आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आद्यगणिका वसंतसेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतसेना आणि चारुदत्त यांच्या प्रेमकथेवर आजवर जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले त्यातला एकही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला नाही. वसंतसेना ही व्यक्तिरेखा चित्रपट-व्यवसायात अपेशी मानली जाऊ लागली. या मान्यतेवर 1984 सालच्या गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘उत्सव’ने पुन्हा एकदा जणू शिक्कामोर्तबच केले. खरे तर वसंतसेना या व्यक्तिरेखेने शतकानुशतके नाट्यसृष्टी गाजवली आहे. शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ हे संस्कृत रंगभूमीवरचे अत्यंत लोकप्रिय नाटक. शूद्रकाचा काळ हा गुप्त राजवंशाचा किंवा ख्रिस्तपूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे पाचवे शतक यांच्या दरम्यानचा मानला जातो. शूद्रकाच्या ‘मृच्छकटिका’आधी भासाने ‘दरिद्रचारुदत्त’ लिहिले. चारुदत्त आणि वसंतसेना यांची ही प्रेमकथा भरतमुनींनी घालून दिलेल्या नाट्यशास्त्राच्या नियमांमध्ये न बसणारी आहे. यातला नायक गरीब ब्राह्मण आहे तर नायिका चक्क वेश्या. परंतु त्यामुळेच या नाट्यवस्तूला कधी लाभले नव्हते ते सामाजिक-आर्थिक वातावरणाचे परिमाण लाभलेले दिसते. बहुतेक संस्कृत नाटके ही राजवाड्यात, राजाच्या उद्यानांत किंवा ऋषींच्या आश्रमात घडताना दिसतात. शूद्रकाने तर पुढे जाऊन या प्रेमकथेला समांतर अशा राजकीय घडामोडींचे नाट्य निर्माण करत खरोखरीच हे नाटक नगराच्या रस्त्यावर आणले, सामान्यजनांचे केले. यात एक सामान्य गवळ्याचा मुलगा आर्यक हा जुलमी राजाविरुद्ध क्रांतीचे नेतृत्व करतो आणि जुलमी राजवट उलथून टाकतो.

1984मध्ये याच नाटकावर चित्रपट बेतायचा विचार निर्माता शशी कपूर आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी केला, त्यामागचे एक कारण या नाटकाचे हे सार्वकालिकत्व होतेच. सामान्यपणे लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाची म्हणून जी एक शैली हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकाला परिचयाची होती; तिच्यापासून ‘उत्सव’ या चित्रपटाची शैली वेगळी होती, ती बहुधा ऐंशीच्या दशकातल्या प्रेक्षकांना अपरिचित वाटल्यामुळे पटली नाही. कथानकाला प्राचीन काळाचा संदर्भ असला तरी त्यातल्या सामाजिक चौकटी ऐंशीच्या दशकातल्या प्रेक्षकाला ‘आयडेंटिफाय’ करू देणा-या तर नाहीतच; उलट धक्कादायकच वाटणा-या. त्यातच नायिका कलावंतीण असूनही नृत्य-संगीताचा नेहमीचा जल्लोश करणे गिरीश कर्नांडांनी कटाक्षाने टाळलेले आहे. गाणी हळुवार कवितेच्या अंगाने जाणारी. चित्रपट संगीतातला नेहमीचा चाफ्याचा घमघमाट इथे नाही, तर आहे तो जाईचा मंद सुगंध. या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही, त्यामागची ही काही महत्त्वाची कारणे.

व्यावसायिक यश मिळवू न शकलेल्या चित्रपटाच्या नायिकेचा विचार का करायचा, असा प्रश्न कदाचित कुणाला पडेल. परंतु चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी झाला तरी वसंतसेना ही नायिका एकूणच भारतीय चित्रपटातल्या एका सर्वात लोकप्रिय प्रतिमेचा प्रेरणास्रोत आहे. भारतीय चित्रपटांत सातत्याने सादर होत राहिलेल्या कलावंतिणीच्या प्रतिमेचा आद्य स्रोत म्हणजे, वसंतसेना!

