आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद‌्भुत कलाविश्वाचा ग्रंथऐवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नव्या कलापरंपरेचा उगम होण्यासाठी पूर्वसुरींनी काय अद््भुत विश्व उभे केले होते, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते जाणण्यासाठी ‘बॉम्बे स्कूल-आठवणीतले अनुभवलेले' हा ग्रंथ मोलाची मदत करतो...
ते १९६८ किंवा १९६९ हे वर्ष असावे. मे महिन्याच्या सुटीमध्ये मी हैदराबादला अात्याकडे गेलो होतो. शेजारच्या विद्यावर्धिनी मराठी शाळेमध्ये कुमार सुहास बहुळकरांचे चित्र प्रदर्शन होते. त्याचे वडीलच सुहासला घेऊन आले होते. तेव्हा त्याचा लौकिक ‘चाईल्ड प्रॉडिजी’ कलाकार असा होता. मीही चित्रे काढीत होतो. पण आमच्यामध्ये मोठा फरक होता. त्याचे पालक त्याला विविध शहरांत, विविध कलावंतांकडे कौतुकाने घेऊन जात असत. तर आमच्याकडे गणित, सायन्स, भाषा उत्तम असूनही, आम्ही जे. जे.मध्येच जाणार, हा हट्ट लावून धरल्यामुळे ‘पोरगं इंजिनिअर वगैरे होण्याऐवजी छत्रीवर नाव घालत फिरणार वाटतं.’ असे माझ्या तोंडावरच बोललं जाई.

अर्थात, १९७०मध्ये मॅट्रिक झाल्यावर "जे. जे. रंजले गांजले, त्यासी म्हणे आपुले' या न्यायाने मी जे. जे.मध्ये प्रवेश घेतलाच; पण, तो अप्लाईड आर्ट‌्स विभागात आणि सुहास दाखल झाला फाईन आर्ट‌्समध्ये. जे. जे.मधील पाच वर्षे कापरासारखी उडून गेली आणि १९७५मध्ये आम्हा दोघांना आपापल्या विभागात फेलोशिपसाठी विचारणा झाली. सुहास फेलो झाला आणि माझ्या डोक्यात नाटक-सिनेमाचे भूत असल्यामुळे मी बाहेरच्या जगात आलो. अधूनमधून दादरच्या ‘दत्तात्रय’मध्ये (तेव्हा ‘दत्तात्रय’मध्ये ९० पैशामध्ये राइस प्लेट मिळण्याचे दिवस होते. आता ९० रुपयामध्येसुद्धा ती चव नाहीच.) आमच्या भेटी होत. सुहासने केलेले पेंटिंग अमुक ठिकाणी लागले- विधानभवन, राष्ट्रपती भवन, पार्लमेंट वगैरे बातम्या कानी येत असत.
त्याचे जे.जे.मधील कामही चालू होते. जुन्या पेंटिंग्जचे संवर्धन, प्रदर्शने वगैरे अनेक उपक्रम सतत असत. त्याचे चित्रकुटमधील रामायणावरील काम अनेक वर्षे सुरू होते. आणि हा हा म्हणता वर्षेही जात होती. मुळातील अभ्यासू वृत्तीमुळे आणि ब्रश, पेन्सिलबरोबर लेखणीही चालवण्याची कला साध्य असल्यामुळे त्याने सर्वात महत्त्वाचे म्हणून जर काही काम
केले असेल तर ते ‘बॉम्बे स्कूल : आठवणीतले, अनुभवलेले.' हे २८० पानी उत्तम पुस्तक लिहिण्याचे. एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज त्यामुळे उपलब्ध झाला आहे. जे. जे.ची परंपरा आणि त्या परंपरेचे भोई यांच्याबद्दल एकत्र असे लेखन झाले नव्हते. ‘बेगाॅल स्कूल’चा जसा गवगवा झाला, तसा ‘बॉम्बे स्कूल’चा झाला नाही. ती उणीव काही प्रमाणात तरी या पुस्तकाने भरून यावी. खरं तर हे पुस्तक लवकरात लवकर वैश्विक भाषेत म्हणजे इंग्रजीमध्ये यावे, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत संदर्भ ग्रंथ म्हणून पोहोचेल, ही आशा.

