आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिगामित्वाचा बुरखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परपुरुषाला आकर्षण वाटेल, असं स्त्रीचं वर्तन असू नये, ही चारित्र्याच्या बाबतीत स्त्रीकडून अपेक्षा ठेवणे, ही पुरुषी मानसिकता आहे, असं मागच्या लेखात म्हटलं होतं; पण ती केवळ पुरुषी मानसिकता नाही, हे राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरजे यांनी लगेचच दाखवून दिलं आहे. मुलींनी कसं वागावं आणि कोणत्या वेळी घराबाहेर पडावं, या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे, एवढं म्हणूनच त्या थांबल्या नाहीत; तर बलात्काराच्या घटना घडायला नको असतील तर मुली आणि स्त्रियांचे कपडे व वर्तणूकही पुरुषांना आमंत्रण देणारी असू नये, अशी विशेष टिप्पणीही त्यांनी केली.
स्वत: डॉक्टर असलेल्या आशा मिरजे या एक महिला असल्या, तरी आपल्या समाजाचाच एक घटक आहेत आणि त्यामुळे समाजाचीच मानसिकता त्यांच्या बोलण्यातून प्रतिबिंबित झाली आहे, हे वेगळं सांगायला नको. मिरजेबार्इंच्या बोलण्यावर माध्यमांमधून वादळ उठलं आणि अंगभर साडी नेसलेल्या महिलेवर आणि तीन वर्षांच्या बालिकेवरही बलात्कार होतोच, असा प्रतिवादही करण्यात आला. तो आणखीही सुरू राहील; पण अशिक्षित असो वा उच्चशिक्षित, आपल्या समाजाची मानसिकता काय आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
माध्यमांनी टीका केल्यावर डॉ. आशा मिरजे यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांचे विचार बदलले आहेत, असं त्यांनी जाहीर केलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. समजा त्यांनी तसं जाहीर केलंही; तरी खरोखरच त्यांचे विचार सहजासहजी बदलतील, असे नाही. अशा वेळी आपण डॉ. मिरजे यांच्याकडे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून पाहू या. जाहीरपणे होणा-या टीकेच्या भीतीने किंवा पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेला असल्यामुळे बहुतांश जण त्यांची प्रतिगामी मानसिकता जाहीर होऊ देत नाहीत, एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळेच राजकारणात महिलांचं काम नाही, असं पुरुषच काय; असंख्य महिलाही मानत आल्या आहेत आणि अजूनही मानतात. त्यात त्या महिलांचाच पूर्णपणे दोष आहे, असे नाही.
आपल्याकडे असलेल्या संस्कृतीच्या संकल्पना आणि लहानपणापासून मनावर वेगवेगळ्या मार्गाने होणा-या संस्कारांचा तो दीर्घकालीन परिणाम आहे. हळूहळू सांस्कृतिक मिश्रण वाढत चाललं आहे आणि त्यामुळे मानसिकताही बदलत चालली आहे, हे खरं; पण महिलांना राजकारणाचं व्यासपीठ आपल्यासाठीही तितकंच मुक्त आहे, अशी भावना निर्माण करण्याइतपत परिस्थितीत परिवर्तन व्हायला अजून काही वर्षे जावी लागणार आहेत. उत्क्रांतीच्याच मार्गाने हे
होईल, क्रांतीच्या मार्गाने नव्हे. पण प्रश्न आहे, असं घडत नाही तोपर्यंत काय करायचं?
अर्थात, अशी सामाजिक मानसिकता असल्यामुळे आतापर्यंत महिला राजकारणात गेल्याच नाहीत, असं झालं का? ज्या गेल्या त्या सर्वच चारित्र्याच्या दृष्टीने बदनामच झाल्या का? ठामपणे ‘नाही’ हेच उत्तर समोर येतं. अशा महिलांची संख्या भारतीय राजकारणात पुरुषांच्या तुलनेत अत्यंत कमी असली तरी त्यांनी त्यांचा ठळक असा ठसा नक्कीच उमटवला आहे, हे विसरता येत नाही. प्रजासत्ताकानंतर 14 महिला या देशात एकूण 24 वेळा मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार आहे का? इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील थेट राष्टÑपती झाल्या. मंत्री आणि आमदार, खासदार यांची संख्या तर आणखी खूप मोठी आहे. जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणा-या आणि विजयापासून दूर राहिलेल्या महिलांचा विचार केला, तर विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्यानंतरची सक्रिय राजकारणातली महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यातल्या काही महिलांच्या वाटेला तात्कालिक बदनामी आलीही असेल; पण त्या डगमगल्या नाहीत, घाबरून घरी बसल्या नाहीत आणि म्हणून राजकारणात टिकून आहेत. अर्थात, राजकारणात सक्रिय होताच समाजाकडून झालेल्या बदनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक शिक्षित आणि उच्चशिक्षित महिलाही मी पाहिल्या आहेत. काहींना मुद्दाम बदनाम केलं गेलं, तर काहींनी आपल्या वर्तणुकीतून बदनामी ओढवून घेतली. पण ज्यांना हेतूत: बदनाम केलं गेलं, त्यांनी वेळीच सावध होऊन आवश्यक ती पावलं उचलायला हवी होती. ती उचलली नाहीत, हा त्यांचा दोष आणि ज्यांची त्यांच्या वर्तणुकीमुळे बदनामी झाली त्यांनी आचारसंहिता पाळली नाही, हा त्यांचा दोष.
समाजाची एकूणच मानसिकता आणि त्यामागची कारणं पाहिली, तर समाजाला सार्वजनिक जीवनात, विशेषत: राजकारणात काम करू इच्छिणा-या महिलांकडून कशा वर्तणुकीची अपेक्षा असते, याची जाणीव राजकारणात भरीव कामगिरी करण्यात यशस्वी झालेल्या महिलांना होती, हे जाणवल्याशिवाय राहात नाही. त्यांचं एकूणच व्यक्तिमत्त्व आणि वागणं, बोलणं, बॉडीलँग्वेज आताच्या डॉ. मिरजे यांना अपेक्षित असल्यासारखीच असावी, हा नुसताच योगायोग नाही.
deepakpatwe@gmail.com