भारतीय चित्रपटात गणिका किंवा तवायफ, कलावंतीण, वेश्या ही व्यक्तिरेखा कधी नायिका, कधी खलनायिका, कधी उपनायिका किंवा सहनायिका अशा विविध रूपांत येत राहिली आणि अत्यंत लोकप्रियही होत राहिली. व्यावसायिकदृष्ट्याही तिने अमाप यश मिळविले. कधी ती प्रमथेशचंद्र बरुआ आणि बिमल रॉय यांच्या ‘देवदास’मधली चंद्रमुखी होती, कधी बी. आर. चोप्रांच्या ‘साधना’मधली चंपाबाई होती, कधी गुरुदत्तच्या ‘प्यासा’मधली गुलाबो, कधी देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘काला पानी’मधली किशोरी, कधी सुनील दत्तच्या ‘मुझे जीने दो’मधली चमेली होती, कधी बासु भट्टाचार्यांच्या ‘तीसरी कसम’मधली हीराबाई होती, कधी कमाल अमरोहींची साहेबजान (‘पाकीज़ा’), कधी प्रकाश मेहरांची जोहरा (‘मुकद्दर का सिकंदर’), कधी राज खोसलांची तुलसी (‘मैं तुलसी तेरे आंगन की’), कधी मुझफ्फर अलींची ‘उमरावजान’...! नायकावर प्रेम करणारी, नाइलाजाने वेश्यावृत्ती करावी लागणारी, वेश्या असल्यामुळे नायकाच्या समाजात नाकारली जाणारी, मनोमन कुलीन गृहिणीपदाची आकांक्षा करणारी, पण वास्तवापुढे हार पत्करावी लागणारी, नायकाच्या प्रेमापोटी सर्वस्वाचा, प्रसंगी प्राणांचासुद्धा त्याग करणारी आणि त्या योगे समाजाची ‘रीत’ सांभाळणारी, सुंदर, कलावती, करुणरम्य अशी ही कलावंतिणीची चित्रपटीय प्रतिमा. शेकडो वर्षांपूर्वी भासाने आणि शूद्रकाने ही प्रतिमा वसंतसेनेच्या रूपात सादर केली. त्याबरोबरच समाजभानाचे सूतोवाचही केले.

मनोरंजनप्रधान हिंदी चित्रपटाला ही प्रतिमा फारच सोयीची वाटली. कारण तिच्यात अनायासेच स्त्री सौंदर्य, नृत्य आणि संगीताची लयलूट करण्याची विषयसिद्ध सोय होती आणि ही लयलूट म्हणजे, दशकानुदशके व्यावयायिक यश मिळवून देणारा हुकमाचा एक्का होता. परंतु या प्रतिमेचा प्रेरणास्रोत अशी जी वसंतसेना, ती मात्र चित्रपटाच्या पडद्यावर अपयशी ठरली. 1942मध्ये निर्माते आचार्य अत्रे यांचा ‘वसंतसेना’ हा गजानन जागीरदार दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. वनमाला या नृत्यकुशल होत्या. त्यांच्या नृत्यकौशल्याचा वापर करण्यासाठीच हा विषय अत्रे यांनी निवडला होता. परंतु चित्रपट यशस्वी झाला नाही.