पुस्तकाचे साक्षेपी संपादक दीपक घारे आपल्या प्रस्तावनेमध्ये बॉम्बे स्कूलच्या महत्त्वाबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल आवर्जून लिहितात. यथार्थ चित्रणाची ही शैली साचेबंद असल्यामुळे लवकरच चाकोरीबद्ध झाली, असा आक्षेप जरी घेतला गेला तरी कलेच्या क्षेत्रातील भारतीयत्वाचा मुद्दा, कलाशिक्षण व कलाप्रसार, आधुनिकता आणि इतर उपांगे याबद्दल पुस्तकात योग्य प्रमाणात उहापोह झाला आहे.

बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल, सडवेलकरांचे महाराष्ट्रातील कलेचे जतन करण्याचे प्रयत्न, पळशीकरांची ध्वनीसंबंधी चित्रे, भारतीय प्रतीके आदी सर्व बाबींचा विचार इथे होतो. ब्रिटिशांचा वसाहतवाद, पळशीकरांच्या चित्रामधील लोकसंस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार; एवढेच नव्हे तर उपयोजित कलेचा उगम श्री. आराडकर आणि जेराई यांच्या प्रयत्नामधून उपयोजित कलेचा स्वतंत्र कलाशाखा म्हणून झालेला विस्तार आदी सर्व
अंगांना हे पुस्तक स्पर्श करते.

पुस्तकामध्ये ज. द. गोंधळेकर, सुखवाला, गोपाळ देडसकर, धातुकौशल्याचा मानदंड साबण्णवारसर, कदमसर, बाबुराव सडवेलकर, शंकर पळशीकर, प्रफुल्ला, ग. ना. जाधव, मुकुंद केळकर, डॉ. भय्यासाहेब ओंकार असे सुहासचे सर्व गुरू आणि स्नेही वेगवेगळ्या लेखातून आपणाला भेटतात. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या या लेखामधून त्यांचा व्यक्ती म्हणून आणि कलावंत म्हणून सुहासवर झालेल्या संस्काराचे शब्दचित्र आढळते आणि त्या ओघात संपूर्ण बॉम्बे स्कूलचा इतिहास उलगडत जातो. केवळ इतिहास लिहिण्यासाठी म्हणून कोणी हा प्रयत्न केला असता तर तो कदाचित बोजड आणि अ-वाचनीय झाला असता. पण या व्यक्तिचित्रामधून हा प्रवास अतिशय रंजक आणि वाचनीय झाला आहे. पुस्तक सहजपणे एक-दोन बैठकीमध्ये
वाचून होते. नकळत झालेल्या या रचनेमुळे त्यामध्ये एक उत्फुल्लता आलेली आहे. पण हा काही समग्र इतिहास नाही. त्यामुळे म्हात्रे, करमरकर यांच्यासारखे शिल्पकार यामध्ये नाहीत. पण अस्तंगत झालेल्या या परंपरेचे भारतीय कलाप्रवासात महत्त्वाचे स्थान आहे, हे विसरता येणार नाही.
म्हात्रे, करमरकर यांच्यावर स्वतंत्र पुस्तके लिहून सुहास ही उणीव भरून काढेल, यात शंका नाही. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मेट्रोजवळच्या एस्प्लेनेट मैदानावर सय्यद हुसेन व मंगल या दोघा सैनिकांना बगावतीच्या आरोपाखाली तोफेच्या तोंडी देण्यात आले (१५ ऑक्टोबर १८५७). त्या आधी २ मार्च १८५७ रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्स अँड इंडस्ट्रीची स्थापना झाली. मुंबई (बॉम्बे) युनिव्हर्सिटीची स्थापनाही त्याच वर्षी १८ जुलै १८५७ रोजी झाली. मुलांना आधुनिक जगात व्यवसायाभिमुख कलाकारीचे शिक्षण देण्यासाठी ही संस्था उभी करण्यात आली होती. त्यासाठी ब्रिटनमधून खास शोधून शिक्षक आणले होते. मि. हिगीन्स (धातुकाम), मि. लॉकवूड किपलिंग (जंगल बुक लिहिणा-या रुडयार्ड किपलिंगचे वडील) आणि मि. जॉन. ग्रिफिथ्स हे चित्रकार. मुंबई बंदर भरभराटीस येत होते. त्यामुळे येथे चित्रकला, शिल्पकला, धातुकाम, वास्तुशोधनासाठी चित्रे, शिल्पे, रिलीफ, स्टेन्ड ग्लासची डिझाईन, लाकडी नक्षीकाम, फर्निचर, कास्ट आर्यनची कामे, सिरॅमिकची भांडी आदी अनेक वस्तूंची मागणी होती. त्याच वेळी व्ही. टी. स्टेशन, सेलर्स होम, राजाभाई टॉवर्स, बॉम्बे हायकोर्ट, क्रॉफर्ड मार्केट अशी मोठी कामेही चालली होती आणि त्यांच्या निर्मितीला या कलावंताचा हातभार लागत होता.
