आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षांचे ओझे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस ठाण्यातील महिला सुरक्षा समितीवर काम करताना लेखिकेला आलेल्या अनुभवांवर आधारित ही प्रतिक्रिया.१५नोव्हेंबरच्या मधुरिमामधील ‘लग्न : एक जोखीम?’ हा लेख वाचला. आजच्या समाजाचं एक वास्तव चित्र त्यात आपण मांडलं आणि ते समाजासमोर ठेवलं. सर्वांच्या मनाचा ठाव घेणारा लेख होता तो. मधुरिमा पुरवणीने इतर समाजात असलेले चित्र काय आहे, हे कळवायला सांगितल्याने मी माझे अनुभव शब्दबद्ध करण्याचे धाडस करत आहे.

मी पथ्रोट (ता. अचलपूर, जि. अमरावती) या ग्रामीण भागात राहते. तेथीलच एका हायस्कूलवर काम करते. पथ्रोट पोलिस ठाण्यात स्थापित महिला सुरक्षा समितीची मी गेली अनेक वर्षांपासून सदस्य आहे. समितीसमोर अनेक समाजांतील व विविध सामाजिक दर्जाच्या पतीपत्नींच्या तक्रारी येत असतात. अशा स्थितीत दोन्ही गटांच्या तक्रारी ऐकून घेऊन पतीपत्नींना थोडं समजावून सांगून तडजोडीची भूमिका घेण्यासाठी तयार केले जात असते. उद्देश हाच की, एक कुटुंब तुटू नये. घटस्फोटांना आवर घालता यावा, म्हणून समितीच्या सदस्या काम करतात. अनेक तक्रारी सोडवण्याचे काम मी गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. ही गोष्ट एका वििशष्ट समाजाची नसून समाजातील सर्वच स्तरांतील कुटुंबांची कहाणी आहे.

जेव्हा पतीकडील व पत्नीकडील लोक आपापली बाजू मांडत असतात, तेव्हा दोन्ही गटांचा समन्वय घालण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. नाराजीची कारणे जाणून घेऊन उपाययोजना सांगून पतीपत्नींना एकत्र संसार करावा, म्हणून समजावतो. अनेक वेळा अपत्यही आलेले असते. अशा वेळेला त्यांना समाजावून पोलिस तक्रार मागे घेण्यास सांगतो. अनेकदा आमचे प्रयत्न सफल होतात. आम्हाला बरे वाटते. एक संसार तुटण्यापासून वाचवला, याचे समाधान वाटते. पण कधीकधी आमच्या हाताबाहेर तक्रार जाऊन कोर्टापर्यंत जायचा निर्णय होतो, तेव्हा आम्ही हतबल होतो. यामागे अनेक कारणे आढळून आली आहेत.

सर्वप्रथम अनुभव येतो आपल्या समाजव्यवस्थेचा. परंपरेने चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती व त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न हे याचे कारण असते. मुली लग्न होऊन नव्या घरात जातात. तेथील लोकांचे वागणे, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या घराच्या चालीरीती सांभाळताना त्यांची तारांबळ होते. हे सारे आत्मसात करताना मुलींना जरा वेळ लागतो. अन् सासरच्या मंडळींमध्ये नाराजीचे सूर निघायला सुरुवात होते.

पूर्वीच्या काळी मुलींच्या लग्नाचे वय कमी होते. कुटुंबातील अपत्यांची संख्याही जास्त होती. मुलींना फार शिकवत नसत. त्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याची मानसिकता नव्हती. तसेच मुलींची मानसिकता कुटुंबातूनच अशी बनवली गेलेली असायची की, सासरच्या सगळ्या उण्यापुऱ्या गोष्टी समजून घेऊन कुटुंब चालवायचे. तक्रार करायची नाही. किंवा स्वत:साठी काही अपेक्षाही कुटुंबाकडून ठेवायची नाही. मुलीही सारं मान्य करून आपल्या संसाराची जबाबदारी पार पाडायच्या. मुली माहेरी तक्रार करीत नव्हत्या व तक्रार केली तर तिचे आईवडील तिला समजावून सासरी परत पाठवत असत व मुलीही सासरच्या घरातून मेल्यानंतरच बाहेर पडत.

