आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Artists Politics By Arvind Jagtap, Divya Marathi

रोल...साउंड...पॉलिटिक्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुल पनाग, किरण खेर, नग्मा, नंदू माधव, महेश मांजरेकर, दीपाली सय्यद आणि बरेच काही... यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बहुतेक सर्वच पक्षांनी कलावंतांना रिंगणात उतरवले आहे. यानिमित्ताने कलावंत राजकारणात येताहेत, ही स्वागतार्ह बाब आहे; परंतु यापैकी किती कलावंतांच्या सामाजिक-राजकीय जाणिवा प्रगल्भ आहेत?किती कलावंतांकडे ठोस अशी वैचारिक बांधिलकी आहे? आणि किती कलावंतांकडे गांभीर्यपूर्वक राजकारण करण्याची क्षमता आहे? लेखक-गीतकार अरविंद जगताप यांनी मांडलेले प्रश्न...


रोल-साऊंड-अ‍ॅक्शन... हे तीन शब्द चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे आहेत. सीन सुरू होण्यापूर्वी दिग्दर्शक हे शब्द उच्चारतो आणि मग अभिनेते त्या दृश्याप्रमाणे अभिनय करायला सुरुवात करतात. पण सध्या राजकीय पक्षांची उमेदवार यादी बघितली की लक्षात येतं, की नेमका कोणता रोल करायचा, या बाबतीत अभिनेत्यांचाही गोंधळ उडालेला आहे. प्रत्येक पक्ष चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांना उमेदवारी द्यायला उत्सुक आहे. पण पडद्यावर दिसणा-या या कलावंतांच्या राजकारणात येण्याने खरंच काही फरक पडणार आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे.


मागे एका टीव्ही शोसाठी एका मराठी अभिनेत्रीची मुलाखत सुरू होती. त्यात ती असं म्हणाली, प्रतिभा पाटील महाराष्‍ट्राच्या राष्‍ट्रपती आहेत! मग तिला गमतीने विचारलं, दिल्लीच्या राष्‍ट्रपती कोण आहेत? तिने गंभीरपणे उत्तर दिलं, शीला दीक्षित!! बरं हा काही ऐकीव किस्सा नाही; माझ्यासमोर घडलेला आहे. आणि त्या टीव्ही शोच्या निमित्ताने अनेक अभिनेता-अभिनेत्रींचं राजकीय ‘असामान्य ज्ञान’ मी जवळून अनुभवलंय. अर्थात, त्याला काही सन्माननीय अपवाद आहेत.


बीड लोकसभेसाठी ‘आप’कडून अभिनेते, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाचे दिग्दर्शक नंदू माधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर बीडमधून मित्राचा फोन आला. म्हणाला, गोपीनाथ मुंडे यांना ‘शिवाजी अंडरग्राऊंड...’सारखं नाटक दिग्दर्शित करायला सांगितलं, तर त्यांना ते जमणार आहे का? नाही ना? प्रश्न क्षणभर योग्य वाटतो; पण रामदास आठवले, भुजबळ, बबन घोलप यांच्यासारख्यांनी राजकारणासोबत अभिनय क्षेत्रात प्रयत्न करून पाहिला नाही का? ज्याचं काम त्याने करावं, असं ठरवलं; तर अरविंद केजरीवाल यांना नोकरी सोडायची काही गरज नव्हती, असं म्हणावं लागेल. मनमोहनसिंग यांनी रिझर्व्ह बँकेतली नोकरी सोडणं पण चुकीचं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे, चहा विकणारा माणूस पंतप्रधानपदाची स्वप्नं कशी पाहू शकला असता?


