आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रूम...ब्रूम...ब्रूम..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीरो मॅजेस्टिक मोपेड, ‘काफी कम दाम की, बडे आराम की...ये जमीं ये आसमान, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत की बुलंद तसवीर हमारा..., ये बुलेट मेरी जान, मंजिलों का निशान’ गतकाळातील या जाहिरातींच्या स्मरणरंजनात रममाण होताना कितीतरी जुन्या दुचाकी आपल्या जवळून जाताहेत, असे भासू लागते. लूना, एम-50, एम-80, प्रिया, लॅँब्रेटा, व्हेस्पा, चेतक, सुपर आणि अशा कितीतरी दुचाकींनी गेल्या 40-50 वर्षांत भारताच्या वाहन बाजारपेठेत क्रांतिकारी स्थित्यंतरे घडवून आणली. तसे म्हटले, तर सर्वसामान्यांना परवडणारी सायकल ही ख-या अर्थाने पहिली सहजप्राप्य दुचाकी. गरज आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता इंधनावर चालणा-या वाहनांची आवश्यकताही त्या वेळी नव्हती. पण 80च्या दशकात कायनेटिक लुना आणि टीव्हीएस मोपेडने या ‘सायकल वर्गा’ला आकर्षित केले. क्लच दाबून पॅडल मारले की लुना सुरू आणि पेट्रोल संपले की पुन्हा सायकल, हा दुहेरी फंडा त्या काळच्या सायकलस्वारांना मनोमन पटला. तेथेच लुनाने बाजी मारली. सायकलकडून स्वयंचलित वाहनांकडे वळण्याचे हे पहिले संक्रमण होते. महत्त्वाचे म्हणजे, त्या काळात हर्क्युलस आणि बीएसए, अ‍ॅटलाससारख्या सायकली पाचशे-सहाशे रुपयांत, तर लुना दोन-अडीच हजार रुपयांत मिळायची. त्यामुळे थोडेसे जास्त पैसे टाकण्याची तयारी आहे, पण मोटारसायकल घेण्याची ऐपत नसलेला वर्ग प्रामुख्याने त्याकडे वळायचा. त्या काळात मोटारसायकल (रॉयल एनफील्ड वगैरे) दारात उभी असणे म्हणजे ‘शान की बात’ समजली जायची. परंतु तुरळक पेट्रोल पंप आणि तेही बव्हंशी गावाच्या बाहेरच असल्याने कमीत कमी इंधनात गावातल्या गावात फिरण्यासाठी लुना हाच उत्तम पर्याय ठरायचा.
नेमकी ही अडचण ओळखून बजाजने ‘एम-50’ दुचाकी पहिल्यांदा बाजारात आणली. पॅडलची भानगड नसलेली ही सुधारित आवृत्ती. काहीशा स्कूटरच्या अंगाने जाणा-या या वाहनांना मिळालेला लक्षणीय प्रतिसाद बघून ‘बजाज’ने नंतर ‘बजाज एम-80’ बाजारात पेश केली. गंमत म्हणजे, या दोन्ही गाड्यांचे अ‍ॅव्हरेज 30-35पेक्षा जास्त नव्हते. दुचाकींच्या दुनियेत ‘लॅँब्रेटा’च्या रूपाने लांबुडक्या आकाराची पहिली स्कूटर बाजारात आली. या स्कूटरची दुचाकीप्रेमींना भुरळ पडलेली असतानाच, ‘एलएमएल’च्या ‘व्हेस्पा’चे आगमन झाले. रस्त्यावरून धावण्यात मस्त आणि मजबूत असलेल्या व्हेस्पाने पुढची बरीच वर्षे ग्राहकमनावर राज्य केले. व्हेस्पानंतर 90च्या आधीच्या दशकात चेतक, सुपर सारख्या स्कूटर्सने आपला दबदबा निर्माण केला. होंडा कंपनीने ‘कायनेटिक होंडा’ ही स्कूटरेट वर्गातली पहिली सुटसुटीत दुचाकी बाजारात दाखल केली.
मधल्या काळात देशाची अर्थव्यवस्था खुली होऊन जागतिकीकरणाला वेग आला, तसा मध्यमवर्गाच्या हातात पैसा खेळू लागला. आलेल्या पैशाने महत्त्वाकांक्षाही उंचावत गेल्या. स्वत:चे घर-जमीन- गाडी आदी गोष्टींना महत्त्व येत गेले. परिणामी घरबांधणी आणि वाहननिर्मिती क्षेत्राचा ‘न भूतो न भविष्यति’ असा विस्तार होत गेला. गावा-शहरांत नवनवीन इमारती उभ्या राहू लागल्या. रस्ते चारचाकी-दुचाकी वाहनांनी गजबजू लागले. या संदर्भात आजच्या घडीचा विचार करता वाहन खरेदी करणारा नेमका ग्र्राहक द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. याच शहरांमध्ये स्कूटी, अ‍ॅक्टिव्हासारख्या स्कूटरेट्सचे प्रमाण पूर्वीच्या 15 ते 17 टक्क्यांवरून आता 35 ते 40 टक्क्यांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण गिअर नसलेल्या दुचाकींचे असले तरी यात मोटारसायकलींचा वरचश्मा कायम असून त्याचे प्रमाण 60 ते 65 टक्के आहे. 18 ते 50 वयोगटाचे प्राधान्य मोटारसायकलला असले तरी चालवण्यास सोपी, बसायला सुटसुटीत, गिअरची भानगड नाही, हे बघून साधारणपणे पन्नाशीच्या पुढचा वर्ग स्कूटरेट्सच्या प्रेमात पडलेला दिसत आहे.
