आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिमत्त्वाचा टर्निंग पॉइंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपलं प्रतिबिंब न्याहाळणारे असंख्य लोक असतात, मात्र त्या प्रतिबिंबाच्या, प्रतिमेच्या प्रेमात किती जण असतात? स्वत:च्याच प्रेमात असणा-याला आपण नार्सिसिस्ट म्हणतो. असंख्य कलाकार नार्सिसिस्ट म्हणून माहीत आहेत आपल्याला. केवळ कलाकारच कशाला असंख्य लोक, महिला असोत किंवा पुरुष, स्वत:वर खूश असतात आणि केवळ स्वत:भोवतीच गिरक्या घेत जगत असतात! काही मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रचंड प्रमाणात मिळालेलं सौंदर्य, पैसा आणि बुद्धिमत्ता यामुळेदेखील व्यक्ती स्वत:वरच प्रेम करणारी बनू शकते. स्वत:वर खुश असणं वेगळं आणि दुस-यांची दखलही न घेता जगणं वेगळं.स्वत:च्या मनाप्रमाणे नाही झालं तर चिडचिड करणं किंवा दुस-यांवर राग काढणं चुकीचंच! एका संशोधनात आढळून आलंय की जगात नार्सिसिस्ट लोकांचं प्रमाण फार वेगानं वाढतंय. सामान्यत: पुरुष जास्त नार्सिसिस्ट असले तरी आजकाल स्त्रियांमध्ये हे वैशिष्ट्य जास्त झपाट्याने पसरू लागल्याचं आढळू लागलंय. आणि याला निर्विवादपणे कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली, जी अधिकाधिक आत्मकेंद्रित होऊ लागलीय! याचा एक प्रत्यय येतो वाढत्या कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरींच्या रूपात!
स्वत:ची प्रतिमा आणि त्या पलीकडचा खरा स्व यांमधला भेद न ओळखू शकणारे असे नार्सिसिस्ट आत्ममग्न, आत्मग्रस्त, आत्मध्यासी, आत्मरत, आत्मावर्ती किंवा स्वार्थीपणे वागायला लागतात ज्यामधून ते दुस-याच्या सन्मानाला, प्रतिष्ठेला इजादेखील करून जातात.
हे सारं ते स्वत:ला निराशेच्या गर्तेत कोसळण्यापासून वाचवण्याकरता किंवा नाकारल्या जाण्याच्या शक्यतेला आणि अपराधभावाला कमी करण्याकरता करतात, असं विश्लेषण समोर ठेवण्यात आलंय.
या व्यक्तिमत्त्वाचं दुसरं टोक म्हणजे स्वत:ला सतत नाकारणारे, स्वत:वर अज्जिबात प्रेम करू न शकणारे लोक, जे सतत दुस-यांच्या ओंजळीने पाणी पितात, दुस-यांवर निर्णय आणि भावनिक बाबतीत अवलंबून असतात. असे लोक स्वत:ला उपयुक्त नसलेले मानतात. न्यूनगंडग्रस्त असलेले हे लोक स्वत:वर सतत टीका करणारे, स्वत:मध्ये विश्वास नसलेले असतात. अशा नकारात्मक मनोवृत्तीमुळे त्यांच्यामध्ये निराशा आणि एक प्रकारची भीती आढळून येते. या प्रकारच्या मानसिकतेमुळेदेखील व्यक्ती आपलं नुकसान करून घेत असते. जिथे काही करायची संधी असेल तिथे ‘मला जमणारच नाही’सारख्या वाक्यांना मनात घोळवत असल्याने एक हतबलता ते स्वत: अनुभवत असतात.
कुटुंबांमध्ये किंवा समाजातही वावरताना टोकाची नार्सिसिस्ट किंवा स्वत:ला सतत नाकारणारी वृत्ती कुसमायोजनाला आमंत्रण असते. लोकांच्या भावनांची कदरच न करणारे नाकारले जातात तर स्वत:वरच टीका करणारे दु:खी होत राहतात. या दोन्हीचा सुवर्णमध्य हवा.
