आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर: अ‍ॅक्चुअरी - एक उत्तम करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी मनाला नेहमीच भविष्याचे वेध लागलेले असतात. भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. फ्युचरोलॉजी शाखेचा उदय अशाच उद्देशातून झाला आहे. पण या शाखेची माहिती पुढे कधीतरी घेऊ पण आज अर्थक्षेत्रातील भविष्यवेधी घडामोडींना कवेत घेणा-या एका नव्या शाखेची आपण माहिती करून घेणार आहोत.

अ‍ॅक्चुअरी हे करिअर वित्त शाखेतील भविष्यवेधी शाखा म्हणावी लागेल. एखादी कंपनी सुरळीत चालवण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असावीच लागते. मग ही आर्थिक बाजू कशी असणार आहे, त्याची वाढ कशी व कोणत्या प्रकरणातून चांगली होऊ शकेल, ग्राहकांची विश्वासार्हतासुद्धा कशी टिकवता येईल, त्यांना आकर्षित करण्यासाठी कुठल्या प्रकारचे व्याजदर निश्चित करता येतील, अशा संबंधातील सगळी गणितं, आकडेमोड अ‍ॅक्चुअरीला करावी लागतात. विमा व्यवसायामध्ये यांचा सिंहाचा वाटा असतो. एखादी नवीन पॉलिसी ‘लाँच’ करण्यापूर्वीचा सगळा अभ्यास अ‍ॅक्चुअरीचा असतो. ग्राहकांना दिले जाणारे फायदे, आकर्षक व्याजदर, बोनस किंवा डिव्हीडंड, त्यांच्याकडून वसूल करावयाचा हप्ता, आणखी पाच, दहा, पंधरा वर्षांनी त्या रकमेचे किती ‘पट’ होणार, त्यावेळेला त्याची मॉनिटरी व्हॅल्यू काय असू शकेल अशा सर्व बाजूंनी विचार करून एखादी नवी पॉलिसी बाजारात आणण्याचं काम विमा कंपन्या करत असतात. आणि पडद्याआडची ही जबाबदारी अ‍ॅक्चुअरीज अत्यंत कुशाग्र बुद्धीने पार पाडत असतात. अठराव्या शतकात या शाखेचा विकास सुरू झाला पण अनेक वर्षे हे क्षेत्र विमा व्यवसायापुरतेच मर्यादित होते. पण आता ते आरोग्य, जीवन, वस्तू सारख्या शाखांमधूनही विस्तारित आहे. बँकांमध्ये, वित्तीय उलाढालींशी निगडित कंपन्यांमध्ये या शाखेला आता दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे. हे क्षेत्र अजूनही दुर्लक्षितच राहिलेले आहे. कारण पारंपरिक करिअरची वाट धरणारी मानसिकता अजूनही आहे. पण ग्लोबलायझेशनच्या जमान्यात ही शाखा वेगाने विस्तारित असून येथे करिअर करण्यास प्रचंड वाव आहे. ही शाखा प्रामुख्याने आर्थिक घडामोडींशी निगडित असल्याने तिची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरुपाची आहे.

प्रचंड बुद्धिमत्ता, गणिती मेंदू, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र यांची आवड अशा विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र एक सुवर्णसंधी आहे. इथे गणिताशी खेळावं लागतं, संख्याशास्त्र, अर्थशास्त्राशी घट्ट मैत्री करावी लागते आणि सद्य:स्थितीत तसेच पूर्वाश्रमीच्या काळातील आर्थिक चढउतारांचा अंदाज बांधण्याची कला अंगी बाणवावी लागते. इथे पैसाही भरपूर प्रमाणात मिळू शकतो आणि खरोखरी अत्यंत तल्लख, चतुर (परंतु पुस्तकी नव्हे), बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅक्चुअरीज ऑफ इंडिया मेंबरशिपची देखील व्यवस्था आहे. मात्र त्यासाठी किमान अठरा वर्षे वयाची अट आहे. तसेच गणित/संख्याशास्त्र/अर्थशास्त्र अशा विषयांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा स्कोअर असणं अपेक्षित असतं. या तीन विषयांमध्ये कमीत कमी पंचावन्न टक्क्यांची अट आहे. मात्र पदवी हातात आल्यानंतर खूप चांगल्या ठिकाणी, चांगल्या पदावर उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. भारतभरातील बहुतेक विद्यापीठांमधून अ‍ॅक्चुअरल सायन्स असा कोर्स उपलब्ध आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एन.एम.आय.एस.एस.) मुंबई, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, चेन्नई, अण्णामलई युनिव्हर्सिटी, तामिळनाडू, गोवा युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी देखील या कोर्सच्या संबंधी माहिती मिळू शकते.