आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Alice Munro By Shshikant Sawant, Divya Marathi

आशयसंपन्न अ‍ॅलिस !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅलिस मन्रो ही नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिका. कादंबरी तिने लिहिली; पण तिचे सारे सामर्थ्य कथेत साठवलेले आहे. केवळ कथालेखन हेच तिचे गेल्या काही वर्षांतील मिशन. बरे जगणेही असे; की त्यात काही हेमिंग्वेसारखे भव्यदिव्य अनुभव, युद्ध, संहार असा कोणताही पट नाही. कॅनडातील ऑनटारियोमधल्या ‘सिटी ऑफ क्लिंटन’ या छोट्याशा गाववजा शहरात, ती आपल्या दुस-या नव-यासोबत- जेरी फेमलिनसोबत राहते. 1931मध्ये जन्मलेली अ‍ॅलिस मन्रो आज 84 वर्षांची आहे. जवळपास रोज ती नियमित वेळेत लेखन करते. ती राहते, तो परिसर तिच्या पूर्ण ओळखीचा आहे आणि भोवतालच्या बहुतेक माणसांना ती नावाने ओळखते. आजूबाजूच्या प्रत्येक इमारतीचा इतिहास तिला माहीत आहे. तिच्या कथा प्रामुख्याने या एकाच परिसरात घडतात. इथली साधी, पण सरळ न जगणारी माणसे हाच तिच्या कथेचा निरंतर विषय आहे.


‘कॅरिड अवे’ या संग्रहातील ‘द बिअर केमओव्हर द माऊंटन’ ही कथा 45 पानांची आहे. जवळजवळ अनेक कथा याच लांबीच्या आहेत. साहजिकच एखाद्या क्षीण आशयाभोवती गुंफलेल्या मराठी कथांपेक्षा तिच्या कथेतील अवकाश, पात्र निर्मिती, माणसांचे नातेसंबंध, यांचे जुळणे-तुटणे असे लघुकथेचा पल्ला ओलांडणा-या. फिओना आणि ग्रँट हे एक सुखी मध्यमवर्गीय दांपत्य. मैत्री इतकी दाट की ती जेव्हा त्याला प्रपोज करते तेव्हा त्याला वाटते, ती विनोद करते आहे. वाक्यही कसं; ‘आपण लग्न केलं तर मजा येईल ना!’ त्यानंतर दोघांचाही संसार आणि नेहमीची कामं सुरू होतात. तो कार्डिओलॉजिस्ट आहे आणि ती नर्स. या संसारात मध्यमवर्गीय सर्व भौतिक चिजा हजर असतात. मन्रो सांगते, ‘या घरात ते राहत असताना दोघेही ब-यापैकी टीव्ही पाहत. जवळपास जिथे जिथे कॅमेरा पोहोचू शकतो, असा प्रत्येक प्राणी, कीटक, समुद्रजीव किंवा सरपटणारे जीव यांचे आयुष्य या टीव्हीवर त्यांनी लपून-छपून पाहिले होते. डिपार्टमेंट स्टोअरमध्ये घडणारी इंग्लिश कॉमेडी इतक्या आतुरतेने पाहिली होती की पुन्हा दाखवली जायची, तेव्हा त्यांना संवाद पाठ असत. एखादा नट मरण पावला किंवा मालिका सोडून गेला की ते दु:खी होत; पण पुन्हा पुनरुज्जीवित झालेल्या पात्राचे काम करणा-या नव्या अभिनेत्याचे कामही कुतूहलाने पाहत. मालिकेत छोटी-मोठी कामे करणा-यांचे केस काळ्याकडून पांढरे झालेले आणि नंतर पुन्हा काळे झालेले ते पाहत. त्यांचे स्वस्त सेट कधी बदलत नसत. पण नंतर हेही नाहीसं होतं. सेट्स आणि काळे केस रस्त्यावरची धूळ उडून जावी, तशी निघून जात. हे सारं फिओना आणि ग्रँटला एखाद्या शोकांतिकासारखं वाटत असे, म्हणून ते शेवटचा भागही पाहत नसत.’
असा हा संसार ग्रँटच्या एका अफेअरमुळे धोक्यात येतो. दोघेही शहर सोडून तिच्या बालपणीच्या घरी निघून जातात. आणि मग एक दिवस फिओनाला अल्झायमर, स्मृतिभ्रंशाचा आजार होतो. तिला र्नसिंग होममध्ये ठेवले जाते. ती नव-याला ओळखेनाशी होते. पण र्नसिंग होममध्ये असलेल्या मित्रावर मात्र माया करू लागते. ग्रँट याच्यामुळे विचलित होतो. आपला जुना डॉक्टरीचा पेशा सोडून तो वाङ्मय शिकवायला लागतो. अनेक तरुणी आणि मध्यमवर्गीय महिला कोर्सला अ‍ॅडमिशन घेत असतात. पण एकेकाळचा फ्लर्ट ग्रँट स्मृतिभ्रंशाने ग्रासलेल्या आपल्या पत्नीसाठी कुठलेही प्रलोभन न स्वीकारता कायम तिला भेटत राहतो. एक दिवस ओळख पटवून म्हणते, ‘तुला पाहून छान वाटते. तू मला टाकून निघूनही जाऊ शकला असतास.’ तो म्हणतो, ‘शक्यच नाही.’ दीर्घकाळच्या नात्याने शेवटी क्षणिक गोष्टींवर मात केलेली असते.


ही एक कथा पाहिली तर त्यातील जगणे मध्यमवर्गीय आहे. माणसे आणि त्यांचे जगणे यात अचाट काहीही घडत नाही. पण मन्रो हे सारे सूक्ष्मपणे न्याहाळते आणि आपल्यापर्यंत पोहोचवते. मराठीत कथा हा मोठा साहित्यप्रकार नाही, असा एक वाद नेमाडेंनी छेडला होता. शिवाय ‘सदाशिवपेठी साहित्य’ असाही एक शब्दप्रयोग मराठी साहित्याची मर्यादा दाखवण्यासाठी रूढ झाला. त्यावरूनही वाद झाला.
या दोन्ही वादांची उत्तरे आपल्याला मन्रोच्या कथांमध्ये सापडू शकतात. लेखक जे जग चित्रित करतो, ते मर्यादित असले तरी लेखकाची प्रतिभा तो विषय कसा हाताळते, हे महत्त्वाचे. मन्रोच्या कथांनी आणि नोबेल पुरस्काराने त्याला उत्तर दिले आहे.


shashibooks@gmail.com