आजही या इमारतीत ही कामे दिमाखाने मिरवत आहेत. आबालाल रहमान, रुस्तम सिओदिया, पेस्तनजी बोमनजी, महादेव धुरंधर, एस. पी. आगासकर, श्रीपाद दामोदर सातवळेकर, पिठावाला देऊसकर, शिल्पकार म्हात्रे, तालीम, व्ही. पी. करमरकर या १८६५ ते १८८५च्या काळातील नामवंत कलावंतांच्या नंतर आलेल्या कलावंत आणि कलाचळवळीचा
आलेख या पुस्तकात आहे.पुस्तकांच्या शीर्षकामधील आठवणीतले/अनुभवलेले या उपशीर्षकाला जागून या ठिकाणी आपणास अनेक किस्से आणि अनुभव भेटतात. गजानन
हळदणकरांच्या एका प्रात्यक्षिकाचा किस्सा किंवा दुस-या कलावंताचे काही अनुभव वानगीदाखल...!

एका व्यक्तिचित्रणाच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी हळदणकरांनी एका गो-या टक्कल असणा-या माणसाची निवड केली. पोर्ट्रेटला सुरुवातीलाच भरपूर पांढरा रंग घेऊन त्यामध्ये पर्शियन ब्लू व व्हर्मिलियन रेड मिसळून कॅनव्हॉसवर वरच्या बाजूला पॅच ठेवला आणि नंतर आजूबाजूला विविध रंगांचे पॅच लावत चेहरा साकारला. पहिला पांढरा पॅच आता टक्कलावरील हायलाईट झाला होता. खरं म्हणजे, हायलाईट नेहमी पोर्ट्रेटच्या शेवटी टाकतात; पण हा उलटा, नाट्यपूर्ण प्रकार हळदणकरांची माध्यमावरील मास्टरी दाखविणाराच होता. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय व पौर्वात्य कलामूल्ये जपण्याची पुनरुज्जीवनवादी चळवळ सुरू झाली. या चळवळीतील कलावंतांनी अजंठा,
मुघल किंवा राजस्थानी (राजपूत) कलाशैलीपासून प्रेरणा घेतली असली तरी यात पाश्चिमात्य व जपानी शैलीचाही प्रभाव मिसळला. स्वदेशप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीयत्व या भावना चित्रामधून दिसू लागल्या. आदिवासींच्या वर्गाबाहेर पादत्राणे काढून विद्यार्थी मांड्या घालून, जमिनीवर बसून चित्रे काढू लागले. अर्थात याही परंपरेला आणि चित्र पद्धतीला विरोध करणारे बाबुराव सडवेलकरांसारखे होतेच. १९९१च्या सुमारास ग्लॅडस्टन सॉलाेमन यांची जे. जे.च्या प्रिन्सिपॉलपदी नेमणूक झाली आणि त्यांनी अॅडव्हान्स क्लास(चौथ्या वर्षा)साठी न्युड
स्टडीज क्लास सुरू केला. ‘जिथे प्रत्यक्ष माणसाला बसवून न्यूड लाइफचे शिक्षण नाही, ते स्कूल ऑफ आर्ट नव्हे’ असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात, याही गोष्टीला विरोध करणारे होतेच. पण सॉलोमन या सर्वांना पुरून उरले. न्युडस्टडीच्या वर्गात अनेक गमतीजमती होत. पुस्तकांमधील नऊवारी साड्या घातलेल्या विद्यार्थिनी आणि कोट-टोपीमधील विद्यार्थी न्युडस्टडी करत असल्याचे फोटो मजेदार आहेत. याच वेळी म्युरल डेकोरेशनचा क्लासही
सुरू झाला. प्रिन्स ऑफ वेल्सची भेट किंवा दिल्ली दरबार आदी घटना या कलावंतासाठी योग्य संधी म्हणून सिद्ध झाला आणि बॉम्बे स्कूलची ख्याती सर्वदूर पसरली.