राजकारणात सिनेमा क्षेत्रातल्या लोकांनी येण्यावर कुणी आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण सध्याचं राजकारण हे नेत्यांपेक्षा अभिनेत्यांचंच अधिक आहे. माझ्या आजीला मारलं, वडिलांना मारलं, हा काय लोकसभेच्या प्रचाराचा मुद्दा असतो का? ‘मी लहानपणी चहा विकला’ हा पंतप्रधानपदाच्या दावेदाराच्या भाषणाचा भाग असावा का? हे सगळं अभिनेत्यांना शोभतं; पण नेत्यांनी अभिनेत्यांकडून अपेक्षा करण्यासारखं तरी काही आहे का? आपल्याकडे आज अशा अभिनेत्यांची संख्या खूपच दुर्मिळ आहे, ज्यांचा समाजावर प्रभाव आहे. आमिर खानसारखा अपवाद सोडला, तर आपल्या कृतीतून समाजात काही संदेश जाईल, असा विचार करणारे किती अभिनेते आहेत? मराठीत तर अगदीच बोंब आहे. वर्तमानपत्रांत किंवा टीव्हीवर भडक प्रतिक्रिया देणे, याला तळमळ म्हणत नाहीत. त्यामुळे निवडणुकीत उभ्या असलेल्या तमाम हिंदी-मराठी सिनेमावाल्यांची यादी बघितली की असं वाटतं, काय संबंध आहे यांचा राजकारणाशी? आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत माझ्या माहितीत नंदू माधव हे एकमेव नाव असं आहे, ज्याचं खरोखरीच काही तरी सामाजिक कार्य आहे. ज्याला सामाजिक प्रश्नांची नुसती माहिती नाही, तर ज्ञान आणि जाणही आहे. बाकी दीपाली सय्यद या अभिनेत्रीला नगरमधून तिकीट देण्याचा काय संबंध? अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने तिला टोपी घातली, असं दिसतंय. मुंबईत महेश मांजरेकर उभे आहेत मनसेकडून. ते पूर्णवेळ राजकारण करणार आहेत का? यापैकी कोणत्या उमेदवाराने आपण चित्रपटसृष्टी सोडून पूर्णवेळ जनतेची सेवा करणार, असं जाहीर केलंय?


राजकारणात कुणी यावं, याला काही नियम नाही; पण कुणीही यावं, असंही अपेक्षित नाही. कलावंत आणि खेळाडू यांच्यावर जनता आंधळं प्रेम करते. त्यातून बेटिंगमध्ये दोषी असलेला अझहरुद्दीनसारखा खेळाडू निवडून येतो, म्हणून राजकीय पक्षांचा आत्मविश्वास वाढतो. भारतीय जनता पक्षाकडून गेली कित्येक वर्षे हेमा मालिनी काय काम करतात, हे भाजपवर बारकाईने लक्ष ठेवणा-या संघाला पण ठाऊक नसेल. ‘मै तेरा खून पी जाउँगा’सारख्या संवादासाठी प्रसिद्ध असणा-या धर्मेंद्रलासुद्धा भाजपने लोकसभेत पाठवून हसं करून घेतलं होतं. खरं तर दक्षिणेचा अपवाद वगळता, उर्वरित भारतात कुठलाच अभिनेता राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकला नाही. हिंदीत एकेकाळी बलराज साहनी, कैफी आझमी, ए. के. हंगल, साहिर यांच्यासारखे लोक ठाम वैचारिक भूमिका असलेले होते. ‘इप्टा’सारखी संस्था होती. आपल्याकडे सेवा दल होतं. या लोकांचं चित्रपटसृष्टीत वर्चस्व होतं. आज अशी कुठली संघटना आहे? दक्षिणेत एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव, जयललिता, करुणानिधी हे मुख्यमंत्री आधी सिनेमावाले होते. चिरंजीवीसारखा अभिनेता केंद्रात मंत्री होता. दक्षिणेत आणखी काही अभिनेते आहेत, ज्यांनी आपला पक्ष स्थापन केला आणि त्यांचा प्रादेशिक पातळीवर दबदबा आहे. हे मराठीत का होत नाही? मराठी अभिनेत्याने राजकीय पक्ष काढला तर काय होईल? ही कल्पनासुद्धा करवत नाही. कारण, आजकालचे मराठी कलावंत आपली वैचारिक बांधिलकी स्पष्ट करत नाहीत.


