आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of V.B.Utpal About Comparison In Birdman And Babel Movies

बेबलः (भाषांतरात) हरवलेल्या माणसाची गोष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलात्मक निर्मिती माणसाला उन्नत करते, आसपासच्या जगाशी जोडायला भाग पाडते हे आपल्याला मान्य असेल तर चांगल्या चित्रपटाची व्याख्या अधिक नेमकी होते. ‘बेबल’ याच वर्गात मोडतो.
हा चित्रपट मोरोक्को, जपान, अमेरिका आणि मेक्सिको या चार देशांत घडणाऱ्या चार कथा एकत्र गुंफतो. चारही कथांमध्ये एक धागा आहे आणि कथा काहीशा ‘परस्परावलंबी’ आहेत.
‘बर्डमॅन’ सध्या ऑस्करमुळे चांगलाच चर्चेत आहे. आलेहांद्रो गोन्सालेस इन्यारिटू या नावाजलेल्या दिग्दर्शकाचा हा पाचवा चित्रपट. हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी त्याचा अंमल अजून उतरला नाही. अर्थात बर्डमॅनविषयी आत्ता मला काही म्हणायचं नाही. मला सांगायचं आहे ते ‘बेबल’विषयी. इन्यारिटूच्या ‘डेथ ट्रिलजी’पैकी पहिला ‘आमोरेस पेरोस,’ दुसरा ‘२१ ग्रॅम्स’ आणि तिसरा ‘बेबल.’ ‘बर्डमॅन’ पाहून माझ्यासारख्याच अवाक झालेल्या एका मित्राने इन्यारिटूचा बेबल जास्त आवडला की बर्डमॅन, असा प्रश्न विचारला तेव्हा याचं उत्तर देणं अवघड आहे, असं मी म्हटलं. पण निवड करायचीच झाली तर ‘बर्डमॅन’ची करेन, असंही म्हणालो. नंतर काही दिवसांनी ‘बेबल’ पुन्हा एकदा पाहिला. आणि मग त्या मित्राला कळवलं की ‘मी शब्द मागे घेतो. बेबल हा निःसंशयपणे श्रेष्ठ आहे!’

आलेहांद्रो इन्यारिटूचे चित्रपट हे प्रकरण मुळात अफाट आहे. त्याचे चित्रपट जी कथा सांगतात ती कथा प्रेक्षकांना ज्या प्रकारे आणि ज्या पातळीवर जोडून घेते ते लक्षणीय आहे. चित्रपट या माध्यमावरची आणि चित्रपटाच्या तंत्रावरची इन्यारिटूची हुकूमत हा आणखी एक वेगळा मुद्दा. पण मला त्याचे चित्रपट सामान्य माणसांची कथा सांगता सांगता जे ‘वैश्विक भान’ देतात ते फार महत्त्वाचं वाटतं. ‘बेबल’ हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. इंग्लिशमध्ये नव्याने रूढ झालेल्या ‘हायपरलिंक सिनेमा’ या शब्दाने दर्शवल्या जाणाऱ्या जातकुळीतला. दोन किंवा दोनहून अधिक समांतर चालणाऱ्या आणि एकमेकांत गुंतलेल्या कथा हायपरलिंक सिनेमातून सांगितल्या जातात. (हिंदीमध्ये असा पहिला प्रयोग मणिरत्नमच्या ‘युवा’मध्ये झाला होता.) ‘बेबल’ नावाचा मूळ संदर्भ येतो तो बायबलमधील एका कथेत. विविध भाषांचा उगम सांगताना ‘टॉवर ऑफ बेबल’ची कथा सांगितली जाते. आधी पृथ्वीवरील सर्व माणसं एकच भाषा बोलत होती. पुढे सर्वांनी मिळून आपली ओळख निर्माण करण्यासाठी, सर्वांना कायम एकत्र राहता यावं म्हणून ‘स्वर्गापर्यंत पोहोचणारा’ एक उंच टॉवर बांधायचा घाट घातला. ईश्वराच्या हे लक्षात आल्यावर त्याने त्यांच्या भाषेत गोंधळ घडवून आणला आणि मग सगळे वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. त्यामुळे टॉवर पूर्ण झाला नाही. ईश्वराने सर्व माणसांना पृथ्वीवर विविध ठिकाणी विखरूनही टाकले.