ज. द. गोंधळेकर यांच्याबद्दल फारसे कोणी लिहिले असेल, असे वाटत नाही. पण त्यांच्यावरील मोठा लेख त्यांचे लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्ट‌्सचे शिक्षण, नंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌‌‌्चे डीन, टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर, विद्वत्ता, बहुश्रुतता आदी सर्व गुणांची परिपूर्ण ओळख करून देणारा आहे. भावनाप्रधान व बुद्धिमान असणा-या गोंधळेकरांवरील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. १९२० ते १९३६ या सॉलोमनसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय कलेचे पुनरुज्जीवन झाले होते. ती चळवळ १९६६ पर्यंत चालवण्याचे महत्त्वाचे काम गोंधळेकरांच्या कारकिर्दीमध्ये झाले.
‘न्युड स्टडी’ची असंख्य स्केचेस त्यांच्या माळ्यावर पडलेली होती. पण मनामध्ये एक खंतही होती, ‘माझ्या हातून काहीच काम झाले नाही.’ तसेच काहीसे प्रेमळ पारसी प्रा. बी. एन. सुखडवाला या प्राध्यापकांच्या लेखाबद्दल म्हणता येईल. कदाचित जे.जे.मधील नोकरीमुळे त्यांच्या कामावर मर्यादा आल्या असाव्यात. अप्लाइट आर्ट‌‌‌्समधील आम्ही मुले आणि स्कूल ऑफ आर्ट‌्समधील काही मुले वेगवेगळ्या ग्रुपमधून एकाच वेळी बदामी, हेप्पी आदी कर्नाटकामधील स्टडी टूरसाठी गेलो होतो. आमची अप्लाइड आर्ट‌्सच्या मुलांची राहण्या-खाण्याची, प्रवासाची सोय प्रा. टिकेकरांनी अतिशय चोख ठेवली होती. पण त्या मानाने आर्ट स्कूलच्या पोरांची आबाळच होती. तेव्हा त्या काळी प्रसिद्ध असलेल्या ‘उपरवाला दुखीयों की नाही सुनता रे’ या गाण्याच्या चालीवर आम्ही ‘सुखडवाला दु:खीयों की नाही सुनता रे’ म्हणून धमाल करीत असू. ब-याच वर्षांनी त्यांच्यावरील लेखाने ही आठवण
जागी केली.

‘चित्रकारे सूर्य रंगविला चांग।
प्रकाशाचे अंग आणता न ये।।’
खरोखरीच शंकर पळशीकरांचा जे. जे.मधील वावर चेतनादायी होता. नाना पळशीकरांचे बंधू, असाही एक लौकिक नव्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलाचा विषय असायचा. त्यांच्यावरील लेखामध्ये बहुळकरांनी आपल्या गुरूबद्दल जवळून अनुभवलेले क्षण जिवंत केले आहेत. या प्रत्येक महागुरूचे योगदान बॉम्बे स्कूलच्या वाटचालीमध्ये काय? किती अमूल्य भर घालीत होते? हे या पुस्तकांच्या पाना-पानावर मुद्रित झालेले आहे आणि त्याचबरोबर
सरकारी खाकी कागदाच्या भावनाशून्य व्यवहारात यांची कशी तडफड होत होती, हेही नजरेसमोर नागवे सत्य म्हणून येते. शंकर पळशीकरांची ध्वनीसंबधांची चित्रे अधिक लोकांसमोर येणे जरुरीचे आहे. हा एक उत्तम प्रयोग होता. अमूर्ताकडे जाणारा हा प्रयोग. सर्वसामान्या लोकांचे चित्रकलेसंबंधी कुतूहल जागविण्यास नक्कीच महत्त्वाचा, उपयोगी पडणारा आहे. किर्लोस्कर मासिक, मनोहर, स्त्री आदी प्रकाशनाच्या मुख्यपृष्ठावरून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या चित्रकारीची ओळख पटली, त्या ग. ना. जाधवांवरील लेख या महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलावंताचे आयुष्य चित्रमय उभे करतो, एवढंच नव्हे तर एवढंच नव्हे तर किर्लोस्कर उद्योग समूहाची प्रगतिशील, सामाजिक बांधिलकी मानणारा, शेतामधील शेतमजूर, तसेच मध्यमवर्गीय समाजाचा तारणहार अशी प्रतिमा ज्यांच्या चित्राने प्रामुख्याने
निर्माण झाली, त्या ग. ना. जाधवांच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय देतो. शेवटपर्यंत काहीतरी नवे नवे करण्याची उमेद बाळगणारे ग. ना. सतत म्हणत असत की, ‘मला अजून खूप शिकायचे आहे. भारतात अनेक चित्रकार आहेत. प्रत्येकाची खासियत आहे. तसे आपण करावे. पण ते करू शकलो नाही.'

