आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Actor Dharmendra By Dharmendra Pratap Singh

धर्मेंद्रचा राग... बाप रे बाप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र-हेमामालिनीचा ‘प्रतिज्ञा’(१९७५) हा सिनेमा आठवतोय? त्यातले ‘मैं जट यमला पगला दीवाना...’ हे गाणे धर्मेंद्रच्या ‘अतरंगी’ डान्स स्टाइलमुळे आजही लोकप्रिय आहे. या सिनेमाची निर्मिती धर्मेंद्रचा धाकटा भाऊ अजितसिंह देओलने केली होती. अभय देओल हा अजितचा मुलगा. ‘प्रतिज्ञा’चे दिग्दर्शन दुलाल गुहा यांनी केले होते. दुलाल यांची खासियत म्हणजे, ते आपल्या प्रत्येक सिनेमाचे शूटिंग नाशिकमध्येच करायचे. सध्याच्या दिग्दर्शकांमध्ये रोहित शेट्टी गोव्यातच आपल्या सिनेमांचे शूटिंग करतात तसे. ‘प्रतिज्ञा’चे युनिट जेव्हा शूटिंगसाठी मुंबईहून नाशिकला रवाना झाले, तेव्हा त्या ताफ्यात दोन फियाटसह एकूण आठ-दहा गाड्या होत्या. धर्मेंद्र बसले होते ती फियाट सर्वात पुढे, त्यानंतर भगवंतसिंह यांची गाडी व सर्वात शेवटच्या गाडीमध्ये मीडियाच्या प्रतिनिधींना जागा मिळाली होती. भगवंत यांना त्या वेळी धर्मेंद्र यांचे साथी-सहयोगी-चमचा असे बरेच काही म्हटले जात असे. ते कायम धर्मेंद्र यांच्या सोबत असत. धर्मेंद्र यांच्या मेहेरनजरमुळेच भगवंतसिंह निर्माता होऊ शकले.

नाशिकच्या प्रवासादरम्यान सर्व गाड्या रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबल्या होत्या. फियाटमध्ये धर्मेंद्रना बघून त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी धर्मेंद्र कारच्या खिडकीतून हात बाहेर काढून चाहत्यांशी हस्तांदोलन करू लागले. समोरून एक सरदारजी येताना दिसले, म्हणून धर्मेंद्र यांनी हात पुढे करून पंजाबी ढंगात विचारले, ‘और क्या हाल है पाजी?’ बहुतेक त्या दिवशी सरदारजींचा मूड ठीक नव्हता, किंवा ते काहीसे रागात होते... त्यांनी धर्मेंद्रजींचा हात झटकला आणि अतिशय रुक्षपणे उत्तरले, ‘छोडिए, ये सारी चीजें स्क्रीन पर ही अच्छी लगती है।’ साहजिकच त्यांच्या या उत्तराने धर्मेंद्र दुखावले आणि अवाक् ही झाले. पण तेवढ्यातच फाटक उघडले, त्यामुळे गाड्या पुढे सरकू लागल्या. अचानक धर्मेंद्र यांनी तेवढ्याच रागात हात पुढे केला, तशी सरदारजीची दाढी त्यांच्या हातात आली! खरं तर गाडी सुरू झाली होती, म्हणून धर्मेंद्र यांंच्या तावडीतून दाढी सोडवून घेण्यासाठी सरदारजीने झटक्यात चेहरा मागे खेचला, ज्यामुळे दाढीचे काही केस धर्मेंद्र यांच्या हातात आले. सरदारजीच्या दाढीतून टप टप रक्त टपकू लागले.
धरमपाजींनी क्रॉसिंग पार करून आपली गाडी थांबवली. आता इतर गाड्याही मागे येऊन थांबल्या. काय घडलेय, हे धर्मेंद्रशिवाय इतर कोणाच्याच लक्षात येत नव्हते. धर्मेंद्र यांनी भगवंत यांना त्या सरदारजीला बोलावून आणण्याविषयी सांगितले. धर्मेंद्रजींचा इशारा म्हणजे भगवंत यांच्यासाठी जणू आदेश होता. काही मिनिटांतच सरदारजी धर्मेंद्र यांच्यासमोर हजर झाला. त्याच्या दाढीतून अजूनही रक्त टपकत होते. धर्मेंद्र गाडीत नेहमी ‘फर्स्ट एड किट’ ठेवत. त्यांनी ताबडतोब ‘फर्स्ट एड किट’ काढली आणि स्वत: सरदारजीची मलमपट्टी केली...नंतर भावुक होत म्हणाले, ‘मी तर सहजच आपली चौकशी केली, पण तुम्ही न जाणो कुठल्या विचारात हरवला होतात. यापुढे कोणाशी अशा प्रकारे वागू नका...’ शेवटी धर्मेंद्रजींनी सरदारजीच्या हातावर शंभर-दोनशे रुपये टेकवले, ज्याचा मथितार्थ होता, ‘या पैशाने दूध पी आणि वाहून गेलेल्या रक्ताची भरपाई कर...’

dpsingh@dbcorp.in