आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Sunila Buddhisagar About What Have To Teach Students

संस्कार (पाश रूढींचे)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावी पिढीवर मोठ्या अपेक्षा ठेवून संस्कार करताना, त्यांना घडवताना पालक कथा, पुराणांमधील दाखले देतात. पण आपले सांगणे कर्मकांड, दैवी शक्ती, चमत्कारांभोवती फिरत असेल तर आजच्या विज्ञान व कर्माधिष्ठित जगात मुले मागे पडण्याची भीती जास्त आहे..
चौथीच्या वर्गात बाई आल्या ते गृहपाठाच्या वह्यांचा गठ्ठा घेऊनच. ‘नमऽऽस्ते!’ मुलांनी उभे राहून एकसुरात बाईंना अभिवादन केलं. मुलांना खाली बसायला सांगून बाई म्हणाल्या, ‘हे पाहा, फक्त ४-५ वह्या तपासायच्या रािहल्या आहेत. तेवढ्या तपासून सगळ्यांच्या वह्या देणार आहे. तोपर्यंत तुम्ही शांतपणे एखादं चित्र काढत बसा.’

मुलं खुश होऊन चित्र काढू लागली. अर्थात बालसुलभ वृत्तीनुसार हळू आवाजात बडबड चालू होतीच. ती बाईंच्याही कानावर पडत होती. पण ऐकू येऊनही त्या तसं दाखवत नव्हत्या.

‘अरे, तुकाराम महाराज कसले ग्रेट होते ना! लोकांनी त्यांच्या वह्या नदीत टाकून दिल्या, तर ‘जलदेवी’नं त्या वर काढल्या आणि त्यांना स्वर्गात न्यायला आकाशातून विमान आलं होतं आणि त्यांना जिवंतपणी घेऊन गेलं स्वर्गात!’ पुढच्या बाकावरचा संदीप शेजारच्या कुशलशी बोलत होता. त्यावर कुशल म्हणाला, ‘अरे, ज्ञानेश्वर महाराज पण ग्रेट होते. त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतले होते आणि एकदा तर चांगदेव गर्वानं त्यांना भेटायला वाघावरून निघाले, तर ज्ञानेश्वरांनी भिंतीवर बसून ती भिंतच चालवत त्यांच्याकडे नेली!’
बाई हे सारं ऐकत होत्या; पण त्यावर काही न बोलता त्यांनी मनाशी काही तरी ठरवलं. तास संपताना त्यांनी मुलांना एक सूचना सांगितली. म्हणाल्या, ‘येत्या रविवारी सकाळी १० वाजता आपल्या वर्गातल्या मुलांच्या पालकांसाठी मी मीटिंग ठेवली आहे. सगळ्यांनी आपल्या पालकांना नक्की यायला सांगा.’

रविवारी बहुतेक सर्व मुलांचे पालक जमले होते. बाईंनी सभेला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, ‘आजची मीटिंग मी एका वेगळ्या कारणासाठी बोलावली आहे. आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी याबरोबर त्यांच्यावर चांगले संस्कारही व्हावेत, असं आपल्याला वाटतं ना?

अर्थातच सगळ्यांकडून होकारार्थी उद््गार आले. ‘मग त्यासाठी तुम्ही काय काय करता?’ कुणी म्हणाले, ‘आम्ही देवाची स्तोत्रे त्यांच्याकडून म्हणून घेतो.’ कुणी म्हणाले, ‘आम्ही रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगतो.’ तर कुणी म्हणाले, ‘साधू-संतांची चरित्रे त्यांना वाचायला देतो.’

बाई म्हणाल्या, ‘अगदी बरोबर! पण आता आपण या गोष्टीतून संस्काराचा उद्देश कसा आणि किती साध्य होतो, याचा विचार करूया. स्तोत्रांचा अर्थ मुलांना कितपत कळतो ते सांगता येत नाही. शिवाय त्यात बहुतांश भागात देवाची स्तुती आणि स्तोत्रपठणाची फलश्रुती एवढेच सांगितलेले असते. मात्र, पाठांतर क्षमता, मनाची शांतता आणि एकाग्रता यासाठी त्यांचा उपयोग होतो, एवढं खरं.
दुसरी गोष्ट म्हणजे कथा आणि चरित्रं. लहान मुलांना स्वाभाविकपणेच चमत्कार, जादू अशा गोष्टींचं आकर्षण असतं. पण या गोष्टी परिकथेपुरत्याच मर्यादित असाव्यात. साधुसंतांचा मोठेपणा, त्यांच्या तथाकथित चमत्कारांमुळे नव्हे, तर त्यांचे विचार, कार्य आणि शिकवणीमुळे असतो, हे मुलांना आपण स्पष्ट केलं पाहिजे. तुकारामांनी रंजल्या-गांजलेल्यांना मदत करणं, आपलंसं करणं हेच देवत्व असल्याचं सांगितलं. दु:खी लोकांसाठी काम करणाऱ्यांची उदाहरणं, गोष्टी, पेपरमधल्या बातम्या मुलांना आवर्जून सांगाव्यात. ज्ञानेश्वरांनी सर्व प्राणिमात्र सुखी राहोत असं म्हटलं, तो बंधुभाव मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर संतांची वैचारिक वचने अवश्य समजावून द्यावीत. उदाहरणार्थ, तुकारामांनी म्हटलेले, ‘नवसे कन्या-पुत्र होती, तो का करणे लागे पती?’ संतांनीही वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच पुरस्कार केला आहे, हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं. चमत्कार हे त्यांच्या चरित्रात नंतर कुणी तरी घातले असणार. नवीन ‘तुकाराम’ सिनेमात दाखवल्याप्रमाणे गाथा लोकांनी मुखोद््गत केल्यामुळे तरल्या, हे तर्कशुद्ध आहे. जलदेवीनं तारल्या हे शक्य नाही. मुळात जगात चमत्कार कुठेही, कधीही घडत नसतात हा विज्ञाननिष्ठ संस्कार आपणच त्यांना शिकवायला हवा ना? ऐतिहासिक आणि पौराणिक कथा सत्य-असत्याच्या निकषावर तपासून घ्यायलाही शिकवायला पाहिजे. पटतंय का तुम्हाला माझं?’
sunila0810@gmail.com