आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरी जाणोन घ्‍यावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात लौकिकार्थाने चौसष्ट वर्षं होणार बाळाला. तुमचे गुरुजी एक लहान मूलच आहेत, इति अद्वयमाता. चाळिसाव्या वर्षी ओळख झाल्यावर बेटा म्हणून संबोधणारी सुनीतीकाकू छान बोलते, असं मी म्हटलं तर गुरुजींची ही भावजय तशी त्यांच्यापेक्षा थोडीशीच मोठी तरी त्यांनाही ती बेटा म्हणते, असे ते कौतुकाने म्हणाले. जयंत इतके छान कार्यक्रमाचे संयोजन करेल याची कल्पना नव्हती, असे काकूने समारंभात जाहीर केले तेव्हा त्या शाबासकीने गुरुजींच्या चेह-यावर केवढे हसू उमटले. आणि हो, लहान मुलासारखेच प्रशस्तीच्या मोहात असूनही लोकांत अवघडून ते दूर जाऊन बसले.

ओह! साठ वर्षांच्या गुरुजींचे सहा वर्षांच्या पोरासारखे वर्तन सहन करणे तसे मुश्कील. वृद्धत्वी शैशव जपण्याचे आवाहन करणा-यांनी अनुभवच घ्यावा. आवडले तर चिकाटी, अन्यथा तडक नाराजी. राग-लोभ, फायदा-तोटादी व्यावहारिक विकार स्पर्शणार नाहीत. सामान्यांच्यात असे जीवन अवघडच. मागच्याही कित्येक जन्मांत ते सहा वर्षांच्या पोरासारखेच वाढलेत म्हणे. कुणीही कधीही काही कर म्हणेल, सहज म्हणून धपाटा घालेल, सांगायचे कुणाला? आई दूर. शर्टाच्या बाहीने कुणाला न दिसेलसे डोळे पुसून पुन्हा खेळात रमायचे असे त्यांनी सांगितले तेव्हा मला एक गोष्ट कळाली, पुरुषयंत्राला भावनांचा कप्पा जपूनच उघडण्याचा शाप आहे. आमोद म्हणाला, ‘अल्कोहोल वर्ज्य म्हणून अपेयपानवाले क्लासमेट्स अथवा निकोटिन वर्ज्य म्हणून धूम्रपानवाले शिक्षकसुद्धा वर्ज्य असे पब्लिकला सांगून तू तिथून निघून जातेस. मलाही या गोष्टी तुझ्याइतक्याच तीव्रतेने तिरस्करणीय वाटतात. पण मी मुलगा, म्हणून व्यक्त नाही करू शकत. किंबहुना मला त्याची सवय करावी लागते. समुद्रकिनारा, फुलांचा दरवळ मलाही भावतात, पण अशा प्रत्येक वेळा माझी उत्कटता व्यक्तवायला पुरुष म्हणून समाजाची मर्यादा.’

तेव्हापासून मला भेटलेल्या सौंदर्यात मी आमोदला आठवणीने भागीदार करून घेतेय, त्याच्या उत्कट संवेदनांना दाद देतेय.
विशाल म्हणतो, ‘मुलगी असल्याने तुझ्या जाणिवा आजही प्रखर आहेत. लहानपणी त्या माझ्याही तशाच होत्या. आता आमच्या कन्यांच्या मी पाहतो आहे. कालानुसार आमच्या बोथटल्या. मुलगा असल्याने भावना उफाळून येणे अपेक्षित नाही याचा संस्कार बनत गेला. यात आई-बाबा, मित्र, बायकोचेसुद्धा योगदान आहे. आता माझ्या मुलींनी तरी मला त्यांच्यातला मित्र म्हणून समजून घ्यावे.’ नव-याच्या बालिश (?) वागण्याची किरकोळीत तक्रार करणारी मृणाल नि मुलगा म्हणून संवेदनांना फाटा देण्यास भाग पडलेला नाराज विशाल...

आईला काय होतंय, तिला काही मदत हवीय का हे मी आईलाच विचारून घ्यावं, असं एकुलत्या चिरंजीवांनी म्हटलं तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्याला फटकारलं, ‘मुली नाही घरच्या पुरुषांना बरे नसते तेव्हा समरसतेने सेवा करीत, आजारपणात कसला स्त्री-पुरुष भेद?’ त्याच्या आईकडूनच ऐकलं, ‘हर्षलला कसं सांगणार? माझाच झाला तरी मुलगा आहे नं तो.’ तेव्हा मला हर्षलच्या मनाची तगमग कळोन आली. दवाखान्यातल्या आईसाठी रजा न काढता केवळ रात्री तिच्यासोबत राहणे हेच उभयपक्षी श्रेयस्कर असल्याचे मला रुचले नाही तरी पटले. एक-दोनदा काकू आजारी असताना, काका लोकांनी हतबुद्ध होऊन त्यांची मुलगी येईपर्यंत काकूंना सोबत करण्यास विनवल्याचे आठवले. स्त्री-पुरुष हा फरक आपपरभावापेक्षा अधिक ठळक आहेसे वाटले. शिवरात्रीच्या दिवशी माझी आई, तिची एक अशक्त मैत्रीण, एक सशक्त मैत्रीण नि तिचा नवरा अशी डोंगरावरच्या महादेवाला चाललेली. चढताना अशक्त मैत्रिणीचा नेम चुकला, ती पडणार हे दिसतेय तरी वयाच्या मानाने धावून आधार देणे आईकडून विलंबानेच झाले नि तेवढ्यात त्या मैत्रिणीचे फ्रॅक्चर वगैरे घडले. मावशी काकांना ओरडते, ‘होता ना जवळ? दिला असतात हात तर.’ मागाहून काका म्हणाले, ‘होतो शेजारीच, पण वहिनींना हात धरून आधार द्यायचा की कसा या द्वंद्वात.’ अरेरे! सद्भावनांवर रूढींची मात!

