आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कलेची शोकांतिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समकालीन आत्मचरित्रात्मक मांडणी-दृश्य म्हणजे काय, कुठल्या चित्रकारांनी या प्रकारात उल्लेखनीय काम केले, हे समजून घ्यायचे झाल्यास, दाेन पाश्चात्त्य चित्रकारांच्या चित्रांना समजून घ्यावे लागेल. त्यापैकी एक आहे, जोसेफ बुईस यांचे १९७६च्या ‘व्हेनिस बिएनाले’मधले ‘ट्राम स्टोप’ हे पहिलेवहिले आत्मचरित्रात्मक मांडणी-दृश्य (इन्स्टॉलेशन). साध्या वस्तू व विशिष्ट बांधकामातून रचलेल्या या कलाकृतीत त्यांच्या जीवनप्रवासातील काही संकेत-चिन्हांची उकल करणारे संमिश्र प्रतिमा-विश्व आपल्याला दिसते. प्रस्तुत मांडणी-शिल्पात मधोमध एक लोखंडी खांब उभा केला असून, त्यावर स्वत: बुईस यांनीच घडविलेले माणसाचे डोके (ते त्यांचे स्वत:चेच असावे) ठेवले आहे. त्याच्या शेजारी जमिनीवर ट्रामचे
रूळ (भूमितत्त्व) ठेवले आहेत. शेजारी खणलेल्या खड्ड्यातील पाणी (जलतत्त्व) नळीने अवकाशात उभारलेल्या रचनाकृतीला (हवा) जोडून बुईसने साकारलेल्या मांडणीमधून जर्मनी आणि इटलीमधील नागरिकांच्या दोन महायुद्धातल्या स्मृती जागवल्या आहेत. शिवाय, दोन महायुद्धांतल्या स्मृती विस्मृतीत जाण्यापूर्वी जाणीवपूर्वक उकरूनही काढल्या आहेत.
या मांडणी-शिल्पाला समांतर असलेल्या काळात झालेल्या व्हिएतनाम-अमेरिका या दोन देशांमधील युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता, संबंधित कलाकृतीतून त्यांना काही तरी महत्त्वाचे, मानवतेसंबंधीचे, मूकपणे सांगायचे असावे. संहाराच्या चिखलात उतरलात तर फक्त द्वेष, चीड आणि कडवट, निर्मम भूतकाळाचे दाखलेच हाती येतील, हा त्याचा अर्थ असावा; परंतु मान उंचावून दूरवर पाहिलंत, तर भविष्यातले स्फूर्ती, प्रेम, कणव आणि मैत्रीचे अवकाशही मनात साठवून घेता येईल, काहीसा असाच एक गंभीर संदेशही त्यांच्या मांडणीत दडलेला असावा.
दुसरे मांडणी-शिल्प आहे, मरिना अब्रोमोविक या क्रांतिकारक महिलेचे! तिने स्वत:च्या नग्न शरीराचेच माध्यम केले.
मानसिक पातळीवर स्वत:पासून त्या शरीराला वेगळे केले आणि व्यासपीठावर घडीव मूर्तीसारखे ठेवत जाहीर केले की, “माझ्या शरीरासोबत प्रेक्षक काय वाट्टेल ते करू शकतात. त्याचे जे काही बरे-वाईट परिणाम होतील, त्याला सर्वस्वी मी जबाबदार असेन.” तशा त्या मूर्त (नग्न) अवस्थेत सहा तास उभं राहण्याचं तिने ठरवलं होतं. प्रेक्षकांनी मात्र क्रूर-कहर
केला. म्हणजे हवं ते करण्याचा परवानाच मिळाल्याप्रमाणे आपले सगळे गुण-अवगुण उधळले तिच्यावर. स्वत:च्याच देहात समाधिस्थ झालेल्या मरिनाला प्रेक्षकांनी सिगारेटचे चटके देण्यापासून खिळे, चाकू इत्यादी धारदार शस्त्रांनी जखमा करण्यापर्यंत; तर कधी गलिच्छ चाळे करण्यापर्यंत वाट्टेल ते केले; परंतु ते तिची निश्चयी आशय-तद्रूपता भंग करू शकले
नाहीत. वेळ संपण्याच्या काही क्षण आधी एकाने तर तिच्या अशा असीम बधिर स्थितीला वैतागून, पिस्तूलच तिच्या डोक्याला लावले; परंतु चाप ओढण्यापूर्वीच वेळ संपली आणि शिल्प हलले, पुनर्जीवित झाले. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले सभागृह प्रचंड लाटेसारखे हेलावले आणि त्या क्षणी जो सामूहिक आश्चर्याचा उद‌्गार उमटला, तो मरिनाने निक्षून स्वीकारलेल्या पराकोटीच्या निर्जीवपणाइतकाच सजीव आणि अविस्मरणीय होता!

