आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषा इंद्रियांची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौर्णिमेचाचंद्र अत्यंत देखणा दिसतो, त्याचा सामान्य माणूस अर्थ विचारत नाही, शिवाय अर्थाचा आणि चंद्राच्या तसं दिसण्याचा काडीचाही संबंध नसतो. त्याचे तसे दिसणे हाच त्याचा अर्थ. त्याच्या मंद प्रकाशाने संथपणे आकाशभर प्रसवणं, हेच त्याचं सौंदर्यवाही मर्म, हे सामान्यांना कळत नाही काय? निरर्थक, निरुद्देशीय असणारेही भावार्थ आयुष्यात पुष्कळ असतात, याची का त्यांना जाण नाही?

मुळात, अर्थ-संज्ञा शक्य तेवढी व्यापक करून, अवतीभोवती पाहायला हवं, हे त्यांना दुर्दैवाने जीवनातल्या कुठल्याच टप्प्यावर शिकवलं गेलं नसल्याचा हा परिणाम असावा. त्यामुळे अशा अनेक गोष्टी जीवनात असतात, ज्या त्यांना कळत नाहीत. त्यात कळणे नव्हे तर फक्त अनुभवणेच असते, हेही त्यांना कळत नाही. त्यांपैकी चित्रकला एक आहे आणि ती कळत नाही म्हणून त्यांचं काही बिघडतही नाही, हे विशेष.

कुठलीही भाषा, जी भाषा शिकायची आहे, त्या भाषेतूनच शिकायची असते; त्याचप्रमाणे दृश्याचा अर्थ नव्हे, तर उलगडा दृष्टीनेच करायचा असतो. शब्दांतून नक्कीच नाही. शब्दांतून त्याविषयीचा अभिप्राय व्यक्त करता येतो. शब्दाद्वारेच संपूर्ण जीवन-व्यवहार करण्याचे अनेक फायदे असतीलही; परंतु काही गंभीर स्वरूपाचे तोटे आहेत. त्यापैकी चित्राच्या बाबतीत दोन महत्त्वाचे तोटे म्हणजे, ‘न कळणे’ आणि त्यामुळे आपल्या मूलभूत संवेदनशील ‘इंद्रिय-भाषेचे खच्चीकरण’ होणे. खरं तर ही इंद्रिय-संवेदनेची भाषा किती सक्रिय आहे, यावरच अभिरुची, अभिव्यक्ती आणि रसज्ञतेचा कस अवलंबून असतो. कसदार रसज्ञताच लक्षणीय चित्राला आणि समर्पक समीक्षेला जन्म देऊ शकते, आणि अशी समीक्षाच सुज्ञ, निष्पक्ष समीक्षकालाही घडवते.
समकालीन चित्र, शिल्प, मांडणी-दृश्य समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्याविषयीचे पूर्वग्रह बाजूला ठेवायला हवेत.
आपल्याला त्यातलं काही कळत नाही, हा आपणच निर्माण केलेला सर्वात मोठा अडथळा. तो ओलांडून कलाकृतीकडे पाहताना कलाकृती काय व्यक्त करू इच्छित आहे, याचा अंदाज घ्यायला हवा. मनाशी असं समजायला हवं की, आपल्याला जसा मुक्या-बहि-या व्यक्तीशी ‘संवाद’ साधायचा असतो, अगदी तसाच ‘स्वगताच्या’ नि:शब्द पातळीवरचा संवाद कलाकृतीशी साधायचा आहे. अर्थात, त्यासाठी थोडाबहुत वेळ तर लागणारच, हेही लक्षात ठेवायला हवं. शिवाय तो संवाद यशस्वी व्हावा, यासाठी स्वत:सकट अवघ्या विश्वाचेच भान ठेवणे आवश्यक असते, हे लक्षात घ्यायला हवे.
छंद म्हणून जरी कलाकृती पाहायला सुरुवात केली, तरी हळूहळू तिचे आवडीत रूपांतर होते. कारण त्यात सभोवतालच्या अवांतर गोष्टींचाही अदृश्यपणे अंतर्भाव असतो. त्या गोष्टींपैकी काही नक्कीच आपल्या आवडीच्या असू शकतात. यामुळे त्यांचे कलाकृतीशी असलेले संबंध कलाकृतीला आतून आधार देणा-या संदर्भांचे गुह्य उलगडायला मदत करत असतात. ते उलगडणे आपल्याला एखाद्या दृष्टान्ताच्या उमजण्यासारखे असते. तो आस्वादन प्रक्रियेतील अनमोल अनुभव असतो. कलाकृतीच्या सौंदर्याचे दर्शन या अशा ‘उमजण्यातच’ असते आणि ते पुढे वरचेवर घेतलेल्या अनुभवाने आपल्या जाणिवेत खोलवर पसरत स्थिर होते. मग आपल्या लक्षात येते की, कलाकृतीचे अस्तित्व जितके ती ज्या वस्तू-द्रव्यात साकारलेली आहे त्यात असते, तितकेच कदाचित थोडे जास्तच तिच्याशी निगडित असणा-या अदृश्य संदर्भ-विश्वात असते. हे संदर्भ कलावंताच्या अंतर्मनात असू शकतात, तद्वत बाह्य परिसरातही असू शकतात. कदाचित एकाच वेळी दोन्ही ठिकाणी असू शकतात. अशा तऱ्हेने आधी छंद, मग आवड आणि मग अभिरुची वाढवणारा व्यासंग, असा आपला प्रवास सुरू राहतो.

