आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणूस न पाहिलेला कवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली जिल्ह्यातील पलुसला कवी संमेलन सुरू होतं. कवीचं नाव पुकारल्यावर कवी यायचा, कविता सादर करायचा. कवी संमेलन मध्यावर आल्यावर निवेदकानं नाव घेतलं, आता आपल्यासमोर येणार आहेत, अंध कवी... ‘अंध कवी’ हा शब्द ऐकल्यावरच मंडपात चुळबुळ सुरू झाली. लोकांच्या नजरा अंध कवीचा शोध घेऊ लागल्या. मंडपात पहिल्या रांगेत बसलेला पायजमा, शर्ट घातलेला एक माणूस उठला. पण ‘हा माणूस कसली कविता म्हणणार?’ गर्दीच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. एका तरुणाने या अंध कवीच्या हाताला धरून त्यांना स्टेजवरच्या माइकसमोर उभं केलं. या कवीनं एका हातानं माइक चाचपला. थोडं खाकरला… म्हणाला, माझ्या कवितेचं नाव ‘स्वप्न बापूंचे’ आणि मोठ्या आवाजात त्यांनी कविता सादर करायला सुरुवात केली...
गांधीजींचे स्वातंत्र्याचे स्वप्न किती महान होते
लोकशाही शब्दाचीही आज आम्हाला घाण येते
सत्तेच्या स्वार्थासाठी जेव्हा येथे आणीबाणी
आंबेडकर पुतळ्याच्याही डोळ्यात तेव्हा येते पाणी
कवीचा आवाज वाढत चालला होता. बघता बघता कविता संपली आणि मांडवात टाळ्यांचा कडकडाट झाला.
चंद्रकांत देशमुखे. सांगली जिल्ह्यातील कडेगावचे. जन्मत:च अंध. त्यामुळे शाळा, शिक्षण, धडे, कविता या गोष्टी वाट्यालाच आल्या नाहीत. १९५०च्या दरम्यानचा तो काळ. जिथं औपचारिक शिक्षणाची दुरवस्था तिथं अंधांसाठी असणारं विशेष शिक्षण मिळणं अवघड बाब होती. त्यांचे भाऊ, बहिणी शाळेत जायचे, तेव्हा ते एकटेच घरी बसून असायचे. भाऊ-बहिणी त्यांना शाळेतील गमती-जमती सांगायचे. काही धडे, गोष्टी वाचून दाखवायचे. कधी कधी हौसेने या अंध भावाला शाळेतही घेऊन जायचे.
देशमुखेंना कळायला लागल्यावर मात्र घरात एकट्याला करमेना. मग त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी रेडिओ घेऊन दिला. रेडिओमुळं त्यांची करमणूक व्हायला लागली. वडील त्यांना वृत्तपत्रेही वाचून दाखवू लागले. यातून त्यांची समज वाढत गेली.
देशमुखे पंधरा वर्षांचे असताना, १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. या युद्धाच्या बातम्या त्यांना रेडिओवरून कळायच्या. युद्धातील समरप्रसंग ऐकून त्यांना वाटायचं, आपणही देशासाठी काहीतरी करावं. मनात सारखी घालमेल सुरू व्हायची. रात्री या विचारानं झोपही यायची नाही आणि विचारांच्या तंद्रीत असताना एका सकाळी त्यांना कविता सुचली. ती कविता त्यांनी सिनेमागीताच्या चालीवर पाठ केली. गावातील काही लोकांना ते ही कविता ऐकवू लागले. देशप्रेम व्यक्त करणारी ती कविता ऐकून माणसं त्या कवितेला दाद देऊ लागली. त्यांच्या गावातल्या शाळेत एक कलापथक होतं. त्या कलापथकानं त्यांच्या कार्यक्रमात ती कविता घेतली. त्यामुळं ती आसपासच्या खेड्यात गेली. सोबत त्यांचं नावही पोहोचलं. कडेगावला बाजारासाठी येणारे आसपासच्या गावचे लोक देशमुखेंना भेटून कविता ऐकल्याचे सांगत. तेव्हा त्यांना हुरूप येऊ लागला. मग त्यांनी ठरवलं, आता इथून पुढे हेच काम करायचं. कविता लिहायच्या आणि लक्षात राहण्यासाठी त्यांना सिनेमातील गाण्यांच्या चाली लावायच्या. ते म्हणतात, ‘आपण लोकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी कविता लिहितोय, याचा अभिमान वाटायला लागला. मला कवितेतून नाव, प्रसिद्धी काही नको होतं; पण आपोआपच आसपासच्या १५-२० खेड्यांत माझं नाव पोहोचलं होतं.’
