आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Antartica Continant By Dr.Prakash Joshi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोक्यांची साखळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमदंशाविषयी (फ्रॉस्ट बाइट) थोडंसं विवेचन झालंच आहे. हिमदंश म्हणजे पेशींचं गोठणं. माणसाच्या शरीराचा कोणताही भाग अतिशीत वातावरणाच्या संपर्कात आला की तिथल्या पेशी गोठतात. प्रथम हिमचावे सुरू होतात. (उन्हाचे, उष्णतेचे जसे चटके; तसेच हे थंडीचे चटके/चावे.) हे सतत वा दीर्घकाळ होत राहिल्यास पेशी निकामी ठरतात. शारीरिक कार्यक्षमतेवर त्याचा घातक परिणाम होतो. वातावरणाच्या संपर्कात येणा-या कोणत्याही अवयवावर हा परिणाम होत असला तरी हात, पाय यांच्यावर त्यांचा परिणाम अधिक होण्याची शक्यता असते. कारण, हे अवयव बर्फाच्या सतत संपर्कात येत असतात. याची पुढची पायरी, गँगरीनची बाधा. हिमालयात ट्रेकिंग करणा-या अनेकांच्या हातापायांची बोटं गँगरीनने झडल्याची उदाहरणं आहेत. हिमालयात सहलीला जाण्याचं प्रमाणही भरपूर असतं. तिथं बर्फात खेळताना आपले आणि आपल्या मुलाबाळांचे सर्व अवयव पूर्णत: योग्य पोशाखाने झाकले आहेत, ही खबरदारी घेणं नितांत गरजेचं असतं. तसंच सर्वांच्या डोळ्यांवर काळा चश्मा असणंही अत्यंत आवश्यक असतं. अंटार्क्टिकावर तर ते परम महत्त्वाचं असतं.
हिमदंश, शीताघात (हायपोथर्मिया) याव्यतिरिक्तही काही शारीरिक धोके अंटार्क्टिक वातावरणात असतात. महत्त्वाचे, हिमअंधत्व (स्नो ब्लाइंडनेस). अंटार्क्टिक भूमी बर्फाळ. या भूमीवर सूर्यप्रकाश पडला की त्या किरणांचं परावर्तन होतं. या किरणांत अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांचं प्रमाण जास्त असतं. हे किरण डोळ्यांवर पडले की हिमअंधत्वाला सामोरं जावं लागतं. हे अंधत्व अल्पकाळाचं (काही दिवसांचं) वा कायमचंही असू शकतं. (प्रखर उन्हातून अंधा-या जागेत, समजा सिनेमा थिएटरात प्रवेशलं की अल्पकाळ अंधत्वाचा अनुभव कित्येकांनी घेतला असेल.) यावर उपाय, काळा चश्मा. प्रखर उन्हात आपण वापरतोच ना. परंतु इथं दिवसातले 24 तास सूर्यप्रकाश असल्यामुळं सदासर्वकाळ तो वापरावा लागे. आम्ही प्रयोग केला, चश्मा काढून किती वेळ त्या वातावरणाला आपण ‘डोळे’ देऊ शकतो? दोन-चार सेकंदांतच त्या झगमगाटाने डोळे दिपून जातात. त्यामुळे कँपबाहेर पडताना खबरदारी म्हणून आम्ही एक जादा चश्मा सोबत ठेवत असू. (कारला स्टेपनी असते, तसा) समजा, अपघातात अगर धडपडीत चश्मा फुटला तर?
याव्यतिरिक्त परावर्तित किरणांचा शरीरावर होणारा आणिक एक परिणाम म्हणजे, टॅनिंग- थोडक्यात, त्वचा भाजणे. तप्त वस्तूला स्पर्श केला असता जशी भाजते, तशी. एखाद्या धातूच्या पदार्थाला स्पर्श केला की कातडी सोलून निघालीच म्हणून समजा. बांधकाम, वैज्ञानिक प्रयोग यांस्तव धातूंच्या पदार्थांशी आमचा संपर्क येई. या प्रसादाचा अनुभव मी प्रवासातच घेतला होता. आमच्या जहाजांना 60 अक्षांश पार केले होते. थंडी कमालीची होती. ध्रुवीय पोशाख चढवला होता. हात तेवढे उघडे होते. प्रयोगासाठी मला डेकवर जायचं होतं. वारा जोरात होता. जहाज हेलकावत होतं. आधारासाठी डेकच्या कठड्यांना धरलं आणि हात असे काही भाजले, विचारू नका. अशा वेळी हातावर कातडी हातमोजे सतत चढवावेच लागत. नाहीतर त्वचेचा जो भाग वातावरणाच्या संपर्कात येतो तो शीत चटक्यांनी भाजला जाऊन काळा पडतो. त्यामुळे आमचं संपूर्ण शरीर पोशाखाने झाकलेलं असायचं. परंतु चेह-याचा काही भाग वातावरणाच्या संपर्कात यायचाच. तो भाग अर्थातच काळा पडला. मोहिमेवरून गोव्यात परतल्यावर बायको स्वागताला आली होती. ती ओळखच दाखवेना. ‘माझा नवरा एवढा काळा नाही.’ शीत चटक्यांमुळे आलेले ते काळे चट्टे माझा चेहरा अजूनही मिरवतोय. अंटार्क्टिक मोहिमेने तेवढी ओळख कायमची सोडली आहे...