घर मिळेपर्यंत माझ्या घरी राहणार हे अध्याहृत असूनही गुरुजींनी दामोदरला फ्लॅटची किल्ली देऊन सांगितलं, ‘आरामात राहा. आमच्या घरी कन्या, पुतणी येणार म्हणून एक सेल्फ-कंटेंड खोलीसुद्धा आहे.’ मी चमकून विचारलं, ‘मी एक मुलगी विभागात आले तेव्हा तुम्ही असं नाही सांगितलं?’ ‘मॅडम, आता वर्षभराची ओळख झाल्यावर हे तुम्ही विचाराल. पहिल्याच दिवशी म्या सड्याफटिंगाने निमंत्रण दिले असते तर कुणाला रुचले असते? सेल्फ-कंटेंड रूममध्ये जाण्याआधी पुरुषी पसारा बघून बिचकला असतात. मुक्त विचाराच्या तुम्ही जमवून घेतलेही असते कदाचित. तेव्हा सामान्यांपेक्षा भिन्न तुमच्याशी आमची ओळख नव्हती. एकट्या पुरुषाला चपराक नको म्हणून सावध वागावे लागते.’ उत्तर विचार करायला लावणारं. तेव्हापासून त्यांच्या वतीने एखाद्या स्त्रीशी बोलण्यास बहुधा मी नाही नाही म्हटले. महिन्यातून पाळी नि रोजची दाढी या कटकटी तुल्य नाहीत. निसर्गाने पुरुषांना झुकते माप दिले असं मीच म्हटलेलं. पंचाहत्तरीत हजामतीला कंटाळलेले बाबा केस-दाढी-मिशी मुक्त वाढवतायत तेव्हा सुरुवातीला आइनस्टाइन नि नंतर मुनी होण्याची हौस दिसण्यात भागवतायत अशी मी टिंगल केली तरी तो क्षण अंतर्मुख करणारा होता. स्त्रीची निवृत्ती नैसर्गिक. पुरुषयंत्रास ही सुविधा उपलब्ध नाही. इथे भावनांचा उद्रेक म्हणजे संकटालाच निमंत्रण. चिरंजीवित्व भोगणारा अश्वत्थामाच आठवला. छोट्या दोस्तांचा एक आरोप चक्रावणारा, मावशी नेहमीच ‘गर्ली’ रांगोळ्या काढते. कॉलेजमध्ये शुभाला सिगारेटच्या जाहिरातीतील हीरो ‘मॅन्ली’ वाटला ती माझी ‘मॅन्ली’शी पहिली ओळख. ते केवळ शब्दांचे बुडबुडे हे समजण्यास तिला संसाराची किंमत चुकवावी लागली. रांगोळी हा विषयच गर्ली म्हणून मॅन्ली भाच्यांनी झिडकारला नाही हेही नसे थोडके! त्यांचे अभिनंदन करून मी बोटांना रांगोळीत रोबोट, विमान असले मॅन्ली आविष्कारपण झरविण्याची आज्ञा दिली.

मुलांची शूची जागा पाहण्याची उत्सुकता दाखविल्याबद्दल एका छोट्या मुलीला शिक्षक-पालकांनी कठोर शिक्षा केल्याचे वाचले नि दत्तक बहीण ही वेगळी कशी या मुलाच्या प्रश्नाच्या आधारे छोट्यांना जैविक पालक, बाळाचा जन्म ही वैज्ञानिक प्रक्रिया चित्रांतून समजावणारी समंजस स्मिता आठवली. त्या गंभीर चर्चेच्या शेवटी ती चार-पाच वर्षे वयाची मुले म्हणाली, ‘कळलं, एका वेळी एकच बाळ का. आईच्या पोटात दोन बाळांसाठी पैस जागाच नसते. दोन बाळं जन्मणार म्हणजे आईला दोनदा त्रास, तेव्हा दत्तकच छान.’ ही शिकलेल्या आईची ताकद!

बाळासाठी एखाद्या सखीने ऑफिस, अभ्यास, काम काहीही चुकवले, अगदी करिअरही हुकवले तरी मी त्या सखीचे अभिनंदन करते, मला दिसत असतात पुढच्या चौसष्ट वर्षांना संवेदनशील जीवन देणारे तिचे हात. विद्यमान व्यावहारिक नुकसान भरून काढण्यासाठी तिच्या हातांशी मी माझे हात जुळवते. तुमचे सर्वांचे हात आमच्या हातांना मिळोत, अशी प्रार्थना करते.