आता मी आपल्या देशात काय चालले आहे, त्याची एक-दोन उदाहरणे देऊन पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहे. माझ्या मते, हिंमत शहा हे एकमेव शिल्पकार आपल्या देशात संबंधित कलेला समर्पित होऊन काम करीत आहेत. त्यांच्यानंतर ज्या शिल्पकारांची नावे घेतली जातील, त्यांची यादी फार मोठी नाही. त्यात नागजी पटेल, ध्रुव मेस्त्री, राजेंद्र टिकू इत्यादी
शोधक दृष्टी असलेले कलावंत आहेत. एकीकडे हे सर्व परंपरेला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात नवे दृष्टांत देत आजवर अनोळखी राहिलेल्या जाणिवांना स्पर्श करत, मांडणी-शिल्पाच्या जागतिक रेट्यापुढे नतमस्तक न होता, सावधपणे स्वत:च्या कामातील स्वत्वाची बूज राखून आहेत, तर अलीकडच्या काळात शिल्पाऐवजी आकर्षक कला-वस्तू बनविण्यात
तरुण शिल्पकार मश्गुल झाले आहेत. इन्स्टॉलेशनच्या नावाखाली एकसारखी दिसणारी भांडी एकत्रित जोडून तसलेच मोठे भांडे बनवून मोठा आवाज (गाजा-वाजा) करण्यावर अधिक भर देणारे स्टार-कलावंत संख्येने अधिक, परंतु गुणवत्तेत सुमार आहेत. याला अविस्मरणीय रीतीने कल्पक छेद दिलाय, तो अनिष कपूर या भारतीय वंशाच्या मांडणीकाराने. सध्या
केरळातील कोची येथे सुरू असलेल्या ‘बिएनाले’मध्ये, मोजक्या कलाकृतींमध्ये उठून दिसणारी त्याची किमया रसिकाला आश्चर्याच्या भोव-यात जखडून ठेवणारी आहे. तिला साधी सरळ ‘योजना-कृती’ म्हणायला मला आवडेल. कारण, त्याने समुद्राचे पाणी, जमिनीत घट्ट रुतवलेले एक मोठे गोलाकार भांडे आणि धुलाई यंत्राचे तंत्र एवढीच सामग्री वापरून
समुद्रात हवेच्या दाबाने व गतीने तयार होणारा भीतिदायक भोवरा भांड्यात आणून प्रचंड गतीने गोल गोल फिरवत ठेवला आहे. तो इतका भयंकर वेधक आहे की वाटते, कोणत्याही क्षणी समुद्र त्याला शोधत तिथे येईल आणि त्यावर आपला हक्क सांगेल.

वृत्तपत्रातून चित्र-प्रदर्शनाच्या बातम्या देता देता, टीकाकार झालेले, पुढे केवळ चित्र-पत्रके व चित्रकारांची चरित्रे लिहीत त्यात मिळणा-या मुबलक आर्थिक मोबदल्यामुळे भक्कमपणे जे टिकून राहिले, त्यापैकी एकानेही समीक्षेसंबंधी स्वत:चे स्वतंत्र विचार मांडणारे, एकही पुस्तक आजवर लिहिले नाही. प्रत्यक्ष चित्रकलेतही याहून वेगळी स्थिती नाही. सर्वसामान्यांना
कळत नाहीत, म्हणून चित्रं सोपी करायची; आणि तेवढं करून भागलं नाही तर तोंडी स्पष्टीकरण द्यायचं, अशी नवी प्रथा आता मूळ धरून भक्कम होत आहे. कसब आणि कौशल्य यामधला फरक त्यांना माहीत नसावा, हे समजण्यासारखे आहे; परंतु तो चित्रकारांनाही ज्ञात नसावा, ही चित्रकलेची शोकांतिका आहे.

prabhakarkolte@hotmail.com