वातावरणातील आर्द्रता हा आणिक एक परिणामकारक घटक. अंटार्क्टिक हा पृथ्वीतलावरील सर्वात कोरडा खंड. आर्द्रता वातावरणाच्या तापमानाशी निगडित असते. सर्वसाधारणपणे 350 से. तापमानाला 1 घनमीटर हवेत आर्द्रतेचं प्रमाण असतं 40 ग्रॅम. तेच शून्य से.ला असतं अवघं 5 ग्रॅम. ही अ‍ॅबसोल्युट आर्द्रता, म्हणजे 100 टक्के. तथापि सापेक्ष आर्द्रता नेहमीच कमी असते. हवामान खात्याच्या प्रसिद्धीतून ती आपणाला कळतेही. अंटार्क्टिकावर सापेक्ष आर्द्रता सहसा 50 टक्के असते. याचा अर्थ, तिथल्या 1 घनमीटर हवेत बाष्पाचं प्रमाण असतं, जेमतेम 2.5 गॅ्रम. इतकं कोरडंठाक वातावरण. या कोरडेपणाचा असर म्हणजे अतिसार, डिहायड्रेशन. कोरडेपणा, भन्नाट वारे, प्रत्यक्ष वा परावर्तित सूर्यकिरणं यांच्या एकत्रित परिणामामुळं तहानेची भावना वाढीस लागते. त्यामुळं शरीरात काही हार्मोनल बदल घडून येतात. ते अतिसारास कारणीभूत ठरू शकतात. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे ग्लानी येते. मानसिक स्थिती ढासळू शकते. थंडीला तोंड देण्याची क्षमताही घटते. हिमदंश, शीताघातासारख्या आजारांना चालना मिळते. यावर एकमेव उपाय असतो तो म्हणजे जास्तीत जास्त द्रव पदार्थांचं सेवन करणं.

या द्रव पदार्थांत मद्यांना अर्थातच मज्जाव असतो. बहुतेकांची समजूत असते, थंड वातावरणात मद्यसेवन हितकारक. परंतु कोरड्या हवेत मद्यसेवनाने अतिसाराचा धोका वाढतो. तसंच अंटार्क्टिका म्हणजे धोक्यांची साखळी. तेव्हा सतत दक्ष असावं लागतं, चित्त था-यावर असावं लागतं. आम्ही फळांच्या रसांचं भरपूर म्हणजे दिवसाकाठी तीन-एक लिटर सेवन करत होतो. ब-याच फळांचे रस होते. तथापि मैसूरच्या ‘डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीज’ने बनवलेला पेरूचा रस अप्रतिम स्वादाचा होता. (घरच्या प्रयोगशाळेत हा स्वाद काही जमवता आला नाही.) सर्वांनाच तो हवा असायचा. हा स्टॉक एका महिन्यातच खतम झाला.
कोरडेपणाचा आणिक एक धोका, आग. चुकून आग लागलीच, तर ती विझविण्याचे प्रयास घ्यावे लागत नाहीत. एखाद्या मिनिटातच सा-याची राखरांगोळी. महिनाभरात आमच्यासाठी लॅट्रिन तयार झालं. बांधकाम अर्थातच लाकडी. आता प्रातर्विधीसाठी नको त्या यातायातीपासून सुटका होणार, अशा विचारात असताना कसं काय माहीत नाही, लॅट्रिनला आग लागली. अंटार्क्टिक ट्रीटीनुसार लॅट्रिनमधील विष्ठेची राख करावी लागते. (परतताना ती सोबतही घेऊन जावी लागते.) त्यासाठी विद्युत यंत्रणेचा वापर केला. शॉर्टसर्किटने आग लागली असावी. ती आग विझविण्याचे प्रयास घ्यावे लागले नाहीत. पाचच मिनिटांत तिथं राखेचा ढीग जमा झाला होता...