१९६५ ते १९८३ पर्यंत अंध कवी चंद्रकांत देशमुखे कडेगाव आणि आसपासच्या खेड्यातच माहीत होते. त्यांची कविता ही याच भागात मर्यादित होती. लोकही त्यांच्याकडे गाणी लिहिणारं माणूस, असंच बघत होते. १९८३मध्ये ग्रामीण साहित्य संमेलन घेणाऱ्या राघव शिवणीकर यांना देशमुखेंिवषयी समजलं. ते देशमुखे यांना शोधत कडेगावला आले. त्यांनी एका ग्रामीण साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. तोपर्यंत अशा एकाही साहित्य संमेलनाला देशमुखे गेले नव्हते. या संमेलनातल्या मोठ्या कवींना त्यांची कविता आवडेल काय? अशी धास्ती मनात घेऊनच, ते या कार्यक्रमाला गेले. पण हे संमेलन अंध कवी देशमुखे यांच्या कवितेनेच गाजलं. त्यांची कविता ऐकून रसिकांनी दाद दिलीच, पण या संमेलनाचे अध्यक्ष ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत कविता ऐकल्यावर उठून त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना आलिंगन दिले. त्या दिवसापासून अंध कवी देशमुखे तालुका, जिल्हा स्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांना जाऊ लागले.
‘जे देशाच्या, समाजाच्या हिताचं आहे, ते कवितेतून मांडलं जावं. लोकांच्या चांगुलपणावर प्रेम करावं, वाईटपणावर कोरडे ओढावेत.’ देशमुखे सांगतात, ‘कवी अगोदर कार्यकर्ता असावा, मग कवी.’
देशमुखेंच्या कविता एकदम सोप्या भाषेत आहेत. त्यांना विषयाचं वावडं नाही. गांधीवादापासून ते अलीकडच्या काळातील ऊस आंदोलनांपर्यंत त्यांनी कविता लिहिल्या आहेत. शेतकऱ्यांचं ऊस आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला उग्र स्वरूप आलेलं. सगळीकडे साखर कारखानदारांच्या विरोधात वातावरण तयार झालेलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं.
अश्राप समजून आम्हाला आजवर गुलाम केले
पेटून उठलो आम्ही तर फुटतील उसाला भाले
पोथीतील वाल्या कोळी पोटास्तव वाटा मारी
धडधडीत चालते येथे नोटास्तव काटामारी
शोषून रक्त गरिबांचे पाप्यांचे रांजण भरले
पेटून आम्ही उठलो, तर फुटतील उसाला भाले
गंमत म्हणजे, ऊस आंदोलनात देशमुखे यांची ही कविता अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाइलची रिंगटोन बनली होती.
‘महामानवांचा विचार लोकांच्या ओठात असतो. राजकारणी महामानवांची नावे घेऊन राजकारण करण्यात पटाईत असतात, त्यांना विचारांशी देणंघेणं नसतं.’ हे देशमुखेंचं मत. यावर त्यांनी लिहिलं-
मूकपणे सार सोसणं, हा माझा स्वभाव नाही
आता या देशामध्ये बापू तुम्हालाच भाव नाही
गांधीवाद ओठात आहे
फक्त स्वार्थ पोटात आहे
प्रत्येक क्षेत्रात बड्यांचं
अंतिम ध्येय नोटात आहे
बोलण्याप्रमाणं चालण्याचा कोणालाच सराव नाही
बापू या देशात तुम्हालाच भाव नाही.
