आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Adesh Bandekar And His Journey With Home Minister Serial By Mahesh Joshi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका दशकाची जिव्हाळयात्रा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी घरांत संध्याकाळचे साडेसहा वाजले की ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढुनी खेळ खेळू या नवा...’ या गाण्याचे बोल ऐकायला येतात. भाऊजी आले वाटते... या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत ‘भाऊजी’ घराघरांतील टीव्ही सेटमध्ये अवतरलेले असतात... घराच्या बंदिस्त चौकटीत राहणा-या सर्वसामान्य महिलांना जगासमोर आणण्याची किमया झी-मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ नावाच्या कार्यक्रमाने साधली. १४ सप्टेंबर २००४ला शो सुरू झाला. १४ सप्टेंबर २०१४ला ‘होम मिनिस्टर’ने दहा वर्षांचा पल्ला गाठला. यात सर्वात मोठा वाटा आहे, याचा सूत्रसंचालक आदेश बांदेकर याचा.
हलकेफुलके प्रश्न आणि खेळातून जिंकणा-यांना रोख पैसे आणि पैठणी वाटता वाटता आदेशने महिलावर्गाचे मन जिंकण्यात यश मिळवले. मात्र, व्यावसायिक यशापलीकडे जाऊन दहा वर्षांत अनेक प्रसंग आदेशला भावनिक करून गेले. काही प्रसंगात त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली...
मोनिकाचे दु:ख सरले
मुंबईत लोकलमध्ये चढताना पडल्यामुळे मोनिका मोरे या महाविद्यालयीन तरुणीचे दोन्ही हात कापले गेले होते. मोरे कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच आदेशने मोरे कुटुंबीयांना धीर दिला. सहा महिने मोनिकावर उपचार चालले. आदेश त्याची वेळोवेळी माहिती घेत राहिला. नुकतेच मोनिकाला कृत्रिम हात बसवण्यात आले. ती घरी परतली. सहा महिने मोनिकाच्या आईवडिलांनी जे परिश्रम घेतले, त्याचे सार्थक झाले होते. नवरात्रीनिमित्त तिच्या आईवर ‘होम मिनिस्टर’चा खास एपिसोड चित्रित करण्यात आला. यासाठी आदेश घरी आला तेव्हा मोरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यात मोनिका तर खास आदेशची फॅन... मग काय अख्खे कुटुंब सहा महिन्यांचे दु:ख विसरून आनंदात सहभागी झाले...
नवरात्रीच्या एपिसोडमध्ये मोनिकासह एक मूक आणि एक कर्णबधिर मुलगाही सहभागी झाला आहे. त्या दोघांना कधीच ऐकता किंवा बोलता येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यांनी हे सत्य स्वीकारले आहे. असे असतानाही ते कायम हसत असतात. त्यांना पाहून मोनिकाच्या डोळ्यांत अश्रू दाटले. आपल्याकडे जे नव्हते, ते परत मिळाले आहे. तरी आपण दु:ख केले. पण या दोघांकडे जे नाही, ते कधीच मिळणारही नाही. तरी ते आनंदी आहेत. त्यांच्या तुलनेत आपल्याला देवाने खूप काही दिल्याची आणि आपण भाग्यवान असल्याची भावना मोनिकाने बोलून दाखवली.

बक्षिसाने दिला आधार
एका भागात एका महिलेला ५०० रुपये बक्षीस मिळाले. आदेशने नेहमीप्रमाणे विचारले, या पैशांचे काय करणार? त्या बाईच्या डोळ्यात अश्रू तरळले. गादीखालून शाळेचे कार्ड काढत ती म्हणाली, भाऊजी यांची नोकरी गेलीय. मीसुद्धा काही कमवत नाही. मुलाची शाळेची फी भरण्याची नोटीस आलीय. काय करावे, या विचारात असतानाच तुम्ही देवासारखे आलात. उत्तर ऐकून आदेशही नि:शब्द झाला.

भावाबहिणीची पुनर्भेट
बहिणीने जातीबाहेर लग्न केले, म्हणून मुंबईतील अंधेरी येथील पोलिस कॉलनीत राहणा-या एका मुलीशी कुटुंबाने १५ वर्षे संबध तोडले होते. ही मुलगी एका एपिसोडमध्ये सहभागी झाली. तिने आदेशला आपली व्यथा सांगितली. मी खूप सुखी आहे, पण माझे माहेरचे माझ्यापासून दुरावले आहेत. आदेशने तत्काळ तिच्या भावाला फोन लावून बहिणीची तळमळ व्यक्त केली. शूटिंग संपताच पार्ल्याच्या ‘हॉटेल गजाली’मध्ये भावाला बोलावले. आदेशही तिला घेऊन हॉटेलात पोहोचला. आदेश सांगतो... तेथे मला एक शब्दही नाही बोलावा लागला; दोघांनी एकमेकांना बघितले आणि अक्षरश: ओक्साबोक्शी रडू लागले. १५ वर्षांचा दुरावा एका क्षणात संपला...