गिरीश कर्नाड रंगभूमीवर प्राचीन मिथकांचे सादरीकरण नव्या अन्वयार्थासह अभिजात शैलीत करत आले. ‘उत्सव’ हा याच शैलीचा चित्रपटीय आविष्कार होता. नायिका वसंतसेना, म्हणून चित्रपटात नृत्य-गाण्यांची लयलूट मात्र त्यांनी केली नाही. ‘उत्सव’ मध्ये गाण्यांचा आणि नृत्यमुद्रांचा वापर अत्यंत संयमित आणि विलक्षण नजाकतीने केला आहे. प्रेक्षकाला नाच-गाण्यात गुंगवले असते, तर कथावस्तूच्या गाभ्यापासून त्याचे मन विचलित होण्याचा धोका होता. तो गिरीश कर्नाड यांनी टाळला आहे. त्यात त्यांची ठाम धारणा जाणवल्याशिवाय राहात नाही. इथे मुख्य भर आहे तो समाजातल्या गणिकेच्या स्थानावर, समाजव्यवस्थेवर. त्यामुळे चित्रपटाची सुरुवातही संस्कृत नाटकासारखी होते. सूत्रधार (अमजदखान) नव्या नाटकाचे सूतोवाच करताना, ‘हे नाटक म्हणजे वेश्या वसंतसेनेच्या प्रेमाचा उत्सव असल्या’चे सांगतो. त्यावर नटी ‘छीछी’ म्हणते. मग सूत्रधार म्हणतो, ‘छीछी मत कर प्रिये, यह उस युग की कथा है जब समाज में वेश्याओं का आदर होता था। उनका अपना एक स्थान था।’ त्यावर नटी विचारते, ‘यानी आज के भारत की नहीं?’ तो म्हणतो, ‘नहीं.’ ‘आज का भारत’ म्हणजे इथे अर्थातच विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अभिप्रेत आहे. एकविसाव्या शतकात लैंगिक शिक्षण, लैंगिक व्यवहार यांविषयी खुलेपणाने बोलले पाहिजे, असा जो मतप्रवाह सुरू झाला त्याचा 1980च्या दशकात मागमूस नव्हता, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. सूत्रधार-नटीच्या याच प्रवेशात सूत्रधार नाटकातल्या या काळात वात्स्यायन ‘कामसूत्र’ लिहीत असल्याचीही माहिती देतो आणि प्रेम करण्याच्या कलेचा आदर होत असल्याचेही सूचित करतो. कलांचा उत्कर्ष साधणा-या त्या युगात राजनीती हीदेखील एक कला असल्याचे सांगून तो राजकीय घडामोडींचेही सूतोवाच करतो. (शर्विलक सज्जल याच्या रूपात चौर्यकलेचा आविष्कारही इथे पाहायला मिळतो.)

या सर्व निवेदनातून नायिका वसंतसेनेच्या सामाजिक स्थानाचे सूचन होते. तिचे सामाजिक स्थान हे दुरंगी दिसते. एकीकडे नगरवधू किंवा वेश्या या नात्याने समाजाला तिच्याकडून अपेक्षा आहेत. पण त्याच वेळी या समाजात तिला आदरही आहे. किंबहुना हे तिचे दुरंगी स्थान संक्रमणाच्या सीमारेषेवरचे वाटते. कालचा भारत आणि आजचा भारत यांच्या सीमारेषेवरचे! त्याचे प्रत्यंतरही लगेच येते. सूत्रधार कॅमे-याशी म्हणजे प्रेक्षकांशी बोलत असतानाच नगराच्या रस्त्यात दिवेलागणीच्या वेळी राजाचा वेडसर, लंपट मेहुणा संस्थानिक (शशी कपूर) हा वसंतसेनेचा पाठलाग करीत येतो. गरीब ब्राह्मण असलेल्या चारुदत्ताच्या घरात शिरून वसंतसेना त्याच्यापासून आपली सुटका करून घेते, तेव्हा संस्थानिक श्रीमंत असला तरी, त्याच्याकडून धन मिळण्याची खात्री असली तरी, वसंतसेनेने आपला निवडीचा नसलेला हक्क बजावलेला आहे. तिने त्याला नाकारले आहे. रस्त्यावरचा गोंधळ शमल्यावर ती जायला निघते तेव्हा सज्जन चारुदत्त तिला घरापर्यंत सोबत करायला निघू पाहतो, त्यावर ती त्याला म्हणते, ‘‘आप चिंता मत कीजिए। यहाँ सब लोग हमारा बहुत आदर करते हैं, सिवा उस लंपट के। मैं चली जाऊँगी।’’ सूत्रधाराने वर्णन केलेल्या समाजाचेच प्रत्यंतर ती यातून देते. चारुदत्ताच्या बासरीवादनाने आणि गाण्यामुळे ती त्याच्याकडे ओढली जाते. खरे तर चारुदत्ताची खालावलेली आर्थिक परिस्थिती तिच्यापुढे स्पष्ट आहे. ती स्वत: दागिन्यांनी मढलेली आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे. वेश्यावृत्तीने चारुदत्ताकडून मिळवण्यासारखे काहीच नाही, याची पूर्ण कल्पना येऊनही तिला त्याचे आकर्षण वाटते आणि ती आपल्या कौशल्याचा वापर करून त्याला मोहात पाडते. जायला निघालेली ती नवे काही सुचून वळते. ‘एवढे सगळे दागिने अंगावर घालून रात्री जाणे धोक्याचे आहे, वाटेत चोर-क्रांतिकारक फिरत आहेत’, असे सांगून दागिने चारुदत्ताकडे ठेवून घेण्याची विनंती करते आणि त्याने होकार देताच ते अंगावरून उतरवायला त्याची मदत मागते. दागिने उतरवण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम तिच्या व्यवसायकौशल्याचा साक्षात्कार तर आहेच; दागिने तिथे ठेवून जाण्यामागचा हेतूही या तरुणाची पुन्हा भेट घेण्याची संधी मिळावी हा आहे. दागिन्यांचे मोल तिच्या लेखी नगण्य आहे.

