आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनकॉमन केजरीवाल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्यावर्षापासून ‘झंझावात’ हा शब्द सातत्याने कानावर आदळत होता. नेत्यांपासून तर अगदी सामान्यांना या शब्दाने पछाडले (खरे तर ग्रासले) होते. वातापेक्षाही या शब्दाचे दुखणे अधिक वाटायला लागले होते. पण हा ‘झंझावात’ साथीच्या रोगाप्रमाणे असल्याने त्याचा कधी ना कधी नायनाट होणार होताच. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरच्या विजयाची हवा मस्तकात शिरल्याने हा झंझावात वावटळीसारखा झाला. हा झंझावात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत कमरेचे काढून डोक्याला बांधत प्रचार करत असल्याचे लोकांनी पाहिले. या झंझावाताने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना राजपथवरून फ‍िरविले. चहाच्या निमित्ताने त्यांच्याशी नको तितकी सलगी केली. सगळ्यात कहर म्हणजे, आत्मक्लेश न होता, स्वत:चेच नाव कोरलेला दहा लाखांचा सूट बिनदिक्कत अंगावर चढवला. देशाला ही बाब आवडली नाही. दिल्लीकरांना तर मुळीच नाही. पण या झंझावातावर अक्सिर इलाज शाेधण्याची तयारी जून २०१४पासूनच सुरू झाली होती. त्याचा जो कर्ताधर्ता होता, त्याचे नाव अरविंद केजरीवाल!

आयआयटीमध्ये शिकलेला हा तरुण केंद्रातील आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून सेवा देत असतानाच समाजाचे देणे चुकवण्याच्या इराद्याने घराबाहेर पडला होता. झोपडपट्टीत राहणा-या लोकांच्या व्यथा-वेदना त्याला अस्वस्थ करीत होत्या. देशात चाललेल्या बिनघोर भ्रष्टाचारामुळे तळागाळातल्या माणसांचे जिणे किती दु:खदायक आहे, हे त्याने स्वत: अनुभवले होते. त्यातूनच बहुधा व्यवस्थेविरोधात पद-प्रतिष्ठा आणि बदनामी कशाचीही तमा न बाळगता रणशिंग फुंकण्याची ईर्षा त्याच्यात निर्माण झाली होती. ही ईर्षा समाजबदलाची होती, तितकीच राजकीय व्यवस्था बदलाचीही होती. खरे तर शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात आघाडीचा गुणवंत म्हणून ख्याती असलेल्या केजरीवालांना केंद्र सरकारच्या सेवेतला उच्चपदस्थ अधिकारी म्हणून खूप पैसा कमावता आला असता. मनात आणले असते तर पंचतारांकित आयुष्यही जगता आले असते; परंतु ठरवून निखा-यावरून चालत जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि तो मार्ग अनुसरताना त्यांनी दाखवलेली एकनिष्ठा, जिद्द, चिकाटी आणि त्याग तरुणाईला नवी ऊर्जा देणारा ठरला.

