आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची तेलुगू तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इ.स. सोळाशे, सतराशे दरम्यान महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी आलेली अनेक तेलुगू कुटुंबे मोठ्या विश्वासाने या मराठी मातीशी, भाषेशी, संस्कृतीशी एकरूप होत आपापला पारंपरिक व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत करू लागली. पूर्वी यांची नावे सामान्यपणे रामय्या, नरसय्या, यल्लय्या अशी होती. ती आता विठ्ठल, एकनाथ, पांडुरंग, तुकाराम अशी झाली. आपापल्या व्यवसायातले कसब पणाला लावून आपापला उत्कर्ष साधू लागले. पद्मशाली यांनी आपला हातमाग धंदा वाढवता वाढवता त्या हातमागाचे पायमागात, पायमागाचे पॉवरलूम, त्याचे जेकॉर्ड, आता ऑटोमेटिक लुम्स इथपर्यंत आलेख चढवत नेला. वॉलहँगिंगच्या कलेने जगाला स्तिमित करून टाकले. निलगारांनी पांढर्‍या सुताला नीळ देण्याचे काम करता करता, तेही वस्त्रनिर्मितीत मोठ्या ताकदीने उतरले. गोल्ला नावाची मंडळी मोठ्या अंगमेहनतीने रंगभट्ट्यांवर जोखमीने चढून सूत रंगवायचे, ते आता प्रगत अशा मशीनद्वारे सूत रंगवत आहेत. लाकडी हातमाग तयार करणारे सुतार फ्रेमलुम्स तयार करीत आहेत. हातमागाला लागणार्‍या धोट्याच्याही फॅक्टर्‍या निघाल्या. लुगड्याच्या किनारीसाठी, पदरासाठी जर, रेशीम आदी ताणा, बाण्याच्या धाग्यांची, बॉबीन्सची खरेदी-विक्री होऊ लागली. चादरीच्या विक्रीसाठी जागतिक बाजारपेठ जवळ करून कारखानदार भारताला परकीय चलन मिळवून देऊ लागले. ई. पुरुषोत्तम नावाचा कालचा तरुण विणकर. आपल्या कर्तबगारीने त्याने मोठी औषध कंपनी काढली. दुसरे तेलुगू तरुण रामरेड्डी यांनी ‘बालाजी अमहिन्स’ नावाची कंपनी स्थापली. आज ते सार्‍या जगभर आपला माल पाठवत आहेत. येथे आलेला वडार समाज जो पूर्वी अशिक्षित होता, आज तो शिक्षणक्षेत्रात मानाची पदे भूषवत आहे. शशिकांत धोत्रे नावाचा तरुण वडार चित्रकार आज परदेशातही आपली भव्य चित्रप्रदर्शने भरवतो आहे. त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार सातत्याने मिळत आहेत. आनंद बनसोडे नावाच्या वडार तरुणाने नुकतेच हिमालयातले उंच शिखर चढून सर केले आहे. भगवान रामपुरे नावाच्या तेलुगू तरुणाने मूर्तिकार म्हणून जागतिक कीर्ती मिळवली आहे. आज मुंबई स्टॉक एक्स्चेंजसमोरील मुसंडी मारू पाहणार्‍या, मस्तवाल बैलाचे शिल्प त्याचेच आहे. स्वाती विडप, ऋत्विका श्रीराम या तेलुगू किशोरींनी पोहण्याच्या जागतिक स्पर्धेत अनेक सुवर्णपदके हस्तगत केली आहेत. सिद्धराम सत्यनारायण विडप नावाचा तरुण भारताचा शास्त्रज्ञ होऊन, आज ‘श्रीहरिकोटा’ येथून आकाशातल्या उपग्रहांवर नियंत्रण ठेवतो आहे. आजचे तेलुगू तरुण बदलते जग पाहून वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय बाजूला सारून डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, खेळाडू, विधिज्ञ, जज, बँकर, सोन्या-चांदीचे व्यापारी अशा अनेक व्यवसायात, अनेक रूपांनी रममाण होत आहेत.
bollilaxminarayan@gmail.com