प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत जाणारे ग. ना. सारखे चित्रकार पाहिल्यावर, सतत अस्वस्थ असणा-या कलावंताला एक जन्म पुरेसा नाही, असेच वाटू लागते. अर्थात, त्यांनी केलेले काम पुढील पिढ्यांसाठी अभ्यासाचा विषय होते, हेही खरे. दिग्गज कलावंतांच्या जोडीने ग. ना. जाधवांसारख्या रांगड्या कलाकारांची दखल घेत आपण धातू कौशल्याचा उत्कट अनुभव देणा-या नागेश साबण्णवर या कलाकाराकडे येतो. धातूच्या पत्र्यावर रिलीफवर्क करणारे साबण्णवरसर स्वत:च एक संस्था होते. धातूशिल्प किंवा ‘रिपोझ’ म्हणजे पत्र्यावर ठोकून केलेले (उत्थित शिल्प) करण्यात यांचा कोणी हात धरू शकत नसे. पेन्सिलीला टोक काढण्यासाठीसुद्धा खास आपल्या पद्धतीचा चाकू बनवणारे साबण्णवरसर हे वेगळेच रसायन होते. वेगवेगळी पदकं, देशविदेशातील खास प्रसंगी काढण्यात येणारी नाणी यांची डिझाईन सर उत्तम प्रकारे करीत असत. नृत्यगुरू पार्वतीकुमारांच्या शब्दामध्ये साबण्णवरसरांचे वर्णन करायचे झाले तर
‘यत्र द्रवते अंतरंग।
सस्नेह इति उच्यते।।’
ज्याच्या स्मरणाने अंतरंगाला समाधान वाटते, अशी ही स्नेहशील व्यक्ती आहे. हा कलावंत असा होता, जो आपल्या कामात स्वत:लाच विसरला आहे. काम हाच त्याचा जीवनक्रम, काम करताना आनंद घेणे हाच सद‌्गुण. अभ्यासक कलावंत या नावाने बाबुराव सडवेलकरांवरील लेख प्रदीर्घ म्हणजे जवळपास पन्नास पानांचा आहे. अत्यंत वादळी व्यक्तिमत्त्व असणारे
सडवेलकर यांच्यावरील आदरापोटी आणि एकूण जे.जे.वरील प्रेमापोटी लिहिला गेलेला हा लेख सुहासच्या सडेतोड वृत्तीचे दर्शन घडवतो. एकूणच वादळी कारकिर्दीचा आलेख, पुन्हा उडून गेलेली पाने जुळवून लिहिताना एवढा प्रपंच करावाच लागणार. कलाक्षेत्रामधील कामे, हेवेदावे, राजकारण, सरकारी खाक्या, त्यात निर्माण झालेली गटबाजी आणि त्या गढूळ वातावरणात मनस्वी कलावंताची होणारी घुसमट आदी सारे तपशील इथे येतात. या लेखाच्या निमित्ताने बॉम्बे स्कूलबद्दल वाटणारी सुहासची आत्मीयता अधोरेखित होते, हे नक्की.
