आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Aap Success And Its Stratagies By Prashant Dixit

दिल का हाल सुने दिलवाला! (प्रशांत दीक्षित)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतीलआपच्या विजयाचे विश्लेषण करताना दिल्ली शहरात निर्माण झालेल्या नव्या मतपेढीकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ही मतपेढी शहरी गरिबांची (अर्बन पुअर) आहे. दिल्ली शहराच्या भोवती पसरलेल्या या लक्षावधी शहरी गरिबांनी आपसाठी भरभरून मतदान केले व विक्रमी विजय मिळवून दिला. शहरी गरीब ही गेल्या काही वर्षांत एकगठ्ठा होत चाललेली मतपेढी आहे. शहरीकरण जसे वाढत आहे, तसा या मतपेढीचा विस्तार जागोजागी झालेला आढळतो. सरकारच्या गरिबांच्या व्याख्येत हे शहरी गरीब बसत नाहीत. यांना रोजगार असतो, लहानसे का असेना घर असते, काही ठिकाणी नवरा-बायको दोघेही कमावते असतात. मुले शाळेत जात असतात. म्हणजे ते मूलभूत सुविधांपासून वंचित झालेले नसतात.
मात्र सोयीसुविधांचा दर्जा अत्यंत सामान्य असतो. घर झोपडीवजा असते. नळ, संडास सार्वजनिक असतात. शेअर रिक्षा किंवा बसमधून अत्यंत दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. शाळा सामान्य दर्जाच्या असतात. दवाखाना बहुधा नसतो. असला तरी तेथे पुरेशी औषधे नसतात. मुलांना खेळण्याच्या सोयी नसतात. घरे लहान असल्याने दाटीवाटीने राहावे लागते. कारण प्रश्न पैशाचा असतो. शहरी गरिबाचे उत्पन्न नियमित असले तरी तोकडे असते. दर्जेदार सुविधा त्याला मिळविता येत नाहीत. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सुविधा एक तर मिळत नाहीत व मिळाल्या तर परवडत नाहीत. यात सरकारी भ्रष्टाचाराची भर पडते. भ्रष्ट अधिका-यांना पैसे मोजल्याशिवाय पाणी, वीज अशा सुविधाही मिळत नाहीत. शहरी गरीब हे स्थलांतरित असतात. लांबवरच्या प्रदेशातून शहराकडे आलेले असतात. त्यांची मुळे शहरात रुजलेली नसतात.

या मतपेढीवर अरविंद केजरीवाल यांनी वर्षभर काम केले. त्यांच्या समस्या केजरीवाल यांना आधीपासून माहीत होत्या. याच लोकांमध्ये त्यांचे काम वर्षानुवर्षे सुरू होते. त्या कामानेच गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना २८ जागा मिळवून दिल्या होत्या.
त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांना मोठा फटका बसला. ही मतपेढी मोदी यांच्याकडे सरकली. मात्र त्यानंतर हाय न खाता केजरीवाल यांनी गेले आठ महिने या मतपेढीवर अविश्रांत मेहनत घेतली. आपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः घरन‌्घर पिंजून काढले. गेल्या नोव्हेंबरपासून प्रत्येक घरात निदान तीनदा भेटी दिल्या. या शहरी गरिबांमध्ये माध्यमांचा प्रभाव खूप मोठा नसतो. तेथे व्यक्तिगत संपर्काला महत्त्व असते. शहरी गरीब रोजगारासाठी दिवसभर राबत असतात. त्यांना रात्रीच भेटावे लागते. आपच्या सर्व प्रचार व बैठका रात्री आठनंतर सुरू होत व मध्यरात्रीपर्यंत प्रचार चाले.

