आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळीमाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बहिणाबाई चौधरी’ सृष्टीचा एक नवलाचा चमत्कार! भल्याभल्यांना चकित करणारा हा चमत्कार घडला, खानदेशी मातीत! खानदेशमध्ये तीन स्त्रीरूपे जगन्मान्य आणि प्रसिद्ध आहेत. पहिली खानदेशची लोकदेवता ‘कानबाई’, दुसरी रामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी ‘शबरी’ आणि तिसरी अखिल साहित्य विश्वाला कवेत घेणारी आणि आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकमनाला मोहिनी घालणारी ‘बहिणाई’. साक्षात सृष्टिदेवतेची लेक!
खानदेशला प्राचीन काळी ‘ऋषिक देश’ म्हणून ओळखले जात असे, असे महादेवशास्त्री जोशी म्हणतात. (भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा पृ. ६३५ प्र. आ. १९६४) तर श्री. भा. रं. कुळकर्णी म्हणतात, पुराणात उल्लेखिलेला ‘आभीरदेश’ म्हणजे खानदेश होय. (लोकदेवता : कानबाई पृ. ४७
प्र. आ. १९९७) लोकदेवता कानबाईचा विवाह कन्हेर देवाशी होतो. या कन्हेर देवाचा प्रदेश किंवा कानबाईचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला ‘कान्हदेश’ आणि नंतर खानदेश म्हणत असावेत. आताचे अभ्यासक असे म्हणतात, तर काही थेट कृष्णाशी प्रादेशिक नाते जोडतात.
तर या प्रदेशाची भूमिकन्या ‘बहिणाबाई चौधरी’ एक अशिक्षित स्त्री, पण आता पंडितांनाही भुलविणारी. कोणत्याही मोठ्या लोकांच्या जन्मतिथीचे वाद प्रसिद्ध असतातच. बहिणाबाईही याला अपवाद नाहीत. कोणी बहिणाबाईंचा जन्म आसोदगावी महाजन घराण्यात १८७९मध्ये झाला, असे म्हणतात; तर कोणी बहिणाबाईंचा जन्म १८८०मध्ये नागपंचमीच्या दिवशी जळगावपासून जवळच असणा-या ‘असोदा’ या लहानशा खेड्यात झाला, असे म्हणतात. पण नशीब स्व. जिजामाता किंवा आद्यकवी मुकुंदराजांसारखा त्यांच्या जन्मस्थळाबद्दल तरी वाद नाही, हेच भक्कम झाले.
बहिणाबाईंचा जन्म नागपंचमीला झाला. हे जर आपण ग्राह्य धरले तर तो दिवस सर्वच दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व शुभ आहे. कृषिसंस्कृतीत व धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला अतिशय मानाचे स्थान आहे, आणि या श्रावणातील पंचमीला त्याहून मानाचे स्थान आहे. शेतक-याला नाग हा प्राणी त्याच्या शेतीच्या कामी उपयोगी आहे. त्यामुळे तो त्याची श्रद्धापूर्वक पूजा करतो. श्रावणात नागाच्या पूजेपासून महिन्याची सुरुवात होते आणि बैलांच्या पूजेने शेवट केला जातो. बहिणाबाईंचा जन्मच, असा कृषिसंस्कृतीशी थेट नाते प्रस्थापित करणारा आहे. त्यामुळेच त्यांच्या काव्यात लोकतत्त्वाचा साक्षात्कार घडतो. तसे पाहिले तर लोकतत्त्व हेच मानवतत्त्व आहे. जन, लोक, समाज, समूह या दृष्टीने माणसाचे तत्त्व. त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आदिमतेपासूनचा संदर्भ येतो. जन्मापासूनचे त्याचे वागणे, बोलणे, आचार-विचार, परंपरा, रूढी, विधी, संकेत यांचा समावेश होतो. मुळात म्हणजे, त्याच्या जीवनाचे मूलभूत, पायाभूत तत्त्व नैसर्गिक कसे आहे, हा विचार लोकतत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने बहिणाबाईंचे संपूर्ण जीवन आणि लेखन लोकतत्त्वीयदृष्ट्या परिपूर्ण आहे. त्यामुळेच अलौकिक जीवनानुभव त्या लौकिक पातळीवर व्यक्त करू शकतात. याचे प्रत्यंतर त्यांच्या दोन कवितांतून प्रामुख्याने येते.
