आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्विस आर्मी नाइफ’चा निर्माता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या काकांकडे विविध हत्यारे, उपकरणे, चाकू, सुर्‍या, स्क्रूड्रायव्हर अशा वस्तू असायच्या. चांभाराकडे एक लोखंडाचे तिरपगडे असते, त्यावर चपला बूट ठेवून खिळे ठोकता येतात, तेसुद्धा त्यांच्याकडे होते. आम्हा मुलांना या सगळ्याचे फार आकर्षण. त्यांच्या घरी गेले म्हणजे ते काही तरी ‘खुबिलिटी’ असलेली वस्तू काढून दाखवत. त्यांच्याकडे एक नाइफ होती; त्यात चाकूची पाती, स्क्रूड्रायव्हर, ओपनर असे सगळे एकत्र असायचे. ती सगळी उपकरणे बंद करून ठेवली की एक सुबक चाकू तयार व्हायचा. या जादुई वस्तूला ‘स्विस आर्मी नाइफ’ म्हणतात, असे त्यांनी आम्हा मुलांना सांगितले. मोठे झाल्यावर आपण असा स्विस नाइफ घ्यायचा, असे माझे स्वप्न होते. ते मुंबईच्या फ्लोराफौंटनमधल्या दुकानात मी मोठेपणी पुरे केले. या सगळ्या आठवणी पुन्हा भेटीला आल्या, आज लंडनचा ‘फायनान्शियल टाइम्स’ वाचताना...स्विस आर्मी नाइफ तयार करण्याचा कारखाना स्वित्झर्लंडमध्ये आहे. कार्ल एल्सेनरच्या कुटुंबाच्या मालकीचा हा कारखाना. 1884 मध्ये कार्लच्या आजोबांनी या कारखान्याची स्थापना केली. कार्लने 1950 मध्ये वडिलांकडून कारभाराची सूत्रे स्वीकारली. गेली पन्नास वर्षे कार्ल या कंपनीचा सर्वेसर्वा होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत कंपनीची व्याप्ती जगभर केली. दुसर्‍या महायुद्धाच्या सावलीत या कंपनीचा जगभर प्रसार झाला. दुसरे महायुद्ध संपले, तरी युरोपभर अमेरिकी लष्कराचे वास्तव्य होते. हळूहळू अमेरिकी फौजा परतू लागल्या. परत जाताना त्यांनी स्विस आर्मी नाइफ सोबत नेला. युरोपमधील वर्दळ वाढत होती. स्विस नाइफचा जगभर प्रसार झाला, लोकप्रियता वाढली. कारागिरांनी हातांनी बनवलेली ही उपकरणे, हत्यारे, त्याला कार्लने नवीन यंत्राची जोड दिली. रोज साठ हजार स्विस नाइफसारखी उपकरणे या कारखान्यातून बाहेर येऊ लागली. संगणकाचे युग आल्याबरोबर एलईडीजपासून यूएसबी स्टिक्सपर्यंत संगणकाला लागणारी विविध आयुधे तयार करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील बारीकसारीक गोष्टी कार्लच्या टेबलावरून जात असत. कंपनीत कोणाला किती पगार मिळतो, हे त्याला ठाऊक असे. त्याने कंपनीत एक महत्त्वाचा दंडक घालून दिला. कंपनीतील कोणत्याही अधिकार्‍याचा पगार सामान्य कामगाराच्या पगाराच्या पाचपटीपेक्षा जास्त असणार नाही. काही उद्योगपती कंपनी बघायला येत. निळा अ‍ॅप्रन घातलेला एक जण त्यांचे दरवाजात स्वागत करी व त्यांच्याबरोबर चालू लागे. बोर्डरूममध्ये त्यांच्यासह आत जाई. खुर्चीवर बसल्यानंतर पाहुण्यांना कळे की हेच कार्ल एल्सेनर आहेत. 11 सप्टेंबर 2001. न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला. नव्या युगाची सुरुवात. विमानतळावरची सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढली. चाकू -सुर्‍या नेण्यावर बंदी आली.ड्यूटी फ्री दुकानातील स्विस नाइफ गडप झाल्या. कार्लच्या उत्पादनांची विक्री 30 टक्के खाली आली. कंपनीचे अर्थार्जन एकदम घसरले. कित्येक कंपन्यांनी कामगार कपात केली. पण कार्ल एल्सेनर यांनी एकाही कामगाराला काढले नाही. ‘ओव्हरटाइम’ कमी केला. कामाचे तास कमी केले. कामगारांचा रोजगार थांबला नाही. कंपनीने घड्याळे, प्रवासाचे सामान, फॅशनच्या वस्तू तयार करायला सुरुवात केली. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली. कामगारांचे पगार पूर्ववत झाले. गेल्या 80 वर्षांत आर्थिक कारणासाठी एकाही कामगाराला काढण्यात आलेले नाही, अशी कार्लच्या कंपनीची परंपरा व लौकिक आहे. कार्लचा जन्म 6 जुलै 1922 रोजी झाला. वयाच्या 28व्या वर्षी कंपनीची सूत्रे त्याच्या हाती आली. 2007मध्ये त्यांनी त्यांच्या अकरा मुलांपैकी कार्ल ज्युनियर याच्या हाती कंपनी सोपवली. कार्लच्या वयाच्या 85व्या वर्षी त्याची पत्नी रोझमेरी हिचे निधन झाले. कार्ल ‘सीनियर लीडर’ म्हणून कंपनीत येत राहिला. 2013च्या जूनमध्ये वयाच्या 90व्या वर्षी कार्लचा मृत्यू झाला. सामाजिक जाणीव व कामगारांबद्दलची कणव असलेला कार्ल म्हणत असे, ‘चांगल्या वस्तू नेहमीच आणखी चांगल्या करता येण्याची शक्यता असते.’ उत्पादने सुबक आणि दर्जा उत्तम राखण्यासाठी हा कानमंत्र त्याने त्याच्या कामगारांना दिला होता. उद्योजक हा फक्त पैसा कमावण्याच्या मागे असतो, असा सर्वसाधारण समज. पण कार्ल एल्सेनरसारखे उद्योजक याला अपवाद ठरतात.
dranand5@yahoo.co.in