मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमी (एनसीपीए) मध्ये ८०-९०च्या दशकात एक अनोखा प्रयोग झाला. विख्यात शास्त्रीय गायक भीमसेन जोशी रंगमंचावर गाणार होते आणि त्याच वेळेस त्याच रंगमंचावर प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन त्या गायकीतून मनावर उमटलेल्या तरंगांवर चित्र रंगवणार होते. खरोखरच अनोखा असा तो प्रयोग होता. पण त्याही आधी घडलेली एक घटना भारतीय चित्रकलेच्या बाजारपेठेला कलाटणी देणारी ठरली. ती म्हणजे, हुसैन ज्या को-या कॅन्व्हासवर चित्र चितारणार होते, त्या को-या कॅन्व्हासचा लिलाव करण्यात आला. त्या वेळेस टाटांनी तो कोरा कॅन्व्हास बोली लावून एक लाख रुपयांना विकत घेतला. चित्र चितारण्यापूर्वीच कोणता कलावंत ते चितारणार आहे, यावरून त्याची बोली लागणे हा बाजारपेठेमध्ये असलेली त्या कलावंताची किंमत जोखण्याचाच भाग होता. भारतीय कला बाजारपेठेच्या इतिहासातील ती अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना होती.
त्यानंतरची दुसरी घटना घडली, ती साधारणपणे १९९७-९८च्या सुमारास. त्या वेळेस नेविल तुली नावाच्या तरुणाने राष्ट्रीय आधुनिक कलादालनात एक पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केले की, भारतीय कलावंतांना खूपच कमी किंमत मिळते आहे. हुसैनचे जे चित्र ७-८ लाख रुपयांना जाते, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ४५ लाख रु.च्या आसपास असणार. हे चित्र ५० लाख रु.ला गेलेले तुम्हाला पाहायला मिळणार. तुलीच्या या बोलण्याकडे कुणी लक्ष दिले नाही; पण त्यानंतरच्या नऊ महिन्यांमध्येच हुसैनचे चित्र तुलीने ४५ लाख रु.ना विकून दाखवले आणि तुली, त्याची चित्रलिलाव संस्था ‘ओसिआन्स’ प्रकाशझोतात आली.
त्यापूर्वीचा ट्रेंड हा खासगी कलादालनांनी चित्रविक्री करण्याचा होता. मुंबईत पंडोल, सिमरोझा, केकू गांधींची गॅलरी केमोल्ड अशी कलादालने प्रतिभावान कलावंताची निवड करून कलासाधनेसाठी आवश्यक ती सर्व मदत करत आणि त्यांच्या चित्रांची प्रदर्शने करण्याचे अधिकार त्या बदल्यात घेत. मात्र, त्याला बाजारपेठेच्या तुलनेत खूप मर्यादा होत्या. कारण एखादे कलादालन किती कलावंतांना बांधून ठेवणार हे त्यांच्या आर्थिक मर्यादेवर अवलंबून होते. नेविल तुली भारतात परतण्यापूर्वीपासून ‘सद््बिज’ आणि ‘ख्रिस्तिज’सारख्या जागतिक चित्र लिलाव कंपन्यांनी जागतिकीकरणानंतर भारतात प्रवेश केलेलाच होता. त्यांनीच समकालीन भारतीय चित्र- शिल्पांचा लिलाव करण्यास सुरुवात केली. पण सुरुवातीच्या काळात प्रतिसाद मिळाला, तो प्राचीन भारतीय शिल्पकृतींना आणि त्या खालोखाल लघुचित्र या अस्सल भारतीय पारंपरिक चित्रांना. मात्र नंतर काळ बदलला आणि हळूहळू समकालीन चित्रकलेलाही चांगला भाव भारतीय कलाबाजारात मिळू लागला. एक नवश्रीमंत वर्ग कलाबाजारात रस घेऊ लागला. आता सुमारे विसेक वर्षांनंतर हा चित्र- शिल्प बाजार प्रचंड विस्तारला आहे. हुसैनचे जे चित्र ४५ लाख रु.ना गेल्यानंतर लोकांनी आ वासला होता, त्याच चित्राची आताची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. वासुदेव गायतोंडेंच्या चित्रांनी, तर
तब्बल ८ कोटी रुपयांची किंमत मिळवली असून, त्यांच्या चित्रांनी सर्व विक्रम पार करून विक्रमांचा एव्हरेस्टच उभा केला आहे.
