आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Vrushali Kinhalkar About Relationship With Sister In Law, Divya Marathi, Rasik

आदमास : अकारण अवघङलेलं नातं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नणंद व भावजय या एका पुरुषाशी सर्वस्वी वेगळ्या नात्याने बांधलेल्या असतात. एकीचा भाऊ तो दुसरीचा पती. मग या दोघींच्या नात्यात समजूतदारपणाचा अभाव का बरं असावा?
एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिच्या नातवाचा वाढदिवस होता. माणसांची वर्दळ. उत्साही वातावरण. एक वृद्धा आली. हळूहळू चालत बैठकीत आली. एका भिंतीवरच्या फोटोजवळ गेली. माझ्या मैत्रिणीच्या दिवंगत सासूचा फोटो होता तो. त्या वृद्धेने पदराने तो फोटो पुसला. फोटोतल्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवत ती म्हणाली, ‘‘प्रभावती, घर नातवंड-पतवंडांनी, सुना-जावयांनी भरून गेलं... घरात गर्दी झाली म्हणून तू फोटोत जाऊन बसलीस का माय?’’ अन् त्या वृद्धेच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी हे सगळं बघत होते. मला वाटून गेलं की, कदाचित फोटोतली बाई या वृद्धेची बहीण असावी. मैत्रिणीला विचारलं - तर मैत्रिणीच्या उत्तराने मी जरा चकित झाले. फोटो पुसणारी ही वृद्धा फोटोतल्या स्त्रीची नणंद होती. दिवंगत भावजयीच्या फोटोला पुसणारी, तिच्या आठवणीने सद्गदित होणारी ती नणंद होती चक्क. माझ्या अनुभवाप्रमाणे नणंद-भावजयीचं इतकं उत्कट प्रेम फार दुर्मिळ! क्वचितच असं पाहिलं, अनुभवलं होतं. आणि जेव्हा केव्हा हे असं प्रेम अनुभवायला मिळालं, तेव्हा तेव्हा भावजय ही त्या नात्याला उत्कटता देणारी, ते नातं बांधून ठेवणारी अशी दिसली. परंतु नणंद स्वत:हून भावजयीला आपुलकी, प्रेम बहाल करतेय, असं चित्र नव्हतंच पाहिलं मी. एखादी सासुरवाशीण जेव्हा नणंद-भावजयीचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला स्वत:ला त्या नव्या घरात रुजायचं असतं, रमायचं असतं. त्यामुळे तीच प्रत्येक नवं नातं फुलवण्याचा प्रयत्न करीत असते, असं वाटतं. पण नणंद या भूमिकेतली तिच्याच वयाची ती दुसरी स्त्री मात्र असं स्वत:हून उत्कटतेनं, आपुलकीनं भावजयीचं आपलं नातं अकृत्रिम सहज आणि सुखद व्हावं, यासाठी प्रयत्न करत नाही, हे चित्र घरोघरी दिसतं. मागच्या पिढीत तर सर्रासच. माझी एक पेशंट होती. तिच्या दोन्ही प्रसूतीच्या वेळी तिची भावजय इतकं प्रेमानं तिचं सगळं करायची, सतत मला संपर्क करून नणंदेची पूर्ण काळजी घ्यायची.
एकदा मी सहजच विचारलं, ‘तुम्हाला किती मुलं?’ तर ती म्हणाली, ‘नाहीच झालं मूल. लग्नाला बारा वर्षे झाली.’ स्वत:ला मूल नसूनही, स्वत:च्या तपासण्या वगैरे बाजूला ठेवून ती नणंदेचं करायची. मी त्या नणंदेला म्हणाले, ‘अगं वहिनीला बाळ नाही, तर ती का येत नाही माझ्याकडे इलाज करायला?’ तर ती पेशंट अगदी नणंदेला शोभेल असंच उत्तरली- ‘तिचे माहेरचेच तिचा इलाज करतात. मला काही जास्त माहीत नाही.’ नणंदेच्या सुरात किंचितही स्त्रीसुलभ आपुलकी, ओलावा जाणवत नव्हता. हे चित्र बघून मी खूपच दुखावले गेले होते. पण पुढे पुढे मला असे अनुभव नित्याचेच झाले. नणंद म्हणजे केवळ घेणारी बाई; तिला द्यायचं असतं हे ठाऊक नसतं. घरातील पुरुषांनादेखील हे मान्य असतं, असंच नेहमी दिसतं. या पार्श्वभूमीवर एक बरा अनुभव आला. दोन बायका माझ्याकडे काम मागण्यासाठी आल्या. रिकामी जागा एकच होती. मी म्हणाले, ‘कुणीही एक जण या कामावर.’ त्या नणंद-भावजय होत्या. पैकी नणंद विधवा होती. त्यामुळे मला वाटलं, तिलाच गरज असावी जास्त. पण ती नणंद म्हणाली, ‘भावजयीलाच घ्या कामावर. तिची पोरं शाळेत जातात. खर्च आहे घराला खूप. तेवढाच हातभार होईल.’ तुरळकपणानं नणंद सहृदय मायाळू निघाली या प्रसंगात! पण हे अनुभव म्हणजे ‘रुमडाला सुम आले आले गं’ अशा प्रकारातले. उंबराला फूल यावं तितक्या दुर्मिळपणानं नणंद या स्वरूपातली स्त्री भावजयीशी उदार अंत:करणानं वागते. एरवी आमच्या पिढीपर्यंत तरी नणंद-भावजय हे नातं सहज फुललेलं दिसत नाही. काय कारण असावं या गोष्टीचं?

