आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तन स्वातंत्र्याचे मोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याचा तळ दिसत असला की, आपल्याला त्या पाण्यात उतरण्याची सहसा भीती वाटत नाही. तसंच व्यसनी व्यक्तीचंही असतं. आपल्याला त्यांच्या मनाचा तळ दिसला, की त्यांची भीती वाटत नाही. मग त्यांच्यातली संवेदनक्षमता, त्यांचा प्रेमळ स्वभाव याचीही आपल्याला ओळख होते.

माझ्या असे लक्षात आले की, बहुसंख्य लोक तक्रार करत असतात की, व्यसनी व्यक्ती अभिव्यक्त होत नाहीत, एकटेच राहणे पसंत करतात. परंतु माझा अनुभव असा आहे की, समोरच्या माणसाने अंगी संयम आणि क्षमाशीलता बाणवली तर मदत मागायला येणारा माणूस येताना व्यसनाधीन म्हणून आला, तरी जाताना स्वत:चे चांगले व्यक्तिमत्त्व घेऊन जातो.
मात्र त्यांच्या मनातले ओळखण्यासाठी, त्यांचे मन वाचण्यासाठी आपल्याला साधारण पुढीलप्रमाणे प्रश्न पडणेही आवश्यक असते.
१. व्यसनाधीन व्यक्तींना ख-याखु-या भावना मांडणे कठीण जात आहे का?
२. ते इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या मानसिक-भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करत आहेत का?
३. जेव्हा एखादी चूक घडते, तेव्हा ती व्यक्ती स्वत:चंच चुकलं आहे, या न्यूनगंडात वावरते का?
४. समूहामध्ये असूनही ती व्यक्ती स्वत:ला एकटेपणामध्ये गुरफटून ठेवते आहे का?
५. चांगली माणसे जवळ येण्याची त्या व्यक्तीला भीती वाटते आहे का?
६. कुटुंबाच्या प्रेमाची त्या व्यक्तीला जाणीव राहिलेली नाही का?
एकूणच, व्यसनी व्यक्तींच्या मनोविश्वात डोकावण्यासाठी समोरच्या माणसालाही खूप कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागते. यात शॉर्टकट घेता येत नाही, की मोठेपणाचा आव आणता येत नाही. माझ्याकडे वेदांत नावाचा वाराणसीचा तरुण आला होता. अगदी सुशिक्षित कुटुंबातला, दिल्ली येथे एमबीएचे शिक्षण घेतलेला. परंतु तिथेच त्याच्या व्यसनाधीनतेला सुरुवात
झाली. इतरांचे सोडा, स्वत:चेही भान उरले नाही. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ तो नोकरी करू शकला नाही. त्याने कामातले सातत्य गमावले. तो दुस-यावर दोषारोप करू लागला. शिक्षण असूनही त्याच्यातला आत्मविश्वास संपला होता. भरकटत चाललेलं आयुष्य रुळावर यावं, या उद्देशाने तो गेल्या पाच-सहा वर्षांत भारतातल्या
वेगवेगळ्या व्यसनमुक्ती केंद्रांत अर्थात, रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आला होता, पण प्रत्येक वेळी त्याच्या वाट्याला अपयश आले होते. काही तरी, कुठे तरी चुकत होतं. कदाचित त्याचं नव्हे, पण इतरांचं. त्याला औषधांपेक्षाही विश्वासाने स्वातंत्र्य देणा-या वातावरणाची गरज होती. सुदैवाने त्याची ती गरज आमच्याकडे असलेल्या ‘ओपन रिहॅब सिस्टम’मुळे भागली.
त्याला प्रेमाने समजावत, जबाबदारीची जाणीव करून देत, शेअरिंगची मुभा देत आयुष्याच्या प्रवाहात आणता आले. आज तो एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीत मार्केटिंग मॅनेजरपदी काम करत आहे. गंमत म्हणजे, सलग दीड वर्ष एकाच ठिकाणी नोकरी करण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्याच्यातला आत्मविश्वास पाहून कंपनीने अनेक महत्त्वाच्या
जबाबदा-या त्याच्यावर सोपवल्या आहेत.

एरवी, अपराधी भाव मनात असल्यामुळे व्यसनी व्यक्तींना मनातल्या भावना प्रकट करणे खूप कठीण जात असते. या व्यक्ती स्वत:ला नेहमी अपयशी समजत असतात. परिस्थितीला सामोरं जाण्याच्या त्यांच्या पद्धती चुकीच्या असतात. त्यांची निर्णयक्षमता ब-यापैकी खालावलेली असते. पण, माणूस म्हणून ती-ती व्यक्ती कधीही चुकीची नसते. एवढेच की, चांगल्या माणसांसमोर आपलं खरं रूप उघड होईल, या भावनेने त्या व्यक्ती सतत दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. व्यसन केल्यावर मानसिकदृष्ट्या ताकद मिळते, अशी चुकीची भावना मनात तयार होते. परिणामी, या व्यक्तींचे व्यसनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेल्याचे आपल्याला दिसते. खरं तर व्यसनांपासून रोखण्याचा आपला उद्देश योग्य असतो, पण व्यसनांच्यामध्ये कुणी आलेच तर संबंधित व्यक्तीची चिडचिड होणे वा ती हिंसक होणे, यादेखील
स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत, तिच्या मनाला लागलेल्या सवयी आहेत, हेही आपण विसरता कामा नये.

अशा वेळी, ‘विलिंगनेस टु चेंज’, म्हणजेच स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेची व्यक्तीला जाणीव करून देणे, हा व्यसनमुक्तीच्या वाटेवरचा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा असतो. शेवटी, व्यसनी व्यक्ती ही गुन्हेगार नसते, तर ती विचारांच्या आजाराने ग्रस्त असते. मेंटल एक्सरसाइज, टोन स्केल, रुटिन आदी थेरपींमुळे विचारांची दिशा बदलण्यास सुरुवात होते. या बिंदूपर्यंत पोहोचणं हा संघर्षच असतो, पण तेथूनच त्या व्यक्तीच्या कृतीतही सकारात्मक बदल जाणवू लागतात

nileshsoberlife@gmail.com