आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत रक्त पुरवण्‍याची अव्यवहार्य घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या निवडणुका जवळ येत असल्याने जीवनावश्यक घटक मोफत देण्याच्या घोषणा होत आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाने गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याची कमालीची आकर्षक पण अव्यवहार्य घोषणा केली आहे. 104 नंबरवर तुम्ही फोन केला की, एक व्यक्ती मोटरसायकलवर तुमच्यासाठी रक्त घेऊन येईल, अशी ही परीकथेत शोभणारी कल्पना राबवली जात असल्याचा दावा शासन करत आहे. 100 नंबर फिरवला की घरी पोलिस धावत येतील, अशी अपेक्षा करण्यासारखेच 104 नंबरचे आहे. राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे, हे सत्य असले तरी मोफत रक्त हा त्याला पर्याय असू शकतो का? हा रक्ताचा तुटवडा नेमका कसा निर्माण होतो? रक्तासारखी गोष्ट मोफत वाटत सुटल्यास त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? या प्रश्नांचा विचार ही योजना जाहीर करतानाच नव्हे, तर राष्ट्रीय रक्त संकलन धोरण (नॅशनल ब्लड डोनेशन अँड स्टोअरेज ‘पॉलिसी’) ठरवताना कधी झालेला नाही.
मोफत रक्त पुरवताना किंवा आपण जनतेनेही ते स्वीकारताना मुळात एवढे रक्त येणार कुठून, हा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हात पसरताना आणि मोफत रक्तावर हक्कसांगताना रक्तदानाचे प्रमाण किती आहे? हा विचार आम्हा सर्वांना माना खाली घालायला लावणारा आहे. रक्तदानाचे प्रमाण अल्प असताना 104 नंबर नादुरुस्त झाल्यास त्यासाठी शासनाला दोष देण्याचा आम्हाला हक्क नाही.
आता रुग्णाला रक्त किंवा प्लेटलेट्स देताना गरज नसतानाही केवळ भीतीपोटी ते दिले गेल्याने रक्ताचा कृत्रिम तुटवडा कसा निर्माण होतो, व अनावश्यक रक्तदानामुळे जंतुसंसर्गाचा धोका कसा वाढतो, हे पाहूया. मोफत रक्त पुरवताना तर हा धोका अधिकच तीव्र होत आहे. अत्यंत कमी कालावधीत प्लेटलेट्स व रक्ताचा क्षय करणारे मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू हे मोठ्या प्रमाणात आढळून येणारे आजार आहेत. या आजारांमध्ये प्लेटलेट्स व रक्ताची कमतरता ही जीवाणूंमुळे असते व तुम्ही कितीही प्लेटलेट्स दिले, तरी मूळ कारणांचा म्हणजेच जीवाणूंचा योग्य उपचार केल्याशिवाय रुग्ण बरा होत नाही. प्लेटलेट्स अगदी 10 ते 20 हजारांपर्यंत घसरले व शरीरात कुठेही रक्तस्रावाचे लक्षण नसल्यास प्लेटलेट्स देण्याची गरज नसते. 30 ते 40 टक्के रक्त व प्लेटलेट्सचे ट्रान्सफ्यूजन अनावश्यक असते. म्हणून रक्त व रक्त घटकांचा तुटवडा मेडिकल इमर्जन्सी असण्यापेक्षा सोशल इमर्जन्सी आहे, असे वाटते. शरीरात रक्त कमी असल्याचे आढळून येणारे सर्वसाधारण कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता. याचा उपचार म्हणजे, योग्य प्रमाणात लोहयुक्त आहार व आयर्नच्या गोळ्या असूनही, या कारणासाठी अनावश्यक रक्त दिले जाते. त्यामुळे रुग्णांनी उगीचच डॉक्टरांकडे रक्त देण्याचा हट्ट करू नये. कारण हे रक्त स्वीकारण्यातून काहीच साध्य होत नाही; पण रुग्णाला रक्तामधून इतर जंतुसंसर्गाचा धोका मात्र वाढतो.
रक्त स्वीकारण्यामुळे होऊ शकणारे जंतुसंसर्ग म्हणजे हिपॅटायटिस बी. सी. (कावीळ) व एच.आय.व्ही.. रक्तदान केलेल्या दात्यांकडून येणा-या रक्ताची एच.आय.व्ही.साठी तपासणी केली जाते. पण रुग्ण जर विंडो पीरियडमध्ये असेल तर त्याच्या शरीरात एच.आय.व्ही.चा संचार असूनही टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. अशा दात्याकडून रक्त स्वीकारले तर रक्त स्वीकारलेल्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. बहुतांश शासकीय रक्तपेढ्यांमध्ये फर्स्ट जनरेशन इलायझा या टेस्टचा वापर होतो, यात विंडो पीरियड 45 दिवसांचा असतो. या जागी फोर्थ जनरेशन इलायझा टेस्टचा वापर केल्यास हा विंडो पीरियड 14 दिवसांवर आणला जाऊ शकतो. याही पुढे जाऊन नॅट (न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्टिंग) या टेस्टमुळे विंडो पीरियड चार दिवसांवर येऊ शकतो. महाराष्ट्रात पहिली नॅट टेस्टिंग लॅब सुरू करणारे, अर्पण रक्तपेढी समूहाचे संचालक डॉ. अतुल जैन यांच्या मते, सध्या लोकांमधूनही नॅट टेस्टेड रक्ताची मागणी वाढते आहे. सध्या रक्त स्वीकारल्यामुळे होणा-या एच. आय. व्ही. संसर्गाचे प्रमाण 7 ते 8 टक्के आहे. नॅट टेस्टेड रक्त वापरल्यास हे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. पण ही टेस्ट महागडी असल्याने अजून आपल्या देशात प्रचलित नाही. भारत सोडून इतर सर्व देशांमध्ये या टेस्टचा वापर होत असल्याने रक्तदानामधून होणा-या एच.आय.व्ही.चा संसर्ग अगदीच नगण्य आहे. शासनाने मोफत रक्त पुरवण्याऐवजी, अनावश्यक रक्त देणे टाळण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवून आवश्यक असेल तेव्हा नॅट टेस्टेड रक्त वापरल्यास ती एक आदर्श रक्तपुरवठा योजना ठरेल.
amolaannadate@yahoo.co.in