आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Blood Pressure By Dr. Ramakant Panda, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्तदाबाचे स्वपरीक्षण केल्याने मिळू शकतात सुधारित परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला रक्तदाब आपण नियमितपणे घरातच तपासून पाहिला तर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे निष्कर्ष एका नवीन संशोधनातून प्राप्त झालेले आहेत. आपण आपल्या रक्तदाबाचे नियमित परीक्षण करण्यासाठी वैद्यकीय मदत घेतली तर कदाचित कमी वेळात अधिक चांगले परिणाम प्राप्त होतील, असा निष्कर्ष ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या जर्नल ऐनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालामध्ये मांडण्यात आला आहे.
बोस्टन येथील टफ्ट्स मेडिकल सेंटरचे हेल्थ पॉलिसी स्टडीज आणि इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्चमधील प्रमुख संशोधक डॉ. एथन बाल्क यांनी याविषयी सांगितले, ज्या प्रौढ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि ज्यांना आपल्या आरोग्य सेवा केंद्राच्या मदतीने घरीच आपल्या रक्तदाबाचे नियमित निरीक्षण करण्याची इच्छा आहे आणि तशी त्यांची क्षमताही आहे, त्यांच्यासाठी अशा प्रकारे रक्तदाबाचे स्वपरीक्षण खूप उपयोगी ठरू शकते. किमान काही काळासाठी तरी रक्तदाब कमी राहावा आणि शक्यतो कार्डिओव्हस्क्युलर आजाराचा धोका टळावा यासाठी अशा परीक्षणाचा उपयोग होऊ शकतो.

रुग्णाचा आहार, व्यायामाने नियंत्रण शक्य : डॉ.बाल्क यांनी सांगितले, रक्तदाब परीक्षणातील सुधारणा आणि घेतलेले आवश्यक उपचार, एखाद्या रूग्णाचा आहार नियंत्रणात रहावा व शारीरिक व्यायामामध्ये वाढ व्हावी यासाठी दिल्या जाणा-या प्रोत्साहनांमध्ये वाढ यासारखी अनेक कारणे रक्तदाब नियंत्रित राहण्यामागे असु शकतील. किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची अतिरीक्त मदत मिळाल्याने रूग्णाला अधिक लाभ होऊ शकतात हेही स्पष्ट झाले नाही.
डॉ.एथन बाल्क, सहका-यांनी केला ५० पेक्षा अधिक रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास : एक वर्षापेक्षा अधिक काळानंतरही या परीक्षणामुळे तेवढेच लाभ मिळतील की नाही ते समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचेही डॉ.बाल्क यांनी सांगितले. घरी केलेल्या रक्तदाबाच्या परीक्षणाची परिणामकारकता जाणून घेण्यासाठी डॉ.बाल्क यांच्या सहका-यांनी ५० पेक्षा अधिक रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास केला. अमेरिकेसारख्या देशातही उच्च रक्तदाब असलेल्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांवर पुरेसे उपचार होत नाहीत. भारतामध्ये, जवळजवळ ७० टक्के नागरिकांना स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची जाणीव नसते. त्यामुळे स्वतःच्या रक्तदाबाचे स्वतःच परीक्षण केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल.

आकडेवारीची नियमित नोंदही करावी लागेल : रक्तदाबाचे स्वपरीक्षण करताना प्रत्येक वेळेस प्राप्त झालेल्या आकडेवारीची नियमित नोंदही करावी लागेल. ज्यामुळे तुमची रक्तदाबावरील औषधे योग्य आणि परिणामकारकपणे काम करत आहेत की नाही हे जाणून घेणे वैद्यकीय तज्ज्ञांना सोपे जाईल. जर उच्च रक्तदाबावर योग्य नियंत्रण ठेवले नाही तर त्यामुळे स्ट्रोक, डोळे आणि मूत्रपिंडाची हानी, हृदयविकार, शारीरिक अक्षमता असे अनेक आजार उद्भवू शकतात.

