आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौगंडावस्थेतले धाडसी स्वगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपण आणि तरुणपण याच्यामध्ये एक अशी अवस्था असते, जिथे व्यक्ती ना धड लहान राहिलेली असते ना धड तरुण झालेली असते. बालपणातून तारुण्यात जाण्याच्या या काळात शरीर-मन सारेच आतून-बाहेरून बदलत असते. शारीरिक पातळीवर लैंगिक अवयवांची नवीन जाणीव, नवी ओळख होत असते तर मानसिक पातळीवर भिन्नलिंगी कुतूहल-आकर्षण जागे होत असते. हा काळ सर्वार्थाने एका ‘रोलरकोस्टर’सारखा असतो. ही अवस्था ज्याची त्यानेच भोगायची असते. शेगडीवर ठेवलेल्या आधणाला उकळी फुटून वरच्या झाकणाला कोंडलेल्या वाफांनी धडका देण्याचे हे ‘वाफाळलेले दिवस’ प्रतीक पुरी यांनी त्यांच्या कादंबरीत अत्यंत धाडसाने रंगवले आहेत. ‘गोल्डन पेज पब्लिकेशन’ने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.

या कादंबरीत लेखकाने आठवीत शिकत असणार्‍या एका मुलाचे, म्हणजे साधारण चौदा वर्षांच्या मुलाचे शारीरिक-मानसिक बदलांच्या अवस्थेतून जातानाचे अनुभव कथारूपाने मांडले आहेत. या निमित्ताने वयात येणार्‍या मुलांचे अंतरंग उलगडण्याचा धीट प्रयत्न लेखकाने केला आहे. धीट या अर्थाने की अजूनही ‘लैंगिकता’ या विषयाकडे निषिद्ध या दृष्टीने पाहिले जाते. या विषयाची संभावना ‘अश्लील’ या सदरात केली जाते. परंतु लेखकाने समजून-उमजून पण सवंगतेकडे न झुकता वस्तुनिष्ठपणे हे ‘पाप’ केले आहे. एक प्रकारे ही एका वयाने मोठे होणार्‍या मुलाच्या ‘स्व-शोधा’च्या प्रवासाची कहाणी आहे.
मोठे होण्याची ही प्रक्रिया दोन पातळ्यांवर घडत असते. एक ज्ञान-संस्कारांच्या पातळीवर आणि दुसरी नैसर्गिक शारीरिक वाढीच्या पातळीवर. मुले शाळेत जातात, विशिष्ट संस्कार त्यांच्यावर केले जातात. अशा वेळी रात्री चड्डी ओली होणे, त्यामुळे वाटणारी लाज, मुलींच्या अवयवांबद्दल आकर्षण वाटणे, त्यांच्याकडे टक लावून पाहणे, त्यांचा स्पर्श मिळवण्यासाठी धडपडणे, हे सारे नैसर्गिकरीत्या जन्म घेत असले, तरी संस्कारित जगाच्या दृष्टीने तो वाह्यातपणा मानला जातो. वयात येणार्‍या मुलांची ही गोची लेखकाने त्यासाठी आवश्यक खुलेपणा स्वीकारून परिणामकारकरीत्या मांडली आहे.
मुले आपापल्या परीने ही कोंडलेली वाफ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. इथे या मुलाचे त्याच्याच वयाचे, समान प्रक्रियेतून जात असलेले त्याचे शाळकरी मित्र आहेत. सच्याला ‘टापर्‍या’ हे उपनाम किंवा विशेषण मिळाले आहे. वर्गातल्या मुलींना न्याहाळत राहणे किंवा ‘टापत’ राहणे ही त्याची हॉबी आहे. सायन्स शिकवणार्‍या मोघेबार्इंमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. अव्या आपल्या थोड्या जास्तच फुगीर झालेल्या छातीमुळे घाबरलेला आहे. शाळेत वैद्यकीय तपासणीच्या वेळी या भीतीमुळे तो पळ काढतो. त्याच्याकडे बाजारात मिळणारी ‘पिवळी पुस्तके’ आहेत. गौरूच्या शेजारी एक लेक्चरर बाई राहायला आली आहे. तिला तो ‘कबुतर’ म्हणतो. यात एक नित्या आहे, तो थोडा मोठा आहे आणि लैंगिकतेविषयी बर्‍यापैकी ज्ञान बाळगून आहे. त्याच्या वडलांच्या हॉटेलातला वेटर रंगाभाऊ त्याचा गुरू आहे. शिवाय एक जितू आहे, जो या सगळ्यांपेक्षा वयाने मोठा आहे. या कादंबरीच्या नायकाची नित्या आणि जितूशी चांगली मैत्री आहे. त्याला पडणार्‍या प्रश्नांना त्यांच्याकडूनच उत्तरे मिळाली आहेत. कधी कधी रंगाभाऊकडूनही. विशेषत: नित्या त्याचा मित्र आणि मार्गदर्शक आहे. नायकाच्या वर्गात शिल्पा निंबाळकर ही नवीन मुलगी दाखल होते आणि लवकरच ती त्याच्या भावविश्वात प्रवेश करते आणि त्याचे जग तिच्याभोवती फिरू लागते. या मुलीसोबतच मधुरा, वसू, सरू वगैरे मुली इथे डोकावून जातात. नायकाच्या शाळेच्या पटलावर या सार्‍या सोबत्यांप्रमाणे पीटीचे सर, फिजिक्सचे सर, च्यूतम सल्फेट असे काही शिक्षक आहेत. लेखकाने ही शाळा खूप वस्तुनिष्ठपणे आपल्या समोर ठेवली आहे. आपणही कधीकाळी या वयातून आणि शाळेतून गेलेलो असल्याने ही सारी पात्रे आपल्या परिचयाची वाटतात, ती अतिशयोक्त वाटत नाहीत.

