आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन व्हावे कणखार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'घर म्हणजे तरी काय; आई-वडील, बहीण-भाऊ, नातलग... ज्यांनी मनाला जपण्याचे काम केले असते. पण आजच्या काळात जपणे जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षाही अधिक कणखर करणे योग्य. अशा वेळी मनाला कणखरपणा देणारी माणसं हवी असतात, कायमसाठी...'

नकाराचा स्वीकार कसा करायचा? ज्या घरात आम्ही राहतो, ते घर वरवर समजावून घेते; मात्र वेळ आली तर खोलवर जखमाच देते. घराबाहेर पडले की प्रत्येक दिवस वाईट जातोच, असे नाही. पण बरेचदा नजरा-स्पर्श आणि शब्द जिव्हारी लागतात. त्यासाठी कॉलेजमधील ‘सेलचा’ काही उपयोग होत नाही. मुळात तेथे ‘सेल’सदृश काही नसते. जबाबदार व्यक्ती प्रथम आमच्याकडे अविश्वासाने पाहते. त्यांना आमचे आयकार्ड पाहायचे असते. ते पाहिले तरी त्यांच्या नजरेत आमची कोणतीही ओळख नसते. तक्रार करणारी तरुणी सर्व तºहेच्या रिस्क्स घेऊन इथवर आलेली आहे, हे विसरून फक्त पारख करण्यासाठी आपल्याला नेमले आहे, असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतात.

घरी सांगितलेल्या तक्रारींचे इथे कसे स्वागत होईल, सांगता येत नसते. कधी प्राचार्यांना भेटायचा आग्रह; तर ज्याने खोड काढलीये त्याचा बंदोबस्त कसा करायचा, याचा प्रतिशोधाच्या भावनेतून विचार.

मध्यम मार्ग अनेक घरात सापडतच नाही. त्यामुळे तक्रार विसरून भीतीपोटी दिवस कंठावे लागतात. घराकडून खूप वेगळी अपेक्षा असते. निर्भर्त्सनेच्या शब्दांना, पराकोटीच्या अश्लील अर्वाच्य शब्दांना आम्ही सामोरे कसे जायचे, याचे प्रशिक्षण आम्हाला घरातून हवे असते. आमच्या आसपास बरेचदा असतात ते शब्द... कठोर, कर्कश, काळजात सुरी फिरवल्यासारखे. अपमान-अवमान करणारे, असहाय बनवणारे. उपेक्षा करणारे. भित्रट नि रोगट करून टाकणारे. निराश, व्यथित, उदास करून सोडणारे. दुर्बल, दोलायमान अवस्था करणारे. खच्चीकरण करताना खात्री या शब्दाला गुंगारा देणारे. अशा शब्दांच्या सान्निध्यात राहणे, अवघड काम. दिवसरात्र इमाने-इतबारे हे काम जसे बाहेर होते, तसे अनेक घरातही होत असते. मुद्दाम नसले, तरी नकळत दुखावण्याच्या पायर्‍या ओलांडल्या जात असतात. त्यातूनच आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. बाहेरचे दबाव, तणाव झेलावे कसे, उमगत नाही. शब्द अघोरपंथी बनतात. शस्त्र होऊन शरसंधान करतात. मनाला सोलून काढतात. चिरफाड करतात. ‘तुला एवढे कळू नये’ म्हटल्यावर अगदी बापुडवाणे वाटू लागते. ‘तुझा उपयोग शून्य.’ हे साधे शब्द हसत-खेळत घेता येऊ शकणारे; पण तेच शब्द जीवन संपायला कारणीभूत ठरतात.

उपहास-उपरोध कसा सहन करायचा, हे कोणी सांगितलेले नसते. टवाळखोर चारचौघांसमोर चेष्टा करतात. ही टर व्यंगाची नसते; हुशारीची असते. कर्तृत्वावर ते हल्ला चढवतात. आपण काही सिद्ध करावे की नाही? समजत नाही. घरात यावर सगळ्यांनी बोलावे, असे कायम वाटते. हेटाळणी होत असेल तर त्वरित सांग. आपण कोणते शब्द आत भिनू द्यायचे आणि कोणत्या शब्दाला हद्दपार करायचे, हे घर का सांगत नाही?

घर म्हणजे तरी काय, आई-वडील, बहीण-भाऊ, नातलग... ज्यांनी मनाला जपण्याचे काम केले असते; पण आजच्या काळात जपणे जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षाही अधिक कणखर करणे योग्य. प्रत्येक बोलण्याचा शेवट स्वत:ला संपवण्यासाठी झाला तर बोलणेच खुंटेल. मोठ्या कुटुंबात छोटी-मोठी भांडणे होतात. चुलत-आत्ये भावंडांत मनाला लागेल, असे बरेच घडते. अर्थात, त्या प्रत्येक वेळेस समजावण्यासाठी वृद्ध हात असतात. टोमणे मारत बेजार करणारे कुणी तरी असतेच. ‘असतो स्वभाव एकेकाचा’, असे सगळेच एकमेकांना म्हणतात. व्यंगावर विनोद घडतात. माहितीये फार डोकेबाज आहेस तू... हे सांगताना क्षणार्धात त्याला सामान्य ठरवले जाते. बाहेर मानमरातब मिळवणारा ‘तो’ घरात अगदी साधा, कोणी उठावं नि त्याला शाब्दिक चिमटा घ्यावा, असा बिच्चारा होतो; पण त्याला त्याचे वैषम्य वाटत नाही. घर त्याला जमिनीवर राहायला शिकवते.

जिंकणे व पराभव याचे अवडंबर घरात असू नये. नाठाळाला धडा शिकवायचाच. मान राखणार्‍याचा मान नि अवमान करणार्‍याला जागा दाखव, हे परोपरीने सांगणारी कुटुंबे आज खूप कमी झालीत. त्यामुळे आपण जगू नये, अतीव दु:ख झाले, संपवा आयुष्य. इतका तकलादूपणा आलाय. नकाराला स्वीकारायचे. आत्महत्या शब्दांमुळे, नजरांमुळे वा स्पर्शामुळे करायची नाही.

जगणे विलक्षण सुंदर आहे. त्यात संघर्ष आहे. क्वचित कडेलोट आहे. अपयशाची कृष्णछाया दाटून आली, तरी वाट पाहिली की ती दूर होणारच. अणकुचीदार शब्दांचा कुणी मारा केला, तरी मनाचे कवच भेदू शकणार नाही, इतके कणखर मन करणारी माणसे घरात आम्हाला हवी आहेत, कायमसाठी...
(bhargavevrinda9@gmail.com)