पण आज परिस्थिती बदललेली आहे. सिनेमा, टीव्ही मालिकांमधलं आनंदी अन्् सुखी पतीपत्नींचं जीवन पाहून मुलामुलींच्या संसारसुखाच्या कल्पना बदलल्या आहेत. शिक्षणाने पुष्कळ गोष्टी त्यांना शिकवल्या आहेत. समाजाचं बदलतं चित्र त्या पाहतात आणि यापेक्षा वेगळा अन् खडतर प्रवाह त्यांच्या वाट्याला आला तर त्या त्याला सामोऱ्या जाऊ शकत नाहीत. मुली शिक्षण घेऊन सुविद्य झाल्यात, छोट्यामोठ्या हुद्द्यावर काम करतात. कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या मानसन्मानाच्या वागणुकीमुळे आपण त्या योग्यतेचे आहोत, पुरुषांइतकाच आपलाही संसारात वाटा आहे, हे त्यांना कळते. त्या आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण संसारात पडल्यानंतर त्यांना वेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. कोणत्याही हुद्द्यावर असली तरी कुटुंबाची जबाबदारी स्त्रीनेच सर्वतोपरी सांभाळावी, ही अपेक्षा तिच्याकडून केली जाते. प्रत्येक वेळी मुली ही परिस्थिती हाताळतीलच, असे होत नाही व तक्रारींना जागा निर्माण होते.

आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. मुलीने सासरच्या गरजा अन्् रीतीभाती लवकर स्वीकाराव्या, अशी सासरी अपेक्षा असते. जवळजवळ सर्वच समाजांमध्ये ही अपेक्षा असते. जिथे मुलीला समजून घेतले जाते तिथे बेसूर वातावरण तयार होत नाही, पण आग्रही अपेक्षा केल्यास मुलगी कमी पडते. मुलींना हे मान्य नसल्यास सासरची मंडळी आपली शस्त्र वापरायला सुरुवात करतात. त्यात कुटुंबामध्ये पुरुष शिरजोर तर स्त्री कमजोर असते. हा अनुभव निभण्याइतपत मर्यादेत असला तर मुली सहन करतात, पण मग मर्यादेबाहेर परिस्थिती गेल्यास मुलीला स्वत:च्या संरक्षणासाठी पोलिस ठाण्याचा आधार घ्यावा लागतो. आईवडिलांची मदत घ्यावी लागते. मग महिला सुरक्षा समितीच्या सदस्या एक कुटुंब तुटू नये म्हणून प्रयत्न करतात. अन्् समज देऊन दोघा पतीपत्नींना एकत्र आणतात.

आजच्या काळात स्त्री-पुरुष समानतेचे धडे शाळेतच मिळतात. मुलींना हक्क चांगल्या प्रकारे कळलेत. मुली गरजांसाठी कुणावर अवलंबून नाहीत. आईवडिलांनी त्यांना भेदभाव न करता वाढवलेले असते. शिक्षणावर मुलासारखाच खर्च केलेला असतो. मुलीच्या लग्नाची जबाबदारी पूर्णत्वाने पार पाडलेली असते. लग्नानंतरची रीतभात योग्य पद्धतीने पूर्ण करण्याची तयारी असते. मग हे सारे असताना अवाजवी अपेक्षांचे ओझे मुलींना नको असते. हे बदलत्या जगाचे चित्र आहे. म्हणून समाजात नवी पिढी व जुनी पिढी असा समन्वय साधला जावा, असे वाटत असेल तर दोन्ही पिढ्यांना जराजरा बदलावे लागेल, तरच कुटुंब सुरक्षित राहतील. अपेक्षांचे अवाजवी ओझे उचलून घेण्याची जबरदस्ती नव्या पिढीकडून करता येत नाही, म्हणून जुन्या पिढीलाही थोडे बदलण्याची गरज आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलग्यांनीही सामंजस्याची भूमिका ठेवून संसाराचा गाडा चालवायला हवा, तरच ही ओढाताण थांबेल.
विजया भांगे, पथ्रोट, जि. अमरावती
बातम्या आणखी आहेत...