आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरण कसं, एका क्षणात यावं...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शुक्रवारी केरळमधल्या ‘अन्सार खिलाफाह’ या ‘इसिस’ समर्थक कट्टरवादी गटाकडून मला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी मिळाली. जे गट इसिसशी संलग्न अाहेत किंवा त्यांचा इसिसशी थेट संबंध अाहे ते सहजपणे कुणाचीही हत्या करू शकतात, हे आजचं भयावह वास्तव आहे. म्हणून मी अनेक वेळा माझ्या गळ्याला स्पर्श करून तो शाबूत आहे की नाही, हे पाहात असते. काही वेळा डोक्याच्या मागेही जाणीवपूर्वक स्पर्श करून पाहते, की माझ्यावर मागून कुणी वार तर केला नाही...? पण दहशतवाद्यांना मला ठारच मारायचे असेल, तर त्यांनी छळ करण्यापेक्षा थेट माझ्या डोक्यात गोळी मारली, तरीही मला चालेल. कारण, मी आजवरच्या आयुष्यात खूप सोसलंय. खूप भोगलंय. मरताना अजून यातना सोसण्याची माझी इच्छा नाही. मरण कसं एका क्षणात यावं. पण माझं म्हणणं दहशतवादी ऐकतील? हे खरं की, अशा माथेफिरूंकडे मी जगण्याची याचना नाही करू शकत. पण, जेव्हा कधी वेळ येईल, तेव्हा मनाला कमी वेदना व्हाव्यात म्हणून मी माझे डोळे मिटून घेईन. शांतपणे रवींद्र संगीतातलं एखादं कडवं म्हणेन आणि मगच मरणाला सामोरी जाईन...
ढाक्यातल्या कॅफेत १९-२० वर्षांची कोवळी मुलं जेव्हा मरणाला सामोरी जात होती तेव्हा त्यांच्या मनात काय विचार आले असतील, हे समजून घेण्याचा मी पुन:पुन्हा प्रयत्न करते आहे. माझ्या मनात प्रश्न घोंगावताहेत की, त्यांचं किंचाळणं स्वत:चा जीव वाचवण्यापुरतं मर्यादित होतं का? त्यांनी दहशतवाद्यांच्या हातातील शस्त्रं खेचून घेण्याचा का प्रयत्न केला नाही? त्या कॅफेमध्ये अनेक लोक होते, ते सर्व मिळून दहशतवाद्यांना का रोखू शकले नाहीत? कदाचित हे लोक पोलिस, लष्कराच्या मदतीची वाट पाहात असतील. पण समजा, मी तिथे असते, तर त्या सहा वा बारा तासांत काय घडलं असतं? पिस्तुल, बंदूक, खंजीर, चाकू घेऊन असलेले हे दहशतवादी माझ्यापुढे परेड करत आहेत आणि मी असहाय्य अवस्थेत मरणाची वाट पाहतेय? एका क्षणी माझा गळा चिरला जातोय? ...विचार मनात आले तरी मला थरथरायला होतंय. घसा कोरडा पडतोय.

ढाक्यातल्या त्या कॅफेमध्ये ओलीस नाट्य सुरू होतं, पण पहिले बारा तास कुठलीच रेस्क्यु टीम तिथे पोहोचली नव्हती. कॅफेत अडकलेल्या आपल्या नातलगांची िचंता करणारे अनेक जण बाहेर उभे होते. जेव्हा हे नाट्य सुरू झालं, त्यानंतर तीन तासांनी तारीषी जैन हिच्या वडिलांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना आपली मुलगी या कॅफेत असल्याचे जगाला सांगितलं. ते अर्थातच अतिशय चिंतेत होते. पोलिस ऑपरेशन अजून का सुरू झालं नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पण मी फरास होसेनचाही विचार केला. त्याला दहशतवाद्यांनी सोडलं होतं, मात्र त्याला एकट्याला स्वत:चा जीव वाचवायचा नव्हता, त्याला त्याचे अडकलेले मित्रही वाचवायचे होते. तो तिथेच ठामपणे उभा राहिला. फराजसारखा शतकातून एखादाच जन्माला येतो, हेच खरं.

ढाक्यात जे घडलं ते कल्पनेपलीकडचं होतं. पण बिगर मुस्लिमांना मारून ढाक्यातल्या दहशतवाद्यांना अपेक्षितं ते ‘पुण्य’ मिळालं. कट्टर श्रद्धा माणसाला काही करायला लावते. या दहशतवाद्यांच्या मेंदूत जे काही पेरलं गेलं आहे, त्यावर प्रश्न विचारण्याची त्यांची इच्छा नाही. हे लोक िदसायला स्मार्ट आहेत, पण त्यांच्याकडे बुद्धी व विवेक क्षमता नाही. खरं तर जो समाज धर्मांध झाला असतो, तेथे जन्मापासूनच ब्रेनवॉश केला जातो. जन्नतची लालूच दाखवली जाते. विखारी विचारांचा आघात सातत्याने होत असल्यानेच विचारशक्ती विकसित होत नाही. पण बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तरी कुठे निरपराधांच्या हत्येसंदर्भात कधी खंत व्यक्त केली आहे? उलट, त्यांनी नास्तिकवादी ब्लॉगर, मुक्तविचार व्यक्त करणाऱ्यांनाच तुरुंगात धाडले आहे. राजकीय नेते दांभिक असतात. धर्मात सोयीस्कर असे जे सांगितले आहे, त्याचाच ते स्वीकार करतात. दहशतवादी हे दांभिक नसतात, ते कठपुतळ्यांसारखे वागतात. ते स्वत:च्या जगण्याचा विचार करत नाहीत. स्वर्गाच्या लालसेने ते मरणाला जवळ करतात. म्हणून मला नेहमी वाटतं, दहशतवाद्यांना ठार मारून आपण दहशतवाद संपवू शकत नाही, तर त्यासाठी दहशतवादाच्या मुळाशी जाऊन ती मुळं उखडून टाकली पाहिजेत. तेच अधिक योग्य आहे.
‘तस्लिमा नसरीेन यांच्या प्रकाशित लेखाचा भावानुवाद.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...