नोकरी करीत असताना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विधायक काम करण्याची घेतलेली शपथ आणि झोपडपट्टींतून सुरू असलेले त्यांचे व्यवस्थाबदलाचे प्रयोग यामुळेच केजरीवाल लोकांच्या हृदयात वसत गेले. आज एक दशकापेक्षा अधिक काळ केजरीवाल समाजसेवेच्या निमित्ताने जनतेमध्ये मिसळत आहेत. परंतु आम आदमी पार्टीची स्थापना केल्यानंतर त्यांना ख-या अर्थाने राजकीय वलय आले. २०११ ते मे २०१४ पर्यंतचे केजरीवाल आणि त्यानंतरचे केजरीवाल ही दोन रूपे पाहायला मिळाली. यादरम्यान समाजातील प्रत्येक घटकाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत बाबी मिळाव्यात म्हणून त्यांनी केलेली आंदोलने आणि थेट शेवटच्या माणसापर्यंत जाण्याची दांडगी इच्छाशक्ती यामुळे त्यांनी केलेल्या अनेक चुकाही क्षम्य होत गेल्या. २०१३ मध्ये मुख्यमंत्री होणे, ४९ दिवसांनंतर राजीनामा देणे, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातून उमेदवार उभे करणे आणि इतर कुणी नव्हे, तर स्वत: सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे, या आम आदमी पार्टीकडून झालेल्या चुका आहेत, हे मान्य करण्याची श्रीमंती त्यांनी जपली. वस्तुत: लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल चर्चेत नव्हते. प्रत्यक्षात तो चार राज्यांतील निवडणुकांमध्ये न उतरून त्यांनी दाखवलेला राजकीय शहाणपणा होता. तेव्हासुद्धा हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुका लढवाव्यात, असा मोहात टाकणारा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत गेला. परंतु आम आदमीच्या कोअर टीमला केजरीवाल यांनीच निवडणुका न घेण्याच्या निर्णयास राजी केले. राजकीय प्रगल्भता आल्याचेच ते लक्षण होते. जून २०१४ ते परवा मतदानापूर्वीपर्यंत आम आदमी पार्टीने दिल्लीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे सूक्ष्म जाळे पसरविले. भाजपच्या अतिप्रचंड प्रचार यंत्रणेला आव्हान देताना, नावीन्यपूर्णतेवर भर देत आपचा प्रत्येक नेता प्रत्येकाच्या दारात गेला. झालेल्या चुकांची क्षमा मागितली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातून पाणी, वीज, रोजगार, पक्की घरे, शिक्षण हे प्रश्न सुटले पाहिजेत, आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी आम आदमीच्या कोअर टीममध्ये जुलै-ऑगस्टपासूनच मंथन झाले. संपूर्ण दिल्लीचा आढावा घेण्यात आला. अगदी शहराची घाण वाहून नेणा-या गटारांच्या सद्य:स्थितीचाही बारकाईने अभ्यास झाला. अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, कुमार विश्वास, योगेंद्र यादव, संजय सिंग, आशुतोष, मनीष सिसोदिया याशिवाय विविध विषयांतील तज्ज्ञांनी बसून दिल्लीच्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठीचे अनेक अहवाल तयार केले. शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठीचा खर्च, दिल्लीला वायफाय सेवा देणे, महिलांना सुरक्षा देणे, शौचालये उपलब्ध करून देणे यासाठी लागणारा खर्च आणि हा निधी उभारण्याची योजना याची गोळाबेरीज करण्यात आली. त्यामुळेच पाणी मोफत देण्याची किंवा विजेचे बिल अर्ध्यावर आणण्याची केजरीवालांची घोषणा केवळ वा-यावरची वरात नव्हती, तर नियोजन आणि अंमलबजावणीचा तो सूत्रबद्ध आराखडा होता. एवढ्या मोठ्या धुळधाणीनंतर केजरीवालांना ६७ जागा मिळाल्या. मात्र ते सरकार चालवू शकणार नाहीत, दिलेली आश्वासने पार पाळू शकणार नाहीत, असा प्रचार भाजपने एव्हाना सुरू केला आहे. परंतु अन‌कॉमन केजरीवालांची ही सुधारित आवृत्ती लोकशाहीकडे कॉमन मॅनची झालेली सशक्त वाटचाल ठरली आहे.
कशी जिरवली!
आम आदमीला मिळत असलेल्या विजयाला सलामी देण्यासाठी सोनिया गांधी, ममता , नितीश, राहुल गांधी, उद्धव, राज अशा अनेक नेत्यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले. अभिनंदन करणे हा औपचारिकतेचा भाग असला तरी संपूर्ण निकाल लागण्याच्या आधीच या नेत्यांचे केजरीवालांना फोन जाणे, ही बाब नरेंद्र मोदी यांना ‘कशी जिरली’ हे सांगणारे होते. केजरीवालांचा विजय झाला असला तरी त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त आनंद हा मोदींचा तथाकथित रथ अडविल्याचा झाला आहे.

zadevikas@gmail.com