मानवतेच्या कल्याणासाठी दारूबंदी केली तुम्ही
पैसे मिळवण्यासाठी नवी संधी शोधली आम्ही
पित नाही दारू असं एकसुद्धा गाव नाही
बापू या देशात तुम्हालाच भाव नाही
अशा कवितांसह देशमुखे कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संमेलनांना उपस्थित राहतात. अगदी बेळगावच्या मराठी भागातही हा कवी पोहोचला आहे. तिथल्या मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनासाठी देशमुखेंनी हजेरी लावलेली आहे. फ. मु. शिंदे, रामदास फुटाणे यांनी कराडच्या साहित्य संमेलनात देशमुखेंचा गौरव केला आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनीही एका पुस्तकात त्यांची नोंद घेतली आहे.
त्यांच्याशी बोलताना अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. कराडजवळ असलेल्या चचेगावात घडलेला एक प्रसंग. त्या गावात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एका महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सुरू होते. त्या शिबिरात कवितावाचन करण्यासाठी देशमुखे गेले होते. नुकतंच कारगिलचं युद्ध झालेलं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढील कविता सादर केली.
दिल्लीतून आमचे नेते शांततेची हाक देतात
सीमेवरून गावाकडं जवानांची प्रेते येतात...
संपूर्ण कविता वाचल्यावर एक वयस्कर माणूस स्टेजवर आला. तो देशमुखेंच्या गळ्यात पडून रडायला लागला. तो का रडतोय, हे देशमुखेंना कळेना. स्टेजवरच्या कुणीतरी सांगितलं, त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी युद्धात शहीद झाला होता. त्याच्या आठवणीत ते रडत होते.
कडेगाव-देशमुखेंची रस्त्याकडेची खोली… त्यांच्यासमोर छोटा डेस्क. बाजूला फोन. मांडीशेजारी चालू असणारा रेडिओ ऐकतच समोर बसलेल्या सहकाऱ्यांशी गप्पागोष्टी करत बसलेले देशमुखे… कुणीतरी आत डोकावतं… त्या पावलाचा आवाज ऐकून ते आवाज देतात,
‘कोण हाय?’
‘काका मी हाय’ तो नुसता ‘मी’ आहे म्हणतो, नाव सांगत नाही.
‘कोण चेअरमन… या…’
मग ते स्वयंपाकखोलीकडं मान वळवून आवाज देतात.
‘पोरांनो, तीन कप कॉफी आणा रं.’
येणाऱ्या माणसाला कॉफी पाजणं आणि नवी कविता ऐकवणं, हे दोन शौक त्यांनी जोपासले आहेत. अंधत्वामुळं ते संसाराच्या वाटेला गेले नाहीत, पण नेटका संसार करण्याचं मार्गदर्शन मात्र ते करतात. कविता, साहित्य याचा कसलाही गंध नसलेले त्यांचे मित्र सल्ला घ्यायला त्यांच्याकडे येतात. त्यांनी माणसं पाहिलेली नाहीत, पण न पाहिलेल्या माणसावर अफाट प्रेम केलंय. जितकं कवितेवर तितकंच माणसांवरही. म्हणूनच कडेगाववरून जाणारा त्यांच्या ओळखीचा एकही कवी, लेखक त्यांना भेटल्याशिवाय पुढं जात नाही. एखादा खूपच लांबून आला असेल, तर त्याला जाताना हमखास विचारणार, ‘बाबा, गाडीभाड्याला पैसे आहेत का?’ त्यांच्या या आपुलकीनं तो कवीही गहिवरून जातो. त्याचे डोळे पाण्यानं डबडबतात. मग अंध कवी देशमुखेही त्याला दिसत नाहीत आणि तोही देशमुखेंना…
संपत मोरे
sampatmore25@gmail.com
(लेखकाचा मोबाईल क्र. ९०११२९६९०१)
बातम्या आणखी आहेत...