आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राऊड टु बी गे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्कृतिरक्षक म्हणतील, ‘समलिंगी आहे’ हे जाहीर करण्यात कसली आलीय फुशारकी; पण जगप्रसिद्ध ‘अ‍ॅपल’ कंपनीचे सीईओ टीम कुक यांना कुठे फुशारकी मारायचीय? त्यांना तर मनाचा कोंडमारा होत असलेल्या तमाम संवेदनशील समलिंगींना आत्मविश्वास द्यायचाय… समलिंगींकडे अनैसर्गिक-अभद्र आणि अस्पृश्य म्हणून बघणा-या समाजाला माणुसकीची आठवणही करून द्यायचीय… किंबहुना, समलिंगी अशी जगापुढे स्वत:ची ओळख जाहीर करण्यामागचा त्यांचा हाच मुख्य उद्देश आहे. या संदर्भात ब्लूमबर्ग बिझनेसवीक या अमेरिकेतील नियतकालिकात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या कुक यांच्या मनोगताचा हा स्वैर अनुवाद...
आजवरच्या कारकीर्दीत मी माझं खासगीपण जपण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. मी सामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीतून पुढे आलो. त्यामुळेही असेल; पण आपल्याकडे इतरांचं सतत लक्ष जावं, असं मला कधीही वाटलं नाही. ‘अ‍ॅपल’ कंपनीकडे मात्र सगळ्या जगाचं लक्ष होतं. त्यामुळे माझ्यापेक्षा ‘अ‍ॅपल’कडे, ‘अ‍ॅपल’च्या दर्जेदार उत्पादनांकडे आणि उत्पादनांमुळे सामान्य माणसाच्या होत असलेल्या प्रगतीकडे जगाचं लक्ष जावं, असाच माझा प्रयत्न होता. त्याच वेळी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या शब्दांवर माझा गाढा विश्वास होता. ते म्हणत, तुम्ही दुस-यासाठी काय करता, हा तुमच्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न असला पाहिजे. याच प्रश्नाने उभं केलेलं आव्हान मी सतत स्मरणात ठेवत असतो. अशा वेळी एक गोष्ट माझ्या मनाला टोचत राहते की, खासगीपण जपण्याचा माझा प्रयत्न दुस-यांसाठी काहीतरी महत्त्वाचं काम करण्यावाचून मला रोखत तर नाही?
गेल्या अनेक वर्षांपासून माझा लैंगिक कल जवळच्या अनेकांपुढे मी उघड केला आहे. ‘अ‍ॅपल’मधल्या अनेक सहका-यांना मी समलिंगी आहे, हे ठाऊक आहे. तरीही त्यांच्याकडून मिळणा-या वागणुकीत मला जराही फरक जाणवलेला नाही. हे खरं की, मी अशा कंपनीत काम करतोय, जिथे सृजनशीलतेची, नवतेची कदर केली जातेय. जिथे वेगवेगळ्या मतांचा आदर केल्यानेच प्रगती साधता येते, याचे सर्वंकष भान आहे. त्या अर्थाने मी सुदैवी आहे.
अर्थात, मी जरी स्वत:ची समलिंगी अशी ओळख नाकारली नसली तरीही, अगदी या क्षणापर्यंत मी ती जाहीरही केली नव्हती. सो लेट मी बी क्लिअर, आय अ‍ॅम प्राऊड टु बी गे… मला असं वाटतं, समलिंगी असणं ही परमेश्वराने मला दिलेली देणगी आहे.
समलिंगी असण्याने मला अल्पसंख्य असणं म्हणजे नेमकं काय असतं, आणि अल्पसंख्य असलेले लोक रोजच्या जगण्यात कोणकोणत्या आव्हानांना तोंड देत असतात, याचं भान दिलं. समलिंगी असण्यानेच बहुधा मला दुस-याबद्दल संवेदनशील व्हायला शिकवलं. याच संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण वर्तनाने माझं आयुष्य समृद्ध बनत गेलं. अनेकदा हे सगळं खूप अवघड नि गुंतागुंतीचं होतं, पण यामुळेच माझा स्वत:चा मार्ग निवडण्याचा, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत पुढे जाण्याचा आत्मविश्वास माझ्यात येत गेला.
माझ्या लहानपणी अनुभवलं ते जग आणि आताचं जग यात जमीन-आस्मानाचं अंतर पडलंय. कधीकाळची प्रतिगामी अमेरिका आता वैवाहिक समानतेचा आग्रह धरू लागलीय. अनेक प्रतिष्ठित लोक असहिष्णू समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे येताहेत. तरीही अजूनही अनेक राज्यांमध्ये एखाद्याच्या लैंगिकतेवरून त्याला कामावरून काढण्याची मुभा देणारे कायदे अस्तित्वात आहेत. अशा अनेक जागा आहेत, जिथे मालक समलिंगी भाडेकरूंना घराबाहेर काढताहेत. असंख्य लोक ज्यात मुलांची संख्या मोठी, जे त्यांच्या समलिंगी असण्यावरून हिंसेचे बळी ठरताहेत.
