तनुजा यांच्यावर चित्रित होणारे दृश्य संपले आणि त्या दुसऱ्या दृश्याच्या तयारीसाठी जवळच असलेल्या चेंजिंग रूमकडे निघाल्या. तेवढ्यात एका अतिउत्साही तरुणाने त्यांच्याविषयी घाणेरडी शेरेबाजी केली. विनोदजींची नजर गर्दीतल्या त्या तरुणाकडे गेली...
लीवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मदन सिन्हा यांनी दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा
आपल्या ‘इम्तिहान’(१९७४) या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी त्यांनी विनोद खन्ना आणि तनुजा यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केली. सिनेमामधील काही दृश्ये शाळेत चित्रित करायची होती. त्यासाठी विनोद खन्नांनी देवळाली (नाशिक) येथील बर्न्स स्कूलमध्ये शूटिंगची व्यवस्था केली. विनोदजी त्या शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालले होते. शाळेतील मुलांप्रमाणेच इतर लोकांनीही शूटिंग बघण्यासाठी गर्दी केली होती.
...तनुजा यांच्यावर चित्रित होणारे दृश्य संपले आणि त्या दुसऱ्या दृश्याच्या तयारीसाठी जवळच असलेल्या चेंजिंग रूमकडे निघाल्या. तेवढ्यात एका अतिउत्साही तरुणाने त्यांच्याविषयी घाणेरडी शेरेबाजी केली. विनोदजींची नजर गर्दीतल्या त्या तरुणाकडे गेली, आणि त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता गर्दीत घुसून त्या तरुणाच्या थोबाडीत लगावली. त्या जोरदार थप्पडीने त्या तरुणाच्या तोंडातून रक्त येऊ लागले. विनोदजींचे ते रूप पाहून गर्दीतले लोक बिथरले होते, पण मॅनेजमेंटच्या लोकांनी प्रसंगावधान राखून मध्यस्थी केली. मामला थोडा शांत झाल्यावर विनोदजींनी सर्वांना समजावले, शिवाय त्या मुलालाही सुनावले, “तुम्हें शर्म नहीं आती... मेहमानों से कैसे पेश आया जाता है!’ या सगळ्या प्रकारात पॅकअपची वेळ झाली...
त्यानंतर सगळे जण नाशिकमधील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी जमले. सिनेमाशी संबंधित प्रश्नाेत्तरे सुरू होणार, इतक्यात “कौन है विनोद खन्ना? बाहर निकल... मेरे इलाके में आकर मारपीट करेगा!’ असा जोरदार आवाज घुमला. सायकलची चेन, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक हाती घेतलेले १२-१५ तरुण शिवीगाळ करत हॉटेलमध्ये घुसले होते. दुपारी घडलेल्या प्रकारामुळे बिथरलेले हेच ते तरुण होते. उपस्थित पत्रकार आणि ‘इम्तिहान’ युनिटचे सर्व जण या प्रकाराने घाबरले. पण विनोद खन्ना रागाने खाली उतरू लागले, तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले व त्यांना ‘ही सर्व गुंड मंडळी आहेत, त्यांच्या नादी लागू नका...’ असे सांगितले. दरम्यान, एका पत्रकाराने स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला होता. सर्वांनी परोपरीने समजावूनही विनोदजींनी ऐकले नाही...त्यांनी वरूनच त्या टपोऱ्यांच्या म्होरक्याला हेरले होते. त्यांनी खाली उतरताच त्या म्होरक्याच्याच हातातली हॉकी खेचून घेतली आणि त्याच हॉकीने त्यांनी त्या मवाल्यांची धुलाई करण्यास सुरुवात केली. विनोदजी एकटेच सगळ्यांना भारी पडत होते... विनोदजींनी १०-१५ मिनिटे त्यांचा यथेच्छ समाचार घेतला. नंतर पोलिस आले, तेव्हा ते तरुण विनोदजींचे पाय पकडून माफी मागू लागले, पण पोलिस त्यांना घेऊन गेले. त्यानंतर मीटिंग पुन्हा सुरू झाली... विनोदजी मध्येच ओरडले, “अरे, कोणीतरी पोलिस स्टेशनमध्ये फोन करून सांगा, त्या मुलांना घाबरवून, धमकी देऊन सोडून द्या. त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे...’’ एका ज्येष्ठ छायाचित्रकाराने पोलिस ठाण्याला फोन केला, तरीसुद्धा विनोदजींनी न राहवून स्वत:च फोन करून इन्स्पेक्टरना त्या मुलांना सोडण्याची विनंती केली...
dbsingh@dbcorp.in