आधुनिक बनतो. लॅपटॉप, मोबाइल, इत्यादी गॅजेट्स वापरतो; पण जन्म, मृत्यू, लग्न या सार्‍यामध्ये परंपरेच्या ओझ्याखालीच तो वावरत असतो. आडनावावरून जात ओळखणे, मैत्री करताना समान उत्पन्नाच्या आणि धारणांच्या माणसांशी मैत्री करणे. ब्रेकअप, घटस्फोट या प्रसंगी पुरुषी अहंकार बटबटीतपणे व्यक्त होणे, हे सारे आपण आधुनिकतेचा टप्पा न गाठल्याचे दाखवते. अशा समाजातच मानबिंदू दीर्घकाळ स्थिर राहू शकतात आणि ‘कोसला’ हा आपल्या साहित्यातील मानबिंदू आहे. तो इतका काळ स्थिर राहणे हे कादंबरीचे यश असले तरी समाज म्हणून आपले अपयश आहे.

‘कोसला’नंतर बर्‍याच काळानंतर आलेली ‘हिंदू’ ही कादंबरी समाजाच्या या थिटेपणाचा धांडोळा घेते; पण समीक्षक आणि अभ्यासकांनी भूतकाळाकडे जाणारी कादंबरी, असा शिक्का मारला. याचे कारण, मधल्या काळात नेमाडेंच्या मुलाखती आणि लेख यातून बरेच जण दुखावले. एकीकडे नेमाडे देशीवादाचे खंदे समर्थक बनले आणि ‘मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप’सारखा त्यांचा निबंध आणि ‘टीकास्वयंवर’सारखे पुस्तक देशीवाद्यांचे बायबल बनले. याचा मोठा परिणाम नव्या लेखकांवर झाला. वास्तवतेला अतोनात महत्त्व आले. कादंबरी हा एक सृजनशीलतेला आव्हान देणारा आणि भोवतालच्या समाजाला आरसा दाखवणारा वाङ्मय प्रकार आहे. दीर्घ लांबीचा रिपोर्ताज म्हणजे कादंबरी नव्हे. पण राजन गवस यांच्या ‘कळप’पासून प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’पर्यंत अनेक कादंबर्‍यांवर देशीवादी विचारांची मोठी सावली पडलेली दिसते. याबद्दल नेमाडे यांना दोष द्यायचा नाही, कारण नेमाडे देशीवाद म्हणजे काय ते सांगत होते; देशीवादी कादंबरी कशी लिहावी, हे सांगत नव्हते.

‘कोसला’चा प्रभाव तर अनेक कादंबर्‍यांवर दिसतो. उदाहरणार्थ-अमुकचे स्वातंत्र्य किंवा अगदी कालची ‘गवत्या’सारखी कादंबरी घ्या. ‘कोसला’ने काही अंशी नव्या पिढीला लिबरेट केले आणि तरुण वयातील अस्वस्थतेला आवाज दिला. ‘कोसला’ ही अनेक अंशी परिपूर्ण कादंबरी आहे, असे अनेकांना वाटते, तर महाविद्यालयीन जीवनातील तरुण-तरुणीच्या निकोप मैत्रीचा अभाव हा मोठा दोष आहे, असे अरुंधती मुंडले यांच्यासारख्यांनी लिहिले आहे. (त्या भारत-अमेरिका संबंधांच्या निरीक्षक असून एका वर्कशॉपमध्ये सादर केलेल्या निबंधात त्यांनी म्हटले होते.) ही सारी मत-मतांतरे बाजूला ठेवली तरी ‘कोसला’ हे कुठलेही पान काढून कधीही वाचावे, असे सर्वार्थाने ‘लोकप्रिय’ या व्याख्येत बसणारे पुस्तक आहे.
(shashibooks@gmail.com)