मी स्वत:ला अ‍ॅक्टिव्हिस्ट मानत नाही. परंतु मला या वास्तवाची पूर्ण जाणीव आहे की, इतरांनी केलेल्या त्यागातून माझं जगणं अधिक सुरक्षित आणि समृद्ध बनलं आहे. अशा वेळी ‘अ‍ॅपल’चा सीईओ समलिंगी आहे, हे कळल्यावर जर कुणामध्ये स्वाभिमानानं जगण्याचं बळ येणार असेल; एकटेपणाचा, उपेक्षेचा बळी ठरलेल्यांमध्ये धैर्य येणार असेल; तर मला वाटतं, खासगीपणाला तिलांजली देणं, या क्षणी खूप महत्त्वाचं आहे.
हे मी कबूल केलंच पाहिजे की, अशा पद्धतीने स्वत:ची ओळख जगापुढे आणणं माझ्यासाठी सोपं कधीच नव्हतं. खासगीपण माझ्यासाठी महत्त्वाचं आहेच; या खासगीपणाचा काही भाग मला माझ्यापुरता ठेवायचासुद्धा आहे. ‘अ‍ॅपल’ हे माझं आयुष्य बनलं आहे. मला माझ्या जागलेपणातला प्रत्येक क्षणन‌्क्षण सर्वोत्तम सीईओ होण्यासाठी खर्च करायचाय. माझ्या सहका-यांचा तो हक्क आहे. सहकारीच कशाला, ‘अ‍ॅपल’चे ग्राहक, भागधारक या सगळ्यांचाही तो हक्क आहे. मी शिक्षण आणि व्यवसायाने इंजिनिअर आहे, कुणाचा तरी काका आहे, निसर्गप्रेमी नागरिक आहे, खेळांचा चाहता आणि बरंच काही आहे. मला ही खात्री आहे, की लोक माझ्या आकांक्षांचा नि अपेक्षांचा आदर करतील आणि ज्यात मी पारंगत आहेत, त्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात मला सहकार्य करतील.
ज्या कंपनीचं मी प्रतिनिधित्व करतोय, त्या अ‍ॅपलने नेहमीच मानवी हक्क आणि समानतेची पाठराखण केली आहे. आम्ही एक कंपनी म्हणून कामाच्या ठिकाणी समानतेचा कायदा लागू करणा-या विधेयकाला जाहीर पाठिंबा नोंदवला आहे. कॅलिफोर्निया राज्यात वैवाहिक समानतेचा आग्रह आम्ही धरला आहे. इतकंच नव्हे, तर आम्ही अ‍ॅरिझोना राज्यात पारित होऊ पाहणा-या समलिंगीविरोधी कायद्याला जोरकसपणे विरोधही केला आहे. मानवी मूल्यांसाठी हा लढाऊ बाणा आम्ही यापुढेही कायम ठेवणार आहोत. मला याचीही पूर्ण खात्री आहे की, ‘अ‍ॅपल’चा कुणीही सीईओ; मग तो कोणत्याही धर्माचा, वंशाचा वा लैंगिक अग्रक्रमाचा असो; तोही यात आपलं योगदान नोंदवत राहील. अर्थातच जोवर माझ्या शरीरात त्राण असेल तोपर्यंत मी समानतेसाठी लढा देत राहीन.
रोज सकाळी जेव्हा मी ऑफिसमध्ये येतो, तेव्हा
डॉ. मार्टिन ल्यूथर किंग आणि रॉबर्ट एफ. केनेडी यांचे फोटो मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देत राहतात. मला याचं भान आहे की, स्वत:ची समलिंगी अशी ओळख जाहीर केल्यानं नक्कीच मी त्यांच्या रांगेत बसण्याला पात्र ठरत नाही. पण त्या फोटोंच्या तिथे असण्यानेच इतरांना छोटीशी का होईना, मदत करत राहण्याची माझ्यातली भावना जिवंत राहिली आहे. आता यापुढच्या काळात आपल्या सगळ्यांनाच एकमेकांच्या मदतीने एकेक वीट जोडून न्यायाकडे जाणारा मार्ग प्रशस्त करत जायचं आहे.
समलिंगी म्हणून जाहीरपणे जगापुढे येणं, ही त्या मार्गाच्या उभारणीतली माझी एक वीट आहे…