भावावरची स्वामित्वाची भावना; बहिणीनं लग्नानंतर पुसट करायला हवी ना. मुळात तर स्वामित्वाची भावनाच असू नये कोणत्याच नात्यात, हे खरं. पण लहानपणापासूनच्या खेळण्या-भांडण्याच्या प्रसंगापासून बहीण-भाऊ स्वत:ची लग्नं होईपर्यंत सुंदर अकृत्रिम नातं अनुभवतात. लग्नानंतर मात्र हळूहळू ‘मीपण’ येऊ लागतं. पण याचा दोष मात्र ‘वहिनीला’ दिला जातो. खरं तर नणंद- भावजय हे नातं मैत्रिणींसारखं बहरायला हवं. त्यामुळं सर्वांनाच सुखी आणि सहजपणानं जगता येईल. पण असं होत नाही. मी या नात्याचा खूप खोलवर विचार करून पाहते. दोन स्त्रिया एका पुरुषाशी एकाच नात्याने बांधलेल्या असतात- त्या दोन सवतीदेखील कसंबसं जुळवून घेऊन संसार नेटाने ढकलतात. हे तर सर्वाधिक अवघड आहे; पण भारतीय स्त्रिया हे दिव्य करू शकतात. मग नणंद-भावजय तर एका पुरुषाशी सर्वस्वी वेगळ्या नात्याने बांधलेल्या असतात. एकीचा भाऊ तो दुसरीचा पती. मग या नात्यात समजूतदारपणाचा अभाव का बरं असावा? कळतच नाही. भारतीय जनमानसाच्या तळात रुजलेली दोन महाकाव्ये-रामायण आणि महाभारत. या दोन्ही महाकाव्यांच्या नायिका- भारतीय स्त्रीचा आदर्श म्हणजे सीता आणि द्रौपदी. इथपासून काही झरा शोधावा तर- या दोघींनाही नणंद नाही. इतर पौराणिक कथानकं, काव्य, कहाण्या यात कुठे नणंद-भावजयी नात्याचे स्रोत मला सापडले नाहीत. लोकगीतात मात्र सापडतात. पण तेही कौतुकाचे, स्रेहाचे नाही. थेट एकनाथांच्या भारुडातच- ‘नणंदेचं कार्ट किरकिर करतं- खरुज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला’ असा संदर्भ सापडला; पण तो खूप अलीकडचा. आजकाल दूरचित्रवाणीवरच्या कहाण्या तर छळकथाच आहेत. इथे तर प्रत्येकच स्त्री दुसर्‍या स्त्रीची वैरी. सुदैवाने नव्या पिढीत जरा कमी दिसतं हे प्रमाण, असं वाटत आहे. तरीही एक धक्का अलीकडेच पचवला. एका आईनं सांगितलं- ‘आम्ही मुलीचं नाव वधूवर मंडळात नोंदवलं, त्यात अटच आहे आमची- मुलाला बहीण नसावी. नकोच ते नणंदेच्या पुढे पुढे नाचणं मुलीच्या नशिबात. आमचं आयुष्य यातच गेलं.’ खूप विचारात गढून गेले मी. कसं हे नातं फुलावं? नव्या पिढीच्या स्वतंत्र, सक्षम, आत्मनिर्भर स्त्रीला हे आव्हानच आहे. प्रत्येकच बाईनं उदार मनानं विचार आणि कृती करायला हवी. सासू, आई, अशा प्रौढ स्त्रियादेखील या नात्याचं ‘मैत्र’ फुलायला मदत करत नाहीत; जे त्यांनी करायला हवं. खरं तर एक छानशी मैत्रीणच असते नणंद किंवा भावजय. मालकी हक्काचा तिथं प्रश्नच उद्भवू नये. पण गेल्या अनेक पिढ्या बाईला हे समजलंच नाहीय. दिवंगत भावजयीचा फोटो पदरानं पुसणारी ती वृद्ध नणंद खूप मोठा संदेश देऊन गेलीय समस्त स्त्री जातीला. पण या धावपळीच्या, स्पर्धेच्या जगण्यात कुणाला वेळच नाही! सगळं काही यंत्रवत झालंय जगणं. प्रत्येकच नात्यात सौंदर्य आहे, श्रीमंती आहे; पण हे समजतं तेव्हा आयुष्यच संपत आलेलं असतं. अन् हेच माणसाचं दुर्दैव आहे.
‘ऐसा नहीं कि जिंदगी बहुत छोटी है
दरअसल हम जीना ही बहुत देर से शुरू करते हैं...’
एका आईनं सांगितलं- ‘आम्ही मुलीचं नाव वधूवर मंडळात नोंदवलं, त्यात अटच आहे आमची- मुलाला बहीण नसावी. नकोच ते नणंदेच्या पुढे पुढे नाचणं मुलीच्या नशिबात. आमचं आयुष्य यातच गेलं.’