आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एफडी' नावाचा छुपाशत्रू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिष नावाचा तरुण मुलगा. घरातले सग‌ळेच उच्चविद्याविभूषित. अनिषही मुंबईच्या एका नामांकित शाळेत शिकलेला. विद्यार्थी म्हणून हुशार आणि विनम्र. शाळेत त्याची गणना गुणवंत विद्यार्थ्यांत होई. अभ्यासाबरोबर त्याला वाचनाचा पण छंद होता. घरात भावंडांमध्ये धाकटा असल्यामुळे तो सगळ्यांचा लाडकाही होता. बारावीनंतर त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे होते. पण प्रथम वर्षाला असताना सोबतच्या मित्रांनी फसवून त्याला एमडी म्हणजेच मेथाडॉनची चव चाखायला लावली. त्या दिवसापासून अनिषच्या आयुष्यात अत्यंत धोकादायक वळण येत गेले. एक क्षण असा आला की हुशार, विनम्र आणि कमालीचा उत्साही अनिष मेथाडॉन म्हणजेच एमडीच्या व्यसनात गुरफटला गेला.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावाच्या वातावरणात थोडासा वेगळेपणा सगळ्यांना हवासा वाटतो. तरुणांमध्ये नव्या गोष्टींचे कुतूहल मोठे असते. काही युवक केवळ कुतूहलापोटी या अमली पदार्थांचे सेवन करतात. पण पुढे ते कायमचे जाळ्यात ओढले जातात. नंतर अमली पदार्थांचे सेवन हे रोजच्या जगण्याचा भाग होऊन बसते. या अमली पदार्थांच्या प्रकारामध्ये नवी भर म्हणजेच ‘मेथाडॉन!’ आज अनिषसारखेच साधारण १७ ते २२ वयोगटातले अनेक तरुण-तरुणी एमडीच्या फे-यात अडकताना दिसताहेत. हे प्रमाण मुंबईसारख्या शहरात सध्या वाढताना दिसत असले तरीही, व्यसनाचे हे वारे इतरही लहान-मोठ्या शहरांत पसरायला वेळ लागायचा नाही. एकट्या मुंबईत गेल्या काही महिन्यांत मेथाडॉनच्या व्यसनापायी जीव गमावणा-यांची वाढती संख्या पाहून महापालिकेला याविरोधात कठोर कारवाई करणे भाग पडत आहे. तंबाखू, सिगारेट, दारू ही सर्वांना माहितीची असलेली व्यसने असली तरीही प्रत्येक पिढी यापलीकडच्या व्यसनात थ्रिल शोधत असते. काही वर्षांपूर्वी हेरॉइनचे व्यसन समाजाच्या चिंतेत भर घालत होते. आज ती जागा एमडीने घेतली आहे.

सेवन केल्यानंतर गुंगी आणणारे मेथाडॉन हे आपल्याकडे मुख्यत: तीन प्रकारांत उपलब्ध होते. (१) पाण्याच्या स्वरूपात (२) गोळीच्या स्वरूपात आणि (३) पावडरच्या स्वरूपात. औषधी वापरासाठी असलेले मेथाडॉन हे डॉक्टर रुग्णाला गुंगी देण्यासाठी वापरतात. याचा उपयोग वेदना शमवण्यासाठीसुद्धा होत असतो. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेथाडॉन मिळू नये, हा नियम असताना वेगवेगळ्या मार्गांनी व्यसनी लोक मेथाडॉन मिळवत असतात. या अमली पदार्थाला औषधाचे सुरक्षित अस्तर असल्याने जवळच्या माणसाला मेथाडॉन घेणा-यांचा प्रारंभी संशय येत नाही. त्या अर्थाने हा एक छुपा शत्रू असतो, जो चटकन ओळखता येत नाही. परंतु जेव्हा उमगते, तेव्हा संबंधित व्यक्ती केवळ औषधोपचारांनी नव्हे, तर व्यसनमुक्तीच्या मार्गांनीच या चक्रातून स्वत:ची सुटका करवून घेऊ शकते.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला, मेथाडॉनच्या पूर्णपणे आहारी गेलेला अनिष एक दिवस आमच्या संस्थेत दाखल झाला. जेव्हा तो आला होता, तेव्हा चिडचिडेपणा, छातीत सतत कळा येणे, जीव गुदमरल्यासारखे होणे असे प्रकार त्याच्या बाबतीत घडत होते. याच अवस्थेतून जाणा-या इतरांच्या बाबतीतही छातीत कळा येण्यासोबतच लघवीवाटे रक्त जाणे, छातीत कफ होणे, दातखिळी बसणे, वजन कमी होणे अशीच साधारण लक्षणे दिसत असतात. परंतु हे व्यसन इतर व्यसनांच्या तुलनेत फसवणारे असल्यामुळे इतरांना या लक्षणांचा माग काढता येत नाही. जो या सगळ्या त्रासातून जात असतो, तोसुद्धा अनामिक भीतीपोटी हे सगळे कुणालाही न सांगता अंगावर काढत असतो. इतर व्यसनांत अडकलेल्यांप्रमाणेच मेथाडॉनमध्ये गुरफटलेले कुटुंब-मित्र-नातेवाईक या सगळ्यांपासून दुरावलेले असतात. त्यामुळे इथेसुद्धा त्यांना आपल्या माणसांमध्ये परत आणणे, हे पहिले आव्हान असते.

अनिष जेव्हा उपचारांसाठी आला, तेव्हा आम्हीदेखील त्याला इतरांमध्ये मिसळण्यासाठी प्रवृत्त केले. प्रारंभी तो अनिच्छेने ते करत गेला, परंतु एकदा त्याला आत्मविश्वास आला आणि त्याच्या वागणुकीत हळूहळू बदल घडत गेला. व्यसनात अडकलेला असताना त्याचे मन विचलित झाले होते. ते स्थिर व्हायला सुरुवात झाली. आधीच्या जीवनातला म्हणजे व्यसनाआधीचा अनिष कसा होता, ते कळण्यास सुरुवात झाली. जीवनात कुठल्याही प्रसंगी किंवा संकटसमयी हसत-खेळत सामोरे जावे हे त्याला उमगले. कालांतराने तो आपले दु:ख व व्यसन विसरला. मित्र कसे असावेत हे त्याने जाणले. गंमत म्हणजे जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्यामुळे नवनवीन कल्पना त्याला सुचू लागल्या. तो आत्मविश्वासाने त्या इतरांसमोर मांडू लागला. या बदलाने त्याचे कुटुंबीय सुखावले. दुरावलेले मित्र नव्याने जवळ आले. या बदललेल्या अनिषने आम्हा सर्वांनाही आत्मविश्वास दिला, तो म्हणजे, एमडीचे व्यसन कितीही चिंताजनक असले तरी त्यातून आत्मविश्वासाच्या बळावर कसेही करून बाहेर पडता येतेच.

nileshsoberlife@gmail.com