रुग्णांचा सहभाग महत्त्वाचा, नियमितपणे परीक्षणांच्या नोंदी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवून सल्ला घेणे महत्त्वाचे : अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनासह सर्व मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सूचित केले की उच्च रक्तदाब रुग्णांनी रक्तदाबाचे घरातच नियमितपणे परीक्षण करावे, अशा प्रकारच्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले. यामुळे रक्तदाब उत्तम रीतीने नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्तदाब तपासून पाहणे, त्याचे नियमित निरीक्षण करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्याविषयीचे उद्दिष्ट साध्य करणे, तेच साध्य झाल्यानंतरही तीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व प्रक्रियेमध्ये रुग्णांचा सहभाग करून घेणे महत्त्वाचे आहे, हीच बाब उपरोल्लेखित निष्कर्षांमधून स्पष्ट होते. ठराविक कालावधीनंतर नियमितपणे या परीक्षणांच्या नोंदी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवून सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.

कफ-स्टाइल अपर-आर्म मॉनिटर या प्रकारचे उपकरण निवडावे
रक्तदाब तपासून पाहण्यासाठी कफ-स्टाइल अपर-आर्म मॉनिटर या प्रकारचे उपकरण निवडावे, असे अमेरिकन हार्ट असोसिशनने सूचित केले आहे. मनगटी किंवा बोटावर ठेवण्याच्या मॉनिटर उपकरणांवर प्राप्त होणारी आकडेवारी ही कमी विश्वासार्ह असल्याने त्यांचा वापर करू नये, अशीही सूचना या संस्थेने केलेली आहे. वयस्कर व्यक्ती किंवा गरोदर महिलांकरिता वापरण्यात येणारी उपकरणे, विशेषत्वाने त्यांच्याकरिता वापरण्यास योग्य असल्याची वैधता प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आत्ता चर्चेत असलेल्या या अहवालाकरिता बाल्क यांच्या सहकारी गटाने संबंधित विषयावर प्रसिद्ध झालेल्या ५२ अभ्यास अहवालांचा आढावा घेतला. या अभ्यास-अहवालांमध्ये रुग्णांनी स्वतःचा रक्तदाब इतरांच्या मदतीने आणि मदतीशिवाय तपासून पाहिल्याची नोंद होती. समुपदेशकांकडून दूरध्वनीवर प्राप्त माहितीपर्यंत घटकांची मदत उपलब्ध झाली.

वैद्यकीय मदतीशिवाय घरी बी पी तपासणे यांना हे अभ्यास िनष्कर्ष लागू होत नाही : ते पुढे म्हणतात, इथे एक महत्त्वाची बाब ही आहे की संबंधित माहितीचे संकलन व उपयोग करून घेणारे वैद्यक तज्ज्ञ आणि/किंवा परिचारिकांच्या मदतीने रक्तदाबाचे स्वपरीक्षण करण्याची प्रक्रिया इथे विचारात घेतलेली आहे. बाल्क यांनी पुढे असेही सांगितले की, जे रुग्ण कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय घरच्या घरी रक्तदाब तपासून पाहण्याचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी या अभ्यासातील निष्कर्ष लागू होत नाहीत.

निष्कर्ष
घरगुती रक्तदाब परीक्षण सहा महिन्यांसाठी तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने वर्षभर बी.पी वर नियंत्रण शक्य

या प्रक्रियेमध्ये असे निष्कर्ष प्राप्त झाले की घरातच रक्तदाबाचे परीक्षण केल्याने सहा महिन्यांपर्यंत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात सुधारणा होत गेली मात्र, १२ महिन्यांपर्यंत असे झाले नाही. जेव्हा रुग्णांना शैक्षणिक साहित्य किंवा वैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संपर्क साधल्यानंतर मदत-मार्गदर्शन मिळाले, तेव्हा मात्र सहा महिने आणि १२ महिन्याच्या कालावधीतही रक्तदाबाच्या घरगुती परीक्षणातून रक्तदाबावरील नियंत्रण वाढण्यास मदत झाली. या माहितीवरून बाल्क यांच्या सहकारी गटाने असे अनुमान काढले आहे की घरगुती रक्तदाब परीक्षण अल्प कालावधीसाठी परिणामकारक ठरते.

(लेखक हे मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष आणि कार्डिओ-व्हॅस्क्युलर थोरॅकिक सर्जन आहेत.)