स्वत: वसंतसेनाच चारुदत्ताच्या प्रेमात पडते. शारीर कामक्रीडेत कुशल अशी ती वेश्या असली तरी प्रेमातल्या भावनिक अवस्थेचा अनुभव ती प्रथमच घेत असावी. घरी गेल्यावरही तिचे मन चारुदत्ताच्या विचारातच गुरफटत राहते. तिची आई आणि वेश्यालयाची मालकीण ही मात्र तिला, संस्थानिकाला न झिडकारण्याचा सल्ला देते. संस्थानिकाच्या वर्तणुकीविषयी तक्रार करणा-या वसंतसेनेला ती म्हणते, ‘‘हमें किसी के चरित्र से क्या लेना? जब तक देता है लेती रहो।’’ चारुदत्तात मन गुंतलेल्या वसंतसेनेला ती म्हणते, ‘‘देखो बेटी, प्रेम करना कौन नहीं चाहता? पर हमें इन चोंचलों में नहीं पड़ना चाहिए।’’ तिची बारीक नजर लेकीवर आहे. राजाच्या मेहुण्याला नाही म्हणणारी आपली लेक एका दरिद्री ब्राह्मणाकडे गेली, एवढेच नव्हे तर तिथे आपले दागिने ठेवून आली, याची बित्तंबातमी तिच्याकडे आहे. ती वसंतसेनेला तंबीच देते, ‘‘आगेसे उसके चक्कर में पड़ी तो घर से निकलना बंद करवा दूँगी।’’
आपल्याला प्रेम करण्याची मुभा नाही, या विचाराने वसंतसेना आणखी दु:खी होते. परंतु हा विचार तिच्या मनात यापूर्वी कधी आला नसेल. परंतु ती लंपट, वेडसर, अंगाने आडव्या तिडव्या सुटलेल्या, मध्यमवयीन, असंस्कृत अशा श्रीमंत संस्थानिकाला ज्याप्रकारे नाकारते, त्यावरून तिची मनोभूमी प्रेमासाठी प्रेम या घटिताचे बीज रुजायला उपयुक्त अशीच असली पाहिजे.

पुढे शहरात घटनाच अशा काही घडतात की, ना वसंतसेना चारुदत्ताला विसरू शकत, ना चारुदत्त तिला. तरीही चारुदत्त आपल्या पत्नीपासूनही दूर जात नाही. परंतु वेश्यालयात आश्रयासाठी घुसलेला चंपीवाला (अनू कपूर), वसंतसेनेची दासी मदनिका (नीना गुप्ता) हिचा प्रेमी आणि व्यावसायिक चोर सज्जल (शंकर नाग) आणि मग अगदी शेवटी प्रत्यक्ष चारुदत्ताचा मित्र मैत्रेय वेगवेगळ्या कारणांनी वेश्यालयात येतात आणि चारुदत्ताचा उल्लेख करतात. शर्विलकाने म्हणजे चोराने तर नेमके चारुदत्ताच्या घरी ठेवायला दिलेले वसंतसेनेचे दागिनेच चोरलेले असतात, ते मदनिकेची किंमत मोजून तिला दास्यमुक्त करण्यासाठी. पण मदनिका आपल्या मालकिणीचे दागिने ओळखते आणि आता ‘तू चारुदत्ताचा नोकर असून दागिने परत करायला आला आहेस म्हणून सांग’ असे ती चोराला सांगते. वसंतसेनेला या वेळेपर्यंत मदनिकेच्या प्रेमप्रकरणाविषयी कळलेले असतेच. नुकताच प्रेमाचा साक्षात्कार झालेली वसंतसेना मदनिकेला दास्यमुक्त करून दोघांच्या विवाहाचा मार्ग मोकळा करून देते. ‘मला तुझा हेवा वाटतो’ असे मदनिकेला म्हणतच ती तिला शुभेच्छा देते. चारुदत्ताविषयीची ओढ आणखी तीव्र होत जाते. मैत्रेय मात्र आलेला असतो तो चारुदत्ताची पत्नी अदिती (अनुराधा पटेल) हिच्याकडून. दुस-या स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या आपल्या नव-याला सोडून माहेरी जातानाही त्या मनस्वी स्त्रीने चोरीला गेलेल्या दागिन्यांची भरपाई म्हणून आपले उरलेले स्त्रीधन- एकमेव असलेली मोत्यांची माळ, तीही माहेराहून मिळालेली- मैत्रेयाबरोबर पाठवलेली असते. चारुदत्त आपल्यात गुंतल्यामुळेच पत्नी अदिती त्याला सोडून निघून गेली, हे कळल्यावर वसंतसेनेची प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाची आहे. चारुदत्तही आपल्यात गुंतला आहे, हा विचार सुखद आहे, त्याचे विवाहित असणे हे तिच्या मनाला क्लेश देणारेही आहे, आणि त्याच वेळी या संधीचा फायदा घेऊन रात्री चारुदत्ताच्या घरी त्याच्या भेटीला जाण्याचा बेतही ती तत्काळ करते. तसा निरोप चारुदत्ताचा मित्र असलेल्या मैत्रेयाबरोबर पाठवते. चारुदत्तही तिची आतुरतेने वाट पाहतो...