मोदींनी ही मतपेढी लोकसभेसाठी मिळविली होती. आजही पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कदाचित यातील साठ टक्के मते मोदींकडे जातील. मात्र विधानसभेसाठी त्यांनी केजरीवाल यांच्यावरच विश्वास टाकला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ४९ दिवसांचा त्यांचा कारभार.आधी उल्लेख केल्याप्रमाणे या मतपेढीच्या अपेक्षा साध्यासुध्या असतात. पाणी वेळेवर मिळावे, शाळांमध्ये प्रवेश मिळावा, तेथे शिक्षण ठीक असावे, वीज-बस-रिक्षा सेवा परवडणारी असावी आणि सरकारी अधिका-यांना पैसे चारावे लागू नयेत. रोजगारात नव्या संधी त्यांना हव्या असतात, पण मुळात ते स्वतः मेहनती असल्याने रोजगार शोधतात. नवी कौशल्ये आत्मसात करून घेतात. प्रश्न असतो तो त्यांच्या राहणीमानाच्या दर्जाचा.
केजरीवाल नावाचा माणूस हा दर्जा बदलवू शकेल, अशी खात्री शहरी गरिबांना ४९ दिवसांच्या कारभारातून वाटू लागली. याचे कारण त्या दिवसांत सर्व थरावरील लाच घेणे जवळपास बंद झाले होते. अधिकारी, पोलिस, अन्य कर्मचारी यांना धास्ती वाटत होती. त्याचबरोबर २४ तास स्वच्छ पाणी, तेही मोफत पुरविण्यासाठी केजरीवाल यांनी मनापासून केलेले प्रयत्न या मतपेढीने पाहिले होते. केवळ १६० कोटी रुपये खर्च केले तर वर्षभर स्वच्छ पाणी मिळू शकेल, हे त्यांनी दाखवून दिले होते.
वस्तीमध्येही पाणी मिळू लागले होते. वीज कंपन्यांचे हिशेब तपासण्याचे आदेश देऊन वीज बिलांमधील वाढ रोखली होती. आरोग्य, शिक्षण यामध्ये त्यांना काही करता आले नाही. पण रोजच्या आयुष्यात थोडा का होईना, चांगला बदल झाल्याचा अनुभव या मतपेढीने घेतला होता. भाजपने भगोडा म्हणून चेष्टा केली असली तरी हा माणूस काही बदल निश्चित करील, अशी खात्री या मतपेढीला वाटली.

या मतपेढीच्या गरजा लक्षात घेऊन मोदी सरकारने गेले आठ महिने काम केले असते तरी निकाल वेगळा लागला असता. पण अमित शहा व मोदींना ही मतपेढी कळलीच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते दिल्लीत कामाला लागले, पण त्यांनी या मतपेढीत कधीच काम केले नव्हते. त्यांचा शहरी गरिबांशी संवादच होत नव्हता.

केजरीवाल यांनी आणखी एक स्मार्टनेस दाखविला. ते फक्त याच मतपेढीवर अवलंबून राहिले नाहीत; दलित, मुस्लिम व भाजपकडे वळलेला उच्च मध्यमवर्ग यांनाही त्यांनी आपलेसे केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःला दलितांचा, मुस्लिमांचा मसिहा म्हणवून घेतले नाही. महागाई व भ्रष्टाचार यावरून लक्ष बाजूला होऊ दिले नाही. महागाई व भ्रष्टाचार हेच मध्यमवर्गालाही जाचणारे विषय होते. हिंदुत्ववादी संघटनांच्या आततायीपणामुळे दलित व मुस्लिम बिथरले होतेच, पण केजरीवाल यांनी या संघटनांवरही टीका केली नाही. धार्मिक, जातीय अशा वादात ते अडकलेच नाहीत. स्वस्त दरात सोयीसुविधा व भ्रष्टाचारापासून मुक्ती याच दोन विषयांवर घट्ट पाय रोवून केजरीवाल यांनी प्रचार केला.

केजरीवाल यांची सचोटी, मेहनत घेण्याची वृत्ती आणि उद्देश याबद्दल कोणालाच शंका नव्हती. नाणे खणखणीत होते व भाषा रोज भेडसावणा-या विषयांची होती. विषयांचा अभ्यासही होता. साहजिकच मध्यमवर्गापाठोपाठ उच्च मध्यमवर्ग, व्यापारी, लहान व्यावसायिक केजरीवाल यांच्याकडे आकृष्ट झाले. लघुउद्योजकांच्या मागण्या काय होत्या, तर पाणी, वीज व लाचखोरीपासून मुक्तता. शहरी गरीब हा लघुउद्योजकांवरच अवलंबून होता. ऑनलाइन खरेदीमुळे व्यापा-यांचा धंदा बसत चालला होता. त्यांना कररचना सुधारून हवी होती. केजरीवाल यांनी त्या दिशेने ४९ दिवसांत प्रयत्न केले होते. मोदी यांनी पुढील नऊ महिन्यांत काहीच केले नाही. वर्षानुवर्षे भाजपची पाठराखण करणारा व्यापारी वर्गही केजरीवाल यांच्यामागे आला. शहरी गरीब, दलित, मुस्लिम, मध्यमवर्ग, लघुउद्योजक, व्यापारी अशी साखळी उभी राहिली व आपची मते ५० टक्क्यांहून अधिक झाली.