नायक मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे अनेक पैलू या कादंबरीत समोर येतात. नायकाला स्वत:च्या शरीराचे भान आलेले आहे, लैंगिक जाणीव झाली आहे, स्त्रीदेहाचे आकर्षण त्याला वाटू लागले आहे. शिल्पा निंबाळकर त्याला आवडणे, नित्या आणि इतर मित्रांबरोबर बिअर पिणे, सिगारेट ओढणे, ब्ल्यू फिल्म पाहणे याचा अनुभव त्याने घेतला आहे. गावातल्या टुकार थिएटरमध्ये तथाकथित सी ग्रेड सेक्सी सिनेमा पाहिला आहे. अव्याच्या पिवळ्या पुस्तकांतल्या भंपक गोष्टी त्याने वाचल्या आहेत, पण या सार्‍यांत तो रमू शकलेला नाही. हे खूप काही भ्रामक आहे, याची त्याला आतून जाण झाली आहे. हा नायक विचारी आहे. खरे तर हे बरेचसे लेखन मोनोलॉग स्वरूपाचे आहे.

लेखकाने ही कादंबरी लिहिताना जाणीवपूर्वक मुलांच्या भाषेचा वापर केला आहे. बर्‍याचदा ती ‘स्लँग’ आहे, शिवराळ आहे. या भाषेत मध्ये मध्ये खूप इंग्रजी शब्द येतात, कधी कधी ‘टॉकतोय’ असे मिंग्लिशीकरणही दिसते. अर्थात, ही मुलांची बोलण्याची स्वाभाविक भाषा आहे. त्यामुळे एकूण चित्रण वास्तवदर्शी झाले आहे. पण या कादंबरीत मुलींची बाजू फारशी आलेली नाही; कारण मला ती उमजलेली नाही, असे लेखकाने भूमिका मांडताना प्रांजळपणे सांगितले आहे. तरीही कथनाच्या ओघात काही अंगाने तरी स्त्रीच्या बाजूचे चित्रण झालेले दिसते. उदाहरणार्थ, आपण मुले आपापसात बोलतो तसे मुली आपापसात काय बोलतात, या उत्सुकतेपोटी मुलींचे बोलणे चोरून ऐकण्याचा खटाटोप नायक आणि नित्या करतात. तसेच गॅदरिंगसाठी नाटकाची प्रॅक्टिस करताना ऋतुजाची वर्तणूक आणि शिल्पा निंबाळकरने शेवटी नायकाला दिलेले वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ यातून स्त्रीच्या जाणिवांवर अप्रत्यक्षपणे प्रकाश पडलेला दिसतो.
पौगंडावस्थेतील मुले-मुली किंवा एकूणच स्त्री-पुरुष लैंगिकतेच्या विषयावर अलीकडे मराठीत खुलेपणाने लेखन होऊ लागले आहे. ही कादंबरी या प्रकारातली असल्याने ‘बोल्ड’ वाटली तरी ती सवंग नाही. वयात येणार्‍या मुला-मुलींचे भावविश्व वस्तुनिष्ठपणे, डोळसपणे, स्पष्टपणे, धीटपणे मांडण्याचा एक चांगला प्रयत्न ‘वाफाळलेले दिवस’ या कादंबरीच्या निमित्ताने झाला आहे.
(Manohar.sonawane1959@gmail.com)