कांद्याचे पोते भेट
कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. नाशकातील चेहडी गावात ‘होम मिनिस्टर’ची टीम पोहोचली. एका सर्वसामान्य शेतक-याच्या शेतात सेट लागला. या घरातील महिला खेळात मात्र हरली. पण याचे जराही वाईट न वाटता आदेशला भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्वच समाधानी होते. तेथून निघताना या कुटुंबाने आदेशला एक भेट दिली. ते पाहून आदेश भारावला. या कुटुंबाने आदेशला दोन पोती कांदे दिले होते. कांदे महाग झाल्यामुळे आमच्याकडून ही छोटीशी भेट, असे ते म्हणाले. या प्रसंगाने कांदे न सोलताही आदेशचे डोळे पाणावले होते.

यांची दारू सोडवा
महिलांना आदेश कधी भाऊजी, तर कधी भाऊ वाटतो. रक्तातील नात्यातल्या भावापेक्षाही या भावावर महिलांचा अधिक विश्वास. म्हणूनच शूटिंगमधून थोडी उसंत मिळताच अनेकदा महिला त्याला बाजूला घेऊन जातात, त्याला विनंती करतात... माझ्या नव-याची दारू साेडवा... आमचे सगळे पैसे दारूतच खर्च होतात... मुलांची आबाळ होते... ते आमचे ऐकत नाहीत. तुम्ही सांगितले तर नक्कीच ऐकतील. मग आदेशही बहिणीच्या विनंतीला मान देऊन आपले काम फत्ते करतो. अनेक घरांतील अशा लहान वाटणा-या पण ज्यामुळे घरच उद‌्ध्वस्त होऊ शकते, अशा समस्या सोडवण्यास मदत करतो.’

पैठणीच्या बदल्यात पैठणी
दिवाळीच्या एका भागात फटाक्यातील अनार पेटवण्याची स्पर्धा होती. स्पर्धक महिलेच्या पतीने एका फुलबाजीने रांगेत ठेवलेल्या अनारांना पेटवायचे होते. जो जास्त अनार पेटवेल, त्याची पत्नी विजयी ठरणार होती. एकीच्या पतीने सगळे अनार पेटवले, तर दुसरीच्या पतीला एकही नाही पेटवता आले. ती नव-यावर जाम चिडली. पतीमुळे तिने पैठणी गमावली होती. शेवटी कॅमे-यासमोर पतीने पैठणी घेऊन देण्याचे वचन दिल्यानंतर तिचा राग शांत झाला.

सासूबाई परतल्या
एका भागात घरच्यांबद्दलचे मत ऐकून एका स्पर्धक महिलेच्या सासूबाई चिडल्या. तावातावाने घरातून निघून गेल्या. पण आपल्या सुनेने पैठणी जिंकल्याचे कळताच त्या परतल्या. सुनेला मिठी मारली. तिला अक्षरश: उचलून घेतले. ‘होम मिनिस्टर’च्या टायटल साँगवर नाचही केला.

पैठणीला नव्याने ग्लॅमर
आदेश भाऊजी हेच ‘होम मिनिस्टर’चे खास वैशिष्ट्य... पण याच्या जोडीला समस्त महिलावर्गाला आवडणारी पैठणीही या शोचे खास आकर्षण आहे. या शोमुळे महावस्त्र पैठणी घराघरांत पोहोचली. या शोमधील पैठणीचे प्रायोजक असणा-या पुण्याच्या ‘तथास्तु’ दालनातून पूर्वी महिन्याला ५ ते १० पैठण्या विकल्या जायच्या. आता ही संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. सणवार आणि लग्नसराईत तर ही संख्या पाच हजारांच्या पुढे जाते. हे केवळ ‘होम मिनिस्टर’मुळे शक्य झाले. येवल्यातील एका पैठणी विक्रेत्याने आदेशला सांगितले की, २००३-०४च्या काळात इथले अनेक पैठणी विक्रेते कर्जबाजारी झाले होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू झाला आणि पैठणीला पुन्हा उठाव आला. सर्वसामान्यांना पैठणीची भेट देऊन आनंद देणा-या आदेश भाऊजींमुळे पैठणीच्या पारंपरिक व्यावसायिकांच्या जीवनातही आनंद आला.

गिनीज बुकसाठी प्रयत्न
२००९च्या विधानसभा निवडणुकीतील दीड महिन्यांचा काळ वगळता, आदेश दहा वर्षे ‘होम मिनिस्टर’चे संचलन करतोय. टीव्ही जगतावरील हा विक्रमच आहे. याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी झी-मराठी प्रयत्न करतेय. तसे झाल्यास हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी बहुमानच असेल, असे आदेश म्हणतो.

हा ख-याखु-या नायिकांचा सन्मान -आदेश बांदेकर
‘होम मिनिस्टर’मुळे हजारो लोकांना भेटता आले. त्यांचे दु:ख समजून घेता आले. या लोकांशी भावनिक नाते निर्माण झाले. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन हिरोइन आहे. ही हिरोइन सर्वसामान्य आहे. तिच्यामागे ग्लॅमर नाहीये. घरातील कामाचा व्याप सांभाळून ती पहिल्यांदाच कॅमे-यासमोर आली आहे. यामुळेच याचा प्रत्येक भाग अनोखा आहे. तो तेवढाच ताजा आहे. अजून अख्खा महाराष्ट्र फिरून आणखी वहिनींना भेटायचे आहे. त्यांच्यातील कलागुणांनाही जगासमोर आणायचे आहे.
mahitri@gmail.com