नावाचा हा संदर्भ घेऊन निर्माण झालेला हा चित्रपट मोरोक्को, जपान, अमेरिका आणि मेक्सिको या चार देशांत घडणाऱ्या चार कथा एकत्र गुंफतो. चारही कथांमध्ये एक धागा आहे आणि कथा काहीशा ‘परस्परावलंबी’ आहेत. मोरोक्कोत सहलीसाठी आलेलं एक अमेरिकन जोडपं, बसमधून प्रवास करत असताना जोडप्यातील बायकोला खिडकीतून अचानक लागलेली बंदुकीची गोळी, तिच्या उपचारांसाठीची नवऱ्याची धावाधाव, दुसरीकडे या जोडप्याच्या मुलांना एकटं टाकता येत नाही म्हणून त्यांना आपल्याबरोबर आपल्या मुलाच्या लग्नाला मेक्सिकोत नेणारी त्यांची मेक्सिकन आया आणि परतीच्या वाटेवर झालेला मोठा गोंधळ, तर तिसरीकडे जपानमधील एका कर्णबधीर मुलीची कथा अशा विविध ठिकाणी, विविध पातळ्यांवर चित्रपट आकाराला येतो.

आपलं बोलणं समोरच्याला ‘समजत’ नाहीये ही बहुतेक सर्व पात्रांची एक मुख्य अडचण आहे. आणि त्यात भाषेची अडचण नसून ‘भाषांतराची’ अडचण आहे. परिस्थितीने ओढवलेली असहायता आणि त्यातून तुटलेले संवादाचे पूल हे सर्व कथांमधील समान सूत्र आहे. आपल्या सर्व मर्यादांसह माणूस भोवतीच्या परिस्थितीशी भांडतो आहे, पण अखेरीस त्याला हवं ते साध्य होत नाही आणि तो विखंडित अवस्थेतच जगत राहतो हा या कथांचा अंतःस्वर आहे. चित्रपटात समाजातील विविध स्तर एकत्र येतात. एक सुखवस्तू अमेरिकन जोडपं आणि मोरोक्कोतील एका छोट्या गावातलं त्यांचं काही तासांचं वास्तव्य, या जोडप्याची दोन मुलं आणि त्यांनी अनुभवलेलं मेक्सिकोतील एक लग्न अशा मांडणीतून दिग्दर्शकाने वर्गीय वास्तवाच्या पलीकडचं एक मानवीय जोडलेपण चित्रित केलं आहे. सगळी पात्रं, त्यांच्या व्यथा, त्यांची असहायता आणि अखेरीस होणारी उकल यातून चित्रपट एक खोलवरचा परिणाम साधतो. हा त्या पात्रांशी आंतरिक जवळीक साधणारा परिणाम आहे, आपली शांतता ‘विचलित’ करणारा परिणाम आहे. सर्व प्रमुख पात्रांचा उत्कृष्ट अभिनय आणि तांत्रिक सफाई याबरोबरच चित्रपट पाहिल्यावर आपल्या मनात उमटणारा हा ‘व्रणासारखा’ अनुभव ही ‘बेबल’ची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

चांगला चित्रपट नक्की कसा असतो याची विविध उत्तरं असू शकतात. कदाचित कुणाच्या मते दोन घटका मनोरंजन करणारा, मारामाऱ्या, नाचगाणी आणि साधारण कथानक असणारा कुठलाही चित्रपट चांगला चित्रपट असू शकेल. पण चांगली कलात्मक निर्मिती म्हणजे माणसाला उन्नत करणारी, आसपासच्या जगाशी जोडून घ्यायला भाग पाडणारी निर्मिती हे आपल्याला मान्य असेल तर चांगल्या चित्रपटाची व्याख्या अधिक नेमकी होते. ‘भाषांतरात हरवलेल्या’ माणसांची गोष्ट सांगणारा ‘बेबल’ हा असा एक चित्रपट आहे. एकीकडे समृद्ध कलाकृतीचा अनुभव देणारा आणि दुसरीकडे आपणही असेच ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ अवस्थेत जगत असतो याची जाणीव करून देणारा!

utpalvb@gmail.com