आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Astrology By Shridhar Tilve, Divya Marathi

ज्योतिषशास्त्राचे साम्राज्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अध्यात्माचा उदय होऊ लागल्यानंतर ‘नियती’ या संकल्पनेला आव्हान दिले गेले. माणसाचे आयुष्य हे नियतीकडून नियंत्रित होत नसून, ईश्वराकडून किंवा देवांकडून नियंत्रित होते, ही संकल्पना त्यापाठोपाठ उदयाला आली. त्यातूनच ‘दैव’ ही संकल्पना आकार घेऊ लागली. दैवाचा अर्थच मुळी जे देवाने दिले ते, असा होतो. नियती देवांनाही बदलता येत नाही, पण दैव मात्र देव बदलू शकतो. देवाला प्रार्थना केल्यास देव तुमची नियती बदलतो, या धार्मिक विश्वासाच्या आधारातूनच प्रार्थना ही क्रिया अधिकाधिक प्रभाव गाजवायला लागली. साहजिकच या दैव संकल्पनेचा (आपल्याकडील ‘रामायण’ आणि ‘महाभारता’वर या दैव संकल्पनेचा प्रचंड प्रभाव आहे.) प्रभाव तत्कालीन साहित्यावर पडला. माणसाचे भविष्य देव ठरवत असल्याने साहजिकच भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणे, हा एक जीवनाचा उपचार बनला.
या आध्यात्मिक धारणेतूनच अनेक शास्त्रे जन्मली. पण शास्त्राला तर्काचा आधार द्यावा लागतो. केवळ आंधळ्या विश्वासापोटी शास्त्र एखादी गोष्ट स्वीकारत नाही. शास्त्र तर्काच्या आधारे पडताळणी करते. मात्र शास्त्राच्या आधारे सिद्ध झालेले सत्य हे विज्ञानाच्या कसोटीवर टिकेल, याची मात्र कधीच खात्री नसते. किंबहुना, शास्त्रातील अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचेही पुढे सिद्ध झाले आहे. प्रथम अध्यात्म, मग दर्शन, मग त्या दर्शनाच्या आधारे शास्त्र आणि मग शास्त्राच्या आधारे धर्म अशी मांडणी या काळात विकसित झाली. याच काळात शास्त्र म्हणून इतिहासाचा उदय झाला. भविष्यात जिज्ञासा असणा-या माणसाने भविष्य सांगण्याचे शास्त्र (भविष्यविज्ञानाच्या इतिहासात पायाभूत मांडणी करणारा काळ म्हणून हा काळ बघितला जातो.) निर्माण करता येईल का, याची चाचपणी करायला सुरुवात केली.
या धार्मिक कालखंडात भविष्यविज्ञानाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. ग्रीसमध्ये प्लेटोने भविष्याचा वेध घेणारा युटोपिया प्रथमच निर्माण करत भविष्याचा शास्त्रशुद्ध विचार करता येणे शक्य आहे, हा विचार दिला. भारतात याच दरम्यान भविष्यपुराण लिहिले गेले. हे भविष्यपुराण कोणी लिहिले, हे माहीत नसले तरी भारतीय भविष्यविज्ञानाच्या इतिहासातील हे पहिले पुस्तक म्हणून त्याची आवर्जून नोंद घ्यावी लागते. या भविष्यपुराणाने सर्वात प्रचलित केलेली कल्पना म्हणजे कलियुग.
या काळातील सर्वात प्रभाव टाकणारे भविष्यविज्ञानाच्या अंगाने उदयाला आलेले शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिष हे शास्त्र आहे की विज्ञान की थोतांड, हा वाद गेली कित्येक दशके महाराष्ट्रात चाललेलाच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपश्चात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ज्योतिषशास्त्राकडे पाहायला वेळ नसला तरी, एकेकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषशास्त्राच्या विरोधात मोहीम सुरू केली होती, हे सर्व जाणतातच. माझ्या मते, ज्योतिष हे विज्ञान नाहीच. त्याला वैज्ञानिक दर्जा द्यायचा, जो काही प्रयत्न चाललेला आहे तो व्यर्थ आहे. मात्र ज्योतिष हे शास्त्र म्हणून कायमच राहील, असे मला वाटते. अर्थातच, ज्योतिषी या जमातीने या शास्त्राची रया पूर्णपणे घालविलेली आहे. तर्कशास्त्राचा आणि ज्योतिषांचा काही संबंध उरलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिका व युरोपमध्ये या संदर्भात अधिक खोलवर अभ्यास सुरू आहे. मात्र ज्योतिष ही काहीतरी प्रयोगशाळेत सिद्ध होणारी गोष्ट आहे, असे मानणे जोपर्यंत ज्योतिषी सोडून देत नाहीत, तोवर त्या शास्त्रावर वादविवाद होणे अटळ आहे.