आश्चर्य म्हणजे, गेल्या दोन दशकांत दुचाकी कंपन्यांच्या भागीदा-यांमध्ये अंतर येऊनही त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम या बाजारपेठेवर झालेला नाही. होंडाबरोबर काडीमोड घेतल्यानंतर हीरो मोटोकॉर्पने दुचाकी बाजारपेठेत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. टीव्हीएस आणि सुझुकीनेही काडीमोड घेतला. बजाजने कावासाकीशी फारकत घेतली. स्वतंत्र होऊन या सगळ्या कंपन्यांनी नव्या ग्राहकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये होंडाची ‘अ‍ॅक्टिव्हा’ कायम राहिली. मग हीरोने ‘प्लेजर’ बाजारात आणली. टीव्हीएसकडे स्कूटी आली. तर अगदी यामाहादेखील यापासून दूर राहू शकली नाही आणि तिने ‘यामाहा रे’ बाजारात सादर केली. स्कूटर निर्मितीतून बाहेर पडण्याच्या ‘बजाज’च्या निर्णयानंतर गिअरलेस स्कूटरमध्ये महिंद्र टुव्हिलर, यामाहा, पियाजिओ हे नवे स्पर्धक आले. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या पूर्वीपासून मनात ठसलेले ब्रॅँड हिरावून घेतलेले नाहीत.
उलट जुन्या जमान्यातील ‘रॉयल एनफील्ड’ला कंपनीने अगदी नवा यंग लूक दिला आहे. हीरो होंडा प्लेजर, मेस्ट्रो, यामाहा रे, महिंद्र पंटेरो, रोडिओ, ड्युरो, रोडिओ आरझेड, पियाजिओ व्हेस्पा, टीव्हीएस वेगो, ज्युपिटर, स्कूटी स्ट्रेक, स्कूटी पेप, होंडा अ‍ॅक्टिव्हा, डिओ, सुझुकी एक्सेस 125, बजाज स्क्रिस्टल अशा नाना प्रकारच्या स्कूटरेट्स रस्त्यांवर सुसाट धावत आहेत.
एकूणच, देशी-विदेशी टू व्हीलर निर्मिती कंपन्या ‘डिमोग्राफिक डिव्हिडंड’ मिळण्याकडे चातकासारखे डोळे लावून असलेल्या भारताच्या खात्रीलायक बाजारपेठेत दाखल होत, बक्कळ कमाई करत आहेत. हे ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याचे लक्षण आहेच; पण भविष्यात भारताची इंधनाची गरज वाढून अवलंबित्व वाढत जाणार, याचाही हा इशारा आहे.
बाइक मार्केटचा धडाका
* हीरो मोटोकॉर्प : ‘आरएनटी’ डिझेल- इलेक्ट्रिक हायब्रीड स्कूटर, लिप हायब्रीड स्कूटर (या दुस-या तिमाहीत), हीरो डॅश, फोर स्ट्रोक, 111 सीसी (दुस-या तिमाहीत), हीरो एचएक्स 250 आर स्पोर्ट्स बाइक (पुढील वर्षाच्या दुस-या सहामाहीत),
150 सीसी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स बाइक (पहिल्या तिमाहीत)
* महिंद्रा टू व्हीलर : सेंट्युरो एन 1 (सेंट्युरो मायनसच्या तुलनेत 2000 रुपयांनी स्वस्त)
* डीएसके ह्योसंग : जीडी 250, जीव्ही 250 अ‍ॅक्विला मोटरसायकल
* टीव्हीएस मोटर : टीव्हीएस रॉकझेड 125 (एमपी 3, एफएम रेडिओ, अँटिथेप्ट लॉक)
* यामाहा मोटर्स : अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणारी नवी स्कूटर
याशिवाय, जपानच्या टेरा मोटर्स कॉर्पोरेशनने मागच्याच आठवड्यात थेट 18 लाख रुपये किमतीची आणि 1000 सीसी क्षमतेची सुपरबाइक बाजारात आणली. सध्या थेट जपानवरून आयात होणारी ही देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाइक आहे.
kalesantosh70@gmail.com