चारुदत्ताच्या घरी, दुस-या दिवशी सकाळी जागी होताच, वसंतसेनेची अदितीशीच गाठ पडते आणि अदितीच्या प्रेमळ वागण्याने ती चकितच होते. ‘तुला माझा राग का आला नाही?’ असे ती जेव्हा अदितीला विचारते, तेव्हा अदिती जे उत्तर देते ते कालसापेक्ष म्हटले पाहिजे. ती तीन कारणे सांगते. पहिले म्हणजे, ‘प्रत्येक प्रतिष्ठित पुरुषाची कुणी एक तरी ठेवलेली स्त्री असते. माझ्या नव-याचीही अशी आहे याचा मला आनंदच झाला.’ हे कारण ऐकून हतबुद्ध वसंतसेना काही प्रतिक्रिया देत नाही. अदितीच्या आणि आपल्या स्थानातला फरक एव्हाना तिला क्लेश देऊ लागलेला आहे. दुसरे कारण, ‘माझा नवरा जो कामक्रीडेत फार रस घेईनासा झाला होता, तो तुझ्याबरोबर एक रात्र घालवल्यानंतर पार बदलला’ हे सांगताना अदिती सुखाने मोहरून गेलेली आहे. ते ऐकताना वसंतसेनेची करमणूक होते. तिच्या स्त्रीत्वाचा तो गौरवच असतो. तिसरे कारण, ‘आप मुझसे बड़ी हैं। मेरी उम्र की होतीं तो मैं जलती।’ हे कारण पुन्हा वसंतसेनेला कष्टी करणारे आहे. कटू वास्तवाचे भान देणारे आहे.

