आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोप्यामध्ये खोपा..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच सो कॉल्ड निसर्गप्रेमींना घरट्यांचा संग्रह करण्याचा छंद असतो. सुगरणीची घरटी तर सहज उपलब्ध असतात. तथापि ती टाकलेली घरटी समजून आपल्या घरात आणणं, हे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने योग्य कृत्य नव्हे. इकॉलॉजी संवर्धनात या घरट्यांचीही काही भूमिका असते. या घरट्यांचा वापर इतर पक्षी उबवणीसाठी करू शकतात. काही काही वेळा दुसरी सुगरण त्यावर आणखी एखादा मजला चढवून आपली सोय करू शकतो. सुगरणीची दोन-तीन मजली घरटी दृष्टीस पडतातही. आतापर्यंत आढळलेला सुगरणीचा सर्वात मोठा इमला सात मजल्यांचा होता. हे त्यांचं रेकॉर्ड.
सुगरणीप्रमाणंच शिंपी पक्ष्याची कलाकुसरदेखील लाजवाब. नावच शिंपी. त्याची कारागिरी शिवणकामाची. त्याचं घरटं सुरईच्या आकाराचं. घरट्यासाठी हादेखील हिरवी पत्ती पसंत करतो. त्याच्या पसंतीचं झाड उंबराचं. दोन-तीन पानांना चोचीने छिद्रं पाडून त्यातून तंतूंनी शिवणकाम करतो. अंतर्गत सजावटीसाठी मऊ गवत, कापूस, कोळिष्टकं, पिसं, अशा सामग्रीच्या जमवाजमवीच्या मागं लागतो. ही सामग्री जमली की मऊसूत बिछाना झाला तयार. की म्होरं निसर्गक्रीडांसाठी हा शिंपी मोकळा. अर्थातच बाळाची जबाबदारी शिंपीणबाईची.

असंच नामाभिधान सार्थ करणारा पक्षी, तांबट. रानात काही वेळा अगदी दूरवरूनसुद्धा ‘टोकऽऽ टोक’ असा आवाज ऐकू येतो. कुठं वृक्षतोड तर चालली नाही ना? आपल्या अभद्र मनाला उगीचच शंका चाटून जाते. बर्‍याच वेळा हा तांबट प्रताप असतो. आपल्या कणखर चोचीने झाडाच्या मऊ खोडाला टोकरून तो घरटं बनवत असतो. त्याची कारागिरी तर अभिजात अभियंत्यालाही चक्रावून टाकणारी. कर्कटाच्या साहाय्यानेदेखील आपणाला असं परफेक्ट गोलाकार बनवणं मुश्कील जाईल. गुळगुळीत तर असा की घसरगुंडीच.
तथापि काही झालं तरी गृहकलाकारीत सुगरण म्हणजे अल्टिमेट... उगीच नाही बहिणाबार्इंनी सुगरणीचा महिमा गायला? इतरांची घरटी असतात तर सुगरणीचा झोका, निसर्गलहरीवर जोजवणारा.
अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला
देख पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला...
एकूणच पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास हा मनोरंजक ठरू शकतो. तथापि या विविध तर्‍हेच्या निवार्‍यांमागं काही शास्त्रीय तत्त्वं दडलेली आहेत का? तसंच ऋतुचक्र आणि हे निवारे यांचा काही संबंध आहे का? हे अभ्यासणं तेवढंच रंजक ठरू शकेल. ऋतुचक्र आणि मानवी घरं, हा वास्तुतज्ज्ञांच्या (आर्किटेक्ट्स) अभ्यासाचा खास विषय असतो. पशुपक्ष्यांच्या बाबतीतही हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

प्रसिद्ध लेखक माधव आचवल यांनी आपल्या एका लेखात म्हटलं होतं, ‘ऋतू हे घराचे पाहुणे आहेत.’ हे विधान माणसांबाबतीत जेवढं सत्य आहे, तेवढंच ते पशुपक्ष्यांच्या बाबतीतही योग्य आहे. हे पाहुणे सोबत नवलाई घेऊन येतात. थंडी घेऊन येतात, पाऊस घेऊन येतात. वसंत सुमनं आणतात आणि वैशाख वणवाही आणतात. आपण या पाहुण्यांचं आपल्या घरी स्वागत कसं करतो? पशुपक्षी कसं करतात? हा विचार करताना प्रश्न उमटतात, आपण घरं का बांधतो? या अतिथींसाठी? पक्षी घरटी का बांधतात? अंडी घालणं, उबवणं, पिलांचं पालनपोषण आणि अंडी तथा पिलांची सुरक्षितता या कारणांस्तव पक्षी घरटी बांधतात. हे सरळ आहे. इतर काही प्राणी आणि सरपटणारे जीव यांची घरटीसुद्धा अशाच कारणांसाठी बांधली जातात. कासवासारखे उभयचर प्राणी निवार्‍याची बेगमी त्यांच्या पद्धतीने करत असतात. पक्ष्यांबाबतीत किमान पिलांच्या पंखांत बळ येईपर्यंत तरी त्यांना घरट्यांची आवश्यकता असते. त्यामुळं हा कालावधी भौगोलिक बाबी आणि प्रादेशिक हवामानावर अवलंबून असतो, ऋतुमानावर अवलंबून असतो. म्हणूनच ऋतुमान आणि घरटी हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.