त्यांची ‘आिदमाय’ विराट रूप लेवून त्यांना व आपल्यालाही दिपवून टाकते. ‘ही आदिमाया त्यांच्याप्रमाणेच त्यांना वेडी... अद‌्भुत वाटते, अलौकिक वाटते. आणि या अलौकिकातून त्यांची प्रतिभा दुथडी भरून वाहते आणि लौकिक पातळीवर स्थिरावते.’ म्हणूनच रसिकांना भुलवते. त्यांचे कलासक्त मन अचेतनात चेतना पाहते. निराकाराला आकार देते.
‘बारा गाडे काजळ कुंकू
पुरलं नही लेनं
साती समुदराचं पानी
झालं नाही न्हानं’
अशी ही निराकार आदिमाय मग बहिणाबाईंच्या शब्दकळांतून साकार होऊ लागते. मला इथे साती आसरांच्या आरतीची आठवण होते.
‘सात बाई बहिनी मिळाल्या
पान्यावरती गेल्या...
डोह माय पाह्यला संगीन
रमलं बाईचं मन...
परकर नेसल्या मशरूचा
भंगार सोन्याच्या...
लोकमानसातील या देवीरूपांना पाण्याचं अतिशय वेड. मानवाची जलासक्त प्रवृत्ती त्यातून प्रगटते. याच जलतत्त्वाचं साकार रूप म्हणजे या साती आसरा, ज्या लोकमानसाला प्रभावित करतात. बहिणाईंच्या गाण्यातील ‘सरोसती’ या लोकमानसाचं प्रभावी प्रत्यंतर घडविते. सृजन शक्तीचा साक्षात साक्षात्कार आपल्याला या कवितेतून घडतो. अशिक्षित बहिणाबाई, पण साहित्यनिर्मितीविषयी, अध्यात्माविषयी आपली ठाम मतं व्यक्त करते. तेही पुन्हा या निर्मितिप्रक्रियेशी लडिवाळ नातं जोडत... हे त्याहून नवलाचं आहे. संत नामदेव जसे विठ्ठलाशी हे लडिवाळ नातं निर्मून वर त्याच्याशी भांडण मांडतात, त्याच जातिकुळाचं बहिणाबाईंचं हे नातं
आहे. त्या स्त्री असल्यामुळे, ते तितकंच स्वाभाविकही आहे. कारण स्त्रीवर तसेच संस्कार होत होते, हे ऐतिहासिक सत्य आहे.
मराठीतील ब-याच स्त्रीगीतांतून धर्माचरणाचे, देवदेवतांचे व त्यांच्या उपासनेचे, पुराणातील आदर्श स्त्री-जीवनाचे, पातिव्रत्याचे, सतित्वाचे चित्रण केलेले आहे. या स्वरूपाच्या गीतांतून स्त्रीमनातील देवदेवतांविषयीच्या आणि पुराणातील व्यक्तींविषयीच्या श्रद्धा व्यक्त झालेल्या आहेत. असे असता बहिणाबाईंची ‘सरोसती’ मात्र लौकिक पातळीवर उतरते. ती देवता न वाटता साक्षात माय वाटते. पण आदिमाया कविता मात्र येडी माय वाटते.
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
बारा गाडे काजळ कुंकू
पुरलं नही लेनं
साती समुदराचं पानी
झालं नाही न्हानं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
धरतीवरलं चांदी सोनं
डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगळं
ते भी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
इडा पिडा संकटाले
देल्हा तूने टाया
झाल्या तुझ्या गयामंधी
नरोंडाच्या माया
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
बरहमा, इस्नू रुद्र बाळ
खेळईले वटी
कोम्हायता फुटे पान्हा
गानं आलं व्होटी
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नशिबाचे नऊ गिऱ्हे
काय तुझ्या लेखी?
गिऱ्हानाले खाईसनी
कशी झाली सुखी?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नऊ झनासी खाऊन गेली
सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तव्हा
कुठ राहिन सुर्टी
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?