वेध कृत्रिम पावसाचा / वेध कृत्रिम पावसाचा ढगांच्या गर्भधारणेतील विज्ञान

Jul 27,2012 10:50:55 PM IST

‘अमेरिकेतील 38 टक्के मका पिकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. देशातील 30 टक्के सोयाबीन पिकाची पावसाअभावी दुर्दशा झाली आहे,’ असे जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने जाहीरच केले आहे. अमेरिकेतील 29 राज्ये यंदा गेल्या पन्नास वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाला तोंड देत आहेत. हवामान अंदाज देणारी तत्पर यंत्रणा, संगणकीकृत शेती, सिंचनाची अत्याधुनिक उपकरणे, अद्ययावत शेती तंत्रज्ञान, भांडवलाची मजबूत उपलब्धता ही अमेरिकी शेतीची वैशिष्ट्ये आहेत.
मात्र, एवढी अनुकूलता पाठीशी असल्यानंतरही प्रतिकूल निसर्गापुढे अमेरिकी शेतक-याला आजही मात खावी लागते. अमेरिकेच्या काही भागांत कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातात. आपल्याकडेही पावसाने ओढ दिली की बहुतेक वेळा सरकारने कृत्रिम पाऊस पाडावा, अशा चर्चांना तोंड फुटते. कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान खरोखर किती उपयुक्त आहे याचा मागोवा यानिमित्ताने घ्यायला हवा.
दुष्काळी स्थितीत पाऊस पाडण्यासाठी ढगांना कळ लावण्याचे प्रयत्न माणसाने दुस-या महायुद्धाच्या आसपास सुरू झाले. तोपर्यंत विमानांचा शोध लागला असल्याने या प्रयत्नांना गती मिळाली होती. अर्थात, तत्पूर्वी कित्येक शतके आधी यज्ञ करून ढगांना आवाहन करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत रूढ होती. अधिक धूर होणा-या (चिकयुक्त) झाडांची लाकडे, धूप, दुग्धजन्य पदार्थ आदींची आहुती देऊन यज्ञाद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयत्न व्हायचा. हा कृत्रिम पावसाचाच प्रयोग. यामागचे शास्त्र वैज्ञानिक सत्याच्या जवळ जाणारे होते तरीही ते पुरेसे व्यवहार्य नव्हते. साठ वर्षांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्रायल या देशांत कृत्रिम पावसाचे असंख्य प्रयोग झाले. आजमितीस जगातील 35 देश कृत्रिम पावसाचे संशोधन करीत आहेत.
कृत्रिम पाऊस म्हणजे ?
पृथ्वीतलावरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. ही वाफ हलकी असल्याने वातावरणात उंच जाते. त्याचे ढगांमध्ये रूपांतर होते. या ढगांना थंड हवा लागली की वाफेचे रूपांतर पावसात होते. भूगोलात शिकलेली ही पावसाची व्याख्या. ही प्रक्रिया नैसर्गिक आहे.
कृत्रिम पावसाचा सगळा भर ‘क्लाऊड सिडिंग’वर असतो. क्लाऊड सिडिंगचे सोपे मराठी रूपांतर ‘ढगांची गर्भधारणा’ करता येईल. जमिनीपासून साधारणत: 2 ते 18 हजार फूट उंचीपर्यंत पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढग असतात. उष्ण किंवा शीत या दोन पद्धतीने क्लाऊड सिडिंग केले जाते.
उष्ण पद्धतीमध्ये विमान किंवा रॉकेटच्या साहाय्याने ढगांवर सोडीयम क्लोराइड (मीठ)चा फवारा सोडला जातो. शीत पद्धतीत सिल्व्हर आयोडाइड आणि ड्राय आइस या रसायनांचा फवारा ढगांवर केला जातो.
क्लाऊड सिडिंग घडते कसे ?
