आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Awara Film By Dharmendra Pratap Singh

बाप से बेटा सवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांचा उल्लेख ‘बॉलीवूड्स फर्स्ट फॅमिली’ असा होतो, त्या कपूर घराण्याचे अध्वर्यू पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र राज कपूर यांना ‘बरसात’च्या जबरदस्त यशाने नवी ओळख दिली. त्या वेळच्या ठरावीक पठडीतल्या सिनेमांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी आणि केवळ ‘पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा’, यापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी राज कपूर कमालीचे आतुर होते. साहजिकच ते एका आगळ्या पटकथेच्या शोधात होते, त्याच वेळी योगायोगाने ख्वाजा अहमद अब्बास एका निर्मात्याच्या शोधात होते. राज यांचे पुत्र ऋषी कपूर सांगतात, ‘डॅड सांगतात की, अब्बास साहेबांनी ‘आवारा’ची कथा महबूब (खान) साहेबांसाठी लिहिली असली तरीही त्यांच्या नजरेपुढे पृथ्वीराज व राज कपूर हीच दोन नावे होती. पण कथा ऐकल्यानंतर महबूब साहेबांनी युसूफसाहेबांचे (दिलीप कुमार) कास्टिंग करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्याला अब्बास कदापि मान्यता देणार नव्हते.
दुसरीकडे महबूब साहेबांना आपल्या समकालीन कलाकारांसोबत (पृथ्वीराज) काम करणेही मंजूर नव्हते. याविषयी जेव्हा डॅडना समजले, तेव्हा त्यांनी महबूब साहेबांना हा सिनेमा बनवण्याचे अधिकार आपल्याकडे सोपवण्याची विनंती केली. डॅडना निर्माता म्हणून आपले स्थान निर्माण करायचेच होते, हेदेखील त्याचे एक कारण असू शकते. शेवटी हे कथानक त्यांच्याकडे आलेच...’ यामुळे राज कपूर यांचा पुढील मार्ग सोपा झाला, असे मात्र झाले नाही. के. ए. अब्बास आणि व्ही. पी. साठे यांनी लिहिलेल्या ‘आवारा’नुसार ही राज नावाच्या एका सडकछाप तरुणाची कथा होती. राजच्या जन्मानंतर त्याच्या श्रीमंत न्यायाधीश वडलांनी-रघुनाथ यांनी त्याला सोडून दिलेले असते. राज कपूर यांनी पृथ्वीराज यांना न्यायाधीश रघुनाथ यांची व्यक्तिरेखा साकारण्याचा आग्रह केला, तेव्हा त्यांनी नकार दिला, ‘मी चित्रपटांमध्ये
मुख्य भूमिका करतो, मी वडलांची भूमिका करणार नाही.’ हिंदी सिनेमाचे ‘पितामह’ अशी ख्याती असलेले पृथ्वीराज खूप मोठे कलाकार होते.
त्यामुळे आपण त्यांना या भूमिकेसाठी राजी करू शकणार नाही, हे राज यांना कळून चुकले होते. अशा वेळी अब्बास साहेब स्वत: ‘पापाजीं’कडे गेले आणि त्यांना सांगितले, ‘सिनेमाचे हिरो तर आपणच आहात, कारण न्यायाधीश रघुनाथ यांच्या अवतीभोवती फिरणा-या या कथेमध्ये ‘आवारा’तर आपलाच मुलगा असेल!’ तेव्हा पृथ्वीराज राजी झाले. आणि त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी ‘आवारा’त साकारलेली न्यायाधीशाची भूमिका अविस्मरणीय ठरली.
‘आवारा’मध्ये राज आणि पृथ्वीराज पिता-पुत्र म्हणून भूमिका करत होतेच; शिवाय राज यांचा लाडका रणधीर आणि पृथ्वीराज यांचे दुसरे सुपुत्र शशीदेखील पडद्यावर झळकले. जरा तो सीन आठवून बघा, जेव्हा न्यायाधीश बनलेले पापाजी ‘आॅर्डर आॅर्डर ऑर्डर, मुल्जिम राज।’ असे म्हणतात, तेव्हा पथदिव्याच्या प्रकाशात कुत्र्याला भरवत असलेला एक मुलगा दिसतो, तोच रणधीर! आणि शशी कपूर यांनी बालपणीच्या राजची भूमिका केली होती. ‘आवारा’ (१९५१)मुळे स्वदेशातच नाही तर अगदी रशियापर्यंत लोकप्रियता मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार ठरले होते. आजच्या व्यवहार भाषेत सांगायचे तर, ‘आवारा’ हाच ओव्हरसीज मार्केट काबीज करणारा पहिला हिंदी सिनेमा होता आणि राज कपूर पहिले स्टार... शाहरुख
खान-सलमान खान-आमिर खान हे आजचे ओव्हरसीज स्टार्स त्यांचा वारसा पुढे नेत आहेत, इतकेच.
dpsingh@dbcorp.in