आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Ashay Pariwar Special Issue By Ganesh Manohar Kulkarni

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आशय' समृध्‍द वाचनानुभव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेले कैक दिवस खरे तर महिने, नवे काही चांगले वाचायला मिळत नव्हते. नव्या पुस्तकांसाठी दुकानात जायला जमत नव्हते. नोकरीची अडनिड वेळ आणि नव्याने घेतलेल्या घराच्या व्यापात अखंड बुडालो होतो. स्वत:चा राग यायला लागला होता. सगळी तगमग तगमग होत होती. त्रागा नक्की कशाचा, तेच कळत नव्हतं. अशा वेळी ‘आशय-परिवार’चा ग्रंथ-लेखन हक्कदिन विशेषांक २०१५चा अंक हातात आला आणि वाचता वाचता ताळ्यावर आलो.
संपूर्ण अंकात डॉ. आनंद जोशींचा एकमेव लेख. तोही वाचन/लेखन, त्या संदर्भातलं मेंदू विज्ञान या विषयावरचा. अंक हातात घेता क्षणी त्यातला साधेपणा मोहवून गेला. शब्देविण संवाद साधणारी शिरीष घाटे यांची प्रवाही रेषािचत्रं आणि मलपृष्ठावरची बज्रेश कानुनगोची हिंदी कविता इतकी सहज सोपी की, भारावून जावं. परत छापताना कुठलाही भाषिक आग्रह न धरता, हिंदीतच छापल्यामुळे त्याचा आनंद मनापासून घेता आला. कवितेतला साधेपणा तर मोहवून टाकणारा. पुस्तकांच्या प्रदर्शनात फिरता फिरता एखाद्या लेखकाच्या प्रेमात जसे आपण सहज पडतो, तसेच कवीही विष्णू नागरच्या प्रेमात पडलाय आणि तितक्याच साधेपणानं कविता कागदावर उतरली आहे. आतल्या लेखात डॉ. जोशींनी तॉमस ट्रॉन्सटॉमर या नोबल विजेत्या कवीचा उल्लेख केला आहे. कवी म्हणतो, कविता मोठी होत जाते आणि कवी आक्रसत जातो. तसेच या कवितेबद्दलही म्हणता येईल.

मला वाचायला सलग वेळ फार कमी वेळा मिळतो. पण हा अंक मी सलग वाचलाच नाही. कारण, मला तो पुरवून पुरवून वाचायचा होता. एखादे आवडते गाणे किंवा मेहंदीने गायलेली गजल संपूच नये असे वाटावे, तसा हा लेख संपूच नये आणि आपण वाचत राहावे, असे सतत वाटत राहिले. लेखन/वाचनाचा आणि मेंदूचा अशा तऱ्हेनं विचार करता येतो, हेच भारावून टाकणारं होतं. माझ्यासारखा माणूस जो सतत पुस्तकातच सगळे आनंद/दुःख शोधत असतो. सगळ्या जाणिवा पुस्तकातून व्यक्त झाल्या पाहिजेत, याबद्दल आग्रही असतो, त्याला हा अंक म्हणजे ऑक्सिजनचा छडा लागण्यासारखं होतं. एखादा सुंदर, शुद्ध पाण्याचा झरा गवसावा आणि त्याचे पाणी पित आपण तृप्त व्हावे, ही भावना हा लेख वाचताना सतत येत होती.
लेखात एका ठिकाणी जेम्स जॉईसच्या ‘द डेड’ नावाच्या कथेचा उल्लेख आहे. ती कथा समजावून देणारे जॉर्ज स्टेनर आपल्या सहाध्यायींना कथेतल्या शब्दांना वाचताना त्याच्यातलं संगीत ऐकायला सांगतात. हे ऐकताना स्वत: जॉर्ज व त्यांच्या मित्रांचे डोळे नकळत पाणावतात. हा मुद्दा वाचला आणि तब्बल दोन ते तीन दिवस याच ठिकाणी थांबलो. त्या जेम्स जॉईसच्या कथेचा, त्यातल्या संगीताचा अदमास घेत राहिलो. माझा मित्र गजलकार चंद्रशेखर सानेकरशी धबधबा कोसळावा तसा या संदर्भात बोलत राहिलो. हे सगळं वाचताना जे वाटत होतं, ते तसंच वाहून जाऊ नये, वेळ पडली तर त्याच्याशी परत बोलून सगळे पुन्हा अनुभवता येईल, हाच हेतू होता. परत हे वाचताना स्वत:चं करंटेपणही जाणवत राहिलं की, आम्हाला कुणी जॉर्ज स्टेनर कुठल्या टप्प्यावर कधी भेटलाच नाही; ज्याने अशा अवघड कथा आम्हालाही समजावल्या असत्या. लेखात एके ठिकाणी ‘अॅलिस इन वंडरलँड’ या पुस्तकाबद्दल लिहिलं आहे. यातल्या कथा वाचतच आपण मोठे होत जातो; पण इंग्लंडमधला एक सुज्ञ वाचक, अॅलिस जेव्हा बोटीतून निघाली त्या दिवशीची तारीख टाकून त्यांच्या हवामानखात्याला विचारतो की, या या तारखेला हवामान कसे होते? आणि तिथले तत्पर हवामान खाते, त्या तारखेचे जुने बाड शोधून ‘आकाश ढगाळलेले होते’ असे उत्तरही तत्परतेने देते. तेव्हा इंग्रजांची नोंदी ठेवण्याची सवय स्वत:ला लाजायला लावते. इतकेच नव्हे, तर वाचन व्यवहारातील पारदर्शकतादेखील जाणवून जाते. (असे म्हणतात की, पहिल्यांदा जेव्हा इंग्रजांचा गव्हर्नर आपल्या बाजीरावांना भेटला, तेव्हा त्याच्या हातात पृथ्वीचा ग्लोब आणि दुर्बीण होती. या कशाशीही आपल्या पेशव्यांचा यापूर्वी संबंधच आलेला नव्हता. नाही इंग्रज आपल्यावर राज्य करणार?)

