आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आनंद' गाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविता हा त्याचा जीव की प्राण. त्याचे विश्वच निराळे. शब्दांच्या मळ्यात तो रमायचा. त्यात त्याच्या वाट्याला आलेली, लष्करातली नोकरी. लष्कराच्या कडक शिस्तीत शब्दांना अधिकच साचेबद्धता आली. लय मिळाली. ते रुक्ष वातावरण, तो युद्धाचा सराव, लष्करी कवायत, अशा वातावरणात राहूनही हा पठ्ठ्या खुशाल कवितेच्या मळ्यात बागडायचा. या प्रतिभेनेच त्याला रुपेरी जगताच्या दालनात आणले. त्याच्या शब्दांच्या जादूने, त्याच्या आनंददायी गीतांनी रसिकांना जिकले. त्याच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी तरुणाईला झिंग आणली. आनंद बक्षी नावाचा हा गीतकार उत्तरोत्तर बहरतच गेला. तरुण, ताजे, टवटवीत शब्द हे आनंद बक्षी यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. त्यातूनच जन्माला आली, तुम्हा-आम्हाला दु:ख विसरायला लावणारी ‘आनंद गाणी.’
कलाकार बनण्याचे स्वप्न उरी बाळगणारा हा रांगडा गडी नेहमी म्हणायचा, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय हवे. गायक व्हायचे आनंद बक्षी यांच्या मनात खूप होते; मात्र त्यांच्यातील कविमनाने गायकीवर मात केली. ते गीतकार बनले आणि जन्माला आली, रसिकांचे जीवन फुलवणारी अविस्मरणीय गाणी. शब्दांच्या या जादूगाराने आपल्या गीतांनी रसिकांना जणू मोहिनीच घातली. प्रेमाची लय असो की विरह, आई-मुलातील वात्सल्य असो की मरणाची अपरिहार्यता; आनंद बक्षींच्या लेखणीने सर्व भावना रसिकांच्या मनात अलगद पोहोचायच्या. त्यातील भावनांच्या स्पर्शाने रसिकमन कधी आनंदाने बहरायचे. 1958मध्ये आलेला ‘भला आदमी’ हा या भल्या गीतकाराचा पहिला चित्रपट. ‘धरती के लाल न कर इतना मलाल’ पहिले चित्रपट गाणे. मात्र, आनंद बक्षी खरे प्रकाशझोतात आले, ते ‘जब जब फूल खिले’मधील गाण्यांमुळे.
सहज ओठांवर येतील असे साधे, अर्थपूर्ण शब्द, मनाला भावणा-या शब्दांची यमकालंकारात केलेली सुलभ गुंफण, ही आनंद बक्षी यांच्या गाण्याची काही वैशिष्ट्ये. रसिकांच्या मनातले भाव त्यांच्या गीतातून नेमकेपणाने उतरायचे. मैत्री असो की द्वेष, प्रेम असो की मत्सर, वात्सल्य असो की कारुण्य, जीवनाचे तत्त्वज्ञान असो की फँटसी... आनंद बक्षी यांची लेखणी हे सारे भावविश्व चपखलपणे टिपायची. या सर्व भावना मग सुंदर गीतांतून रसिकांच्या मनी रुंजी घालायच्या. संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल (एलपी) यांच्याबरोबर आनंद बक्षी यांचे खरे सूर जुळले. या त्रयीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली.
आने से उसके आये बहार (जीने की राह), बिंदिया चमकेगी (दो रास्ते), सावन का महिना (मिलन), मै शायर तो नहीं (बॉबी), परदा है परदा (अमर अकबर अँथोनी), आदमी मुसाफिर है (अपनापन), डफलीवाले (सरगम), ओम शांती ओम (कर्ज) ही आनंद बक्षी-एलपी या त्रयीची कामगिरी दर्शवणारी काही गाणी. एलपीप्रमाणेच राहुल देव बर्मन (आरडी) या तरुण संगीतकाराबरोबर वयाने नेहमीच तरुण असणा-या आनंद बक्षी यांची वेव्हलेंग्थ जुळली. ना कोई उमंग है (कटी पतंग), रैना बिती जाए (अमर प्रेम), महेबूबा ओ महेबूबा (शोले), परबत के पिछे (महेबूबा), सावन के झुले पडे (जुर्माना), दम मारो दम (हरे राम हरे कृष्ण) ही आरडी-आनंद बक्षी या कॉम्बिनेशनची झलक दाखवणारी काही गाणी. कल्याणजी-आनंदजी, अन्नू मलिक, राजेश रोशन या संगीतकारांसाठीही आनंद बक्षी यांनी अनेक आशयघन गाणी दिली आहेत.
उगवत्या सूर्याला नमस्कार करणा-या या झगमगत्या चित्रसृष्टीत माणुसकीची नाती जपणारा संवेदनशील माणूस म्हणूनही आनंद बक्षींनी अनेक माणसे कमावली. सुभाष घई ‘कर्मा’च्या निर्मितीत असताना, आनंद बक्षी यांनी ‘दिल दिया है जान भी देंगे’ हे थीम साँग लिहिले. त्याचे बोल ऐकले आणि सुभाष घर्इंनी लगेच खिशातून शंभराची नोट आनंद बक्षी यांना भेट दिली. त्यावर ‘सप्रेम भेट’ असे लिहिलेले होते. आनंद बक्षी यांनी वॉलेटमध्ये ती नोट शेवटपर्यंत जपून ठेवली होती. ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ हा आदित्य चोप्राचा पहिला चित्रपट. त्यांना हिट गाणी हवी होती. ‘मेरे ख्वाबों मे जो आए’ हे आनंद बक्षीच्या चिरतरुण लेखणीतून उतरलेले गीत सुपरहिट ठरले. हे शब्द अंतिम करण्यापूर्वी आदित्य चोप्राने 24 वेळा या गाण्याचा मुखडा नापसंत केला होता. दर वेळी तेवढ्याच उत्साहाने आनंद बक्षी यांनी नव्या जोमाने गाणे लिहिले आणि त्या वेळी आनंद बक्षी यांचे वय होते 65 वर्षे!
आदमी मुसाफिर है (अपनापन)मधून जीवनचक्रावर भाष्य करणारा हा संवेदनशाील गीतकार इश्क बीना क्या जीना यारों (ताल)मधले तरल भाव तेवढ्याच आशयघनतेने मांडतो. कोरा कागज था ये मन मेरा (आराधना) अशी प्रांजळ कबुली देत प्रेमाची ग्वाही दिल्यानंतर तिला पाहताच ‘दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने’ (कर्ज) अशी स्पष्ट कबुली देण्यास हा गीतकार कचरत नाही. पुढच्याच पावलावर ‘मै शायर तो नहीं’(बॉबी) असे सांगत तिच्या प्रभावाचे वलय स्पष्ट होते. शीशा हो या दिल हो (आशा)मधून पुढील धोक्याची जाणीव करून देण्यास हा संवेदनशील कवी विसरत नाही. प्रेमाचा बहर संपल्यानंतरचे नैराश्य, वैफल्य व्यक्त करताना आनंद बक्षी यांच्या लेखणीला जणू आगळी धारच चढते. त्यातील भावामुळे ती अविस्मरणीय बनली. बक्षींच्या 40 गीतांना फिल्मफेअरचे नामांकन मिळाले, चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या सिद्धहस्त लेखणीने रसिकांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवलेल्या बक्षी यांची सर्वच गाणी म्हणूनच ‘आनंद’ गाणी ठरली.
kajaykulkarni@gmail.com