असे हे आस्वादन-शास्त्र शिकता येते का? तर ‘होय’ हेच त्यावरचे उत्तर. प्रचलित शिक्षण-प्रक्रिया अनुसरली तर प्रचलित पद्धतीने रूढ झालेले शास्त्र पदरात पडेल आणि त्यात वाढ होण्याला फारसा वाव नसेल. कारण ते ‘आऊटडेटेड’ झालेले असेल. खरं म्हणजे शिकलेल्या सगळ्याच तांत्रिक गोष्टी शिकलेल्या दिवसापासूनच निरुपयोगी व्हायला लागलेल्या असतात. कारण त्या फक्त माहितीवर आणि तंत्रज्ञानावर बेतलेल्या असल्यामुळे अल्पजीवी असतात. परंतु स्वतंत्ररीत्या सातत्याने चित्रांचा आस्वाद घेण्याने जे पदरात पडेल, ते पवित्र करणारे असेल. कलेत होणारे बदल स्वीकारत समृद्ध करत जाणारे ठरेल. कारण ते स्वायत्त स्वानुभवावर आधारलेल्या ज्ञानासारखे असते. पुस्तकी अभ्यास आपल्याला नक्कीच विचार करायला प्रवृत्त करतो, परंतु तो आयता विचार देत नाही. म्हणूनच अभ्यासानंतर आपण स्वतंत्रपणे चिकित्सा, विचार, चिंतन आणि मनन करत स्वत:च्या मुक्त अनुभवांचे विश्व विस्तारायला हवे. अर्थात, मार्गात येणा-या संभ्रमावर, वैचारिक अडचणीवर संयमाने तथा निग्रहाने मात करत.

चित्रकलेचे समकालीन अभ्यासक्रम, प्रक्रिया आणि एकूणच स्वरूपाबाबत गंभीरपणे पुनर्विचार करायची वेळ यापूर्वीच अनेकदा येऊन गेली आहे. आता तिच्याकडे युद्धपातळीवर लक्ष देऊन दीडशे वर्षांपासून राबवत आणलेले, ब्रिटिश छापाचे, केवळ अनुनय करण्याचे कसब विद्यार्थ्यांवर लादणारे शाळा-कम-छापखाने थांबवायला हवेत. मुक्त वातावरण देणारा, विचार करायला भाग पाडणारा, कसब आणि कौशल्य यातला नेमका भेद स्पष्ट करणारा प्रवाही कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हाती द्यायला हवा; तरच आपल्या देशात राहूनच जगाशी स्पर्धा नव्हे, परंतु बरोबरी करणारे व शक्य झाल्यास जागतिक कलेचे नेतृत्व करण्याची धमक ठेवणारे कलावंत आपण निर्माण करू शकू.

म्हणूनच आता अश्मावस्थेत गेलेली इंद्रियांची भाषा आपल्या मनात, विचारांत आणि दृश्य-उच्चारात आणून नव्याने वसवायला हवी. त्या भाषेचे व्यायाम आणि आयाम आपल्या सुप्त जाणिवेत नेऊन रुजवायला हवेत. शब्दातून दृश्याकडे नव्हे तर दृश्यातून शब्दाकडे व सकल जीवनाकडे जाण्याची सवय करायला हवी. चित्र ही कथनाची बाब नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची आणि कृतीतूनच कृतीच्या आधी, मध्ये व नंतर अनुभवण्याची बाब आहे, हे स्वीकारण्याची वेळ आली आहे. कारण चित्राला आणि त्याद्वारे मिळणा-या अनुभवाला फक्त वर्तमानच आहे, जो कधीच शिळा होत नाही. शिळी होते आपली मानसिकता.

prabhakarkolte@hotmail.com

(पुढील आठवड्यापासून अर्थकारणाचे जाणकार प्रा. नीरज हातेकर यांचा अक्षरनामा)