खरे तर ज्योतिष हे ओपन असावे. मात्र विज्ञानाचा दर्जा त्याला कधीही देऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या संदर्भात काही कृती करता येणे, ही शक्यता माणसाने कधीच सोडू नये, या संदर्भात जितके संशोधन करता येईल तितके करावे आणि सर्व पर्याय खुले ठेवावेत. ज्योतिषाचा केवळ एक पर्याय म्हणून विचार करावा, हाच यातला खरा मध्यममार्ग आहे.
साहित्यात या संदर्भात सर्वाधिक गाजलेली कृती म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘कालाय तस्मै नम:’ हे नाटक. या नाटकाने इतके यश मिळविले की पुढे त्याच्यावर अमोल पालेकर यांनी ‘अनकही’ नावाचा सिनेमा काढला. अर्थातच, किरकोळ पातळीवर मराठी साहित्यात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख येत असला, तरी प्रत्यक्ष साहित्यात मात्र ज्योतिषशास्त्राचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही.
सर्वाधिक गमतीचा भाग म्हणजे, साठोत्तरी साहित्यिकांच्या पिढीमध्ये भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, चंद्रकांत पाटील हे उत्तम ‘ज्योतिषी’ आहेत. यातील चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या समकालीन लेखकांच्या कुंडल्यांचा सांगोपांग अभ्यास करून त्यावरून एक लेखही लिहिला होता. अर्थातच, अशा प्रकारच्या मांडणीला दाद देणे हे मराठीत मागासलेपणाचे समजले जात असल्याने त्यावर फार चर्चा झाली नाही. गमतीचा भाग असा की, या लेखकांच्या प्रत्यक्ष साहित्यात मात्र ज्योतिषशास्त्राचा फारसा प्रभाव दिसत नाही. मात्र अनेक कवींच्या कवितांत हास्यरेखा, हातावरचे उंचवटे, हातातले खडे, बोटांचा ज्योतिषीय अर्थ, शनीची साडेसाती, मांगलिक असणे यांसारख्या अनेक संकल्पनांचा मार्मिक वापर झालेला दिसतो. मात्र नियती या संकल्पनेचा जेवढा प्रभाव साहित्यावर पडला आहे, तेवढा दैव व ज्योतिषशास्त्र यांचा पडलेला नाही. यामागचे कारण उघड आहे. ज्योतिष हे तर्ककर्कश आहे, तर नियती ही संकल्पना कलात्मक आहे. साहजिकच तिचा कलात्मक वापर अधिक चांगल्या रीतीने करता येतो. त्यामुळे साहजिकच जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, काही अंशी दिलीप चित्रे यांच्या साहित्यात नियतीचा विचार प्रचंड झालेला दिसतो. दिलीप चित्र्यांना तर खड्यांचे प्रचंड वेड असल्याने त्यांच्या अनेक कथांतून या खड्यांचा प्रभावी वापर केलेला दिसतो. विशेषत: माणिक आणि नीलम.
अर्थातच, ज्योतिषशास्त्राला आव्हान देणारा एक विचार प्राचीन काळापासून भारतात आहे. विशेषत: चार्वाक आणि बौद्धदर्शनाने ज्योतिषशास्त्राला पूर्ण नकार देऊन, आपला कडवा विरोध नेहमीच जारी ठेवला. दुर्दैवाने ज्याला चार्वाकीय साहित्य म्हणावे, असे साहित्यात फारसे निर्माण न झाल्याने ज्योतिषशास्त्राचा प्रभाव काही ओसरला नाही. कालांतराने बौद्धदर्शनात महायानाचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसा बौद्धदर्शनातील ज्योतिषशास्त्राचा शिरकाव चीन, जपान, तिबेट यांसारख्या देशात होत बौद्ध ज्योतिष्यांचा उदय झाला. या बौद्ध ज्योतिष्यांनी ज्योतिषशास्त्राचा स्वीकार केल्याने, साहजिकच अनेक बौद्ध राजांनी ज्योतिष्यांना आश्रय द्यायला सुरुवात केली. परिणामी, बुद्धाच्या जन्मापूर्वीसुद्धा बौद्ध जन्मणार, अशा प्रकारचे ज्योतिषीय उल्लेख बौद्ध
साहित्यात झळकू लागले. राजपुत्र सिद्धार्थाचे भविष्य सांगणारा ज्योतिषी आला. मूलभूत कथेतच ज्योतिषाचा शिरकाव झाल्यानंतर संपूर्ण बौद्ध धर्मात ज्योतिषशास्त्राचा शिरकाव होणे अटळच होते. याचा परिणाम चिनी आणि जपानी बौद्ध साहित्यात आपणाला जाणवतो. तिबेटमध्ये तर लामा कोण होणार, हेही आधीच ठरू लागले आणि साहजिकच आजतागायत संपूर्ण आशियावर ज्योतिषशास्त्राचे साम्राज्य पसरले. ते आजही अबाधित आहे.

shridhar.tilve1@gmail.com