आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीतांची भैरवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यातील एक प्रसन्न सकाळ. पहाटेच पावसाची जोरदार सर येऊन गेलेली. सकाळच्या कोवळ्या उन्हाने चोहीकडे दाटलेली हिरवळ सोनपिवळी झालेली. तेवढ्यात रेडिओवर गाणे लागते... ‘मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है...’ ‘साजन बिना सुहागन’मधले हे गाणे येसुदासच्या स्वर्गीय सुरांतले. या गाण्याचा गंधच निराळा. शब्दा-शब्दांतून सुगंधाची एक अविरत मंद झुळूक कर्णपटलातून मन:पटलावर उमटत राहते. अमित खन्ना यांच्या लेखणीची जादूच अशी असीम आनंद देणारी. म्हणूनच शब्दांना उपमारूपी अत्तराच्या कुपीतून गाण्यात उतरवणारा अमित खन्ना हा गीतकार चोखंदळ रसिकांच्या मनात घर करून आहे...
अमित खन्ना हा ख-या अर्थाने अष्टपैलू गीतकार. तो केवळ गीतकारच नाही, तर दिग्दर्शक, पत्रकार, पटकथाकार, निर्माता, कॉर्पोरेट व्यवस्थापक अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या आहेत. हे सर्व करत असताना अवीट गोडीची अनेक अविस्मरणीय गाणी अमित खन्नांच्या लेखणीची ताकद सांगणारी आहेत. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इंग्रजी विषयातील पदवीधर असलेल्या अमित खन्ना यांनी हिंदीवरचे प्रभुत्व आपल्या अनेक गाण्यांतून वेळोवेळी सिद्ध केले आहे. दिल्लीत प्रारंभीच्या काळात त्यांनी अनेक नियतकालिकांसाठी पत्रकारिता केली. गाण्याची लहानपणापासून आवड असणा-या अमित यांना मुंबईत खरा ब्रेक दिला तो एव्हरग्रीन स्टार देव आनंद यांनी आपल्या नवकेतन बॅनरमध्ये. देव आनंद निर्मित ‘शरीफ बदमाश’ व ‘देस पसदेस’ या चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक म्हणून अमित खन्ना यांनी काम पाहिले. त्यांच्यातील प्रतिभा पाहून देव आनंद यांनी ‘देस-परदेस’च्या गीत लेखनाची जबाबदारी अमित यांच्याकडे सोपवली.
नजराना भेजा है किसीने प्यार का, आप रहें और हम ना आये, जैसा देस वैसा भेस, नजर लागे ना साथियाँ, ‘देस परदेस’मध्ये यासारखी एकाहून एक सरस गाणी देत अमित खन्ना यांनी देव आनंद यांचा विश्वास सार्थ ठरवला. ‘देस परदेस’ पासूनच अमित आणि संगीतकार राजेश रोशन यांचे सूर जुळले. या गोड समीकरणातूनच रसाळ गाणी जन्माला आली. लोगों का दिल अगर, रहने को एक घर, कभी शादी ना करो, चारू चंद्रा की चंचल चितवन, मै अकेला अपनी धून मे मगन (सर्व मनपसंद) यातून हे सूर आणखी सुरेल झाले. मग बासू चटर्जींच्या ‘बातो बातों मे’मधून या जोडीने आणखी दर्जेदार कामगिरी करत रसिकांची मने काबीज केली. यातील ‘सुनिए कहिए’, ‘ना बोले तुम’, ‘उठे सबके कदम’, ‘कहाँ तक ए मन को’ अशा एकाहून एक सरस गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. बासूजींच्याच ‘स्वामी’मधल्या अमित खन्ना यांच्या गाण्यांची महती काय वर्णावी. ‘का करू सजनी आये ना बालम’ हे येसुदास यांच्या आवाजातले गाणे असो, की ‘यादों मे वो’मध्ये ठेवणीतला आवाज वापरणारा किशोर असो; आजही ही गाणी हेलावून टाकतात. त्यावर कडी म्हणजे, लतादीदींच्या आवाजातले ‘पल भर में ये क्या हो गया, लो मै गयी वो मन गया’, ‘चुनरी कगे सुन री पवन सावन लाया अब के सजन’, ‘दिन भर मुझे ये सताए, उन बिन अब तो रहा नही जाए...’ त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या तिच्या मनाची अवस्था अमित खन्ना यांनी ज्या शब्दांत गुंफली आहे, त्याला जोड नाहीच. अमित यांच्या लेखणीची जादू पाहा- तिची ही विरहावस्था मांडताना त्यांची लेखणी जशी मुलायम होते, तशीच ती आक्रमकही होते. ‘लुटमार’मधल्या ‘जब छाये मेरा जादू, कोई बचना पाय’मधून याचे प्रत्यंतर येते.
राजेश रोशनप्रमाणेच बप्पी लाहिरी यांच्यासमवेत अमित खन्ना यांनी अशीच लोकप्रिय गाणी दिली आहेत. ‘चलते चलते’ हे त्याचे उत्तम उदाहरण. यातील प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, जाना कहाँ है, दूर दूर तुम रहो... अशी सर्वच गाणी गाजली. सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, सबूत, गुदगुदी, अविनाश अशा अनेक चित्रपटांतून या जोडीने गाणी दिली.
अमित खन्ना यांनी खरी कमाल केली ती ‘भैरवी’मध्ये. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेल्या अमित खन्नांच्या लेखणीतून अवतरलेल्या भैरवीतील गाण्यांनी रसिकांना पुन्हा एकदा केसरी सुगंधाचा आस्वाद दिला. भैरवीतील ‘बलम केसरिया’, ‘चलरी पवन’, ‘बीच भँवर में’, ‘कुछ इस तरह से’ अशा गाण्यांनी अमित खन्ना ही काय चीज आहे, याचे प्रत्यंतर रसिकांना आले. रामसे बंधूंच्या ‘पुराना मंदिर’ या भयपटातही ‘वो बिते दिन याद है’सारखे आशयघन गाणे देणा-या अमित खन्ना यांच्या शब्दांची जादूच अशी निराळी व कायम स्मरणात राहणारी आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटसारख्या कॉर्पोरेट कंपनीचा सर्वेसर्वा ते अनेक टीव्ही सिरियल्सचा लेखक, गीतकार म्हणून अमित खन्ना यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या गाण्यांनी बी ग्रेड चित्रपटाला हिट करण्याची ताकद असलेला अमित खन्ना हा गुणी गीतकार म्हणूनच त्याच्या गीतांमुळे सर्वांच्या मनात घर करतो.
kajaykulkarni@gmail.com