निळू फुले, दादा कोंडके यांचे विचार परस्परविरोधी होते; पण त्यांची विवादास्पद असली तरीही ठाम वैचारिक भूमिका होती, जिची त्यांना किंमत मोजावी लागली; पण ते मागे हटले नाहीत. श्रीराम लागू यांनी तर देव नाकारला. त्याबद्दल सनातनी लोकांनी त्यांच्यावर जहरी टीका केली. पण आपल्या चाहत्यांना काय वाटेल, असा स्वार्थी विचार या कलावंतांनी केला नाही.त्या काळी पक्षाच्या प्रचाराला निळू फुले यायचे, दादा कोंडके यायचे. आता अभिनेता-अभिनेत्री येतात, नाचतात, निघून जातात. कुणाला कोणताही पक्ष चालतो. त्यात डावं-उजवं नाही, की योग्य-अयोग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-मनसे सगळेच सारखे. असं का व्हावं? कारण, विचारधारेचा अभाव आणि चुकून असली तरी ती मांडण्याचे धाडस नसलेले कलावंत. त्यात जे काही कलावंत वर्तमानपत्रांत किंवा टीव्हीवर भूमिका मांडतात, ते एवढं गोलमोल, गुळगुळीत असतं की दया यावी. नाना पाटेकरांसारखे अपवाद वगळता जाहीर भूमिका घेणं प्रत्येक जण टाळतो. असं का होत असावं? तसं प्रत्येक कलावंताने राजकारणावर बोलावं, हेही अपेक्षित नाही. पण विजय तेंडुलकर ज्या धाडसाने मोदी आणि ठाकरे यांच्याबद्दल बोलले होते, त्याच्या एक टक्का तरी धाडसी भाष्य करण्याची नंतर कुणाची हिंमत का होऊ नये? ज्या प्रकारे सिंचन घोटाळा झाला, आदर्श घोटाळा झाला, त्यावर आपलं काहीच मत असू नये का? दाभोलकरांची हत्या झाली. त्याचा निषेध केला, म्हणजे संपलं का सगळं? जास्तीत जास्त अंधश्रद्धा सिनेमावाल्या लोकांमध्ये आहे. त्यांच्या अंगठ्या, गळ्यातले दोरे बघून हैराण होतो आपण. आणि हेच लोक अंधश्रद्धाविरोधी कायद्यावर बोलतात, तेव्हा हसावं की रडावं असं होतं. इतिहास बघितला तर कलावंत राजाच्या दरबारात असणं, आपल्याला नवीन नाही. तानसेनपासून दरबारात असणा-या कलावंतांबद्दल आपण ऐकत आलोय. त्यामुळे अभिनेते एखाद्या पक्षाच्या दावणीला जात असतील, तर ते फार धक्कादायक नाही; पण महाराष्‍ट्रात तरी असं दरबारी राजकारण नव्हतं. कलावंतांना हुजरेगिरी करायची गरज नव्हती. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं सुसंस्कृत नेतृत्व होतं, आपलं. मग ही चमचेगिरी कधी सुरू झाली? यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांच्याकडे भेटायला येणारे कलावंत असायचे. पण ती मैत्री होती; दरबार नव्हता. पण जेव्हा कलावंत छोट्या मोठ्या भानगडी घेऊन ‘बंगल्या’वर जायला लागले, तेव्हापासून प्रतिमा बदलली. अगदी संजय दत्तला घेऊन सुनील दत्त यांच्यासारखा काँग्रेसचा माणूस बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेला. मग बाकी लोकांचं काय बोलणार? छू केलं की पाहिजे तो स्टार हजर होऊ शकतो, असं मग सगळ्या राजकारण्यांना वाटू लागलं. आपल्याकडे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासाठी काही विचारवंत पूर्णवेळ प्रचारकाचं काम करताना दिसतात. आता नितेश राणे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांकडे कलावंत आहेत, पूर्णवेळ! राज ठाकरे यांच्या कुत्र्याबद्दल तासन् तास बोलणारे लोक चित्रपट क्षेत्रात आहेत. हे सगळं का घडतं? कारण एक कणाहीन पिढी तयार होतेय, कलावंतांची. हे एखाद्या राज्यासाठी आणि राजकारणात येऊ पाहणा-या कलावंतांसाठी चांगलं लक्षण नाही. एरवी, राजकीय नेत्यांकडून हळदी-कुंकवापासून ते लावणी महोत्सवापर्यंत कलावंतांचा सर्रास वापर सुरू असतोच. त्याचा भरघोस मोबदला त्यांना दिला जातो. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत उरत नाही. दुर्दैवाने, ठोस राजकीय किंवा सामाजिक भूमिका नसलेल्या अभिनेत्यांची ही गर्दी आहे, असा निष्कर्ष काढावा लागतो. या गर्दीतून कुणी जयललिता वा एम. जी. रामचंद्रन निर्माण होण्याची चिन्हं तूर्तास तरी दिसत नाहीत, हे खरं; तरीही यातल्या कुणी तरी तसं कर्तृत्व गाजवलं तर कोण हरकत घेईल?


jarvindas30@gmail.com