लेखाचा आवाका संदर्भांनी ओतप्रोत भरलेला आहे. त्यांच्या संदर्भसूचीतली पुस्तके जर कधी वाचायला मिळाली तर आपण नक्कीच अधिकाधिक श्रीमंत होत जाऊ, यात काही शंका नाही. लेखकाला स्वत:च्या विषयाचा आवाका माहीत आहे. खरे तर मेंदू हाच एक जटिल अवयव आहे आणि त्याबद्दल, त्यात होणा-या घडामोडींबद्दल इतक्या छानपणे लिहिणे आणि असे काहीतरी लिहायला वाव देणारे दोघेही मला ग्रेट वाटतात. आपण रोज एक इंच वरच्या दिशेने वाढायला हवे, हा आयुष्यभराचा हेका या अंकामुळे अधिक सोपा होत गेला. स्वत:ला समृद्ध करण्याचा इतका चांगला मार्ग दुसरा कुठलाच असू शकत नाही. हरिवंशराय बच्चन त्यांच्या एका लेखात तेजी बच्चनच्या मुलाखतीबद्दल लिहितात. ते म्हणतात, ‘तेजीशी माझी जेव्हा पहिल्यांदा ओळख करून देण्यात आली, त्या वेळी खोलीत एक दिवा जळत होता. तिला बघितलं आणि माझ्याही आत एक दिवा उजळला.’ असाच दिवा माझ्याही आत या वाचनाने उजळल्याचा अनुभव सध्या मी घेतोय.

अत्त दीप भव! याचा याहून चांगला प्रत्यय दुसरा कुठलाही असू शकत नाही. खरे तर ‘आशय’चा अंक चटकन मिळायला हवा, यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात यायला हवी. आज डोंबिवलीतल्या कुठल्याही ग्रंथालयात हा अंक असणे अशक्य, बाजारात विकत मिळणे दुरपास्त. माझ्यासारख्या अनेक वाचकांची ही कुचंबणा दूर करायला काही पर्याय शोधायला हवा. असे अंक दुर्मीळ का असतात? आजच्या जमान्यात सगळे सहज उपलब्ध होताना, हा अंक का नाही उपलब्ध होऊ शकत?
माझ्यासारख्या तमाम वाचनवेड्या फकिरांपर्यंत हा अंक पोहोचावा, या अपेक्षेत इथेच थांबतो.

magnakul@rediffmail.com