केजरीवाल यांच्या प्रचारात तरुणांची संख्या मोठी होती. हा तरुण चांगल्या राहणीमानातून पुढे आलेला असला तरी त्याच्यासमोर रोजगाराच्या समस्या आहेत. त्यालाही दर्जेदार सोयीसुविधा हव्या आहेत. भ्रष्टाचार कमी केला तर दर्जा सुधारता येऊ शकतो, हे त्याला कळले.
त्याचबरोबर केवळ जात, पंथ, धर्म यावर आधारित राजकारण न करता बौद्धिक व तंत्रज्ञानाची बैठक घेऊन राजकारण करता येते, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. आज भाजप व आप या दोन पक्षांकडे सर्वात जास्त व्यावसायिक असतील, पण दोन्हींमध्ये फरक आहे. सोयीसुविधा दर्जेदार करण्यासाठी स्वतःहून वेळ व पैसा खर्च करणारे व्यावसायिक आपकडे आहेत, तर भाजपकडे राजकीय स्वार्थातून काम करणारे व्यावसायिक आहेत. आपकडील या वेगळेपणामुळेच अत्यंत कमी खर्चात प्रभावी प्रचार केजरीवाल यांना करता आला.
केजरीवाल यांच्या यशामागची ही कारणे सर्व पक्षांनी समजून घेण्यासारखी आहेत. मोदींचा रथ अडला म्हणून निधर्मवादी पत्रकार व नेत्यांना उकळ्या फुटत आहेत. पण या नवीन मतपेढीला असल्या गोष्टीत रस नाही. किंबहुना काही प्रमाणात हिंदू धर्माबद्दल त्यांना आस्थाच आहे. मात्र घरवापसी वा लव्ह जिहाद असल्या गोष्टींचा तिटकारा आहे. ही मतपेढी खरे तर काँग्रेसची. खिरापती वाटून या मतपेढीला आपेलेसे करण्याची बरीच धडपड काँग्रेसने केली. पण यांना खिरापती नकोत. त्यांना विकासाची संधी हवी आहे. त्यासाठीच त्यांनी मोदींना मते दिली. मोदींनी आर्थिक विकास करून आम्हाला संधी मिळवून द्याव्यात व केजरीवाल यांनी रोजचे जगणे सुसह्य करावे, असाही विचार कदाचित या मतपेढीने केला असेल. काँग्रेसने निधर्मीवादाचा जो अतिरेक केला, तोही या मतपेढीला आवडला नाही. हिंदू धर्माच्या चौकटीतच ही मतपेढी मोठी झाल्याने श्रद्धावान आहे. व्रतवैकल्ये, धार्मिक सण उत्साहाने साजरी करणारी आहे. शहरी गरीब ही तशी नवी मतपेढी नाही. इतिहास पाहिला तर ५०मध्ये केरळात कम्युनिस्टांकडे हीच मतपेढी होती.
महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र, डाव्या चळवळी, शिवसेना ही अशाच मतपेढीची अपत्ये. जेपींची चळवळ याच मतपेढीने चालविली. याच मतपेढीतून लालूंपासून ठाकरेंपर्यंत अनेक नेते मोठे झाले व लवकरच प्रस्थापित झाले. मतपेढीपासून दूर गेले. त्या वेळी शहरातीलच गरिबांची संख्या मोठी होती. आता स्थलांतरित गरीब वाढले आहेत. शहरे विस्तारत आहेत व त्याबरोबर शहरी गरिबीही वाढते आहे. मात्र एक महत्त्वाचा फरक आहे. त्या काळी ही मतपेढी विचारधारांच्या चौकटीत अडकून काम करीत असे. अन्य देशांचे दाखले देत चळवळी केल्या जात. या मातीतील श्रद्धा, संवेदना यांना स्थान नसे. आताची मतपेढी ही यापासून मुक्त आहे. विचारधारा, इतिहास यांचे ओझे त्यांच्यावर नाही. त्यांना फक्त सुविधांचा दर्जा व स्वच्छ कारभार यामध्येच रस आहे. केजरीवाल जितके फोकस्ड होते, तितकीच ही मतपेढीही फोकस्ड आहे. म्हणूनच त्यांचे गोत्र जुळले. भाजपला ते उपद्रवी वाटले.
आज दिल्लीतील शहरी गरिबाने हिसका दाखविला आहे. पुढील वर्षी मुंबईतही हा वर्ग शिवसेनेला झटका देऊ शकतो. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये ही नवी मतपेढी उदयाला येत आहे. तेव्हा सर्वच नेत्यांनी सावध व्हावे. स्वतःला बदला अन्यथा मफलर झाडू चालविणार, हे नक्की.

ppodix@gmail.com