आताच्या परिस्थितीतील महत्त्वाचा बदल म्हणजे, केवळ आघाडीच्या चित्रकारांनाच नव्हे, तर नवोदित चित्रकार आणि तरुण चित्रकारांनाही चांगले दिवस आले आहेत. पूर्णवेळ चित्रकार हा चांगले व्यावसायिक आयुष्य जगू शकतो हे जगालाही लक्षात आले आहे. पण त्याचबरोबर शेकडोंच्या संख्येने चित्रकार असेही आहेत की, ते गोंधळलेले आहेत. त्यांना अद्याप हे बाजारपेठेचे गणित लक्षात आलेले नाही. ते त्यांना समजावून सांगणारे कुणीही नाही. किंबहुना महाराष्ट्रातील मुंबई ही चित्रबाजारपेठेची भारताची राजधानी आहे, पण इथे राज्य करणा-या चित्रकारांमध्ये मराठी कलावंत मात्र मोजकेच आहेत. राज्य आहे ते बंगाली आणि केरळी चित्रकारांचे! त्यांनी त्यांचे व्यावसायिक गट तयार करून त्या आधारे बाजाराचे गणित नेमके जमवून आणले आहे. ज्येष्ठ बंगाली किंवा केरळी चित्र - शिल्पकार मुंबईत वर्चस्व राखून आहेत. ते त्यांच्या राज्यांतून आलेल्या नवोदित किंवा तरुण चित्रकारांना
आपल्या खरेदीदार संग्राहकांची ओळख करून देतात आणि त्यांची चित्रविक्री पक्की करतात. ते करताना खरेदीदाराला सांगितले जाते की, हा प्रतिभावंत चित्रकार आहे, वर्ष- दोन वर्षांत त्याची किंमत वाढणार आहे. सध्या चित्र कमी किमतीला उपलब्ध आहे, ते विकत घ्या. ज्येष्ठ चित्रकार आणि चित्रदलालांच्या विश्वासावर ते चित्र विकत घेतले जाते, ती त्याची ‘बेस प्राइज’ म्हणजे मूळ किंमत ठरते. दुस-या संग्राहकाला पहिल्याचा दाखला दिला जातो की, त्याने विकत घेतले कारण त्याला भविष्यात चांगली किंमत येणार. त्यामुळे पहिल्याचे पाहून दुसरा खरेदीदार विकत घेतो, त्या वेळेस मधल्या काळात किंमत वाढली, असे सांगून किंमत वाढवली जाते. दरम्यान, अशी साखळी तयार होत असताना पहिल्या व दुस-यास वाढलेल्या किंमतीचा दाखला दिला की, तेही अधिक चित्रे विकत घेतात. अशा प्रकारे किंमत वाढवण्याचा प्रकार सध्या या बाजारपेठेत सुरू आहे. या उलट मराठी चित्रकार एकमेकांना फारसे मदत करताना आढळत नाहीत. एखाद दुसरे वासुदेव कामतांसारखे मदत करणारे चित्रकार अपवाद ठरतात. बंगाली व केरळी चित्रकारांचा हा ट्रेंड गेली १० वर्षे कायम आहे. आणि मराठी चित्रकारांना या बाजारपेठेत चांगला वाली नाही, अशी अवस्था आहे.
चित्रांना आलेली किंमत पाहून काळ्या बाजाराचा पैसा याकडे न वळता तर नवलच. मग मध्यंतरीच्या कालखंडात काही कॉर्पोरेट कंपन्यांनीही कलाक्षेत्राला मदत करण्याच्या नावाखाली चित्रखरेदी केली. त्यातून करसवलत मिळवली. दुसरीकडे, चित्रांच्या किंमती चांगल्याच वाढणार आहेत, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. याच मार्गाचा वापर करून अनेकांनी पैसा काळ्याचा पांढरा करण्याचे प्रयत्नही केले. मग अनेक गैरव्यवहारांनाही सुरुवात झाली. त्यात गुरुस्वरूप श्रीवास्तव या उद्योगपतींचे नावही चर्चेत आले. सुरुवातीस त्यांनी हुसेनचे एक चित्र एक कोटी रुपयांना असे करत १०० चित्रे खरेदी करत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी ताज महाल हॉटेलमध्ये पत्रकार परिषदही घेतली. त्यात स्वतः हुसैन हजर होते. मात्र नंतर हुसैन यांच्यावर देश सोडून जाण्याची वेळ आली. दरम्यान, हुसैन यांच्या एका मोठ्या पेंटिंगचे तुकडे करून ते स्वतंत्रपणे हुसैन यांचीच अनेक चित्रे म्हणून बाजारात आणल्याचा आरोपही श्रीवास्तव यांच्यावर झाला.
एका बाजूला हे सुरू असतानाच दुसरीकडे बनावट चित्रांचा बाजारही सुरू झाला. जसेच्या तसे दुसरे चित्र तयार करायचे आणि बाजारपेठेत आणून त्यावर किंमत उकळायची असे प्रकार सुरू झाले. एखादी बाजारपेठ विस्तारते तेव्हा तिथे असे प्रकार अनेकदा होत असतात. मग अंजली इला मेनन, हुसैन, रझा आदी अनेक चित्रकारांच्या बाबतीत असे बनावट चित्रांचे प्रकार उघडकीस येत गेले.
