आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठीचं दुखणं: गैरसमजुतीपेक्षा जागरूकता महत्त्वाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनंदिन जीवनात आरोग्याविषयी अनेक गैरसमजुती आपल्या मनात घर करून असतात. त्यातील काही अतिशय क्षुल्लक असतात, पण कालांतराने शरीरास घातक ठरतात. अशाच काही पाठीच्या दुखण्यासंदर्भात असलेल्या गैरसमजुतींचा उलगडा येथे केला आहे.

१. गैरसमज : व्यायामामुळे पाठदुखी होते
सत्य: व्यायामाच्या अतिरेकामुळे पाठदुखी होऊ शकते, मात्र नियमित, संतुलित व्यायामामुळे पाठीला लाभ होतो. कणा निरोगी राहावा व त्याची लवचिकता आणि कणखरता वाढावी म्हणून पोहणे, योगाभ्यास व चालणे यासारख्या व्यायामांची पाठीला आवश्यकता असते.
२. गैरसमज : शस्त्रक्रियेमुळे पाठदुखी कायमची बरी होऊ शकते
सत्य: जरी काही शस्त्रक्रियांमुळे पाठीला झालेली दुखापत, वेदना ब-या होऊ शकत असल्या व पाठीची कार्यक्षमता ब-याच अंशी वाढत असली, तरी शस्त्रक्रिया हा पाठीच्या प्रत्येक समस्येवरील उपाय नाही. खरं तर, १ टक्क्याहूनही कमी रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. काही रुग्णांनी तर शस्त्रक्रियेनंतर पाठीची समस्या अधिकच गंभीर झाल्याचं सांगितलं आहे. रुग्णावर कोणत्या प्रकारचे औषधोपचार करावेत याचं अचूक निदान करणं क्लिष्ट असतं.
३. गैरसमज : वय वाढलं की पाठीचं दुखणं सुरू होतंच
सत्य: असं असेलच असं नाही. प्रत्यक्षात, तरुणांना पाठदुखीचा त्रास होणं ही सर्वसामान्य बाब झाली आहे. शरीराची योग्य ठेवण व योग्य जीवनशैली ही कुठल्याही वयामध्ये पाठ निरोगी राखण्याची सूत्रं आहेत.
4. गैरसमज : जर मी औषधं घेतली, तर मला व्यसन लागेल
सत्य: पाठदुखीवर दिल्या गेलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या बहुतांश औषधांचं व्यसन लागू शकत नाही. मात्र, तो एकमेव पर्याय नाही. त्यांच्यामुळे वेदना आटोक्यात येऊ शकतात, पण आजार समूळ नष्ट होत नाही. आजाराचं योग्य निदान, सुयोग्य औषधोपचार पद्धती आणि रुग्णावर देखरेख या उपचारासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
5. गैरसमज : झोपून विश्रांती घेणं हा पाठदुखीवरचा सर्वोत्तम उपचार आहे
सत्य: वास्तवात, ब-याचशा प्रकरणांमध्ये झोपून विश्रांती घेतल्यामुळे पाठदुखी वाढू शकते. तीव्र पाठदुखीसाठी झोपून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. युरोपियन मार्गदर्शक तत्त्वांनुसार २ दिवस झोपून विश्रांती घेतल्यास तिस-या दिवशी चालणं आवश्यक असतं (वैद्यकीय सल्ल्यानंतर). निष्क्रियतेमुळे पाठीची सहनशक्ती कमी होऊन ती कडक व कमजोर बनते. याशिवाय, पूर्ण दिवस झोपून राहिल्यामुळे नैराश्य येऊ शकतं. यामुळे पाठीचं दुखणं दीर्घकाळ टिकून राहातं.