ढगांची निर्मिती बाष्पापासून झालेली असते. अवकाशातील ढगांचे तापमान शून्य अंश सेल्सियस किंवा त्याहीपेक्षा कमी असते. पाऊस पडण्यासाठी या ढगांमधील बाष्पाचे रूपांतर हिमकणांमध्ये व्हावे लागते. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात हीच क्रिया रसायनांच्या साहाय्याने घडवून आणली जाते. मीठ फवारल्याने ढगांमधील बाष्पाचे रूपांतर हिमकणांमध्ये होऊ लागते. त्याच्या वाढलेल्या आकारमानामुळे हे कण पृथ्वीकडे खेचले जातात. तापमानाला येताच हिमकणांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होते आणि पाऊस पडू लागतो. ढगांचे तापमान 0 ते -10 अंश असल्यास क्लाऊड सिडिंग अधिक चांगले होते.
योग्य ढगांचा शोध - कृत्रिम पावसाच्या प्रयोगातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो अनुकूल ढगांचा शोध घेण्याचा. रिमोट सेन्सिंग, डॉप्लर रडार, उपग्रह आदी अत्याधुनिक तंत्राचा वापर यासाठी केला जातो. जल-बाष्प-हिम या अवस्थांमध्ये ढगात पाणी असते. मायक्रोव्हेव्ह रेडिओमीटरच्या साहाय्याने ढगांमधील पाण्याचे नेमके प्रमाण किती याचा अंदाज घेतला जातो. वा-याची दिशा आणि वेग पाहिला जातो. उपग्रह, रिमोट सेन्सिंगच्या साहाय्याने ढगांचा आकार, घनता, उंची यांचा वेध घेतला जातो. विविध निरीक्षणांवरून मिळालेले निष्कर्ष ‘क्लाऊड मॉडेल’मध्ये घातले जातात. यावरून मिळणा-या उत्तराच्या आधारे क्लाऊड सिडिंगसाठी अनुकूल ढगांचा शोध घेतला जातो. पुरेसा पाऊस पाडण्याची क्षमता असलेले ढग किती काळ कोणत्या भागात असतील याचा अंदाज बांधल्यानंतर विमानाच्या अथवा रॉकेटच्या मदतीने या ढगांवर रसायने फवारण्याचा निर्णय घेतला जातो.
पाऊस किती, खर्च किती?
2003-2004 मध्ये बारामती व शेगाव या दोन गावांच्या दोनशे किलोमीटर परिघात पहिल्यांदाच कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. प्रयोगानंतर फक्त 1 ते ६ मिलिमीटर पाऊस पडल्याचे आढळले, परंतु प्रयोगाच्या परिणामामुळेच पाऊस पडल्याचे सिद्ध झाले नाही. आकाशात घिरट्या घालणारे विमान अनुकूल ढग न आढळल्याने अनेकदा खाली उतरवावे लागले होते. त्या वेळी या प्रयोगावर 12 कोटी रुपये खर्च झाले. आजमितीस हा खर्च 40 कोटींपर्यंत गेल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. कोट्यवधी खर्च केल्यानंतरही पाऊस पडण्याची शाश्वती नाही हे सरकारला माहिती असूनही केवळ लोकभावना जपण्यासाठी हा प्रयोग राबवण्यात आला होता.
ढगांच्या गर्भधारणेतील अडचणी - पन्नासहून अधिक वर्षे प्रयोग केल्यानंतरही प्रगत देशांना हमखास पावसाची खात्री देणारे यश मिळू शकलेले नाही. क्लाऊड सिडिंगमुळे पाऊसमानात जास्तीत जास्त 15 टक्क््यांपर्यंत वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. क्लाऊड सिडिंग हा दुष्काळावरचा उपाय ठरू शकत नाही. कारण, अनुकूल ढग असल्याखेरीज हा प्रयोगच करता येत नाही. वेगाने वाहणारे वारे, प्रदूषित हवा यामुळे ढगांच्या गर्भधारणेत खंड पडतो. साहजिकच शहरी, दाट मानवी वस्तीच्या, औद्योगिक परिसरात या प्रयोगाला मर्यादा आहेत.

X