भय्यासाहेब ओंकार आणि बखळीतील चित्रकार मुकुंद केळकर या दोन पुणेकर चित्रकारांच्या सहवासाचे चित्रण करणारे लेख म्हणजे बॉम्बे स्कूलच्या पोटामधील पुणे स्कूल म्हणता येतील. पुण्यामधील कलावंताचा एक वेगळाच थाट असतो. एक वेगळेच अवकाश घेऊन हे येत असतात. मुंबईत आले तरी सतत एक पाय पुण्यातील गल्लीबोळात अडकलेला असतो. अत्यंत अनौपचारिक वागण्याचे, राहणीचे नमुने म्हणावे, असे हे कलावंत महाराष्ट्राला निश्चितच माहीत असतात. १९६०/७०च्या दशकामध्ये वेगवेगळ्या मासिकांमधून कथाचित्रांच्या मालिकांमधून भेटणारे भय्यासाहेब ओंकार असे भारदस्त नावाचे व्यक्तिमत्त्व सुहास ज्या संयतपणे रंगवतो, तेवढेच मुकुंद केळकरांचे चित्रण दोस्ताच्या टपरीवर चहा पिता पिता गप्पा
माराव्यात अशा अनौपचारिक पद्धतीने डोळ्यासमोर उभे करतो. कदमसर आणि प्रफुल्ला ही दोन व्यक्तिचित्रे त्या त्या व्यक्तींच्या वेगळेपणाला न्याय देणारी आहेत. उत्साहमूर्ती प्रफुल्ला तिचे नवनवीन कार्यक्रम, उपक्रम, नवीन कलावंतांना सहज आणि सतत दिलेला आधार. मोठी मोठी स्वप्नं पाहणे आणि प्रत्यक्षात आणणे. उच्चभ्रू सोसायटीमधील वावर
आदी गोष्टींच्या बरोबर विरुद्ध असणारे कदमसरांचे व्यक्तिमत्त्व! साहित्य, चित्रकला, काव्य, संगीत, सौंदर्यशास्त्र, लेखन, गायन, वादन आदी अनेक अंगाने जीवनातील अर्थपूर्णतेला भिडण्याचा अट्टाहास, किंवा प्रामाणिक प्रयत्न सरांना वेगळी ओळख देतो.
रंगाच्या पॅलेटवर कद्रूसारखा थोडासाच रंग दिसल्यावर "काय चिमणी शिटल्यासारखा रंग घेतला आहे' म्हणून रंगाची अख्खी ट्यूब वापरणारे सर, रंग लोण्यासारखा लावला पाहिजे, म्हणून मुक्तहस्ते कॅन्व्हासला लावू लागले की पोरांच्या पोटात गोळा उठत असे.
आणि मनाजोगता स्ट्रीक मारला की ‘अहाहा... काय मस्त सूर जुळला आहे. धा. धिं. धा... ता धिं. धीं.. धा. म्हणत असत आणि त्यानंतर ‘काही कळतंय का? काही लक्षाऽऽत येतंय का? फॉलोड? असा तकीया कलाम मागोमाग येत असे.

आपल्या विविध गुरुजनांबद्दल आपुलकीने, सजग दृष्टीने लिहीत असताना सुहास बहुळकर नकळत एक पर्व उभे करतात. गेले ते दिवस! असे म्हणत असताना सध्याच्या शासकीय अनास्थेपोटी आबाळ झालेल्या या कलेच्या वटवृक्षाची सावलीही आता उरलेली नाही, ही जाणीव चटका देणारी आहे. या बॉम्बे स्कूलच्या प्रवासात मोठमोठे कलाकार रस्त्यावरील प्रेमळ, शांत, वत्सल, थंडगार सावली देणारे, नवी उभारी देणारे वटवृक्षच होते. अशा या पुराणवृक्षांच्या गर्द छायेमध्ये वसलेल्या जे. जे.च्या दगडी वास्तूमध्ये ज्यांचे शिक्षण झाले ते भाग्यवान म्हणावे लागतील. ग्रंथालीसारख्या संस्थेने कलाविश्वाला वाहिलेला हा ग्रंथ प्रसिद्ध करून आपल्या शिरपेजात एक उंच दिमाखदार पिसांचा तुरा खोचलेले आहे. सर्वदूर हा ग्रंथ पोहोचविण्याचे काम झाले तर यासारख्या प्रयासाने चीज होईल. एका नव्या कलापरंपरेचा उगम होण्यासाठी पूर्वसुरींनी काय अद‌‌्भुत विश्व उभे केले होते, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते जाणण्यासाठी ‘बॉम्बे स्कूल- आठवणीतले, अनुभवलेले' हा ग्रंथ निश्चित मदत करेल. सर्व
कलाकारांनी, कलारसिकांनी हा प्रपंच एकदा तरी आवर्जून अनुभवावा!

बॉम्बे स्कूल : आठवणीतले/ अनुभवलेले
लेखक - सुहास बहुळकर
प्रकाशक - ग्रंथाली प्रकाशन मुंबई
पाने -२८०
raghuvirkul@gmail.com
बातम्या आणखी आहेत...