कुटुंबव्यवस्था ही एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाला जपण्यासाठी, व्यक्तिमत्त्वाला आधार देण्यासाठी असली तरी खूप आत्ममग्न असणा-यांना ही कुटुंबव्यवस्था स्वातंत्र्यावर गदा आणणारी वाटू शकते. या उलट आत्मविश्वास नसलेले जेव्हा सोबत असतात तेव्हा त्यांच्या कमकुवत मनामुळे इतरांना त्यांचं ओझं वाटायला लागू शकतं. यातून उद्भवतात भांडणं, नाराजी. आपल्याला कोणीच समजून घेत नसल्याची भावनाही यातून मूळ धरू शकते. मोकळा श्वास घेण्याला वाव राहत नाही. सतत ‘अहो अहो’ करणा-या बायका याच सदरात मोडतात.
जर आपल्या मनोवृत्तीची जडणघडण आपल्या लहानपणात, बालसंगोपन पद्धती आणि आपल्या जीवनानुभवावर अवलंबून असेल, तर आपला स्वभाव आपण बदलूच शकणार नाही का?
मंडळी, स्वभावाला औषध नसतं याचा खरा अर्थ असतो की स्वभावाला बदलायचं तर औषध नाही, आपल्या विचारांवर ऑपरेशन करावं लागतं! आपल्याला जी बदलण्याची क्षमता मिळालीय ती केवळ विलक्षण आहे. अनेकांना वाटत असेल की आपण बदलूच शकणार नाही स्वत:ला आणि जर त्यांचा तसा ठाम विश्वास असेल तर मात्र ते नाहीच बदलू शकणार स्वत:ला! मात्र जर आपण विश्वास ठेवला की आपण केव्हाही स्वत:चे व्यक्तिमत्त्व हवे तसे घडवू शकू तर आपल्याला नक्कीच परिवर्तन घडवून आणता येईल. हा मनाचा मोकळेपणा फार महत्त्वाचा. सगळ्यात मोठी अडचण जर कोणती
असेल स्वत:ला बदलवताना तर ती म्हणजे ‘लोक काय म्हणतील’ याची.
आपल्याला आपल्या वागण्याची सवय होत जाते, अर्थात दुस-यांनादेखील होतेच. पण जर आपल्या वागण्यामुळे इतरांना आणि आपल्यालाही तोटा होणार असेल तर ते बदलायला हवे, याची जाणीव होणे, परिवर्तनाची इच्छा होणे हाच खरा जीवनातला र्टनिंग पॉइंट असतो. आता तुम्ही म्हणाल की सिंहाने गवत खायचं का? तर प्रतिप्रश्न असेल की हे ‘सिंह असणं’ कोणी ठरवलं? विकासाचे दरवाजे बंद करणारी, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारी कोणत्याही प्रकारची मानसिकता बदलायला हरकत काय? मात्र त्यासाठी हिंमत लागणारच, ती आपल्यात आहे हे जाणू या.
हेच सुधीर मोघेंच्या शब्दांत अर्थगर्भपणे समोर येतं...
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राउळ
किती खरंय ना? आपण ठरवू तसं मन, ते देवदत्त किवा दैवदत्त पण नाही. आपण घडवू आपण ठरवू तसं असणार आपलं मन! त्याला आपलंसं करायचा, त्याचे मनोगत जाणायचा प्रयत्न करायला हवा. कधी ते सोप्पं होतं अगदी ‘बे दुणे चार’इतकं तर कधी ‘एक अधिक एक’ची बेरीजदेखील जुळत नाही. पण म्हणून त्या मनाच्या चैतन्याला अजिबात निसटू द्यायचं नाही. त्याला समजून घ्यायचं, इतकंच नव्हे तर त्याला लहानग्याइतकं जपायचं कारण त्याच्याइतकं आपलं दुसरं काहीच नसतं!
swatidharmadhikarinagpur@gmail.com