चित्रबाजारपेठेचा विस्तार होत असतानाच रिझर्व्ह बँकेचेही त्यावर लक्ष होते. लक्ष म्हणण्यापेक्षा बारिक नजर होती. दोन- तीन वर्षे ते सातत्याने सांगत होते की, चित्र खरेदी-विक्रीवर स्वतंत्र कर बसविण्याची वेळ आली आहे. आता अखेरीस गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यावर कर बसविण्यात आला. याचाच अर्थ, आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाजारपेठ देशांतर्गत विकसित झाली आहे व त्याला चांगले भवितव्यही आहे.
लिलावात चित्र
ठेवण्याची पद्धत
हयात असलेले चित्रकार दलालामार्फत वा जवळच्या विश्वासू मित्रामार्फत लिलाव कंपनीकडे आपले चित्र लिलावासाठी पाठवतात. ठेवायचे की नाही याचा अधिकार त्या कंपनीला असतो. चित्रकला जाणणा-या जाणकार समीक्षकांच्या समितीने चित्र लिलावासाठी निवडल्यानंतर चित्रकार आपल्या अपेक्षेनुसार दलालास वा मित्रास बोलीची किंमत ठरवण्यास सांगतो.त्याआधी प्रत्येक चित्राची ठरावीक किंमत आकारली जाते, त्या किंमतीपासून बोली सुरू होते. अत्यंत दर्दी आणि गर्भ श्रीमंत रसिक या लिलावास उपस्थित असतात. सर्वाधिक आकड्यावर बोली थांबते, नि त्या आकड्यानुसार चित्राची किंमत ठरून लिलाव होतो.
व्यक्तिनिहाय विभागली जाते लिलावाची किंमत
हयात असलेल्या चित्रकाराने स्वत: आपले चित्र दलालामार्फत लिलावात ठेवल्यास दाेघांमध्ये मिळणा-या किमतीची विभागणी होते, जी व्यक्तिनिहाय असते. मात्र, हयात नसलेल्या चित्रकारांची चित्रे जर आधीच एखाद्या व्यक्तीने विकत घेतल्यास आणि तिने लिलावात ते चित्र ठेवल्यास लिलावातून मिळणारी रक्कम त्या चित्रकारास, वा त्याच्या कुटुंबीयांस न मिळता, ते चित्र ज्याने विकत घेतले होते त्यास मिळते. वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रास गेल्यावर्षी जी २३ कोटी रु.ची किंमत लिलावात मिळाली ती चित्र आधी पाच लाख रुपयांस विकत घेणा-या व लिलावात ते चित्र ठेवणा-यास मिळाली होती.
प्राप्तिकर व व्हॅट कापून मिळते लिलावाची किंमत
या लिलावादरम्यान विक्रेत्यास आणि खरेदीदारास प्राप्तिकराचे नियम लागू होतात. चित्राच्या किमतीतील प्राप्तिकर विभागाच्या ठरलेल्या रकमेनुसार प्राप्तिकर घेतला जातो. तसेच नियमानुसार कंपनी देशाबाहेरील असल्यास व्हॅटही घेतला जातो. या विभागांव्यतिरिक्त खरेदीदाराचे नाव मात्र गुप्त ठेवले जाते.
जगातील श्रेष्ठ लिलाव कंपन्या
सद्बिज ही जगातील सर्वात मोठी लिलाव कंपनी आहे. त्यानंतर ख्रिस्तिज या मूळ इंग्लंडच्या असलेल्या कंपनीचा क्रमांक लागतो. या दोन कंपन्यांव्यतिरिक्त काही श्रीमंत कुटुंबे, राजघराण्यातील लोकही वैयक्तिक स्तरावर चित्र विकत घेतात.तसेच ‘ओसियान्स’ ही देखील एक एजन्सी चित्रांच्या लिलावाकरता प्रसिद्ध आहे.
चित्रास सर्वाधिक किंमत मिळणारे भारतीय चित्रकार
एस. एच. रझा, तय्यब मेहता, जॉन विकिन्स, फ्रान्सिस सुझा, वासुदेव गायतोंडे, अमृता शेरगिल आणि एम. एफ. हुसैन हे आतापर्यंतचे आपल्या चित्रास सर्वाधिक किंमत मिळणारे भारतीय चित्रकार आहेत जे आज हयात नाहीत.
चित्रकार हयात असताना त्यांच्या चित्रांस लिलावानंतर येणारी किंमत आणि ते हयात नसताना येणारी किंमत यात प्रचंड तफावत आहे. वासुदेव गायतोंडे हयात असताना त्यांच्या एका चित्राची किंमत अधिकाधिक १ कोटी रु.पर्यंत जात होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर ख्रिस्तिजने केलेल्या लिलावामध्ये २००२मध्ये ९२ लाख रुपये, तर गेल्या वर्षी २३ कोटी रुपये किंमत त्यांच्या चित्राने मिळवली.