चारुदत्तावरचे प्रेम हे तिला कायमस्वरूपी औदासीन्याच्या प्रदेशात घेऊन जाणारे आहे. उदार तर ती आहेच, कटू भावना तिच्या मनात नाही. अदितीवर आपल्याकडून होणा-या अन्यायाचीही बोच तिच्या अंतर्मनात आहे, अदिती नको नको म्हणत असताना ती आपले सगळे दागिने घालून अदितीला नटवते. दारिद्र्यातच दिवस काढावे लागणारी अदितीही आपले अलंकारमंडित रूप पाहून सुखावते. तिचे सुख पाहून वसंतसेनाही सुखावते; हलकेच अदितीने भरपाई म्हणून पाठवलेली मोत्यांची माळ अदितीच्या गळ्यात घालून तिचा साजशृंगार पुरा करते. अदितीने मागितले असते तर तिने आनंदाने सारे दागिने तिला देऊनही टाकले असते. प्रेमापुढे आता वसंतसेनेच्या लेखी तिच्या त्या दागिन्यांची किंमत शून्यच झाली आहे. या दोन स्त्रियांची आपापसात थोरपणाची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. चारुदत्त-आदितीचा मुलगा रोहित आईकडे येतो, तेव्हा अदिती त्याला ‘हीदेखील तुझी आईच आहे’ म्हणून सांगून तिच्याकडे जायला सांगते आणि वसंतसेना अदितीच्या औदार्याने आणखीच भारावून जाते. ‘ही आई आहे तर मग ती एवढी चमचमत्या दागिन्यांनी कशी काय मढलेली’ असा प्रश्न रोहितला पडतो. कारण त्याने ‘आई’ला नेहमी लंकेच्या पार्वतीच्या रूपातच पाहिलेले असते. त्याचे ते निरीक्षण ऐकताच वसंतसेनेच्या लेखी दागिन्यांची किंमत आणखीनच घटते. दागिने आणि अदितीचे स्थान यात निवड करायला सांगितले असते तर वसंतसेनेने अदितीच्या स्थानाचीच निवड केली असती. आपल्या मातीच्या गाडीमुळे मुले आपल्याला खेळायला घेत नाहीत म्हणून चारूदत्ता आणि अदितीचा मुलगा रोहित रडत येतो, तेव्हा वसंतसेना आपल्या सर्व दागिन्यांनी ती मातीची गाडी सजवून त्याला देते. धन हेच सर्वस्व मानणा-या तथाकथित समाजातील वसंतसेना अशा प्रकारे तीन वेळा आपल्या दागिन्यांचा खुशीने त्याग करताना दिसते, दागिन्यांपेक्षा भावनेला, मनाच्या ऊर्मीला अधिक मानताना दिसते. आपल्या परंपरागत स्वभावधर्मापासून फारकत घेताना दिसते...

संस्थानिकाने आणि चारुदत्ताने पाठवलेल्या गाड्यांच्या अदलाबदलीपायी पुष्करवनात वसंतसेना संस्थानिकाच्या ताब्यात सापडते, त्यांची झटापट होते आणि संस्थानिकाने गळा दाबल्यामुळे ती बेशुद्ध पडते. वसंतसेनेचा आपल्या हातून खून झाला, असे वाटून संस्थानिक घाबरतो. पुष्करवनातच वसंतसेनेची वाट पाहात बसलेल्या चारुदत्तावरच खुनाचा आरोप ठेवतो. चारुदत्ताची पुष्करवनातली उपस्थिती, त्याच्या मुलाच्या खेळण्यातल्या गाडीत सापडलेले वसंतसेनेचे दागिने या पुराव्यामुळे चारुदत्ताला देहान्ताची शिक्षा फर्मावली जाते. परंतु ऐन वेळी वसंतसेनाच वधस्थानी येऊन हजर होते पण; क्रांती यशस्वी होऊन राजा पालकाला पदच्युत करण्यात आल्याची व आर्यकाचे राज्य सुरू झाल्याची द्वाही फिरते आणि सर्व गुन्हेगारांना सोडून देण्यात येते. चारुदत्ताची सुटका होताच अदिती आणि वसंतसेना अत्यानंदाने त्याच्या दिशेला धावतात, परंतु वसंतसेना अचानक थबकते आणि अदिती धावत जाऊन चारुदत्ताला मिठी मारते. काही क्षण पती-पत्नी संकट टळल्याच्या आनंदात एकमेकांच्या मिठीत सारे जग विसरतात. ते दृश्य वसंतसेना उदास मुद्रेने पाहताना दिसते. चारुदत्त-अदिती भानावर येतात तेव्हा वसंतसेना वळून धावत निघून गेलेली असते...

कथेचा नायक चारुदत्त हा निष्क्रिय आहे. वसंतसेना मोहात पाडते, तेव्हा तो सहजपणे मोहात पडतो. पत्नीबरोबरही रमतो. ती रुसून माहेरी गेली, तरी तिला परत आणण्याचा फारसा प्रयत्न तो करत नाही. उलट तिच्या अनुपस्थितीत वसंतसेनेचे स्वागत करतो. अर्थात ही भेट घेण्याचे ठरवते, तीही वसंतसेनाच. चारुदत्त स्वत: नाही. त्याच्या पदरात आयतेच फळ पडते. पत्नी माहेरी गेली काय, परतली काय; त्याला काही फरक पडलेला दिसत नाही. वसंतसेना त्याला भेटायला धडपडते, तसा तो धडपडताना दिसत नाही. त्याच्याकडे ना दिव्यात घालायला तेल ना गाडीभाड्याचे पैसे. गाडीभाड्यासाठी वसंतसेनाच अंगठी काढून देते. पत्नी आपली मोत्यांची माळ मैत्रेयाबरोबर पाठवते त्यावरही चारुदत्ताची प्रतिक्रिया शून्यच असते. पुष्करवनात भेटायचे ठरलेले असताना हे महाशय तिथल्या तळ्याकाठी निवांतपणे बासरीवादनात मग्न असतात. वसंतसेनेने हवे तर येऊन भेटावे! ती अजून का येत नाही, अशी हुरहूरही नाही. तिच्या जिवावर बेतल्याचे त्याच्या गावीही नाही. ती मेल्याचे वृत्त ऐकून तो शोकही करत नाही, धीरोदात्तपणाचा आव आणत विनातक्रार शिक्षा स्वीकारण्यात त्याला पुरुषार्थ वाटत असावा. सुटका झाल्याक्षणी तर तो वसंतसेनेला पार विसरलेला आहे. आकांक्षांनी धगधगणा-या, भावनिक वादळांना तोंड देणा-या वसंतसेना आणि अदिती या स्त्रियांची खरी शोकांतिका हीच असावी!

मूळ नाटकाच्या शेवटात नव्याने राजा झालेला आर्यक वसंतसेनेला ‘नववधू’ असे संबोधतो. ‘हे वास्तवात होणे नाही, परंतु आमच्या नाटकात हे असे व्हावे आणि सगळ्यांचे कल्याण व्हावे असे आम्हाला वाटते’ अशा अर्थाचे भरतवाक्य म्हटले जाते. वसंतसेना ही चारुदत्ताची प्रेमिका, बहुधा तत्कालीन सामाजिक मान्यतेनुसार त्याची उपपत्नी-रखेली-म्हणून त्याचीच बनते, अर्थात अदितीचा (नाटकात तिचे नाव ‘धूता’ असे आहे.) गृहस्वामिनीचा मान त्यात नसतो, असे तिथे सूचित होते. (फार काय, नाटकात चारुदत्ताने वसंतसेनेच्या दागिन्यांचे गाठोडेदेखील घराच्या ओटीवरच ठेवले आहेत; घरात नेले नाही, ते वेश्येचे दागिने म्हणून!) चित्रपटाचा शेवट मात्र अशा अर्धसुखान्त पद्धतीनेही केलेला नाही. तो अशा कोणत्या कल्याणाची कामना न करता कठोर वास्तवानेच केलेला आहे. इथे संपत्तीतून येणारा सगळाच माज उतरलेला असा संस्थानिक लोकांचा मार खाऊन गलितगात्र होऊन वसंतसेनेच्याच नावाचा जप करत वेश्यालयापुढे येऊन पडतो. दागिन्यांचा त्याग केलेली, मघाच्याच साध्या वस्त्रातली वसंतसेना वेश्यालयाच्या दारात डोकावते आणि तिच्या उंबरठ्यावर कोसळलेल्या संस्थानिकाला करुणेने उठवून आत घेऊन जाते...! करुणा त्याच्याविषयीची आणि त्याहून अधिक स्वत:विषयीची!

वसंतसेनेच्या जीवनात अपघाताने आलेल्या एका प्रेमभावनेची विफल सांगता इथे झालेली असते.
कुलीन विवाहसंबंध जपण्याची भारतीय समाजाची आणि त्यामुळे चित्रपटाची परंपरा ‘उत्सव’ही जपतो! त्यासाठी मूळ शूद्रकाच्या नाटकाच्या शेवटात बदलही करतो. त्यामुळे सुरुवातीला सूत्रधाराने जरी ‘प्रस्तुत कथा ही आजच्या युगातली नाही, वेश्यांचा आदर होत असे त्या युगातली आहे’, असा इशारा दिलेला असला, तरी चित्रपट संपता संपता दिग्दर्शक आजच्या युगातल्या प्रेक्षकाचे आपले भान बाजूला सारू शकत नाही! किंवा असे म्हणावे लागेल, की समाजाच्या संक्रमणावस्थेतले पहिले टोक म्हणजे चित्रपटाची सुरुवात आणि दुसरे टोक म्हणजे त्याचा शेवट!


(deshrekha@yahoo.com)